मुश्रीफनामा :एका स्वयंसेवकाची आत्मकहाणी

विवेक मराठी    10-Sep-2019
Total Views |

एक संघकार्यकर्ता संघसंस्काराने कशा प्रकारे घडत गेला याचे कथन नाना मुश्रीफ तथा श्रीकृष्ण ज्ञानेश्वर मुश्रीफ यांनी लिहिलेल्याआमी बी घडलो, तुमी बी घडाना!’या पुस्तकात वाचण्यास मिळते. विशेष म्हणजे श्रीगुरुजींच्या नानांनी लिहिलेल्या आठवणी रसाळ आहेत.

 

 

 ज्येष्ठ स्वयंसेवक नाना मुश्रीफ (श्रीकृष्ण ज्ञानेश्वर मुश्रीफ) यांनी त्यांच्या संघ आठवणींचेआमी बी घडलो, तुमी बी घडाना!’ हे पुस्तक मला घरी आणून भेट दिले. नानांचा माझा परिचय बहुधा आणीबाणीनंतरच्या काळातील आहे. आम्ही दोघेही मुंबई महानगराचे संघकार्यकर्ते. नानांनी आपल्या संघजीवनाच्या आठवणींच्या पुस्तकाविषयी मनोगतात-, ‘पुस्तकाचे प्रयोजन सर्वसामान्य स्वयंसेवकाच्या आयुष्यातील संघजीवनातील, पर्यायाने सामाजिक जीवनातील घटना, नकळत घडलेल्या कार्याचा घटनाक्रम उलगडून वाचकांपुढे ठेवावाअसे सांगितले आहे. नानांनी स्वत:चे वर्णनसर्वसामान्य स्वयंसेवकअसे केलेले आहे. म्हटले तर ते खरेही आहे आणि म्हटले तर खरेही नाही

 

ते खरे अशा अर्थाने आहे की, आज जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जगाला दिसतो, तो सर्वसामान्य स्वयंसेवकांनीच उभा केलेला आहे. संघात कोणी असामान्य नसते. जबाबदार्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येक जबाबदारी संघटनेच्या दृष्टीने सारख्याच तोलामोलाची असते. ते खरेही नाही, अशा अर्थाने की लौकिक जीवनात नाना मुश्रीफ सामान्य माणूस नाहीत. नोसिलसारख्या विश्वविख्यात कंपनीत मेकॅनिकल इंजीनिअर म्हणून अत्यंत उच्च पदावर त्यांनी काम केले. सौदी अरेबियातील पेट्रोकेमिकल कंपनीत पाच वर्षे त्यांनी महत्त्वाच्या पदावर काम केले. सर्वसामान्य माणूस ज्या पदावर जाऊ शकत नाही, अशा पदावर ते होते. हे असामान्यत्व विसरून सामान्य स्वयंसेवकाच्या भूमिकेत संघाचे काम करणे म्हणजेच संघकाम करणे होय. नानांच्या या पुस्तकात आपल्याला त्याचा पावलोपावली प्रत्यय येत जाईल.


मिरजेत वाढलेले नाना शिक्षण-व्यवसायानिमित्ताने पुणे जिल्हा आणि पुढे मुंबई या ठिकाणी आले. मिरजेत शाखेत जाणे सुरू झाले. गाव सुटले, पण शाखा कधी सुटली नाही. ज्या गावी गेले त्या गावी ते स्वयंसेवक म्हणून शाखेत रुजू झाले. वालचंद नगरच्या मुक्कामात त्यांनी अनेक शिबिरे केली. या प्रवासात त्यांनी पानशेत धरणफुटीचा अनुभव घेतला. तसेच पहिल्या बंदीच्या झळादेखील त्यांच्या आई-वडिलांना आणि नातेवाइकांनाही खूप सहन कराव्या लागल्या. पिंपरीच्या पेनिसिलीन फॅक्टरीच्या कॉलनीत पांडुरंगाचे मंदिर उभारण्याचा किस्सा नाना मुश्रीफांनी तन्मयतेने कथन केलेला आहे.

मुंबईत आल्यानंतर शीव येथे त्यांचे घर झाले. शीव परिसरातील सुरेशराव खरे, भाऊसाहेब खोना, बर्वे, महाजन यांच्या अनेक आठवणी या पुस्तकात वाचायला मिळतात. शीवला आल्यानंतर साप्ताहिक शाखाप्रमुख, सायंशाखा कार्यवाह, मंडल कार्यवाह अशा जबाबदार्या त्यांच्याकडे आल्या. याच वेळी 67 साली ते नोसिल कंपनीत कामाला लागले. शीवच्या निवासात संघाच्या अनेक ज्येष्ठ प्रचारकांशी त्यांचा जवळचा संबंध आला. सुरेशराव केतकर, भास्करराव कळंबी, शिवराय तेलंग, वसंतराव केळकर अशा अनेक प्रचारकांच्या सहवासातील हृद्य अनुभव नानांनी वेचकपणे आपल्या पुस्तकात दिले आहेत. जवळच राहणारे वामनराव घैसास हे एका अर्थाने नानांचे पालकच होते. त्यांच्याविषयीच्या आठवणीदेखील यात आहेत. यथावकाश नानांचा विवाह झाला.

श्रीगुरुजींचा निवासही अनेक वेळा वेदप्रकाशजी गोयल, वामनराव घैसास, लक्ष्मणजी धु्रव यांच्याकडे असे. नानांनी लिहिलेल्या श्रीगुरुजींच्या आठवणी रसाळ आहेत. रामदासजी कळसकर हे संघाचे पहिल्या पिढीतील प्रचारक होते. प्रचारकी जीवनातून ते गृहस्थाश्रमी जीवनात आले आणि त्यांना कर्करोगाने गाठले. कळसकरांविषयीची एक आठवण नानांच्या शब्दातच इथे सांगितली पाहिजे. ‘.पू. श्रीगुरुजींनी कळसकरांना जवळ बोलवून खाली बसवले हात पुढे करण्यास सांगितले. कळसकरांनी आपला उजवा तळहात पुढे केला. .पू. श्रीगुरुजींनी कळसकरांच्या हाताचा तळहात दाबला हसत म्हणाले, “अरे काय झाले? काही नाही, दहा वर्षे निर्धास्त राहा! तुला काहीही होणार नाही.” आणि मृत्यूच्या दारात पदार्पण करणारे कळसकर बरोबर दहा वर्षे कार्यरत होते. संसार केला सांगितल्याप्रमाणे दहा वर्षांनंतर परलोकी प्रयाण करते झाले. पुढे काही काळाने .पू. श्रीगुरुजींना कर्करोग झाला शेवटपर्यंत त्यांचे कार्यक्रम आणि प्रवास सर्व काही चालू होते.1 जुलै 1970ला टाटा हॉस्पिटलमध्ये .पू. श्रीगुरुजींचे कर्करोगाचे ऑपरेशन झाले. पण शेवटी 5 जून 1973 रोजी त्यांचे निधन झाले.

आज नानांनी ऐंशी पार केली आहे. शीववरून ते मुलुंडला राहायला आलेले आहेत. मुला-मुलींचे विवाह झाले, नातवंडे आली, परंतु नानांची संघकामाची ओढ काही कमी झालेली नाही. या वयातही नेहमी शाखा आणि पेलवेल ती जबाबदारी उत्साहाने घेत असतात. ‘कार्यमग्नता जीवन व्हावे...’ ही पद्याची ओळ ते आजही जगताना दिसतात.

नानांचे पुस्तक मी जमेल तसे वाचत गेलो. नानांचा माझा पूर्वपरिचय होताच. त्यांचा शांत, प्रसन्न चेहरा मी कधी विसरू शकत नाही. आज संघकामाच्या विविध जबाबदार्या पार पाडल्यानंतर माझ्या कामाचे आणि लेखनाचे खूप कौतुक होत असते. आपण कितीही स्वत:ला सांभाळायचा प्रयत्न केला तरी मनात मीपणाची भावना कळत-नकळत प्रवेश करायला लागते. नानांसारख्या स्वयंसेवकाचे एखादे पुस्तक आपली गाडी नीट रुळावर आणण्याचे काम करते. हे या पुस्तकाचे मला भावलेले सगळ्यात मोठे सामर्थ्य आहे.

उत्तम संपादकीय संस्कार आणि उत्तम पुस्तक छपाई, तसेच निर्दोष शुद्धलेखन या गुणांनी जर नानांचे हे पुस्तक मंडित झाले असते, तर संघ वाङ्मयातील एक दर्जेदार पुस्तक झाले असते. विवेकने हे काम हाती घ्यावे, असे मला वाटते.


Rss