ही सर्व मंडळी मोदीद्वेषाने आंधळी झालेली मंडळी आहेत. ही मंडळी उद्या सूर्य उगवला, याला पुरावा काय? चंद्र उगवला याला पुरावा आहे का? नदी वाहते याला पुरावा आहे का? वारा वाहतो याला पुरावा आहे का? असले प्रश्न विचारतील.
बालाकोट सर्जिकल एअर स्ट्राइकमुळे जशी पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे, तेवढीच भारतातील मोदी विरोधकांचीही भंबेरी उडाली आहे. हवाई दलाने बालाकोटवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान म्हणाला की, हा हल्ला जंगलात झाला, जीवितहानी काहीही झालेली नाही, फक्त काही झाडे नष्ट झाली.
भारतातील विरोधी पक्षांना पाकिस्तानने विषय दिला. पाकिस्तानची बाजू घेऊन ते म्हणू लागले, हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याचे पुरावे द्या, कोण काय काय बोलतो आहे, हे (न) वाचण्यासारखे आहे. दिग्विजय सिंग म्हणतात, ''बालाकोटचा हल्ला अपघात आहे.'' नवजात सिध्दू म्हणतो, ''हल्ल्यात फक्त झाडे नष्ट झाली.'' कपील सिब्बल विचारतात, ''हल्ला झाल्याचे पुरावे द्या.'' शरद पवार म्हणतात, ''पराक्रम कुणी केला आणि छाती कोण बडवत आहे.'' ममता बॅनर्जी म्हणतात, ''हल्ल्याचे पुरावे द्या.''
ही सर्व मंडळी मोदीद्वेषाने आंधळी झालेली मंडळी आहेत. ही मंडळी उद्या सूर्य उगवला, याला पुरावा काय? चंद्र उगवला याला पुरावा आहे का? नदी वाहते याला पुरावा आहे का? वारा वाहतो याला पुरावा आहे का? असले प्रश्न विचारतील. आपल्या बारा विमानांना अडविण्यासाठी पाकिस्तानचे विमानदल सज्ज होत होते, पण आपलेच भारी नुकसान होईल म्हणून ते मागे फिरले, ही बातमीदेखील प्रसिध्द झाली आहे. बीबीसीने बालाकोट परिसरातील लोकांच्या मुलाखती प्रसिध्द केल्या. हल्ला किती जबरदस्त होता हे त्यांनी सांगितले.
या लोकांना पुरावे द्यायचे की पुरायचे, हे जागरूक आणि देशभक्त मतदार या नात्याने आपल्याला ठरवायचे आहे. आपल्या शूर जवानांच्या शौर्यावर संशय उपस्थित करणाऱ्या शंकासुरांना लोळवायचे की आडवे पाडायचे, हे मतदारांनीच ठरवायचे आहे. या सर्वांना हे कळून चुकले आहे की, येणारी लोकसभेची निवडणूक आपण काही जिंकत नाही, आपण उताणे होणार. म्हणून त्यांचा आता थयथयाट चाललेला आहे.
त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य राष्ट्रभक्तांच्या मनात संताप निर्माण करते. या संतापाला वाट करून द्या. पुरावे मागणाऱ्यांना 'पुरावे', यासाठी लोकशाही मार्गाने जाणारी एक पध्दती आहे. ही पध्दती मतपेटीतून जाते. मतपेटी हे माज उतरविण्याचे आणि पुरून टाकण्याचे प्रभावी साधन आहे. आपले मत आजच निश्चित करा आणि तेवढयावर समाधान न मानता प्रत्येकाने आपल्यासारखे दहा लोक तयार केले पाहिजेत.
राजकारणी लोकांना राजकारणाची भाषा समजते, तेथे तर्काच्या भाषेचा उपयोग नसतो. उद्या पुरावे दिले की ते विचारतील, 'जे मेले ते अतिरेकी कशावरून होते? ते अतिरेकी असल्याचे पुरावे द्या. त्यांचे पाकिस्तानी आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? त्यांची नावे द्या...' एकदा राजकारण करायचे ठरविले की त्याला काही मर्यादा नसते.
या सर्वांना राजकारण करू द्या, आपण देशकारण करू या. देशासाठी सर्वस्वाचे होम करणाऱ्यांच्या मागे उभे राहू या, त्यांचे हात बळकट करू या, त्यांना शक्ती देऊ या, अशी शक्ती देऊ या, जी दहशतवादाचे पेकाट कायमचे मोडून काढील. या काळातला हाच राष्ट्रधर्म आहे. पाकिस्तानधर्म जागविणाऱ्यांना हेच उत्तर आहे.