अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचे नवे आकलन

विवेक मराठी    25-Sep-2019
Total Views |

1617 सप्टेंबर रोजी मॉस्को येथील पुश्कीन इन्स्टिटयूटमध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली.अण्णा भाऊ साठेंच्या जन्मशताब्दीनिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेतून उपस्थितांना अण्णाभाऊंच्या साहित्याचे नवे संदर्भ समजले.


''भारतीय जीवनमूल्ये हीच अण्णाभाऊंच्या साहित्याचे अधिष्ठान आहेत. त्यामुळे वैर-विद्रोहासारख्या तात्कालिक संकल्पनांना त्यांच्या साहित्यात स्थान नाही. अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून सत्य, करुणा, प्रेम, वचन अशा चिरंतन मूल्यांबरोबरच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आधुनिक मूल्यांचा पुरस्कार करतात. अण्णा भाऊ साठेंनी आपल्या मनोगतात म्हटले आहे की 'हा देश सुखी समाधानी व्हावा, समृध्द व्हावा आणि वैर, दुष्टावा लयास जावा अशी स्वप्ने पाहत मी लिखाण करतो. वैर-दुष्टाव्याचे घोर परिणाम दाखवत जुन्या पण प्रगत प्रथा पुढे आणव्यात, महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे यासाठी मी लिहितो.' म्हणजेच वैराने नाही, तर प्रेमाने समाजाचे भले होईल असे अण्णाभाऊंना वाटते आणि सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी तथागतांनी हाच विचार मांडला आहे. तथागत म्हणतात, 'वैराने वैर शमत नाही,तर अवैराने वैर शमते.'{ संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितले, तेच पसायदान अण्णाभाऊंच्या साहित्यातून प्रकट झाले आहे. अपार करुणा, परस्परांविषयी प्रेमभावना दर्शवणारे आणि सर्वांच्या सुखाची कामना करणारे अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आहे आणि ते चिरंतन भारतीय जीवनमूल्ये प्रसारित करण्याचे काम करते.'' पुश्कीन इन्स्टिटयूटच्या सभागृहात मी बोलत होतो. मुंबई विद्यापीठ आणि पुश्कीन इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एम.जी.डी. या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने 16 17 सप्टेंबर 2019 रोजी एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अशी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यामागे काय औचित्य? असा प्रश्नही अनेकांना पडू शकतो. 1963 साली सप्टेंबर महिन्यात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे रशियाच्या दौऱ्यावर गेले आणि पुढे चाळीस दिवस ते तेथे राहिले. या चाळीस दिवसांच्या अनुभवांवर आधारित 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवासवर्णनही त्यांनी लिहिले. अण्णाभाऊंच्या रशिया प्रवासाचे स्मरण करून पुन्हा एकदा रशियात जावे आणि तेथे त्यांच्या साहित्याचा जागर करावा, या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. दोन विद्यापीठे आणि एक सामाजिक संघटना यांच्या पुढाकाराने आणि अथक परिश्रमांतून ही परिषद आकाराला आली. या परिषदेत माझा शोधनिबंध मांडला, तेव्हा दोन्ही विद्यापीठांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबरच महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आलेले साडेतीनशेपेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.


महाराष्ट्रात सर्वत्र अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यक्रमांच्या मालिकेतील एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे मॉस्को शहरात झालेली ही आंतरराष्ट्रीय परिषद होय. या परिषदेच्या उद्घाटनाला दोन्ही विद्यापीठांच्या प्रमुख अधिकाऱ्यांबरोबर भारताचे रशियातील राजदूत डी. बालकृष्ण उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात या अभिनव परिषदेचे कौतुक करून ''असे उपक्रम सातत्याने केले, तर दोन्ही देशातील सांस्कृतिक आदानप्रदान अधिक वेगाने होऊ शकेल'' असे मत मांडले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. संजय देशपांडे, डॉ. शिवाजी सरगर, पुश्कीन इन्स्टिटयूटचे कुलगुरू/रेक्टर डॉ. मार्गारिटा, प्रो. रेक्टर डॉ. शिवेलता तिगोरोवा, डॉ. ऍना खेकतेल - डायरेक्टर, डॉ. सोनू सैनी (दिल्ली) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेत सुमारे पंचेचाळीस शोधनिबंध सादर केले गेले. भारत-रशिया व्यापार, भारत-रशिया सांस्कृतिक संबंध या विषयाबरोबरच, अफणासी निकीतीन, अलेक्झांडर पुश्किन या रशियन साहित्यिकांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणणारे शोधनिबंध वाचले गेले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची नव्या परिप्रेक्ष्यातून मांडणी करण्याचा प्रयत्न झाला. आजवर महाराष्ट्रातील समीक्षकांनी अण्णा भाऊ साठे यांना साम्यवादी नजरेतून पाहिले. त्यामुळे त्याच्या साहित्याचे सर्वार्थाने योग्य मूल्यमापन झाले नाही. राष्ट्रीयतेच्या पातळीवर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर चर्चा घडवून आणली गेली नाही. साम्यवादी पक्ष आणि संघटना यांनी अण्णा भाऊ साठे यांचा केवळ वापरच करून घेतला. या साऱ्या पार्श्वभूमीवर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे विविध पैलू अधोरेखित करण्याचे काम या परिषदेतून झाले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील राष्ट्रीय विचार, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील भारतीय जीवनमूल्ये, फकीरा कादंबरीतील राष्ट्रवादी भूमिका असे विषय या परिषदेतून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडले गेले. महाराष्ट्रात तथाकथित समीक्षकांनी अण्णा भाऊंच्या साहित्यांची नीटपणे समीक्षा केली नाही. साम्यवादी लेखक अशी अण्णाभाऊंची प्रतिमा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. खरेच अण्णाभाऊ साम्यवादी होते का? या प्रश्नाचे ओझे घेऊन प्रवासाला निघालो. अण्णाभाऊंवर मनापासून प्रेम करणारे असंख्य सोबती सोबत होते. आणि या वातावरणात काही प्रश्न उपस्थित करत मी आणि माझे सोबती दिनेश प्रताप सिंग नव्याने अण्णाभाऊंचे आकलन करून घेत होतो. अण्णा भाऊ साठेंनी 'मी कम्युनिस्ट आहे' असे कोठे लिहिले आहे का? हा प्रश्न असंख्यांना विचारला. सर्वांनी याचे उत्तर नाही असे दिले. दुसरा प्रश्न होता 'अण्णाभाऊ कम्युनिस्ट पार्टीचे कार्ड होल्डर होते का?' या प्रश्नाचेही उत्तरही नाही असेच आले. आणि तिसरा प्रश्न 'अण्णा भाऊंना सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला आहे का?' या प्रश्नाचेही उत्तर नाही असे आले. या तिन्ही प्रश्नांचे उत्तर 'नाही' असे आहे, तर मग अण्णाभाऊ कम्युनिस्ट कसे? अण्णाभाऊ लाल बावटा कलापथकाचे कलावंत होते, एवढया एका कारणासाठी अण्णाभाऊंना साम्यवादी ठरवणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय आहे. हीच भूमिका घेऊन अनेकांशी बोललो. काहींनी या भूमिकेला दुजोरा दिला, तर काहींसाठी ही भूमिकाच खूप नवी होती. इतके दिवस अण्णा भाऊ साठेंसारख्या मानवतावादी लेखकाला एका विशिष्ट विचारधारेपुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला. मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय परिषदेने अण्णाभाऊंच्या साहित्याची नव्याने मांडणी सुरू झाली.

1 ऑगस्ट 2019 रोजी अण्णाभाऊंची जन्मशताब्दी सुरू झाली. राज्यात विविध सामाजिक संघटनांच्या आणि शासनाच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये मॉस्को येथे झालेली ही परिषद म्हणजे मेरुमणी आहे. साडेतीनशे लोक एका वेळी मॉस्कोला जातात आणि अण्णाभाऊंना अभिवादन करतात ही गोष्टच इतिहासात नोंद घेतली जावी अशी आहे. कारण या ठिकाणी गेलेली मंडळी ही केवळ श्रध्दाभाव मनात ठेवून गेली नव्हती, तर आमचा एक महापुरुष तुमच्या भूमीत येऊन गेला, त्याचा विचार आणि जीवन सांगण्यासाठी / ऐकण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत ही भूमिका मनात ठेवून सारे जण रशियाला गेले होते. एकमेकांच्या सहवासात, वैचारिक आदानप्रदानातून एकमेकांच्या अधिक जवळ आले. अण्णा भाऊ साठे नावाच्या सूत्रात गुंफलेली ही सारी मंडळी पुढे असंख्य वर्षे रशियात झालेली ही परिषद स्मरणात ठेवतील.

 

एखादा महापुरुष केवळ आपल्या जातीचा आहे म्हणून त्याचा गौरव करण्यापेक्षा त्याच्या कार्याचे कालोचित मूल्यमापन करून संपूर्ण समाजासाठी तो महापुरुष कसा आदर्श आहे हे उपस्थित प्रतिनिधींच्या मनावर बिंबवण्याचे काम या परिषदेतून झाले. एम.जी.डी. या सामाजिक संघटनेच्या पुढाकाराने या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयोजन झाले. दोन विद्यापीठांच्या सहकार्याने ही परिषद पार पडली. त्याचप्रमाणे अण्णा भाऊ साठे ज्या हॉटेलमध्ये चाळीस दिवस राहिले, तेथे त्यांचे एक तैलचित्र लावले गेले. पुश्कीन इन्स्टिटयूटच्या लायब्ररीमध्ये अण्णा भाऊ साठेंच्या पुतळयाचे अनावरण झाले. हा सारा उपक्रम यशस्वी होण्यासाठी एम.जी.डी. या सामाजिक संस्थेचे असंख्य कार्यकर्ते उभे होते. सुनील वारे, डॉ. बळीराम गायकवाड, आनंद कांबळे यांचे नेतृत्व आणि सुयोग्य नियोजन यामुळे हा सारा उपक्रम केवळ यशस्वीच झाला नाही, तर परदेशात अशा प्रकारे कार्यक्रम कसे आयोजित करावेत याचे मार्गदर्शन करणारे पायोनिअर्स म्हणूनही या मंडळींनी आपले स्थान निश्चित केले आहे.