ज्ञानसूर्याला आदरांजली

विवेक मराठी    11-Apr-2019
Total Views |

 


सा. विवेकच्या वाचकांच्या साथीने हा चांदण्यातला प्रवास सुरू केला, त्याला एक वर्ष झालंदेखील!

'कवितेची सोबत म्हणजे चांदण्याची बरसात' असं जरी असलं, तरी पायाखाली वास्तवाचा रस्ताच असतो. त्यावरचे काटेकुटे बोचायचे राहत नाहीत. कवितेचा चंद्रस्पर्श आपल्याला लौकिकातली दु:खं, काळज्या विसरायला लावतो, त्यांच्यासह चालायला बळ देतो,  इतकंच! तोच विचार, तोच आशय कवितेचं लेणं लेऊन आला की त्यातला रूक्षपणा बाजूला जातो. आतली कोवळीक आपसूक जागी होते. ते बीज मग सहजच मनात रुजतं. आपल्या मनाला समृध्द करतं.

या निमित्ताने अनेक लाडके कवी परत वाचले. एक कविता निवडणं कधीकधी कठीण व्हायचं. मग काही जोडीने आल्या. त्या-त्या दिवसातल्या घडामोडी, विशेष प्रसंग याला साजेशा कविता अलगद हातात येत गेल्या.

एक वर्तुळ पूर्ण झालं. आता काही काळाकरता निरोप घ्यायचा. वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला, आवर्जून फोन केले. सा. विवेकने लिहितं केलं नि वाचकांच्या प्रतिसादांनी लिहितं ठेवलं.

कवितांची साथ सुटत नाही. ती भेटत राहीलच. आपणही भेटत राहू. कदाचित याच सदराच्या नव्या रूपात... कदाचित नव्या सदरात...

सदराचा आरंभ भीमवंदनेनेच केला होता कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेचं पुष्प वाहून. आज पुन्हा महामानवाच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी आजचे कवी संतोष पद्माकर यांची कविता.

महामानव सहस्रकातून एकदा जन्माला येतो. सामान्य माणसाइतक्याच लांबीच्या मानवी आयुष्यात दैवी कार्य करून जातो. बाबासाहेबांनी भारतीय समाजाच्या लांछनास्पद जातिव्यवस्थेचा चिखल दहा हातांचं बळ लावून उपसला. त्यांच्या भीमप्रयत्नातून जो प्रगतीचा पथ दिसू लागला, त्यावरून आता देश खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने घोडदौड करेल, असं वाटत होतं.

लढाईची गरजच भासू नये असा संवादाचा मार्ग तो महामानव दाखवून गेला होता. झालेल्या अपरिमित अन्यायांचेच दाखले देत त्यांनी आयुष्य वाया घालवलं नाही. आत्यंतिक अनुकूलता असतानाही जे करता येऊ नये ते बाबासाहेबांनी पराकोटीच्या प्रतिकूलतेत करून दाखवलं.

बाबासाहेबांना आदरांजली वहाताना संतोष लिहितात -

'रोज उगवतो दिवस, लोक होती जुने जुने,

एक तूच सूर्याप्रमाणे नभी शोभत आहे भीमा!'

असे ते ज्ञानसूर्यासारखे भारतीय विभूतीमंडलात शोभले,

'तुझी मायेची ओंजळ पाजी हक्काचे पाणी,

धम्म घेऊनी वहिवाट नवी पाडत आहे भीमा!'

अशी नवी पायवाट त्यांनी रेखून दिली. आपल्या कणखर हातांनी तहान अन पाण्यामधले अडथळे दूर केले अन स्वत: ओंजळीने मायेने पाणी पाजून शतकांची तृषा शमवली.

तरीही आज स्थिती पूर्ण पालटली नाहीये. निरनिराळया संदर्भात बाबासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका यांची उणीव भासते आहे.

'दिनोदिन तुझी प्रस्तुतता वाढत आहे भीमा,

हरेक दु:खी तुझीच याद काढत आहे भीमा!' असं म्हणणारा कवी या उसळलेल्या संघर्षात, वादळात भरकटलेली विचारनौका पाहून अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. मोठया विश्वासाने बाबासाहेबांनी चळवळीचं भक्कम जहाज बांधून, त्याला आपल्या शुध्द विचारांचं शुभ्र शीड लावून, आमच्या प्रवासाची दिशा ठरवून आम्हाला जगण्याच्या समुद्रात पाठवलं. पण आज पाहावं तो ते जहाज मुक्कामी पोहोचलंच नाही! आमच्या मनातली संघर्षाची आग विझल्यासारखी दिसते आहे. चळवळीचं जहाज तुटून मागे राहिलाय तो फक्त अडचणीच्या वेळेला असावा म्हणून लावलेला, जहाजाला एका जागी जखडून ठेवणारा नांगर!

कुणीच का शहाणं नाही? कुणाच्याच तोंडी का जोडायची भाषा नाही? अशा विद्वेषाच्या आगीत सारं खाक झालं, तर आपला ठाव शोधावा तरी कुठे? आपण विसरलोय का, की एकच माय आपल्याला व्यालीय? तिच्या हातचा तुकडा ओरबाडून भांडतो आहोत आपण? आपल्याच बापावर मालकी सांगण्याकरता त्याच्या चित्राचे कपटे केलेत आपण! आपल्याच जिवलगांपासून अलग राहण्यासाठी घराला कुंपण कसं घालायचं? नात्यांच्या मातीत मनाचा ओलावा मिसळून लिंपल्यावर येणाऱ्या आपलेपणाच्या घट्ट गिलाव्याला विसरायचं कसं? नुसत्या भुशाने पोकळ घर उभारावेत असे कोरडे दिवस आलेत हे मानावं कसं?

तेव्हा आमच्या मनातले संकल्प या सागरापेक्षा जास्त उसळया घेत होते. आज तो जोश हरवलाय. ओढाताणीत निशाणाच्या चिंध्या झाल्यात. बाजूला बसून गंमत पहाणारा किनारादेखील आता आमच्या गर्जत असलेल्या सागराला गिळून टाकेल की काय?

काल पेटलेला बाई कसा विझला संगर

गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर ॥ध्रु.॥

 

नाही कोणीच शहाणं घर टाकलं मोडून

नाही जोडण्याची भाषा वासे टाकले विकून

जळालेल्या राखेमधी कसं शोधावं नगर

गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर ॥1॥

 

कशी तुटू फुटू गेली एका आईची लेकरं

एका भाकरीचे झाले कसे कोरके शंभर

कोणी फाडून टाकले चित्र बापाचे सुंदर

गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर ॥2॥

 

कसे घराला घालावे दार अथवा कुंपण

माती पाण्याच्या मेळाचे होते वायले लिंपण

नुसते भुसाला रचावे दिस आलेत खंगर

गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर ॥3॥

 

काल उधाणला दर्या आज ओसरला जोश

झेंडा विरून चालला जसा झाला पायपोस

कसा काठाने गिळला इथं गर्जता सागर

गेलं जहाज तुटून मागे राहिला नांगर ॥4॥

 

ही वेदना केवळ चळवळीच्या वाताहतीची नाही. ही सच्ची वेदना आहे त्या महामानवाची शिकवण विसरल्याची. बाबासाहेब सर्वच भारतीयांच्या हाती एक जबाबदारी सोपवून गेलेत. संविधानाच्या राजरस्त्यावरून समतेचा, बंधुतेचा रथ नेण्याची. जी जातिअंताची लढाई बाबासाहेब प्राणपणाने लढले, त्या जातींचीच हत्यारं एकमेकांवर अजूनही पारजत आहोत आपण.

त्यांनी दिलेलं संविधानाचं हत्यार हे वंचितांच्या विकासाचं साधन आहे आणि हजारो वर्षं झालेल्या निंदनीय अमानवी पापकृत्यांच्या परिमार्जनाचा मार्ग आहे. वेदना सोसणारे व वेदना देणारे या दोन्ही वर्गांचे दैवत जर एक होईल, दोघंही हातात हात घालून त्या बंधुतेच्या मार्गावर चालतील, तर त्या महामानवाच्या शब्दांचं आपण मोल राखलं असं होईल.

त्यांच्या मनातल्या चित्रातला मानव सहिष्णू होता, संतुलित होता, सुशिक्षित होता. ज्ञानार्थी, समन्वयवादी नि समानतेसाठी संघर्ष करणारा होता. बाबासाहेबांनी स्वत:च्या उदाहरणातून आदर्श निर्माण करून आपलं ॠण कधीच फेडलं आहे.

'भीमा

तू इथल्या मातीत जन्मल्याचा उपकार फेडताना दावलास शांतीचा बुध्दधम्म

तूझ्या मनात नांदत होती

न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या भारतासाठी

तू या मातीतला, सच्चा महामानव होतास...

नाहीतर तूही जिनासारखा मागू शकला असतास आणि घेऊही शकला असतास दलित बांधवांसाठी एक वेगळा देश...'

ही प्रत्येक भारतीयांच्या मनातली कृतज्ञता कवी बोलून दाखवतात आणि तिला स्मरून आपल्या सर्वांसाठी ॠणमोचनाचा मार्गही सांगतात -

शिकविले जे इमान तू सदाच इथे आम्ही राखू रे,

आम्हीच रोखू जे लोकांना नाडत आहे भीमा!

 

आदरणीय बाबासाहेबांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र वंदन!

विनीता तेलंग

9890928411