आता प्रतीक्षा नवीन शासनाची

विवेक मराठी    30-Apr-2019
Total Views |

शासन चांगले की वाईट, हे शासन कोण करते यांच्यावर जसे अवलंबून आहे, त्याहून जास्त त्यांना निवडून कोण देते, यावर अवलंबून आहे. राज्य, लोकशाही, शासन, याचा विचार करता सार्वत्रिक सत्य असलेले एक वाक्य आहे - लोकांना त्यांच्या लायकीचे सरकार मिळते. 23 मेनंतर नवीन सरकार अस्तित्तवात येईल. 




महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींचा शेवटचा टप्पा शांततेत पार पडला. 2014पेक्षा या वर्षी मतदानाचा टक्कादेखील वाढलेला आहे. मतदान करताना ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अपंग आणि प्रथम मतदान करणारे तरुण आपले कर्तव्य पार पाडताना दिसत होते. प्रचंड ऊन असूनसुध्दा काही ठिकाणी मतदार तासन्तास रांगेत उभे राहिले. मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी राजकीय पक्षांनी जागोजागी बूथ उभे केले. या बूथवरदेखील कार्यकर्ते बारा-बारा तास ठाण मांडून बसले होते. निवडणूक प्रचारांच्या सभेत एकमेकांच्या उखाळयापाखाळया काढणारे आणि अर्वाच्य भाषेचा वापर करणारे बूथवर मात्र अत्यंत सौम्यपणे बोलताना दिसत होते. एकमेकांना मदत करतानाही दिसत होते. भारतीय असण्याचे आणि जगण्याचे हे वैशिष्टय आहे.

निवडणुकांचे निकाल जे काही लागायचे असतील ते लागोत. परंतु एका प्रश्नाचा निकाल मात्र आताच लागला आहे. हा प्रश्न आहे - लोकशाही हा आमच्या जगण्याचा भाग झाला आहे की नाही? तर त्याचे सकारात्मक उत्तर असे की, होय! लोकशाही आमच्या जीवन जगण्याचा भाग झालेली आहे.

लोकशाही आपल्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अधिकार देते. यातील राजकीय अधिकार सर्वाधिक महत्त्वाचा असतो. आपण केवळ एकच मत देतो. पण आपल्याला हे माहीत आहे का, की माझे एक मत आणि टाटा, अंबानी, किंवा शरद पवार यांचे एक मत याचे मूल्य समान आहे! म्हणजे राजकीयदृष्टया मी, टाटा, अंबानी, पवार समान आहोत, ही आहे राजकीय समता. आपण गेली सत्तर वर्षे तिचा अनुभव घेत आहोत. प्रत्येक लहान-मोठया निवडणुकीत मतदान करताना आपण सर्व एका समान भूमिकेवर असतो.

हा एक मोठा चमत्कार आहे असे जर म्हटले, तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील - यात कसला आलाय चमत्कार? आपण जातीत जगत असतो. जातीची उतरंड असते. वरच्या जातींना अधिक मान-सन्मान, मधल्या जातींना थोडे कमी आणि कनिष्ठ जातींना नगण्य मान-सन्मान असतात. समता नसते. 'प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे मूल्य समान' ही संकल्पना जातीची उतरंड नाकारते आणि ती सर्वांनी मान्य केली आहे. ब्राह्मण कुळातील जन्मलेला कुणी म्हणत नाही की मी ब्राह्मण आहे, माझ्या मताचे मूल्य शंभर असले पाहिजे. आपल्या मताचे मूल्य एकच आहे, हे तोही स्वीकारतो. ही राजकीय समता हा एक चमत्कारच आहे.

गेली सत्तर वर्षे आपल्यापैकी काही जण मतदान करीत आले आहेत. दर वीस वर्षांनंतर पिढी बदलते. मतदारांच्या संख्येत वाढ होत जाते. तरुणांना मतदान करण्याचा फारच उत्साह असतो.  त्यांचा उत्साह ही आपली लोकशाही भक्कम करणारा उत्साह आहे. आपण मतदान करतो, म्हणजे काय करतो? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर तो त्याचे उत्तर देईल की, मी माझ्या आवडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी माझे मत देतो. काही वेळेला उमेदवार आवडीचा नसतो, पण पक्ष आवडीचा असतो. अशा वेळी तो म्हणतो की, मी पक्षाला मतदान केले आहे. माझ्या आवडीचा पक्ष निवडून आला पाहिजे.

यापेक्षा थोडा अधिक खोलवरचा विचार करू या. आपण जेव्हा मत देतो, तेव्हा एका विषयाचा निर्णय घेतो की, आमच्यावर राज्य कुणी करायचे? राज्यकर्त्याच्या निवडीचा हा अधिकार आहे. शासनाशिवाय समाज चालू शकत नाही. समाजातील माणसे (म्हणजे आपण सर्व) वेगवेगळया प्रकारची भांडणे करण्यात कायमच व्यग्र असतो. भांडणाचे विषय असतात - मालमत्ता, जमीन, घर, सोने, शिवीगाळ, मारझोड, चोरी, दरोडा, उधार-उसनवारी, पैशाचे वेगळया प्रकारचे व्यवहार.. अशा विषयांना काही अंत नसतो. ही भांडणे कधी व्यक्तिगत असतात, तर कधी समूहाची असतात. कामगार, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, प्राध्यापक, विविध आस्थपनांत काम करणारे कर्मचारी हे समूहरूपाने भांडणासाठी उभे राहतात. त्यांच्या काही मागण्या असतात, काही गाऱ्हाणी असतात. शासनाला या सर्वांचे निर्णय करावे लागतात. निर्णय योग्य त्या कायद्याने करावे लागतात आणि निर्णय न्याय देणारा असावा लागतो.

आपण जेव्हा मतदान करतो, तेव्हा कायद्याने चालणारे शासन आणि न्याय करणारे शासन आणण्यासाठी मतदान करतो. ही आपली जबाबदारी आहे. लोकशाहीतील ही सर्वात मोठी जबाबदारी आहे, म्हणून मतदानाचा अधिकार अतिशय पवित्र मानला जातो.


हा मतदानाचा अधिकार सार्वभौमत्वाचा अधिकार असतो. लोकशाहीत प्रजा सार्वभौम असते. राज्य कुणी करायचे हे प्रजेने ठरवायचे. योग्य कायदे करणारे प्रशासक कोण असावेत, हे जनतेने ठरवायचे. जनता म्हणजे जसा समूह आहे, तसा जनतेतील एक घटक म्हणून माझे अस्तित्वदेखील स्वतंत्र आहे. मतदान करताना मी माझे सार्वभौमत्तव मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करतो आहे. या मतदानाचे इतके महत्त्व असते.

लोकसभेसाठी आपण मतदान केले आहे. आपआपल्या आवडीनुसार उमेदवाराला आणि पक्षाला मतदान केले आहे. उभ्या असलेल्या उमेदवाराने आणि पक्षानेदेखील काही आश्वासने दिली आहेत. निवडून आल्यानंतर आम्ही काय करू, हे सांगितलेले आहे, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. निवडणूक निकालानंतर दिल्लीत नवीन सरकार अस्तित्वात येईल. आपण जर आज आहे त्या शासनालाच पुन्हा संधी दिलेली असेल तर तेच शासन अधिकारावर येईल आणि दिली नसेल तर नवीन सरकार येईल.

शासन चांगले की वाईट, हे शासन कोण करते यांच्यावर जसे अवलंबून आहे, त्याहून जास्त त्यांना निवडून कोण देते, यावर अवलंबून आहे. राज्य, लोकशाही, शासन, याचा विचार करता सार्वत्रिक सत्य असलेले एक वाक्य आहे - लोकांना त्यांच्या लायकीचे सरकार मिळते. 23 मेनंतर नवीन सरकार अस्तित्तवात येईल. ते चांगले की वाईट, पात्र की अपात्र, याची चर्चा निरर्थक एवढयासाठी ठरेल, कारण शेवटी ते आपण निवडून दिलेले सरकार आहे. आपल्या लायकीप्रमाणे आपल्याला सरकार मिळाले आहे, असेच आपण समजले पाहिजे.

vivekedit@gmail.com