मानवी समाजक्रांतीत हळूहळू ईश्वरी प्रेरणेची जागा घटनात्मक जीवनमूल्यांनी घेतली. ऐहिक जगाशी संबंधित या घटनात्मक जीवनमूल्यांची निर्मिती क्रमाक्रमाने होत गेली. त्यातून मोठा इतिहास आकाराला आला. या घटनात्मक जीवनमूल्यांसंबंधी सखोल चिंतन करणारी ही लेखमाला.
एक काळ असा होता की धर्मग्रंथ समाजाचे नियंत्रण करीत असत. हे जग ईश्वराने निर्माण केले आहे. माणूस ही त्याची सर्वात प्रिय असलेली निर्मिती आहे. त्याने कसे वागावे, वागू नये हे केवळ त्यालाच कळते. त्याचे नियम जगाला समजावून सांगण्याकरिता तो प्रेषितांना किंवा अवतारांना या जगात पाठवितो. त्यांचे मार्गदर्शन धर्मग्रंथात ग्रथित केलेले असते. तसे वागण्यातच मानवाचे व मानवजातीचे हित असते. त्याआधारेच समाजाचे नीतिनियम ठरविले जातात. जो तसे वागणार नाही, तो अनीतीने वागत असतो. नीतीने वागणे म्हणजेच न्यायाने वागणे. तसे वागल्याचे फळ या लोकात मिळाले नाही, तरी परलोकात नक्की मिळते. मानवी बुध्दीला मर्यादा आहेत, त्यामुळे ईश्वरप्रणीत नियमांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा किंवा त्यांची चिकित्सा करण्यापेक्षा त्यांचे पालन करण्याचा प्रचार करणे हेच हितावह असते. सर्व मानवजातीला यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी केलेले सर्व प्रकारचे प्रयत्न हे पुण्यकर्मच असते, अशी यामागची भूमिका असते.
घटनात्मक जीवनमूल्ये यापेक्षा वेगळया पायावर उभी असतात. ही जीवनमूल्ये ईश्वरनिर्मित नसून ती मानवी बुध्दीतून जन्मली आहेत. परलोकातील पुण्यसंचय हा त्यांचा हेतू नसून माणसाचे ऐहिक जीवन न्यायपूर्ण जगण्यासाठी त्यांची निर्मिती झाली आहे. या न्यायाच्या संकल्पना जसजशा अधिकाधिक प्रगल्भ होत जातील, तसातसा या मूल्यात बदल करायचा अधिकार माणसांनाच आहे हे यात गृहीत धरलेले आहे. तो बदल करण्याची प्रक्रियाही एखाद्या माणसाच्या मर्जीवर अवलंबून नसून ती नियमबध्द केलेली असते. या मूल्यांना कायद्याचा आधार असतो. या मूल्यांचे पालन केले नाही, तर त्याची शिक्षा परलोकात नव्हे, तर याच जगात भोगावी लागते. घटनात्मक मूल्ये परलोकासंबंधी बोलतच नाहीत. त्यांचा सर्व संबंध ऐहिक जगात घडणाऱ्या घटनांशी असतो. या मूल्यांची निर्मिती एकाएकी झालेली नाही, तर त्यांच्या विकासक्रमाचा मोठा इतिहास आहे.
जसजशी वैज्ञानिक क्रांती होऊ लागली, तसतसे मानवी जाणिवेतील कार्यकारणभावाचे क्षेत्र विस्तारू लागले. माणूस आजवर ज्या गोष्टींकडे चमत्कार म्हणून पाहत होता, ते चमत्कार नसून कार्यकारणभावाने त्याचा उलगडा होऊ शकतो, असे त्याच्या लक्षात आले. येणाऱ्या रोगाच्या साथी ईश्वरी कोपाने होत नसून रोगजंतूंमुळे होतात व त्यांचे निराकरण करूनच त्यांच्यावर नियंत्रण आणता येते, हेही त्याच्या लक्षात आले. जसजशी वैज्ञानिक प्रगती होत गेली, तसतसे ईश्वराच्या अधिकारक्षेत्रातले एक एक क्षेत्र कमी होत ते मानवी बुध्दीच्या कक्षेत येत गेले. तरीही काही क्षेत्रे अशी राहिली, ज्यांवर ईश्वरी संकल्पनेचा प्रभाव होता. माणसाची निर्मिती कशी झाली व त्याच्या जीवनाचा उद्देश काय? माणसाचे वागणे कोण ठरविते? त्याच्या सुखदु:खाची निर्मिती कशी होते? या तिन्ही प्रश्नांची क्रमाक्रमाने उत्तरे दिली गेली. माणसाची निर्मिती ईश्वराने केली नसून तो जैविक उत्क्रांतीचा भाग आहे, हे डार्विनने सिध्द केले. परमेश्वराची प्राप्ती हे माणसाचे उद्दिष्ट नसून त्याच्या मनातील सुप्तावस्थेत असलेल्या स्वातंत्र्यविषयक आकांक्षांचे प्रकटीकरण हे त्याचे प्रमुख जीवनमूल्य आहे, असा विचार हेगेलने मांडला. माणसाचे वागणे हे त्याच्या मनोव्यापारावर अवलंबून असते व त्याचे विश्लेषण करता येऊ शकते, असा सिध्दान्त फ्रॉइडने मांडला. मानवी सुखदु:खे ही ईश्वरी कृपेवर किंवा अवकृपेवर अवलंबून नसून ज्यांच्यापाशी आर्थिक साधने नसतात ते कारण त्यांच्या दु:खाला कारणीभूत ठरतात व आर्थिक साधने नसल्याचे कारण म्हणजे समाजव्यवस्था. ही समाजव्यवस्था बदलून मानवी दु:ख दूर करता येईल असा विश्वास माक्र्सने प्रकट केला. त्यामुळे माणसाची निर्मिती, त्याच्या जीवनाचा उद्देश, त्याचे वागणे, त्याची सुखदु:खे या सर्वांचा विचार ईश्वर या संकल्पनेला बाजूला ठेवून करता येऊ शकतो, हे सिध्द झाले. हे सिध्दान्त परिपूर्ण नसले, तरी त्यासाठी ईश्वराकडे जाण्याची गरज नव्हती. त्याच विचारांच्या चिकित्सेतून पुढचे मार्ग सापडत होते.
याच विचारांचा प्रभाव समाजधारणेच्या संकल्पनांवर झाला. आजवर ईश्वराच्या नाते, त्याचे प्रतिनिधी म्हणून धार्मिक नेते किंवा राजे राज्य करीत होते. परंतु ईश्वरी अधिष्ठानावरच प्रश्नचिन्ह उत्पन्न झाल्यावर समाजधारणा करणारे तत्त्व कोणते, याचा विचार सुरू झाला व त्यातून इहवादी नीतिशास्त्राचा जन्म झाला. मानवी कृतीमागची प्रेरणा ही ईश्वराची कृपाप्राप्ती नसून सामाजिक हित असले पाहिजे हा यामागचा मूळ विचार. परंतु सामाजिक हित ही फार ढोबळ संकल्पना झाली. सामाजिक हित म्हणजे नेमके काय? त्याचे घटक कोणते? ते कशातून साध्य होईल? त्याकरिता आदर्श समाजस्थिती कशी असली पाहिजे? या आणि यासारख्या विषयांवर अनेक मतमतांतरे आहेत. अशा चर्चेतच आपल्या घटनेची जीवनमूल्ये दडलेली आहेत.
kdilip54@gmail.com