निर्णय आपल्याला घ्यायचा आहे

विवेक मराठी    13-Mar-2019
Total Views |


 

लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नांदू शकत नाहीत. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. दुसऱ्यांदा तेच राष्ट्राध्यक्ष व्हावे म्हणून लोकांनी प्रचंड आग्रह केला. जेव्हा तिसऱ्यांदा आग्रह झाला तेव्हा ते म्हणाले, ''आपल्याला राजेशाही नको म्हणून इंग्रजांच्या राजाविरुध्द आपण बंड केले. लोकशाही मार्गाने हीच राजेशाही आपण आणणार असू, तर आपल्या बंडाला काही अर्थ राहत नाही. म्हणून मी तिसऱ्यांदा अध्यक्ष होणार नाही.'' आणि ते आपल्या मूळ गावी निघून गेले. आपल्या देशात नेहरू, नंतर त्यांची मुलगी, नंतर मुलीचा मुलगा, नंतर मुलाची बायको आणि आता नंबर लावून उभे आहेत त्यांची मुले. आपली बुध्दी गहाण ठेवू नका आणि लोकशाहीसाठी मतदान करा.

 सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....

https://www.facebook.com/VivekSaptahik/

निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. लोकसभेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील उमेदवाराला आपल्याला मतदान करायचे आहे. मत कोणाला द्यायचे याचा निर्णय घ्यायचा आहे.

तसे, निर्णय घेण्यात आपण फार चोखंदळ असतो. भाजी खरेदी करायला बाजारात गेलो की, चार भाजीवाल्यांकडे फिरल्याशिवाय आपण भाजी घेत नाही. कपडे घ्यायचे असतील तर एकाच दुकानात कपडे घेत नाही. साडी किंवा ड्रेस मटेरियल घ्यायचे असेल तर किती दुकाने पालथी घातली जातील हे काही सांगता येत नाही. आपल्या जीवनातील अशा प्रत्येक गोष्टींबाबत आपण चोंखदळ असतो. आपली आवड-निवड जपतो आणि विचारपूर्वक निर्णय घेतो.

मतदानाच्या बाबतीत एवढा विचार करतो का? तो केला पाहिजे, कारण आपल्या एका मताने आपल्यावर राज्य कुणी करायचे आहे, याचा निर्णय केला जाणार आहे. आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत. जशी भाजी, कपडे, पादत्राणे यांचे पर्याय असतात, तसेच उमेदवार आणि त्यांचे पक्ष यांचे पर्याय असतात. त्याला आपण पारखून घेतले पाहिजे.

काँग्रेसचा एक पर्याय आहे. एकेकाळी ही काँग्रेस सर्व भारताची राष्ट्रीय चळवळ होती. सर्व विचारधारांची माणसे काँग्रेसमध्ये जात. काँग्रेसचे नेतेदेखील राष्ट्राचा विचार करणारे होते. ते स्वार्थाचा विचार करीत नसत. आपल्या घराण्याचा विचार करीत नसत. ज्यामुळे समाजाचे हित होईल, त्याचाच विचार ते करीत असत. महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, पं. मदनमोहन मालवीय, डॉ. राजेंद्रप्रसाद इत्यादी नेते फार मोठया उंचीचे नेते होते. ते काँग्रेसचे नेते नव्हते, तर देशाचे नेते होते, राष्ट्राचे नेते होते.

 महात्मा गांधीजींनी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या बरखास्तीचा विषय मांडला. ज्यांना सत्तेचे राजकारण करायचे आहे त्यांनी वेगळा पक्ष काढावा, असे त्यांनी सुचविले. त्यांनी असे सुचविले की, काँग्रेसने आता सेवाभावी संस्था व्हावे, सत्ताकारण करू नये. सत्ता सेवेची दासी झाली पाहिजे. यावर विनोबा भावे म्हणतात की, गांधीजींचा हा विचार उपनिषदाच्या दर्शनासारखा आहे. पण तसे झाले नाही आणि सत्ता भोगण्याची इच्छा धरणाऱ्यांनी काँग्रेस नावाचा राजकीय पक्ष तयार केला.

कालांतराने हा पक्ष एका घराण्याचा पक्ष झाला. या घराण्याचे नाव आहे - नेहरू-गांधी घराणे. या घराण्यात जन्मलेला हेच समजतो की, मी पंतप्रधान होण्यासाठी जन्मलेलो आहे आणि देश मीच चालविणार आहे. तो दुसऱ्या कुणाला काही किंमत देत नाही. मनमोहन सिंग दहा वर्षे पंतप्रधान होते. त्यांचा कसा चोथा केला, हे समजण्यासाठी 'द ऍक्सिडेंटल प्राइममिनिस्टर' हे पुस्तक वाचले पाहिजे किंवा चित्रपट बघितला पाहिजे. राहुल गांधी सतत देशभर कशी बेताल बडबड करीत फिरत असतात, हे आपण रोज ऐकतो किंवा वाचतो. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की, आम्हाला लोकशाही हवी की घराणेशाही?

लोकशाही आणि घराणेशाही एकत्र नांदू शकत नाहीत. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. दुसऱ्यांदा तेच राष्ट्राध्यक्ष व्हावे म्हणून लोकांनी प्रचंड आग्रह केला. जेव्हा तिसऱ्यांदा आग्रह झाला तेव्हा ते म्हणाले, ''आपल्याला राजेशाही नको म्हणून इंग्रजांच्या राजाविरुध्द आपण बंड केले. लोकशाही मार्गाने हीच राजेशाही आपण आणणार असू, तर आपल्या बंडाला काही अर्थ राहत नाही. म्हणून मी तिसऱ्यांदा अध्यक्ष होणार नाही.'' आणि ते आपल्या मूळ गावी निघून गेले. आपल्या देशात नेहरू, नंतर त्यांची मुलगी, नंतर मुलीचा मुलगा, नंतर मुलाची बायको आणि आता नंबर लावून उभे आहेत त्यांची मुले. आपली बुध्दी गहाण ठेवू नका आणि लोकशाहीसाठी मतदान करा.

आजची काँग्रेस म्हणजे नेहरू-गांधी घराण्याची लाचार काँग्रेस आहे. लाचार व्यक्तीला स्वाभिमान नसतो. जेथे स्वाभिमान नाही, तेथे शौर्य नाही. त्याला वाटते की जसे आपण लाचार आहोत, तसे लोकांनाही लाचार झाले पाहिजे. म्हणून तो लोकांना लाचार करणारे अनुदानाचे तुकडे फेकतो. फुकट घ्या, फुकट जगा, कष्ट करू नका, आमच्यावर अवलंबून राहा, हा त्यांचा संदेश असतो, आपण तो लाथाडला पाहिजे.


आपल्यासमोर दुसरा पर्याय आहे वेगवेगळया आघाडयांचा. कोण आहेत त्या आघाडयांत? हे सगळे असे राजनेते आहेत, जे अब्जाधीश आहेत. सत्तेत राहून त्यांनी पोट फाटेपर्यंत संपत्ती गोळा केली आहे. त्यातील हिमनगाचे एक टोक आपले छगनराव भुजबळ आहेत. यांना सत्ता पाहिजे, धन जमविण्यासाठी. यांच्या राजकारणाचा पाया त्यांची जन्मजात असते. मी माळी आहे, मी मराठा आहे, मी कुणबी आहे ही त्यांची ओळख असते. त्याला धरून ते राजकारण करतात. ब्राह्मणांना भरपूर शिव्या घालणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. त्यांनी पोसलेले विद्वान इतिहास खणून काढून ब्राह्मणांनी काय काय वाईट केले हे रंगवून रंगवून सांगत राहतात. प्रत्येकाला ब्राह्मणशाहीविरुध्द लढायचे आहे आणि त्यासाठी जातवाद जागविणे त्यांना आवश्यक झालेले आहे.

अजाणतेपणे किंवा भाबडेपणाने किंवा आपल्या जातीचा आहे म्हणून जर आपण त्यांच्या मागे गेलो, तर एवढेच होईल की ही मंडळी आज जेवढी श्रीमंत आहेत त्यापेक्षा अधिक श्रीमंत होतील. आपण आहोत तिथेच राहू. शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपणार नाहीत की मजुरांचे प्रश्न संपणार नाहीत की शेतीला पाणी मिळणार नाही.

काँग्रेस आणि महाआघाडीतील मंडळी एक राग आळवून आळवून गात असतात, तो म्हणजे संविधान धोक्यात आहे. संविधानाचे रक्षण केले पाहिजे. मोदी जिंकले तर ही निवडणूक शेवटची असेल, देशात हुकूमशाही निर्माण होईल. खरे म्हणजे संविधान धोक्यात नसून या जातवाद्यांचे आणि भ्रष्ट राजकारण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे हा धोका निर्माण झालेला आहे. पूर्वी कसे संविधान वाटेल तसे वाकविता येत होते. पंतप्रधान मनमोहन सिंग, पण सर्व निर्णय घेणार सोनिया गांधी, त्यांना सल्ला देणार नॅशनल ऍडव्हायझरी काउन्सिल. या दोन्ही व्यवस्था घटनाबाह्य व्यवस्था होत्या. घटनेवर जबरदस्त आघात करणाऱ्या होत्या. पण कसे सुरळीत चालू होते. वेगवेगळया पदांवर जाता येत होते. खाण्याची, पिण्याची आणि वाटेल त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था होती, ती आता बंद झाली. घटनेचा अंमल सुरू झाला. त्यामुळे 'घटना' धोक्यात आली. असे हे तर्कशास्त्र आहे.

आपल्याला निर्णय घेताना आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागेल. गेली अनेक वर्षे सातत्याने पाकिस्तानातून दहशतवादी येतात आणि कुठेही हल्ला करून आपल्या बांधवांना ठार करून जातात. पाकिस्तानने ठरविले आहे की, भारताला सतत जखमी करत राहायचे, सुखाने जगू द्यायचे नाही आणि सुरक्षिततेचा अनुभव घेऊ द्यायचा नाही. पाकिस्तानचे समर्थन करणारी मोठी गँग भारतात आहे. मोदी पंतप्रधान झाल्यामुळे त्यातील काही जण ओरडू लागले की, देशाचे सांप्रदायिक वातावरण धोक्यात आहे. अल्पसंख्याकांना असुरक्षितता वाटते. पाकिस्तानवर कारवाई केल्यास भारतातील मुसलमान दंगल करतील, म्हणून आपण प्रेते मोजत बसले पाहिजे, मार खात बसले पाहिजे. शेवटी मरतात कोण? मरणारे हिंदूच असतात आणि हिंदू तर सातव्या शतकापासून मरतोच आहे. आज मेला तर त्याचा शोक कशासाठी करायचा? असे त्यांना वाटते.

मोदींना तसे वाटत नाही. त्यांनी ठरविले आहे की, एक मारला तर दहा मारायचे. एका ठिकाणी हल्ला झाला तर शत्रूच्या गोटात शिरून त्याचे उत्तर द्यायचे. नेहरू-गांधी घराण्याचे लाचार झालेल्या लोकांना - मग ते राजनेते असतील, सिनेनट असतील, पुरस्कारवापसीवाले असतील, अशांना हे तेज सहन होण्यासारखे नाही. कोल्हा कधी हत्तीची शिकार करीत नाही. हत्तीची शिकार सिंहच करतो. मोदींनी तो सिंहनाद दिलेला आहे. प्रश्न आपल्या केवळ विकासाचा नसून सुरक्षेचादेखील आहे. म्हणून जेवढया चोंखदळपणे आपण भाजीपाला, कपडेलत्ते यांच्या निवडीचा निर्णय घेतो, त्याहून शतपट अधिक विचारपूर्वक आपल्यावर कुणी राज्य करायचे याचा निर्णय केला पाहिजे.

vivekedit@gmail.com