काळ पुढे धावत होता. एक वेळ अशी आली की मुलं मुलांच्या विश्वात, त्यांच्या त्यांच्या कंपनीत दंग झाली. मला जाणवलं, आता त्यांना माझी तेवढी गरज नाही. हे मन स्वीकारेना. आयुष्य उत्तरार्धाच्या टप्प्यावर. मग मात्र कुणाकुणाशी बोलले नि स्वत:ला एक दिवस वेगळं काढलं. वळणावर उभी राहिले नि मनात म्हणाले, ''बाप रे! पन्नास वर्षं कशी गेली कळलंच नाही!'' कळतील कशी? समजून घ्यायला वेळ कुठे होता?
म्हटलं, जरा मागे वळून पाहू... अर्थात आठवू आपलं आयुष्य. असं आठवायला लागलं की काय होतं? सगळया वाईट घटना आठवतात. त्या लक्षात राहतात. मनाला तीच सवय लागलेली असते. म्हणतात ना - सुख पाहता जवाएवढे, दु:ख पर्वताएवढे! म्हणून की काय, पर्वत पटकन दिसतो. जवासारखं धान्य पाहायला बारीक दृष्टीने पाहावं लागतं. खरं असं थोडंच असतं? कारण बरेच वेळा वेगळं काही घडत नाही. चाकोरीत आपण पार बांधलेले असतो. खरं तर किती छोटया छोटया गोष्टींत आनंद लपलाय!
आता मात्र आपण आपल्याच आयुष्यातील चांगल्या घटना आठवू, आनंद देणाऱ्या घटना आठवू. अनेक अडचणींमुळे कधीच बाहेर न पडलेले असू, तर नुसते घोकत बसण्यात काय अर्थ आहे! कुठ्ठे जाणं झालं नाही! आता दोघं एकत्र बसू. डोळे बंद करू आणि नुसती वाक्यं म्हणू या. वाक्य म्हणताना त्या वाक्यातला अर्थ लक्षात आणू, डोळयापुढे आणू. काय म्हणायचं? हे फक्त उदाहरणादाखल -
''चल, आज विमानाने काश्मीरला जायचं.''
''वा! किती छान!''
''हे बघ, ती आबोली साडी नेस. थोडा मेकअप कर.''
''काहीतरीच..''
''लवकर आवर. मुंबईहून निघायचंय.''
''जेवणाचं?''
''वाटेतच घेऊ.''
''जेवण छानच होतं, नाही?''
''एअरपोर्टवर लवकरच पोहोचलो जरा. मजा वाटतेय.''
''छान दिसतेस.''
''तुम्हीपण!''
''किती वेळात येईल श्रीनगर?''
''आत्ता एक-दीड तासात. गप्पात वेळ कसा जाईल, कळणार नाही.''
''हे बघ, जिथे वाद होतील असे मुद्देच नकोत.''
''हं.''
''आपण छानशा या हॉटेलला जाणार आहोत. लगेचच बर्फात...''
आलो ना काश्मीरला जाऊन! किती फ्रेश वाटतंय! जे प्रत्यक्षात मिळालं नाही, ते कल्पनेत मिळवलं. सुखावलो. असंच आयुष्य आठवू. मी आठवू लागले. मी लहान असतानाच्या गमतीजमती आई-दादा सांगायचे. खरंच असं लहानाचं मोठं केलं त्यांनी मला. मग ताई झाले. घरातून बाहेर पडले नि मैत्रीण झाले. लग्नाच्या निर्णयाने बायको झाले. जगण्याचा ट्रॅक बदलला. नवी नाती आयुष्याशी जुळली. वहिनी, सूनबाई, जाऊबाई, मामी, काकू आणि आत्या व मावशीही झाले. अशा नात्यांची पहिली हाक ऐकली तेव्हा किती सुखावले होते. इथपर्यंत बाहेरून नाती चिकटली होती. एक दिवस बाळ झालं नि आई झाले. पुन्हा दुसऱ्यांदा आई. आता मात्र जगण्याला फारच वेग आला. कुणी घेतलेली आवडती साडी, गजरा, विडयाचं पान...
तेव्हा लक्षात नाही आलं, पण वय सरकत होतं. व्यवहारातल्या विश्वात 'मॅडम' झाले. माझ्या जगण्याच्या एवढयाशा वर्तुळात माझं अस्तित्व फुलायला लागलं. लोकांना माहितीची झाले. इथपर्यंत मजा होती. घर, मुलं, नाती, घटना.. सगळं सांभाळताना मुलं मोठी झाली. त्यांचं जगणं आकार घेऊ लागलं. दटावणं, ओरडणं, डोळे मोठं करणं, हक्क गाजवणं, निर्णय देणं, मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं हे सुरू झालं.
काळ पुढे धावत होता. एक वेळ अशी आली की मुलं मुलांच्या विश्वात, त्यांच्या त्यांच्या कंपनीत दंग झाली. मला जाणवलं, आता त्यांना माझी तेवढी गरज नाही. हे मन स्वीकारेना. आयुष्य उत्तरार्धाच्या टप्प्यावर. मग मात्र कुणाकुणाशी बोलले नि स्वत:ला एक दिवस वेगळं काढलं. वळणावर उभी राहिले नि मनात म्हणाले, ''बाप रे! पन्नास वर्षं कशी गेली कळलंच नाही!'' कळतील कशी? समजून घ्यायला वेळ कुठे होता?
हे सारं थोडयाफार वेगळया प्रमाणात असंच घडतं. अजून तसा मरणाचा वगैरे विचार येत नव्हता मनात. पण कुणाच्या मृत्यूची बातमी ऐकताना धस्स व्हायचं. कधीतरी.... गावाबाहेर पडल्यावर पुढचा रस्ता तर स्मशानाकडून होता. कुणाची क्वचित दिसायची चिता. मग ती चिता पाहून चिंता वाटायची. असं काय आठवतंच आपल्याला! कधी दवाखान्यात फार गेलो नाही आजारपणासाठी. आताआताशा भीती वाटते. दोन्हीची! आजारपण आणि खर्च. शरीर स्वत: दाखवू लागलं. वेळ होता का नाही कुणास ठाऊक, पण काळजी घ्यायची असते हेच माहीत नव्हतं.
भूमिका बदलली नुकतीच. आजी झाले नि पुन्हा निरागसतेकडे मन खेचलं गेलं. आपल्या मुलांचं करायला वेळ नव्हता. आता यांचं तरी! आमच्यासारखं नाही आता आजी होणं! माझी आई माझ्या आजीचं सगळं ऐकायची! कारण तिला बाकी काही माहीतच नव्हतं. माझ्या लक्षात आलं, माझ्या पुढची पिढी जास्तच तयारीची आहे. 'कन्सीव्ह' करायचा विचार केलाय हेही सांगताना संकोच नव्हता नि आईपण आपलं आपण तपासून निर्णय सांगतानाही संकोच नव्हता. सगळी तयारी झालेली. आधी विचार, नंतर विचार.. खरं तर किती छान! कदाचित यामुळेच समोरच्या पिढीला पालक होताना पाहण्यात आनंद वाटू लागला. गरजेला सल्ला, नाहीतर सुचवणं. भूमिका बदलली. आजी झाले खरं तर! 'आमच्या वेळी असं नव्हतं बाई' अशी तुलना करायलाही वेळ नव्हता. नाही केली तेही एका अर्थाने स्वत:ला वेगळं काढणंच होतं. आयुष्य किती भुर्रकन गेलं. आता जरा जगणं दमानं बघावं.
अशीच एका बहिणीकडे गेले होते. तिची तरुण मुलगी खूप काळजी घेत होती स्वत:ची! ती सांगत होती - व्यायाम करते, खाण्याची काळजी घेते, वाटेल तेव्हा खात नाही. मी पटकन म्हणाले, ''उगाचच चोचले! एवढया तरुणपणी कसले आले आहेत हे नखरे! भरपूर काम करा. असेल ते आनंदाने खा!'' मुलीने हे ऐकलं नि शांतपणे म्हणाली, ''मावशी, आता लक्ष दिलं तर आईसारखं होण्याचे चान्सेस कमी.'' ''म्हणजे?'' ''हे दुखतंय, ते दुखतंय, उठवत नाही. दमायला होतं. मी तिला सांगते, आता तुझी पन्नाशी ओलांडली. पुढचं आयुष्य म्हणजे बोनस समज...'' मी दचकले नि मनात म्हणाले, मी नाही माझ्या आईला हे सांगितलं. काळजी घ्यायची. त्यातून व्हायचं ते होईल. चांगला विचार केला तर बिघडलं कुठं? खरं तर करायलाच हवा. त्याला पैसे पडत नाहीत नि वेळही द्यावा लागत नाही. चांगलं जगणं स्वस्त असतं. डोक्यावरचा पांढरा थर काळा केला तरी आयुष्य सांगतंय, पन्नाशी ओलांडली.
rrenudandekar@gmail.com
8828786875