बंगालवर अनेक साम्राज्यांनी राज्य केले. लॉर्ड कर्झनने 1905मध्ये बंगालचे पूर्व व पश्चिम बंगालमध्ये विभाजन केले, तेव्हाच फाळणीचे बीज रोवले गेले, ज्याची परिणती 1971च्या बांगला देशाच्या निर्मितीत झाली. बांगला देश हा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला देश आहे.
बांगला देश! ढाका, बिक्रमपूर, सोमपूर, चित्तग्राम यासारख्या शहरांचा; गंगा, ब्रह्मपुत्रा, मेघना आदी 700हून अधिक नद्यांचा; हिमालयातून येणाऱ्या नद्यांमुळे सुपीक जमीन असलेला प्रदेश आहे. भरपूर पाऊस, क्वचित वादळे आणि पूर इथे नित्याचे आहेत. समुद्राच्या काठाने असेलेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे Mangrove अरण्य या देशाला लाभले आहे.
या नद्यांच्या प्रदेशात आजही होडीने प्रवास केला जातो. इसविसनपूर्व काळापासून येथून समुद्रमार्गाने इंडोनेशिया आदी देशांशी चाललेल्या व्यापाराची नोंद मिळते. ताम्रलिप्ती हे बंदर प्राचीन उत्तरापथ या महामार्गाला जोडलेले होते. आज हा महामार्ग चित्तग्राम (Chittagong), ढाका, पूर्णिया, पाटणा, आग्रा, दिल्ली, अमृतसर, लाहोर, पेशावरमार्गे काबुलपर्यंत जातो.
बंगालच्या जन्माची कथा वायुपुराणात येते ती अशी - राजा बली व सुदेष्णा यांना पाच पुत्र होते - अंग, वंग, कलिंग, पुंड्र व सुम्ह. या सर्वांनी गंगेच्या काठाने एक एक राज्य स्थापन केले. अंग देशाविषयी शैव पुराणांतून कथा येते की - शिवाने कामदेवाचे अंग जिथे भस्मसात केले, तो 'अंग' देश व नंतर कामदेवाला पुन्हा जिवंत करून त्याला नवीन शरीर अर्थात रूप दिले, तो शेजारचा 'कामरूप' देश. बौध्द साहित्यातील अंगुत्तर निकाय या ग्रंथात 16 महाजनपदांमध्ये एक अंग देश आहे.
अंग (उत्तर बंगाल), बंग (दक्षिण बंगाल), पुंड्र (मध्य बंगाल) या प्रदेशांचा उल्लेख ब्राह्मणग्रंथात व महाभारतात येतो. बंगालच्या शेजारी देशांची तेव्हाची नावे होती कलिंग (पश्चिम ओडिशा), उत्कल (पूर्व ओडिशा), मगध (बिहार) आणि कामरूप (आसाम). महाभारतात अर्जुन एकदा यात्रेला गेला, तेव्हा तो या प्रांतात फिरला. त्या प्रवासात अर्जुनाने गंगेच्या काठावरील नागराजाची कन्या उलुपी हिच्याशी विवाह केला. तसेच येथील चित्रवाहन राजाची कन्या चित्रांगदा हिच्याशी विवाह केला. कुमारवयात दुर्योधन व कर्ण यांची मैत्री जडली, ती दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचे राज्यपद दिले तेव्हा. पुढे मगधराज जरासंधाने कर्णाला चंपावती नगरी बहाल केली. चंपावतीचे आजचे नाव आहे चंपा. पश्चिम बिहारमधील चंपानगरी त्या वेळी अंग देशाची राजधानी होती.
अंग, पुंड्र व बंगचा प्रांत पुढे बंगाल म्हणून ओळखला जाऊ लागला. इ.स.पूर्व सहाव्या शतकात मगधच्या बिंबिसार राजाने अंग देश जिंकला होता. नंतर चौथ्या शतकापासून गुप्त राजांनी बंगालवर राज्य केले, तर आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत पाल घराण्याने येथे राज्य केले.
पाल राजांनी बंगालमध्ये अक्षरश: शेकडो बौध्द विहार बांधले व अनेक विद्यापीठांना राजाश्रय दिला. या काळात पाच विद्यापीठे प्रसिध्द होती - बिहारमध्ये नालंदा, ओदंतपुरी व विक्रमशीला आणि बंगालमध्ये सोमपुरी व जगदल. येथील विद्यापीठातून एका वेळी हजारो विद्यार्थी शिकत असत. केवळ भारतीय नाही, तर चीन, तिबेट, मलेशिया, इंडोनेशिया या देशांमधून विद्यार्थी येथे शिकायला येत असत. सातव्या शतकातील इत्झिंग या चिनी प्रवाशाने इतर चिनी विद्यार्थ्यांना सांगितले आहे - 'चीनमधून आधी सुमात्रा येथे संस्कृत भाषेचे शिक्षण घेतल्यास भारतात भाषेची अडचण होणार नाही. सुमात्रा येथून समुद्रमार्गाने गंगेतून प्रवास करून नालंदा येथे येणे सोयीचे होते.'
अकराव्या शतकापासून सेन घराण्याने बंगालवर राज्य केले. बाराव्या शतकात लक्ष्मणसेन राजाच्या काळात जयदेवाने लिहिलेले 'गीतगोविंद' हे काव्य अजरामर झाले. बंगालच्या अनेक कृष्ण मंदिरांतून हे काव्य गायले जात असे व त्यावर नृत्यदेखील केले जात असे.
लक्ष्मणसेनच्या काळात बखात्यार खिल्जीने बिहारवर, बंगालवर आक्रमण केले. या हल्ल्यात त्याने विक्रमशीला, ओदंतपुरी, नालंदा आदी अनेक विद्यापीठे जमीनदोस्त केली गेली. अनेक बौध्द भिक्षू व ब्राह्मण शिक्षक, तसेच अनेक विद्यार्थी या हल्ल्यांमध्ये मारले गेले. त्याने नालंदा येथील अनेक मजली ग्रंथालय जाळून लक्षावधी ग्रंथ भस्मसात केले. हजारो वर्षांचे ज्ञान या एका हल्ल्यात बेचिराख झाले. यानंतर बंगाल प्रांतातील अनेक बौध्द भिक्षू तिबेटला निघून गेले.
बखात्यार खिल्जीने लगोलग आसामवर हल्ला केला. परंतु आसामच्या पृथू राजाने त्याचा सपशेल पराभव केला. थोडयाफार सैन्यासह परतत असताना खिल्जीचा मृत्यू झाला.
पुढे बंगालवर मुघलांनी राज्य केले, नवाबांनी राज्य केले आणि सरतेशेवटी ब्रिटिशांनी राज्य केले. लॉर्ड कर्झनने 1905मध्ये बंगालचे पूर्व व पश्चिम बंगालमध्ये विभाजन केले, तेव्हाच फाळणीचे बीज रोवले गेले, ज्याची परिणती 1971च्या बांगला देशाच्या निर्मितीत झाली.
ढाका येथील ढाकेश्वरी मंदिर परिसरात 5 शिव मंदिरे व ढाकेश्वरी अर्थात कालीमाता मंदिर आहे. बाराव्या शतकात सेन राजांनी हे बांधले होते. वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोध्दार होत राहिला आहे. 2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट दिली. बांगला देशातील मंदिराला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.
ढाकामध्ये देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक रामन कालीचे मंदिर होते. 1971मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने हे मंदिर नष्ट केले होते. त्यानंतर ढाकेश्वरी मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. 2017मध्ये केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी बांगला देशला भेट दिली, तेव्हा भारताच्या मदतीने 15 लोकोपयोगी प्रकल्पांबरोबरच रामन काली मंदिर पुनश्च बांधण्याचा करार केला.
संदर्भ -