कालसुसंगतेचा स्वीकार

विवेक मराठी    29-Jul-2019
Total Views |

वयाच्या एका ठराविक टप्प्याला जसे शारीरिक बदल आपसूक घडत जातात, तसेच आपणहून मनाचे बदल घडवून आणले तर सारे सुसह्य होते. वास्तविक सततच नवं येत असतं. जे जुनं टिकतं, ते काळालाही सुसंगत असतं म्हणूनच.


एकदा काय झालं
, आम्ही आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. तसे पूर्वी बऱ्याच वेळा जायचो. मध्यंतरी जाणं झालं नाही. काही वर्षांनी गेलो, त्यामुळे घरात खूप बदल झालेले जाणवले. घरातलं एक माणूस वजा झालं होतं, एक माणूस नवं आलं होतं. आमचे हे मित्र तसे ठरावीक गोष्टी मानणारे. त्याचं तंतोतंत पालन बायको वय झाल्यावर करत होती. साडीचा रंग, कुंकवाचा आकार, बांगडया, मंगळसूत्र... सगळं कसं दिसेल असं त्यांना ठसठशीत लागायचं. फारसा विरोध करण्यात अर्थ नाही हे लक्षात घेऊन बायको सगळं सांभाळत होती. कमावणं आणि गमावणं याचा ती वेगळा विचार वय झाल्यावरही करत होती. ''अगं, या बाह्य गोष्टी कराव्या लागतात त्या मी करते. मनात नसतं, पण ठीक आहे. जमेची बाजू अशी की आताही मला अभ्यास करायला ते सपोर्ट करतात. बघ ना! त्यामुळे मी रिसर्चही केला. आता 'गीता' विचार करतेय, परीक्षा देतेय.'' ती म्हणाली. मला आवडलं हे! अस्तित्व जपणं हे असण्यात असतं, दिसणं फार महत्त्वाचं नाही मानलं तिने. अर्थात मित्राच्या बाह्य गोष्टींच्या आग्राहाचा तसा तिला त्रास झाला होताच.


घरातली मुलगी सासरी गेली. घरात सून आली. तिची राहणी
, विचार, आवडीनिवडी, जीवनपध्दती सगळंच वेगळं. त्यांच्याकडे गेलो तेव्हा हे जाणवलं. सून आली नि तिने आपल्यात कोणताच बदल केला नाही. ती आहे तशी होती. जीन्स, टीशर्ट, नो मंगळसूत्र, नो टिकली. ''यांना बरं चालतंय हे सगळं?'' माझं हे मत येणार हे मित्रपत्नीने गृहीत धरलं होतं. म्हणाली, ''बघितलंस! कसे बदललेत ते! असं सगळं यांना चालतंय आता! सून आहे. शिवाय या काळातली! बोलून नाही चालणार तिला आणि ती का ऐकून घेईल!... मला मात्र...'' आमचं बोलणं सुरू असताना मित्रवर्य आत आले. म्हणाले, ''आश्चर्य वाटतंय ना! माझी मतं बदलली असं वाटतंय तुला!'' ''हो, म्हणजे तुम्ही तसं जुन्या विचारांचे.'' ''अजूनही आहे. मी विचार वेगळा केला. तिच्यावर माझी मतं लादणारा मी कोण? एकदम सगळं तिच्यावर लादणार कसं! मी तिला सुचवलं. तेव्हा म्हणाली, कधीतरी हे सगळं करायला मला आवडेल बाबा. यामुळे आपल्या नात्यात तर काही बदल नाही होणार. मला तुमच्याबद्दल आदरच आहे. मग काय! मी मनात पक्कं ठरवलं आपण तिच्यावर या गोष्टी लादायच्या नाहीत. तिच्या मनातही आदर राहिला. मुख्य म्हणजे मला मी बदलू शकतो हा विश्वास आला.'' खरं होतं हे! यावरून जर विरोधातून नव्या माणसाबरोबर बोलण्याची सुरुवात झाली असती, तर एकत्र राहिलेच नसते ते! घरात ते दोघे, मुलगा सून, नातवंडं सगळे समजूतदारपणाने राहतात. सगळेच सगळयांना संधी देतात, आपण जे करतोय ते शेअर करतात. शेवटी बाह्य बदलावर जोर द्यायचा की नवं जगणं समजून स्वीकारत म्हातारपण सुसह्य करायचं, हे आपल्यावर अवलंबून.


वय झाल्यावर घटनांचा
, जगण्याचा पुन्हा नव्याने असा विचार करणं खूप महत्त्वाचं वाटतं. एरवी जसं जसं वय होतं, तसतसं आपण अधिक बंदिस्त होत जातो असं दिसतं. वयच एक टणक कवच घालतं आपल्यावर! या अनुभवातून मी अंतर्मुखही झाले. 'काय काळ आलाय?...' असं (वाईट तोंडाने) म्हणणं सोडून दिलं. पुढे आमचे मित्र म्हणाले, ''माझ्या बायकोने मुकाटयाने ऐकलं तेही चुकलंच. नवी मुलं किती स्वातंत्र्य देतात-घेतात नि त्यामुळे त्यांचं स्वत:चं अस्तित्व कसं टिकतं, हेही पाहत आलोय. मी तिला बदलायला आग्राह नाही केला. तिलाच का करावा? मुलगाही बदलायच ना! सून आणि मी छान मित्र आहोत. ती मला जर्मन शिकवते. मी तिला फोटोग्राफी. तिच्या जगण्यातून नवी विचारसरणी समजून घेतोय गं!'' या वयात मनाची बैठक बदलायला हवी. शरीराचीही बदलतेच ना!


याची दुसरीही बाजू अनुभवायला मिळते. मला उत्तम चवीचा स्वयंपाक कधी जमला नाही. माझी एक मैत्रीण मात्र यात तज्ज्ञ. खावं तर तिच्या हातचं. तिचं मन लावून करणं
, वाढणं, सांगणं... पन्नाशीनंतरही तसंच. सुना आल्या. स्वयंपाकात इतका वेळ घालवणं मंजूर नसणाऱ्या मुलांना आईच्या हातच्या चवीची सवय. ती आग्रह धरू लागली. सुना दाद देईनात. तिला वाटलं, मुलांचे हाल होतायत. स्वयंपाकाची जबाबदारी पूर्वीसारखीच तिने घेतली. 'करताय तर करा' असं झालं नि 'यांना अगदी सामान्य स्वयंपाक येतो गं!' असंही झालं. अर्थात व्हायचा तो तणाव निर्माण झाला. ती दमायची. सुना निवांत. टीव्ही बघत. यातही तिची चिडचिड. 'काही शिकायला नको. अंगावर घेऊन करायला नको' असा तिचा वैताग. बायकोने केलेलं मुलं खाईनात नि ही स्वयंपाकघर सोडेना. टोकाला गेलं सगळं. 'इतकं सगळं करते तरी त्या दोघींना काही नाही. काय करू? झेपत नाही.'

या परिस्थितीला जबाबदार कोण? तीच. आपलं असं घरातलं आग्रही, हट्टाचं असणं तिनं सोडलं असतं, तर कदाचित हे घडलं नसतं. तिने फक्त स्वत:ला बाजूला करायला हवं होतं अलगदपणे. बऱ्याच वेळा असंच घडतं किंवा बाहेर पडताना 'कळेल आता तुम्हाला आमची किंमत' असं बोलून घडतं. गंमत अशी असते की खिळा मारायचा असतो/ठोकायचा असतो, पण भोक चौकोनी नि खिळा गोल.. कसा बसणार? भूतकाळात ठरलेल्या भूमिका इतक्या घट्ट होतात की त्या तशाच जगताना काहीच वाटेनासं होतं. मी जसा जगलो तसंच पुढच्याने जगलं पाहिजे हा आग्राह. मूर्ती बदलल्या तर नव्याची स्थापना होते. विशेषत: सामाजिक भान असणाऱ्यांच्या बाबतीत तर घडतंच घडतं. मी समाजासाठी काम केली, मी नावारूपाला आलो आता तुम्हाला हे हातात घ्यायचं असेल तर आमच्यासह घेतलं पाहिजे असं वाटतं. वास्तविक सततच नवं येत असतं. जे जुनं टिकतं, ते काळालाही सुसंगत असतं म्हणून.

केवळ तरुणांवर नाही, तर आता लहान मुलांपासून वेगवेगळे ताण मनावर आहेत. 'माझी रिक्षा वेळेत येईल ना' या चिंतेने चिमुकला जीवही ग्रासतो. 'अभ्यास झाला नाही तर काही खरं नाही. मार्क पडले नाहीत तर आईवडील ओरडतील' अशा एक ना दोन, कितीतरी विवंचना लहानग्या आयुष्यात आहेत. आपल्या वेळी हे असलं काही होतं का? या चिंतांना कारण अनेक असतील, पण आहेत हे वास्तव आहे. मग संगोपन विचारात तफावत पडते. पुन्हा वाद. खरं तर जग जवळही आलंय नि रुंदावलंयही. तरुणाईही अकाली चिंतेने वृध्दत्व आलेली आहे की काय? त्या चिंताही, व्यवसायातले ताण, स्पर्धा, वाढत्या संख्येचे परिणाम समजून मगच आपले अनुभवी शब्द पुढे करावेत. त्यासाठी हा नव्या जगाचा अनुभव घ्यायला सिध्द होऊ या.

रेणू दांडेकर

8828786875