मतदानाचा टक्का । कुणाला धक्का ?

विवेक मराठी    04-May-2019
Total Views |

 

 

मतदानाचा जेवढ्यास तेवढा टक्का हा विरोधकांना एक धक्का आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेत आहे असा जर यांचा दावा होता, ‘मोदी-शहा यांना पाडा’ असा जर राज ठाकरेंचा आग्रह होता तर वंचित बहुजन आघाडीने जे अल्प प्रमाणात करून दाखवले ते यांनी मोठ्या प्रमाणात करायला हवे होते. आपल्या मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान करून घ्यायला हवे होते. मतदानाची टक्केवारी लक्षणीय अशी वाढवून दाखवायला हवी होती. पण ही संधी विरोधकांनी घालवली. आताही ज्या जागा विरोधकांच्या निवडून येतील त्या जनमताचा रेटा असेल. विरोधकांची किमया नसतील.

महाराष्ट्रातील सर्व चारही टप्प्यातील मतदान २९ एप्रिलला पार पडले. निवडणूक आयोगाने जी अंतिम आकडेवारी जाहीर केली त्यानुसार गतवेळेइतकेच मतदान (६० टक्के) या वेळेसही झालेले दिसून येते आहे. मतदानाचा हा टक्का तितकाच राहणे यात एक दुसरा छुपा अर्थ आहे. जवळपास ७ टक्के इतकी वाढ मतदारांमध्ये झालेली होती. म्हणजे आधीपेक्षा यावेळेस नवीन मतदार नोंदवले गेले ती वाढ महत्त्वाची आहे. टक्का तितकाच राहिला याचा ढोबळ अर्थ असा होतो की नवीन मतदारांनी मोठ्या जोमाने मतदान केले.

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्येने सभा भाजप-शिवसेना यांच्याच झाल्या. एकूण संख्येची बेरीज केल्यास ती युतीच्या बाजूची दिसते. याचा साधा अर्थ परत असा निघतो की सकृत दर्शनी लोकांचा कल परत सत्ताधार्‍यांकडेच आहे. 

या आकडेवारीकडे एक वेगळ्या दृष्टीने पहायला पाहिजे. विरोधी पक्षांनी सरकार विरोधी असंतोष आहे असे वारंवार सांगितले होते. मग याचे प्रतिबिंब मतदानात पडायला हवे होते. जर सरकारवर लोकांचा राग आहे, तर तो दोन पद्धतीनं दिसतो. एक तर लोक मतदानाला बाहेरच पडत नाहीत. तसे असेल तर त्याचा फायदा सत्ताधार्‍यांनाच होतो. कारण बदल होत नाही. मतदान जेवढ्याला तेवढे झाले तर त्याचा अर्थ लोकांना फारसा बदल अपेक्षित नाही.  अशावेळी थोड्याफार जागा कमी जास्त होऊन तेच सरकार सत्तेवर राहते. तिसरा प्रकार म्हणजे मतदानात प्रचंड वाढ होणे. यामुळे मात्र सत्ताधारी गोत्यात येतात. विरोधी पक्षांनी तयार केलेल्या वातावरणाचा फायदा त्यांनाच मिळतो. जनमत विरोधात गेल्याचे दिसते. सत्तापालट होऊ शकतो. 

महाराष्ट्रात मतदानात काहीच बदल झाला नाही, यावरून सत्ताधारी युती ३५ जागांपर्यंत सहज पोचू शकते. पाच-सात जागांचे नुकसान होऊ शकते. विरोधकांना मागच्यावेळी ६ जागा मिळाल्या होत्या. या वेळीस त्या १२-१३पर्यंत पोहोचू शकतात.  

दोन ठळक मुद्दे या मतदानातून समोर येतात. एक तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते. त्यांना राज्यभर प्रचाराची राळ उडवून देत वातावरण निर्मिती करण्यात अपयश आले. याचाच परिणाम म्हणजे आपल्या आपल्या प्रभावाखालील प्रदेशात त्यांना जास्त मतदान करून घेता आले नाही. पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि विदर्भात कॉंग्रेस यांनी असे मतदान करून घेणे अपेक्षित होते. कारण हे प्रदेश त्यांचे कधीकाळी गढ राहिले होते. 

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते आपापले मतदार संघ सांभाळण्यातच गुंतून गेले. उर्वरीत महाराष्ट्रात फिरणे त्यांना जमले नाही. हे चित्र चांगले नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बीडमध्येच अडकून पडलेले आणि विधानसभेतील राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या दरवाज्यावर खुर्ची टाकून बसलेले. एकटे शरद पवार उतरत्या वयात सभा घेत फिरले. कॉंग्रेस अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आपल्या मतदारसंघातील मतदान होईपर्यंत बाहेर पडलेच नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याही प्रभावी सभा कुठे झाल्याची नोंद नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आपल्या आपल्या प्रभाव क्षेत्रात मतदानांत उत्साह निर्माण करता आला नाही.

दुसरा मुद्दा राज ठाकरेंच्या निमित्ताने समोर आला होता. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ९ सभा घेतल्या. मग या ९ मतदारसंघांत त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी काही केले का? राज ठाकरेंचा राजकीय प्रभाव मुंबई-पुणे-नाशिक असा राहिला आहे. इथे त्यांच्या सभा झाल्या. मग मतदानाचा टक्का या ठिकाणी का नाही वाढला. कल्याण आणि पुण्यात तर मतदान लक्षणीय घटल्याचे आकडे आहेत. मुंबईत ते चांगले साडेतीन टक्के वाढल्याचे दिसते आहे. पण इथेही मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून मतदान करून घेताना दिसले नाहीत.

‘मोदी-शहांना पाडा’ असा प्रचार राज ठाकरेंनी केला होता. त्याचा अर्थ मोदी-शहा विरोधी मतदारांनी घरात बसून राहणे असा काढला का? आणि जर तसे असेल तर त्याचा मोठा फायदा भाजप-सेनेलाच होणार. जेव्हा प्रत्यक्ष मतमोजणी होईल आणि पक्षनिहाय आकडे बाहेर येतील तेंव्हा राज ठाकरेंना हा प्रश्‍न विचारला गेला पाहिजे. 

तिसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. दलित आणि मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. या आघाडीचे कार्यकर्ते हिरवे-निळे झेंडे घेत मोठ्या संख्येने प्रचारात उतरले होते. प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांच्या सभाही प्रचंड उत्साहात आणि चांगल्या गर्दीत पार पडल्या.  मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दलित आणि मुस्लीम वस्त्यांमधून मतदान झालेले आढळून आले. लोकं रांगा लावून मतदान करत होते. त्यांना आणण्यासाठी गाड्यांची व्यवस्था कार्यकर्त्यांनी केली होती. अगदी मुंबईच्या धारावी सारख्या भागात तर इतर पक्षांना बुथवर कार्यकर्तेसुद्धा मिळाले नाहीत. कुणी कितीही कशीही टीका करो प्रकाश आंबेडकर-ओवेसी यांनी वातावरणनिर्मिती करण्यापासून ते प्रत्यक्ष मोठ-मोठ्या सभा घेण्यापर्यंत आणि मतदाराला मतदान केंद्रावर आणण्यापर्यंत यश मिळवले. लोकसभेचे मतदारसंघ प्रचंड मोठे सरासरी १८ लाखांचे मतदान असल्याने त्यांचा प्रभाव निवडून येण्याइतपत  नाही पडणार. पण येत्या विधानसभेत ही आघाडी अशीच राहिली तर चांगले यश मिळवू शकते. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, मुस्लीम लीग ही सगळी मते या वेळेसे वंचित बहुजन आघाडीकडे एकवटलेली दिसतील. 

सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला गेली ५ वर्षे सतत निवडणुका लढविण्याचा मोठा अनुभव आहे. विधानसभा, मनपा, नपा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायत या निवडणुकांत कार्यकर्ते चांगले तयार झाले होते. प्रत्येक बुथवर काम करणारी एक यंत्रणा विकसित केली गेली. अशा बुथ प्रमुखांच्या सभा प्रत्येक मतदार संघानुसार वेगळ्या पार पडल्या. याचा एक मोठा फायदा यावेळेस झाला. भाजप-सेनेने आपल्या मतदाराला घरातून काढून त्याचे मतदान करून घेत आपल्या यशाची निश्‍चिती केल्याचे मतदानातून जाणवते. (यातही परत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपसाठी आणि भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेसाठी किती फिरले याचा शोध घ्यावा लागेल.) 

विरोधक नेहमीप्रमाणे केवळ माध्यमांमधूनच आरडाओरड करत राहिले. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्या त्या  मतदार संघात संभाव्य आमदारकीच्या उमेदवाराला योग्य ती रसद पुरवली असती तर त्याने मतदान करवून घेतले असते. तसेच तो उमेदवार पुढे नगरपालिका किंवा महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवत संभाव्य उमेदवाराला कामाला लावू शकत होता, जे की भाजप-सेनेने केले. पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीत हे घडले नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सुपारी दिल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. तो खरा असो की खोटा पण किमान राज ठाकरेंनी या निमित्ताने का होईना पण महाराष्ट्र पिंजून टाकायचा होता. पण त्यांनी केवळ ९ सभा घेतल्या. मोदी देशभर प्रचार करत असताना महाराष्ट्रात जास्त सभा आणि गर्दी जमा करून गेले. आणि राज ठाकरेंसारखे सभा संध्याकाळी ७ वा. घ्यायची, अंतरांवर खुर्च्या पसरवून घ्यायची असे त्यांनी केले नाही. विदर्भात उत्तर महाराष्ट्रात राज ठाकरे गेलेच नाहीत. राज ठाकरेंपेक्षा पंतप्रधान असूनही देशभर सभां घेत महाराष्ट्रात जास्त सभा मोदींनी घेतल्या. आणि त्याही जास्त संख्येने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर महाराष्ट्रात आणि लगतच्या गुजरात मध्यप्रदेशात सभांची सेंच्युरी ठोकली. असा प्रचंड उत्साह विरोधी कुणा नेत्याने दाखवला? 

मतदानाचा जेवढ्यास तेवढा टक्का हा विरोधकांना एक धक्का आहे. सत्ताधार्‍यांच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेत आहे असा जर यांचा दावा होता, ‘मोदी-शहा यांना पाडा’ असा जर राज ठाकरेंचा आग्रह होता तर वंचित बहुजन आघाडीने जे अल्प प्रमाणात करून दाखवले ते यांनी मोठ्या प्रमाणात करायला हवे होते. आपल्या मतदारांना घरातून बाहेर काढून मतदान करून घ्यायला हवे होते. मतदानाची टक्केवारी लक्षणीय अशी वाढवून दाखवायला हवी होती. पण ही संधी विरोधकांनी घालवली. आताही ज्या जागा विरोधकांच्या निवडून येतील त्या जनमताचा रेटा असेल. विरोधकांची किमया नसतील. 

 जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575