दुष्काळी मराठवाडयात असंख्य शेतकरी स्वयंप्रेरणेने चंदन शेती करत आहेत. या शेतीला कायदेशीर बंधने होती. तरीही इथल्या शेतकऱ्यांनी चंदन शेती करून धाडस दाखविले आहे. आता वनविभागाच्या परवानगीने घनसांगवी तालुक्यातील दहिगव्हाण येथे महाराष्ट्रातील पहिले श्वेतचंदन झाड तोडण्यात आले. आता चंदन तोडणीचा, चंदनाच्या अधिकृत विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या मराठवाडयात 1200हून अधिक शेतकरी चंदन शेती करत आहेत. कमी पाण्यात येणारे हे झाड असल्यामुळे दुष्काळी भागासाठी वरदान आहे. महाराष्ट्रातील चंदन झाड तोडण्यास आणि त्याची विक्री करण्यास कायदेशीर बंधने होती. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक, तामिळनाडू व आंध्र व तेलंगण या राज्यांच्या धर्तीवर चंदन झाड तोडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मराठवाडयातील चंदन लागवड शेतकरी करत होते. शेतकऱ्यांच्या मागणीला वनविभागाने सकारात्मकता दर्शवत चंदन झाड तोडणीला परवानगी दिली आहे. घनसांगवी तालुक्यातील दहिगव्हाण येथील मनीषा विलास दहिभाते या महिला शेतकऱ्याला महाराष्ट्रातील चंदनाचे झाड तोडण्याचा पहिला मान मिळाला आहे.
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळाले यश
मनीषा विलास दहिभाते या महिला शेतकऱ्याच्या शेतात चंदनाची झाडे आहेत. चंदनाची झाडे सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी मनीषा याचे पती विलास दहिभाते यांना गेल्या पाच वर्षांपासून तलाठयांपासून ते वन अधिकाऱ्यापर्यंत चकरा माराव्या लागल्या. राज्यात चंदन विक्रीची परवानगी नसल्याने वनविभागाकडून 'नकार' यायचा. त्यामुळे दहिभाते कुंटुंबाच्या पदरी निराशा पडायची. 'हार' न मानता विलास दहिभाते यांनी विभागीय वन अधिकारी ते मंत्रालयातील आयुक्तांपर्यंत हा विषय पोहोचविला. या पाठपुराव्याने दहिभाते यांना वन परिक्षेत्र अधिकारी, जालना यांनी मोजमाप यादीतील फक्त अ.क्र.2चे झाड परिपक्व असल्याने एक झाड तोडण्यास परवानगी दिली आहे. प.पू. डॉ. श्रीकृष्ण महाराज (निरंजनी आखाडा हरिद्वार) यांच्या हस्ते चंदनाच्या झाडाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हे झाड तोडण्यात आले. या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी इटलोड व राठोड यांची उपस्थिती होती.
म्हैसूर येथे होणार चंदनाची विक्री
अधिकृत तोडणी झालेले हे चंदन म्हैसूर येथील 'म्हैसूर सँडल' ही कंपनी विकत घेणार आहे. मराठवाडयातल्या चंदनाला कंपनीकडून मोठी मागणी आहे. त्यामुळे दहिभाते यांच्या चंदनाला कंपनीने पसंती दिली आहे. ''श्वेतचंदनाच्या एका झाडातून दहा ते पंधरा किलो सुंगंधित गाभा अपेक्षित आहे. 8 हजार 500 रुपये प्रतिकिलोप्रमाणे एक ते दीड लाख रुपये दर मिळणार आहे. हे केवळ एका झाडातून मिळणारे उत्पन्न आहे'' असे विलास दहिभाते यांनी सांगितले. या विक्रीमुळे लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा संभ्रम दूर होईल, असेही ते म्हणाले.
''चंदन खरेदीसाठी अधिकृत परवानाधारक नेमा''
- विलास दहिभाते
वन विभागाकडून चंदन तोडणीला परवानगी मिळाली असली, तरी शेतकऱ्यांपुढे काही प्रश्न उपस्थित होत आहेत. चंदन लागवडीचे नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी गाव कामगार तलाठी चालढकल करत असतात. यामुळे शेतकरी हताश होतो. चंदन शेतीबाबत महसूल विभागाने वन विभागाप्रमाणे सकारात्मकता दाखवावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंदन विक्री करण्यासाठी सरकारने अधिकृत चंदन खरेदी परवानाधारक नेमणे आवश्यक आहे.
-चंदन लागवड शेतकरी आणि मार्गदर्शक
केंद्र सरकारच्या 'आयुष' (AYUSH) मंत्रालयाने चंदन लागवडीसाठी परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना एकूण लागवडीवर 75 टक्के सवलत दिली आहे. महाराष्ट्रातील एकातरी शेतकऱ्याला या सवलतीचा लाभ मिळाला आहे, असे ऐकिवात नाही. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
मराठवाडयात शेतकरी आत्महत्येचा बिकट प्रश्न आहे. निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेती करणे अवघड बनत चालले आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी प्रयोगशील शेती करत आहेत. शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्यावर तग धरू शकणाऱ्या चंदन शेतीचा पर्याय निवडला आहे. हा पर्याय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नवा मार्ग दाखविणारा आहे. आता चंदन तोडणीचा अधिकृत विक्रीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे चंदन लागवड शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
''विलास दहिभाते यांच्या मार्गदर्शनाखाली मी तीन वर्षांपूर्वी दीड एकरात चंदनाच्या 412 झाडाची लागवड केली आहे. वन विभागाने चंदन तोडणीला परवानगी दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. चंदन शेतीतून आपण मोठया प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळणार आहे'' असा विश्वास घनसांगवी तालुक्यातील खालापुरी गावातील चंदन लागवड शेतकरी बाळासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
''औसा तालुक्यातील उजळंब गावात आमची दीड एकरात चंदन शेती आहे. वन विभागाने चंदन तोडणीबाबत दिलेल्या परवानगीचे आम्ही स्वागत करतो. या परवानगीने असंख्य शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. आता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी चंदन शेतीकडे वळायला हरकत नाही'' असे हणमंत दिलीप जाधव यांनी सांगितले.
एकूणच वन विभागाने चंदन तोडणीची परवानगी दिली असल्याने होतकरू शेतकरी चंदन शेतीकडे निश्चितच वळतील अशी आशा आहे.
अन्... सा. 'विवेक'चे मानले आभार
मराठवाडयातील असंख्य शेतकरी दुर्लक्षित चंदन शेतीचा पर्याय निवडून आपल्या स्वप्नांचे मनोरे रचत आहेत. या संदर्भातला विस्तृत लेख साप्ताहिक 'विवेक'च्या 3 फेब्रुवारी 2019 ते 9 फेब्रुवारी 2019च्या अंकात 'चंदन शेतीचा मराठवाडा पॅटर्न' हा लेख प्रसिध्द झाला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वाचकांनी व शेतकऱ्यांनी या लेखाचे स्वागत केले होते. विशेष म्हणजे या लेखात चंदन तोडणी व विक्री संदर्भातही भाष्य करण्यात आले होते. चंदन शेतीबद्दल प्रबोधन केल्याबद्दल विलास दहिभाते, बाळासाहेब गायकवाड आणि हनुमंत जाधव या शेतकऱ्यांनी साप्ताहिक 'विवेक'चे मनापासून आभार मानले आहेत.
http://www.evivek.com/Encyc/2019/1/30/Sandalwood-Cultivation-Information