विचारपरिवर्तन की सत्तालोभ?

विवेक मराठी    26-Jul-2019
Total Views |

जनसंघ ते भाजपा याची वाढ घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याच्या मार्गाने झालेली आहे. आता लष्कराच्या भाकऱ्या खाऊन घर भरू पाहणारे लोकच भाजपात प्रवेश करू लागलेले आहेत. ही स्थिती पक्षाचा आणि विचारधारेचा जे विचार करतात, त्यांच्यापुढे असंख्य प्रश्न निर्माण करणारी झाली आहे.


कालपर्यंत भाजपाला शिव्या घालण्यात ज्यांची हयात गेली, त्या राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी आता भाजपात प्रवेश करू लागले आहेत. काळाचा महिमा अगाध असतो. काळ कुणाला केव्हा काय करायला लावील, हे सांगता येत नाही. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करतील असे जर चार वर्षांपूर्वी कुणीभविष्य सांगितले असते, तर लोकांनी त्याला वेडयात काढले असते. आणि आता जर कुणी भविष्य वर्तविले की अशोकराव चव्हाण, जयंत पाटील, पुढच्या वर्षी भाजपात येणार आहेत, तर हे भविष्य वेडेपणाचे आहे असे समजण्याचे कारण नाही.

राजकारण कशासाठी करायचे? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे असते. राजकारण सत्ताप्राप्तीसाठी करायचे. सत्ताप्राप्ती कशासाठी करायची? सत्तेमुळे मानसन्मान मिळतो. समाजात इज्जत वाढते आणि चार पैसे कमविताही येतात. लोकांना उपकृत करता येते. दरबार भरविता येतात. सतत स्तुती करणारे लोक आजूबाजूला गोळा करता येतात. साहेबांसारखा कुणी नाही... साहेब म्हणजे साहेब आहेत... ही वाक्ये ऐकायला बरी वाटतात.

अशा प्रकारची इच्छा असणे ही गोष्ट अनैसर्गिक नाही. ती वाईट आहे असे समजण्याचे कारण नाही. माणसाच्या कामप्रवृत्ती जितक्या स्वाभाविक असतात, तितक्या स्वाभाविक प्रवृत्ती राजकारणाचे अंग असणाऱ्या लोकांच्या असतात. त्यात लिंगभेद करण्याचेही कारण नाही. समाजात काही लोकांत राजकारण आणि सत्ताकारण हे गुण उपजत येत असतात. समाजाच्या दृष्टीने अशी माणसे आवश्यकदेखील आहेत. शासन करणे हे येरागबाळयाचे काम नाही. पानपट्टीचे दुकान चालविणे आणि मंत्रिपद चालविणे एक नाही. त्यासाठी फार वेगळया प्रकारची गुणवत्ता लागते. निर्णयक्षमता लागते. माणसांची पारख करण्याची बुध्दी लागते. काळाचे भान असावे लागते आणि सगळयात महत्त्वाचे म्हणजे स्वतःकडे शंभर ते हजार माणसांची कार्यशक्ती लागते. एवढी गुणवत्ता ज्याच्याकडे आहे, तो सत्तास्थानी जातो.

लोकशाही सत्तास्थानी जाण्यासाठी राजकीय पक्ष लागतात. राजेशाहीत सत्तास्थानी जाण्यासाठी सरदारकी मिळवावी लागेल. सरदार घराण्यातील वारस सरदार होईल. लोकशाहीत लोकमान्यता मिळावी लागते. ज्याला लोकमान्यता तो आमदार, खासदार होतो. आणि ज्या पक्षाला लोकमान्यता, त्या पक्षाचे सरकार येते. या पक्षाच्या माध्यमातून सरकारात जाता येते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जबरदस्त लोकमान्यता असलेला एकच पक्ष भारतात होता, तो म्हणजे काँग्रेस. स्वातंत्र्यापूर्वी सर्व देशाचा तोच एक राजकीय पक्ष होता. काँग्रेसच्या नावाने खऱ्या अर्थाने देशात राष्ट्रीय आंदोलन चालले. सर्व विचारधारांची माणसे काँग्रेसमध्ये राहिली. स्वातंत्र्यानंतर ही राष्ट्रीय काँग्रेस राजकीय काँग्रेस झाली. सत्तेवर जाण्याचे एक माध्यम झाली. ज्याला सत्तेवर जायचे आहे, त्याच्यापुढे काँग्रेसची वाट धरण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता.

सत्तेची दोन रूपे असतात. एक रूप असते राजकीय सत्तेचे आणि दुसरे रूप असते प्रशासकीय सत्तेचे. प्रशासकीय सत्ता कायमची असते, राजकीय सत्ता पाच वर्षांनंतर बदलू शकते. आपल्या देशात 1977पर्यंत राजकीय सत्तेत परिवर्तन झाले नाही. काँग्रेसचीच सत्ता राहिली. प्रशासकीय सत्ता राजकीय सत्तेच्या अंतर्गत काम करते. ती दुय्यम असते. ती राजकीय निर्णय करू शकत नाही. राजकीय निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच तिचे काम असते.


सिध्दान्तता ही प्रशासकीय सत्तेशी तटस्थ हवी. काँग्रेसच्या एकछत्रीय सत्तेमुळे प्रशासकीय सत्ता राजकीय सत्तेची दासी झाली. अशी राजकीय सत्ता उपभोगण्याची घराणी आपल्याकडे तयार झाली. राजेशाहीतील सरदार घराणी आणि लोकशाहीतील खासदार घराणी गुणवत्तेत एकसारखी राहिली. परिस्थिती एकसारखी राहत नाही. गौतम बुध्दांनी सांगितले की
, जे नाव रूपात्मक आहे, त्याचा नाश अटल आहे. या नियमाने काँग्रेसचा ऱ्हास सुरू झाला. 1998पासून त्याची प्रक्रिया सुरू झाली, 2014ला या ऱ्हासाची एक अवस्था आली आणि 2019ला या ऱ्हासाची घोडदौड सुरू झाली.

पर्यावरणाचा नियम असा आहे की, विदेशी झाडावर देशी पक्ष घरटी करीत नाहीत. कीटक, मुंग्या या झाडावर फारशा जात नाहीत. राजकारणाचा नियम असा आहे की, ज्या पक्षाचा ऱ्हास सुरू होतो, त्या पक्षात राजघराणे राहत नाहीत. खासदार घराणी आपल्या निष्ठा बदलायला सुरुवात करतात. सत्तेचा ऐरावत त्यांना सोडायचा नसतो. तो ज्यांच्याकडून मिळेल, त्यांच्या दारी ते जातात. त्यांची स्वतःची शक्ती असते. या शक्तीच्या बळावर ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. आता भाजपात प्रवेश करतात. भाजपालाही आपली शक्ती वाढवायची असल्यामुळे भाजपा या सर्वांचे स्वागत करतो. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ वाढत जाते. जसे आता गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांत वाढले आहे.


ही शक्तीची वाढ आहे की शरीराला आलेली सूज आहे
, याचा विचार केला पाहिजे. नैसर्गिकरीत्या वाढ झाली तर शरीरावर मांस वाढते आणि सूज आलेली असेल तरीसुध्दा मांस वाढलेले दिसते. सूज ही नैसर्गिक अवस्था नाही, विकार आहे. यासाठी भाजापाला शक्ती प्राप्त झाली की विकार प्राप्त झाला, याचादेखील विचार करायला पाहिजे.


लेखाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे जे आज भाजपात येत आहेत
, त्यांनी संघ-भाजपावर कोणत्या शिव्यांचा आणि आरोपांचा अभिषेक केला होता? सेक्युलॅरिझमचे मारेकरी, भारताची बहुविधता धोक्यात आणणारे, धार्मिक राजकारण करणारे, गांधीजींना कमी लेखणारे, मनुवादी, स्त्री-स्वातंत्र्य नाकारणारे, देशाला मध्ययुगात घेऊन जाणारे, देशाची धार्मिक फाळणी करून दुसऱ्या फाळणीची बीजे रोवणारे, हिंसाचारी, शेठजी-भटजींची पार्टी... आरोप लिहून थकायला होईल, एवढे अारोप झाले. आज या लोकांना भाजपा सर्वधर्मसमभावी, मानवतावादी, बहुविधता जोपासणारा, सर्वांना बरोबर घेऊ जाणारा, काय काय वाटू लागला?


परिवर्तन घडण्याचे अनेक मार्ग असतात. सिध्दपुरुषाकडे अशा काही सिध्दी असतात की तो दरोडेखोराला साधू करू शकतो. पवहारी बाबा नावाचे एक हठयोगी होते. ते एका गुहेत राहत. एके दिवशी चोर तेथे शिरला. संन्याशाकडे काय असणार! सगळे घेऊन तो पळू लागला. पवहारी बाबा जागे झाले. पूजेची पितळेची भांडी तशीच होती. ती त्यांनी हातात घेतली आणि चोराच्या मागे धावू लागले. चोराला म्हणाले
, ''थांब नारायणा! माझ्यावर कृपा कर आणि ही भांडीदेखील घेऊन जा.'' चोराला गाठून बाबा त्याला म्हणतात, ''हे नारायणा! ही भांडीदेखील घेऊन जा, हे सगळे तुझेच आहे.''


आपल्याला हा संन्यासी पकडणार आणि पोलिसांकडे देणार
, या भयात असणाऱ्या चोराला काय बोलावे हेच समजेना. त्याने बाबांचे पाय धरले. त्यांची क्षमा मागितली आणि संन्यासी बनून हिमालयाची वाट धरली. हा संन्यासी विवेकानंदांना हिमालयात भेटला. परिवर्तनाची अशी 'बाबा शक्ती' भाजपात आहे, असे समजण्यासारखे नाही. मग भाजपात प्रवेश करणाऱ्यांत परिवर्तन कशामुळे झाले?


सत्तासुंदरीमुळे झाले. तिच्याशिवाय त्यांना राहता येत नाही आणि तिच्याशिवाय जगता येत नाही.
'तेरे बिना जिंदगीसे कोई, शिकवा तो नही, तेरे बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी तो नही'-सत्तेच्या लाभापायी भाजपाच्या वाटेवर अनेक काँग्रेसी आहेत. हा प्रवाह मध्य प्रदेशात जाईल, तेथून तो राजस्थानात जाईल, त्याला रोखणे फार अवघड आहे. हा प्रवाह सुरू करण्याचे काम राहुल गांधी यांनी केलेले आहे. मते आणण्याची त्यांची ताकद नाही. निवडून आणण्याची त्यांच्यात शक्ती नाही. पक्षाला उभे करण्याचे त्यांचे बळ नाही. रणांगण सोडून पळणारे ते सेनापती आहेत. सेनापतीच पळाला की अनुयायांना पळा म्हणून सांगावे लागत नाही.


येथे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की
, नवीन येणाऱ्या भरतीमुळे भाजपाचे स्वरूप काय राहील? तो विचारावर आधारित पक्ष राहील का? कार्यकर्ता आधारित पक्ष राहील का? वर्षानुवर्षे ध्येयनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्थान काय राहील? त्यांना निवडणुकांची तिकिटे मिळतील का, की बाहेरून आलेल्या लोकांच्या पालख्या त्यांना उचलाव्या लागतील? अशी स्थिती झाली तर जे नैराश्य निर्माण होईल, जी हताशा निर्माण होईल, ती कोणत्याही पध्दतीने भरून येणार नाही. जनसंघ ते भाजपा याची वाढ घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याच्या मार्गाने झालेली आहे. आता लष्कराच्या भाकऱ्या खाऊन घर भरू पाहणारे लोकच भाजपात प्रवेश करू लागलेले आहेत. ही स्थिती पक्षाचा आणि विचारधारेचा जे विचार करतात, त्यांच्यापुढे असंख्य प्रश्न निर्माण करणारी झाली आहे.


जनसंघ ते भाजपा हा प्रवास विचारधारेच्या प्रस्थापनेचा प्रवास आहे. ही विचारधारा भारताचा एकात्मिक विचार करते. हिंदू समाजाला जातीत विभागून जातिसमूहांचा विचार करीत नाही. हिंदू
, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, ज्यू, पारशी अशी धर्मगटात विभागणी करीत नाही. आमची ओळख एकच, ती म्हणजे आम्ही भारतीय आहोत. भारत आमची माता आहे. आम्ही तिची संतान आहोत. आम्हाला सत्ता पाहिजे आहे - भारतमातेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी, विश्वगुरुपदावर बसविण्यासाठी. दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी या रूपांत तिची पुनःस्थापना करण्यासाठी. सत्ता भोगण्यासाठी नाही, सत्ता सेवेसाठी आहे ही आपली गाभ्याची विचारसरणी आहे. जे भाजपात येतात, त्यांच्या गळयात ती उतरवता आली तर संकट नाही. पण त्यांनी जर गरळ टाकली, तर...

vivekedit@gmail.com