आपल्याला मिळालेल्या प्रजातंत्राचे मूल्य आपण अजूनही लक्षात घेत नाही. केवळ निवडणुकीतील मतदानापर्यंतच त्याचा विचार मर्यादित राहतो. त्यामुळे या प्रजातंत्राचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण विसरतो.
प्रजातंत्राने दिलेली प्रचंड शक्ती विचारपूर्वक वापरायची, तर कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे? आणि तो का करायला पाहिजे? हे आपण समजून घ्यायला पाहिजे.
पहिला विचार आपण केला पाहिजे की, प्रजातंत्र म्हणजे काय? वाचकांनी वाईट वाटून घेऊ नये, परंतु आपण या प्रश्नाचा अजिबात विचार करीत नाही. आपल्या दृष्टीने प्रजातंत्र म्हणजे काय? तर नियमितपणे येणाऱ्या निवडणुका - मग त्या नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या असतील... या निवडणुकीत जाऊन मतदान करायचे. एवढे काम केले की आपल्याला वाटते की, आपण प्रजातंत्र जगत आहोत.
हे झाले मतदारांचे प्रजातंत्र. प्रजातंत्राचा हा अर्थ अतिशय संकुचित आणि तेवढाच मर्यादित आहे. प्रजातंत्रासाठी दुसरा शब्द आहे - लोकशाही. लोकशाहीची व्याख्या अशी केली जाते - 'लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले शासन.' आपले शासन आणण्यासाठी आपण मतदान करतो आणि आपले प्रतिनिधी निवडून देतो. म्हणून लोकशाही म्हणजे निवडणूक आणि निवडणूक म्हणजे मतदान, एवढाच आपला प्रजातंत्राचा किंवा लोकशाहीचा अर्थ असतो.
मग विचार करावा लागतो की, हे प्रजातंत्र किंवा लोकशाही राजवट का आणण्यात आली? आपल्या देशात तर दीर्घकाळ राजेशाही होती. वेगवेगळया प्रदेशांत वेगवेगळे राजे राज्य करीत असत. इंग्रजांची पध्दतीदेखील राजेशाहीचीच होती. ते तिला राजेशाहीची लोकशाही म्हणतात. परंतु आपल्याकडे इंग्रजांनी लोकशाही आणली नाही, राजेशाहीप्रमाणे राज्य केले.
आपला देश स्वतंत्र होत असताना आपल्यापुढे प्रश्न उपस्थित झाला की, येथून पुढे आपल्याला आपले राज्य चालवायचे आहे, ते कोणत्या पध्दतीने चालविले पाहिजे याचा निर्णय करायचा आहे. आपल्या राष्ट्रनेत्यांनी एकमताने निर्णय केला की, आम्हाला राजेशाही नको, बादशाही नको किंवा इंग्लडची सम्राटशाही नको. आम्हाला लोकशाही राजवट पाहिजे. आम्हाला लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य पाहिजे. म्हणून त्यांनी दीर्घ विचार करून लोकशाहीची राजवट स्वीकारली.
आपल्याला 1947 सालापासून वारसा हक्काने ही राजवट प्राप्त झालेली आहे. आजच्या पिढीला ती फुकट प्राप्त झालेली आहे. जे फुकट मिळते, त्याची किंमत फुकट घेणाऱ्याला नसते, हा आपला व्यवहारातील अनुभव आहे. म्हणून व्यवहार सांगतो की, कुणालाही काहीही फुकट देऊ नये. फुकट दिल्याने जी वस्तू दिली जाते, त्याचे मूल्य कमी होते आणि घेणारा आळशी होतो.
थोडा इतर देशांचा इतिहास बघू. इंग्लंडने राजाशी संघर्ष करून लोकशाही मिळविली. 1642 साली इंग्लंडमध्ये गृहयुध्द झाले. ते राजाविरुध्द झाले. या गृहयुध्दात आठ लाखाहून अधिक ब्रिटिश लोक ठार झाले. फ्रान्समध्ये लोकांनी राजाविरुध्द बंड केले. सगळे राजघराणे कापून काढले. राजघराण्याप्रमाणेच सरदार, उमराव आदी वर्गांच्या लोकांच्या माना कापल्या. 1789 ते 1791 या काळात गिलोटीनखाली 45 हजार लोक ठार मारले गेले. अमेरिकेतील लोकांनी इंग्रज राजसत्तेविरुध्द बंड केले. 1776 साली या बंडाची सुरुवात झाली, 1783 साली ते संपले. या बंडात लाखो लोक ठार झाले. लोकशाहीसाठी त्या-त्या देशाने अशी रक्ताची किंमत मोजलेली आहे.
आपणदेखील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी रक्ताची किंमत दिलेली आहे. फासावर जाणारे क्रांतिकारक, अंदमानात काळया पाण्याची शिक्षा भोगणारे स्वातंत्र्यसैनिक आणि इंग्रजांच्या तुरुंगात गेलेले लाखो तरुण यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेली किंमत आहे. लोकशाही आणण्यासाठी इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स यांच्याप्रमाणे आपल्याकडे रक्ताच्या नद्या वाहिल्या नाहीत. घराणी किंवा कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली नाहीत. कदाचित यामुळे लोकशाही निर्माण करण्यासाठी आपण प्रचंड किंमत दिलेली आहे असे आपल्याला वाटत नाही. ती वारसा हक्काने मिळालेली ठेव किंवा संपत्ती आहे असेच आपल्याला वाटते.
संपत्ती कष्टाने मिळवायची असते आणि ती एकदा मिळविली की तिचे रक्षण कसे करायचे हे शिकवावे लागत नाही. संपत्ती जशी धनात आहे, तशी लोकशाही हीदेखील एक मोठी संकल्पनाच आहे. ती कष्टाने मिळवून रक्षित करावी लागते. ब्रह्मदेशातील एक लोककथा आहे. नुकतेच लग्न झालेले जोडपे होते. नवऱ्याला रासायनिक क्रिया करून धातूचे सोने करण्याची विद्या शिकायची होती. दिवसभर तो त्याच कामात गुंतलेला होता. घर चालविण्याचे सर्व कष्ट बायकोला करावे लागत. रासायनिक क्रिया करून कशाचेही सोने होत नाही, हे लक्षात घ्यायला तो तयार नव्हता.
त्याचे सासरे हुशार होते. त्याने एकदा जावयाला घरी बोलाविले आणि सांगितले की, मीसुध्दा जीवनभर हे प्रयोग करीत आलेलो आहे आणि प्रयोगसिध्दीच्या जवळपास मी पोहोचलेलो आहे. जावयाला आनंद झाला. सासरे म्हणाले, ''त्याला एकच आता घटक पाहिजे, तो म्हणजे केळीच्या पानावर जमणारे हंडाभर दवबिंदू हवेत. ते तू आणून दे.'' असे म्हणून केळी लावण्यासाठी सासऱ्याने जावयाला जमीन दिली. दवबिंदू गोळा करायचे असल्यामुळे जावयाने शेतीची खूप मशागत केली, खूप खत घातले, केळीची लागवड केली आणि पानांवरचे दवबिंदू गोळा केले. 50-60 पानांतून चमचाभर दवबिंदू मिळत असत. केळींना लागलेली केळी त्याची पत्नी बाजारात नेऊन विकत असे.
त्या पैशातून त्याने आणखीन जमीन घेतली आणि आणखी केळीची लागवड केली. अशी दोन वर्षे गेली. तोपर्यंत हंडा भरत आलेला होता. तो सासऱ्याकडे गेला आणि म्हणाला, ''आता आपण सोने तयार करू या.'' सासरा म्हणाला, ''सोने तर तयार झालेलेच आहे, आणखी नवीन करायची काय गरज आहे?'' जावई म्हणाला, ''कधी सोने तयार झाले?'' सासऱ्याने आपल्या मुलीला बोलाविले आणि तिला विचारले, ''बेटा, गेल्या दोन-एक वर्षांत मिळालेल्या पैशाचे तू काय केलेस?'' मुलगी घरी गेली, दोन पिशव्या घेऊन आली आणि वडिलांसमोर त्या रिकाम्या केल्या. ते सगळे सोने होते. केळी विकून आलेल्या पैशाचे मुलीने सोन्यात रूपांतर केले होते.
आपल्याला लोकशाहीच्या मळयाचे आपल्या कष्टाने सोने करता आले पाहिजे. मग प्रजातंत्र म्हणजे काय? लोकशाही म्हणजे काय? याचा आपल्याला अर्थबोध होईल.
(क्रमश:)
vivekedit@gmail.com