स्थानिक इतिहासाच्या परिचयासाठी हेरिटेज वॉक

विवेक मराठी    13-May-2019
Total Views |

 भारतीय इतिहास संकलन समिती ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून 'वारसा सफर' म्हणजे हेरिटेज वॉक हा उपक्रम राबवत आहे. त्यामागे नुसतंच प्रेक्षणीय स्थळांचं दर्शन अथवा पर्यटन एवढंच कारण नसून इतिहासाबद्दल आणि परंपरेबद्दल जागृती असा उद्देश आहे. या संदर्भात इतिहास संकलन समितीचे कोकण प्रांत सचिव मल्हार गोखले यांची आमच्या प्रतिनिधीने घेतलेली मुलाखत....

आपण नुकत्याच आयोजित केलेल्या 'मुंबई फोर्ट हेरिटेज वॉक'ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही कल्पना तुमच्या मनात कशी आली?

पूर्वी गो.नी. दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे लोकांना किल्ले दाखवायला घेऊन जात असत. आज महाराष्ट्रभर जे असंख्य ट्रेकर्स पाठीवर सॅक लटकावून गडकिल्ल्यांच्या अवघड वाटा तुडवत जातात, त्याची मूळ प्रेरणा गो.नी.दा. उर्फ अप्पा यांच्या पदभ्रमणावरच्या लेखनाची आहे. मी स्वत: ट्रेकरही आहे आणि इतिहास संकलनचा कार्यकर्ताही आहे. इतिहास संकलन समितीचे आद्य प्रवर्तक माननीय मोरोपंत पिंगळे यांचा असा आग्रह असायचा की, देशाचा इतिहास, प्रांताचा इतिहास हे तर महत्त्वाचे आहेतच, तसाच स्थानिक इतिहासही फार महत्त्वाचा आहे. तो जमा केला पाहिजे.

प्रत्येक स्थानाला इतिहास असतोच का?

होय, असतो. इतिहास म्हणजे अगदी हजारो वर्षांचा, शिवकालीन, पेशवेकालीन असंच नव्हे. एखादं ठिकाण समजा गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांत भरभराटीला आलं असेल, तरी तो इतिहासच आहे. मा. मोरोपंतांच्या या आग्रहामागे मनुष्य जिथे राहतो आहोत ती वस्ती, ते नगर, ते शहर, तो तालुका, तो जिल्हा, तो प्रांत, तो देश असा चढत्या क्रमाने अभिमान असतो. शेवटी अस्मिता अस्मिता म्हणतात ती अशीच तर बनते.

या सगळयाचा हेरिटेज वॉकशी काय संबंध?

त्याचीच पार्श्वभूमी सांगतोय. तर किल्ले पाहताना माझ्या मनात कुठेतरी खंत असायची की, माझ्या राहत्या मुंबई शहराला असा कोणताच गौरवशाली इतिहास नाही.

असं वाटण्याचं काय कारण?

पूर्वी मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये (आताच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात) आठवडयातून एक दिवस विनामूल्य प्रवेश होता. मी आवर्जून जायचो आणि तासन्तास तिथल्या वस्तू पाहायचो. कॉलेज विद्यार्थी होतो. वेळ होता. म्युझियमचा संपूर्ण परिसरच ऐतिहासिक आहे. हा सगळा इतिहास वेगवेगळया कर्तबगार इंग्रज गव्हर्नरांनी घडवलेला आहे. कित्येकदा असं व्हायचं की, एखादी अलिशान लक्झरीबस समोर येऊन उभी राहायची. तिच्यातून तीस-चाळीस गोरे प्रवासी उतरायचे. त्यांच्यासोबत जो कोणी किंवा जो कोणी टूरिस्ट गाईड असेल त्याने /तिने परिसराची माहिती द्यायला सुरुवात केली की, तिचं पहिलं वाक्य बहुधा हेच असायचं - 'बाँबे ईज अ ब्रिटिश लीगसी'. बाजूला उभं राहून ऐकणाऱ्या माझ्या काळजात हे वाक्य सलायचं. पुढे मा. मोरोपंतांच्या आग्रहानुसार मी स्थानिक इतिहासाचं खूप वाचन केलं. गो.ना. माडगावकर, आचार्य, नाईक, शिंगणे, न.र. फाटक, अरुण टिकेकर, गंगाधर गाडगीळ, शारदा द्विवेदी या जुन्या-नव्या विद्वानांनी मुंबईबद्दल खूप लिहिलंय. ते वाचल्यावर मी या निष्कर्षाला आलो की, 'बाँबे ईज नॉट अ ब्रिटिश लीगसी, बट मुंबई इज अ हिंदू लीगसी.'

आणि ही गोष्ट माझ्या इतिहास संकलन समितीतल्या, भन्नाट ट्रेकर्स या माझ्या ट्रेकिंग मंडळातल्या मित्र-मैत्रिणींना कळावी, म्हणून दोन वर्षांपूर्वी आम्ही मुंबई फोर्ट विभागाचा पहिला हेरिटेज वॉक केला.

पण इतरही काही लोक असा वॉक आधीपासून करतात ना?

होय. पण त्यांचा उद्देश पर्यटन किंवा वास्तुशैलीचा अभ्यास असा असतो. आमचा उद्देश इतिहासाची ओळख असा आहे. उदा. चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या भव्य वास्तूंचा परिचय करून देताना आम्ही या वास्तू कोणत्या शैलीच्या आहेत, त्यांचे आर्किटेक्ट, इंजीनिअर कोण होते, त्या किती साली बांधल्या आहेत एवढंच सांगत नाही, तर जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट या एका महापुरुषाच्या अथक प्रयत्नांमुळे इंग्रज सरकारला भारतात रेल्वे सुरू करावीच लागली, अन्यथा इंग्रज भारतात रेल्वे आणायला तयार नव्हते, हेही आवर्जून सांगतो. मुळात आम्ही लोक गडकिल्लेप्रेमी असल्यामुळे मुंबईचा किल्ला म्हणजे फोर्ट नेमका कुठे होता, त्याचे तीन मुख्य दरवाजे कुठे होते, इंग्रजांनी तो किल्ला केव्हा पाडला इत्यादी माहिती त्या त्या ठिकाणी जाऊन सांगतो. चिमाजी अप्पाच्या म्हणजेच मराठयांच्या आक्रमणाच्या भीतीने इंग्रजांनी किल्ल्याच्या उत्तरेकडचं मुंबादेवीचं देऊळ कसं हलवलं आणि पुढे त्याच मोकळया जागेवर व्हिक्टोरिया टर्मिनस कसं उभं राहिलं, ही अत्यंत स्फूर्तिदायक हकीकत आम्ही मुद्दाम सांगतो. लोक चकित होतात, तसेच आनंदितही होतात. 1818 साली भले या इंग्रजांनी आमचा पराभव केला, पण 1736 साली आमच्या चिमाजी अप्पांच्या झंझावातासमोर यांची घाबरगुंडी उडाली होती, ही भावना सुखावणारी असते.

असे हेरिटेज वॉक तुम्ही फक्त फोर्टमध्येच करणार का?

- छे! छे! इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांत कार्यकारिणीतले माझे विद्वान सहकारी डॉ. सूरज पंडित, डॉ. प्राची मोघे, नवीनराव म्हात्रे यांनी गेल्या दोन वर्षांत मुंबई परिसरातील कान्हेरी गुंफा, मंडपेश्वर गुंफा, जोगेश्वर गुंफा, बोरिवली-गोराईमधले वीरगळ अशा अनेक ठिकाणी हेरिटेज वॉक घेतलेत. त्याला सर्व वयोगटातल्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे.

वसई किल्ला हेरिटेज वॉकबद्दल काय?

वसई आणि परिसर पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी चिमाजी अप्पांनी केलेली स्वारी हे मराठयांच्या इतिहासातलं एक तेजस्वी पर्व आहे. डॉ. श्रीदत्त राऊत हे आमचे मित्रच आहेत. ते आणि त्यांची संस्था, वसई मोहिमेतील ऐतिहासिक स्थळांचा हेरिटेज वॉक आयोजित करतात.

इतिहास संकलन समितीची भूमिका अशी आहे की, केवळ मुंबई आणि परिसरातच नव्हे, तर संपूर्ण कोकणपट्टीत अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. स्थानिक रहिवाशांमधूनच त्यांचा अभ्यास करणारे लोक पुढे यावेत. डॉ. श्रीदत्त राऊतांप्रमाणेच त्यांनीही असे हेरिटेज वॉक आयोजित करावेत. लोकांना आपली तेजस्वी परंपरा आणि वारसा यांची जाणीव करून द्यावी.

ही चळवळ कोकणापुरतीच मर्यादित नाही. संपूर्ण महाराष्ट्र प्रांतभर स्थानिक अभ्यासक पुढे यावेत. अशा अभ्यासकांना हेरणं, मदत करणं, पुढे आणणं, अभ्यासवर्ग इत्यादीद्वारे प्रशिक्षित करणं आणि त्यांनी आपल्या देशाचा खराखुरा इतिहास - जो आजवर उपेक्षित राहिला आहे किंवा मुद्दाम दाबून ठेवण्यात आला आहे, तो समाजाच्या तळागाळापर्यंत नेणं, हेच तर इतिहास संकलन समितीचं उद्दिष्ट आहे.

तुमच्या पुढच्या सफरीत सामील होण्यास इच्छुक असलेल्यांना काय करता येईल?

अशा इच्छुकांनी आपला पंचवीस-तीस मित्रांचा गट जमवावा. सफर घडवायला आमचा कार्यकर्ता येईल. पण या सफरीतून प्रेरणा घेऊन, अभ्यास करून आणखी काही काळाने तुम्हीच मार्गदर्शक, कार्यकर्ता बनावं अशी आमची अपेक्षा आहे.

याविषयीच्या अधिक माहितीसाठी संपर्क : मल्हार कृष्ण गोखले  -  7208555458.

 

-प्रतिनिधी