कल्पना दुधाळ यांची 'सौंदड' ही कविता प्रतिकूल वातावरणातही तग धरणारी, गर्भात अग्ी धारण करणारी सौंदड अर्थात शमी आणि आदिम स्त्री यांच्यातील एकरूपता दाखवते. या कवितेचे रसग्रहण.
सौंदड, समडी हे शमीचं ग्रामीण भाषेतलं, लाडाचं नाव वाटतं! दिसायला फारशी आकर्षक नसलेली, पण अतिशय सुंदर फुलवरा येणारी शमी. मराठीत मोठया वृक्षांना त्यांच्या आकारमानामुळे पुल्लिंगी संबोधलं जातं. वड, पिंपळ, आंबा.. सगळे तो वृक्ष किंवा ते झाड. शमी किंवा सौंदड म्हणजे ज्या झाडाच्या बुंध्यात पांडवांनी शस्त्रं लपवली होती, ती... रेताड प्रदेशातही तग धरणारी, आपल्या असण्याने जमीन सुपीक करणारी शमी. कालिदासाने म्हणे हिच्याच सावलीत तपश्चर्या केलेली. सर्वात पहिला अग्नी प्रज्वलित केला गेला, त्यातलं एक लाकूड शमीचं होतं. म्हणून हिच्या पोटात अग्नी आहे असं म्हणतात. तिच्या गर्भात अग्नी वसत असतो. तिची लाकडं समिधेसाठी वापरतात आणि शब्दांचा व लेखणीचा जो देव त्या चित्रगुप्ताची पूजा हिच्या खाली हिची पानं वाहून करतात! 'शमी शमयते पापम्' अर्थात मनुष्याच्या पापांचं क्षालन करणारी, जीवनाचा थेंब शोधण्या-शोषण्यासाठी खोल खोल जात राहणारी अशी सद्गुणी शमी 'मायबाई' वाटणं, आदिम स्त्रीत्वाचं प्रतीक वाटणं ही 'कल्पना'च सुंदर, सुभग आहे!
त्या पहिलावहिला अग्नी निर्माण करू पाहणाऱ्या माणसाच्या मदतीला हीच धावली होती, त्यामुळे जगण्याची त्याची धडपड तिने पाहिलीय. तो तहानलेला होता, भुकेला होता. या आपल्या लेकराला जगवण्यासाठी ती खोल खोल जाऊन शोधत राहिली एक एक थेंब. त्याच्या वणवणीत त्याला पुन्हा अश्रू ढाळावे लागू नयेत याची तजवीज तीच करत राहिली. तिच्या लाकडांना घासून तो अग्नी निर्माण करत आणखी पुढे गेला. होरपळत राहिलं त्याचं जगणं आणि ही त्याच्यासाठी थेंबभर ओल गोळा करत राहिली. तो प्रगती करत धावत राहिला आणि ती त्याच्या जगापासून लांब लांब जात राहिली. पण तिच्याकडे, तिने जपलेल्या ओलाव्याकडे, हिरवेपणाकडे पाठ फिरवून धावत राहिलेला काळदेखील अखेर तिच्यासमोरच येणार आहे. तिला विसरून धावत राहिलेला माणूस पाण्यासाठी तडफडत अखेर तिच्याचकडे येणार आहे.
त्यानेच तर कितीदा चालवलंय धारदार शस्त्र तिच्यावर. तिला छेदल्यावर तिच्या मायपोटातली एकात एक उमटलेली वलयं पाहून म्हणे तो तिचं 'वय' सांगतो! पण या हिरवाईला, या मायबाईला वय असतं थोडंच! किती काळापासून ती हे सोसत आलीय, एक एक थेंब जपत आलीय हे तिलाच माहीत!
तिच्याच अंगावर जोजवलेत तिने पाखरांचे शब्द. गोंजारलेत त्यांचे मधुर कंठ. त्यामुळेच तिच्याविषयी खात्री आहे की ती जपेल आपला शब्द. ती त्या हुंकारांनाही सामावून घेऊन वाढत राहील असा विश्वास वाटतो तिच्याबद्दल. ती देवक होऊन नवी नाती जोडत राहणारच असते. आपण दिलेले शब्द, त्यातले गर्भित अर्थ, त्यातला आशय मनात धरून तिने खुशाल जोडावीत नवनवी नाती. तिने राखण करावी पुन्हा नव्याने जन्मणाऱ्या नात्यांची ..
ती अग्निगर्भा आहे. तिने एकदा शस्त्रं लपवली होती. पण मला तिच्याही पुढं जायचंय. खरंच अग्निगर्भा व्हायचंय. तिच्या काय, माझ्या काय, उदरात वाढली पाहिजे अग्नीसारखी लेक आणि तिच्याही उदरात ..आणि तिच्याही ...अशी एकात एक वलयं आपल्या प्रवासाची. ती उमटत राहिली पाहिजेत. या विचाराने भरून येतं आहे मन माझं. त्या प्रवासाची साक्षीदार होणाऱ्या या मायबाईच्या सारं सोसून खरबुडीत झालेल्या बुंध्याला मला कडकडून मिठी मारायचीय. सांगायचंय तिला की मलाही घे सोबत या प्रवासात. तुझ्या अंगी अनेक गुण आहेत. अनेक व्याधींचे उतारे. मलाही मिसळून घे तुझ्यात. माझेही उतारे, मी शोधलेल्या वाटांचे मंत्र मिसळू देत तुझ्यात. तुझ्या प्रवासाच्या आलेखात उमटू देत माझ्याही रेषा.
तुला सांगू का? तू न् मी निराळया नाहीच. पोटात अग्नी सांभाळणाऱ्या, खोलवर जात जगण्यातली ओल जपणाऱ्या. जखमा करणारी शस्त्रंही पोटात ठेवून रखरखत्या उन्हात सावली बनणाऱ्या. जिथे मूळ धरून उभ्या राहू, तिथली जमीन सुफळ करणाऱ्या.
शमीचं झाड भविष्यसूचक आहे म्हणतात. आणि शमीने भरभरून फुलणं पुढच्या दुष्काळाचं सूचक असतं असं सांगतात.
सौंदड
मायबाई, आपल्या सगळया क्षमता चाचपून आजमावून पाहायला हव्यात आपण. बहरायला काय गं, आयते झरे मिळाले मुळांना, तर झर्रकन पालटतं रूप! नुसतं अंगाखांद्यावर झुलणारी समृध्द पालवी, फुलांचे दागिने याने मोहरून गेलो, तर पुढच्या वाटा वैराण होतील! म्हणून म्हणते मायबाई, लांबच लांब चालत आलेला आपला प्रवास सुरू राहायला हवा. आपण मुळं घट्ट करत जायला हवं. खोल खोल जात राहायला हवं.
गर्भातला अग्नी जपणारं, अंतरातली आग जपणारं, बाईचं हे चिवट मीपण.
ते खांडायला अनेक हात आले,
येताहेत, येतील.
तिच्या खरबुडलेल्या खोडावरची स्वप्नपालवी छाटायला आलेले हात थकून गेले.
जीवनात रुतून बसलेल्या तिच्या
अस्तित्वाला संपवायला
खोल खोल खणून तिला उखडून फेकू पाहणारे दमले.
पण जोवर तू उभी आहेस ना मायबाई,
मीही उभीच राहीन.
तहानेनं व्याकूळ झालेल्या
पृथ्वीवरच्या पहिल्या माणसाचा
पहिला अश्रू
झेलला होतास का तू
म्हणून मुळांनी पाषाण टोकरत
शोधत राहिलीस भूगर्भातलं पाणी
तू लांब लांब लांबच चाललीस
माणसांच्या जगापासून
पण जीव मुठीत घेऊन फिरणाऱ्या
काळाचं दुसरं टोक पोचेलच तुझ्यापर्यंत
पाणी पाणी पाणी करत
जसं त्यांना आठवत नाही कोणतंच नातं
ते पाण्याचाच धावा करतात मरताना
धारदार दातऱ्यांनी कापलेल्या
बुंध्याच्या वलयांवरून
केले जातील अंदाज
तुझ्या आयुष्यमानाचे
पण तुझ्याइतकं तंतोतंत
ते सांगताच येणार नाही कुणाला
मायबाई
विश्वासानं अंगाखांद्यावर बागडणाऱ्या
पाखरांचे गळे कापून
स्वरयंत्र चोरल्याचे आरोप झालेले नाहीत कधीच झाडांवर
म्हणून तुझ्या मुळांत
माझ्या शब्दांचे पसाभर हुंकार
मांडू का मी बिनधास्त?
मग तू देवक बनून
खुशाल जोडत रहा सोयरिकी
गर्भातल्या बाळांसारखी
तू शस्त्र लपवशील
पण मला पोचायचंय
गर्भातल्या लेकीच्या गर्भाशयापर्यंत
तुझ्या खरबुडीत बुंध्याला
कडकडून भेटायचंय
माझं भरून आलेलं मन
तुझ्या लांबच्या प्रवासात
असल्या नसल्या औषधी गुणधर्मात
मिसळून घे सहज
खोदणारे दमून गेले
तोडणाऱ्यांचे हात तुटले
मायबाई, सगळया क्षमता आजमावून बघ
खरी सौंदड तू आहेस की मी?