पहिली कारसेवा 1990साली झाली. तेव्हा सरसंघचालक होते, बाळासाहेब देवरस. मोहिते संघस्थानावर दाढी वाढलेला एक स्वयंसेवक उभा होता. बाळासाहेब त्याला ओळखत होते. शेजारीच उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला त्यांनी विचारले,''त्याने दाढी का वाढविली?'' कार्यकर्ता म्हणाला,''जोपर्यंत जन्मस्थानावर मंदिर उभे राहत नाही, तोपर्यंत दाढी करायची नाही, अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे.'' हसून बाळासाहेब म्हणाले,''त्याला सांग, दाढी तळव्यापर्यंत वाढण्याची वाट बघत रहा.'' 1990साली कारसेवा झाली. सर्व हिंदू समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे मंदिर दोन-चार वर्षांत होणार, असे लोकांना वाटले. बाळासाहेबांना तसे वाटले नाही. याचे कारण असे की, राजकारण, कायदे, मंदिराला विरोध करणाऱ्यांची शक्ती, याचा सर्व अंदाज बाळासाहेबांना परिपूर्ण होता. याला म्हणतात, दूरदृष्टी.
तसा विचार केला तर श्री बाळासाहेब देवरस हेच रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सेनापती होते. संघाची पध्दती कुठल्याही एका व्यक्तीला-सरसंघचालकांनादेखील-संघकामाचे सर्व श्रेय देण्याची पध्दती नसल्यामुळे असे कुणी बोलत नाही. परंतु इतिहास हे सांगतो की, विश्व हिंदू परिषदेला जनआंदोलन करणारी संस्था म्हणून उभी करण्यात बाळासाहेबांनी घेतलेले निर्णय कारणीभूत झालेले आहेत. मोरोपंत पिंगळे यांना त्यांनीच विश्व हिंदू परिषदेच्या कामासाठी पाठविले. मोरोपंत तसे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी नव्हते. त्यांनीच आपल्या प्रतिभेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनला दिशा दिली. 1990ची कारसेवा, शिलान्यासाचा कार्यक्रम, राममंदिरासाठी प्रत्येक खेडयातून एक वीट (रामशीला) घेऊन जाण्याचा कार्यक्रम, अशा विविध कार्यक्रमांमुळे रामजन्भूमी मुक्ती आंदोलन हे जनआंदोलन झाले. स्वातंत्र्यानंतर फार मोठे जनआंदोलन उभे करण्याचे काम संघ माध्यमातून तशा अर्थाने प्रथमच झाले.
रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात संघाची भूमिका प्रारंभापासून अतिशय स्पष्ट आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही. वैचारिक गोंधळ नाही आणि धोरणात्मकदेखील गोंधळ नाही. जी भूमिका रामजन्मभूमी संदर्भात 1986साली घेतली गेली, त्या भूमिकेत कोणतेही अंतर पडलेले नाही. सरकार प्रतिकूल आहे म्हणून नरमाईची भूमिका घेतली पाहिजे किंवा 1993साली रामजन्मभूमी प्रश्नावरुन नरसिंह राव सरकारने संघावर बंदी घातली होती, म्हणून संघाने पडखाऊ धोरण स्वीकारले नाही. 1998साली अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले. सरकारला अडचण नको म्हणून रामजन्मभूमीचा विषय संघाने शीतपेटीत टाकला नाही. तसेच 2014साली नरेंद्र मोदींचे शासन आले. त्यांनाही अडचण नको म्हणून संघाने रामजन्भूमीचा विषय बाजूला ठेवलेला नाही. संघ आपल्या भूमीकेवर ठाम आहे.
रामजन्मभूमीवर बाबराने बांधलेले तीन घुमट होते. त्यातील एक घुमट रामाच्या जन्मस्थानावर होता. तेथे बालरामाची मूर्ती होती. हिंदीत तिला रामलला म्हणतात. तिची पूजाअर्चा होत असे. देशातून श्रध्देने भाविक दर्शनासाठी येत. स्थानाचा विवाद चालू होता. शासनाने रामललाच्या स्थानाला टाळे ठोकले. म्हणजे राम तुरुंगात गेला. तरुण रामाला चौदा वर्षाचा वनवास कैकयीने घडविला. कलियुगातील कैकय्यांनी बालरामाला 33 वर्षाचा कारावास घडविला. न्यायालयाने हे टाळे काढून टाकण्याचा आदेश दिला. रामलल्लाच्या मंदिराचे दरवाजे उघडले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने 1987साली याबद्दल एक ठराव केला.
या ठरावातील महत्त्वाचा भाग असा- टाळे खोलले गेल्यामुळे भारतीय संस्कृती प्रेमिकांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. रामजन्मभूमी मुक्ति यज्ञ समिती, विश्व हिंदू परिषद आणि सर्व साधसंतगण यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला गेला आहे. ठरावातील पुढचा भाग असा -
* आपल्या पूर्वजांविषयीची श्रध्दा कोणत्याही देशाच्या राष्ट्रीयतेचे आधारभूत अंग असते.
* इंडोनेशियातील मुसलमान श्रध्देने राम, कृष्ण, सीता, यांना आपले राष्ट्रीय आदर्श मानलेले आहे. भारतातील मुसलमानांनीदेखील त्याचे पालन केले पाहिजे.
* विदेशी आक्रमक बाबर, तो मुसलमान होता म्हणून त्याच्याशी नाते जोडणे योग्य नाही.
* मुस्लिम समाजाला प्रतिनिधी सभेने आवाहन केले की, फुटीरतावादी मानसिकतेतून त्यांनी लवकरात लवकर बाहेर पडावे.
रामजन्मभूमी विषयावरचा हा संघाचा पहिला ठराव आहे. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनात संघाने उतरण्याचे कारण काय? संघ ज्यांना समजत नाही, अशी मंडळी संघावर कट्टर धार्मिक संघटन असल्याचा आरोप करतात. आणि ज्यांची हयात संघात जाते, असे माझ्यासारखे जेव्हा संघात धार्मिकता शोधू लागतात तेव्हा ती कुठे सापडत नाही. संघाच्या एका तासाच्या शाखेत कोणत्याही देवतेची पूजा, आरती होत नाही. संघशाखेचा सत्यनारायणाचा कार्यक्रम नसतो. संघशाखेचा गणपती बसविला जात नाही. संघशाखेतून अमुक उपवास करा, अमुक तिर्थयात्रा करा, पंढपूरची वारी करा, असे काहीही सांगितले जात नाही. देव-देवतांच्या बाबतीत संघ स्वयंसेवक तटस्थ असतो.
मी अनेक प्रचारकांच्या फार जवळ राहिलो. दोन उदाहरणे देतो. शिवराय तेलंग आणि दामुअण्णा दाते. या दोघांनाही मी कधी देवळात जाताना पाहिले नाही. कोणता उपवास करताना ते दिसले नाहीत. जन्मात त्यांनी कधी कुठली तिर्थयात्रा केली नाही. संघ कट्टर धर्मवादी आहे, पण संघाचा धर्म नैतिक आचरणाचा आहे, चारित्र्य निर्मितीचा आहे, व्यक्ती-व्यक्तीतील स्नेहमय संबंधाचा आहे. संघाचा राष्ट्रीय धर्म आहे. हे सनातन राष्ट्र आहे. त्याची एक जीवनपध्दती आहे. त्याची मूल्यव्यवस्था आहे. ही मूल्य जगणारी थोर माणसे झाली. श्रीराम त्यातील एक. कर्तव्याचा आदर्श म्हणजे राम. आदर्शबंधू , आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श राजा, म्हणजे राम. हा राम भारतातील प्रत्येकाच्या मनात असतो. जे स्वतःला हिंदू म्हणतात, त्यांच्या मनात त्याचे स्थान अढळ असते. जे आपले हिंदुपण विसरले आणि बळजबरीने मुसलमान, ख्रिश्चन झाले, त्यांच्याही रक्तात राम असतोच.
हा राम आपला राष्ट्रीय आदर्श आहे. राम आहे, तर आपला देश आहे. राम असेल तर आपल्या देशात आणि जीवनात 'राम' आहे. त्याची श्रध्दा जागविणे म्हणजे दगडाच्या प्रतिमेची किंवा धातूच्या प्रतिमेची पूजा नव्हे. ते त्याचे रुप आहे. पार्थिव रुपातील राम, मूर्ती रुपातील रामासारखाच होता, असे कुणी सांगू नाही शकत. पण कर्तव्य पालन करणारा राम एकच असतो. आपला देश वेगळी ओळख असलेला देश आहे. आणि ही वेगळी ओळख ज्यांनी घडवून दिली, त्यात रामाचे स्थान अद्वितीय आहे.
अशा रामाच्या जन्मस्थानावर मोगल बाबर याने हल्ला केला. मंदिर पाडले, त्याजागी मश्जिद बांधली. बाबराला मश्जिद बांधायची होती तर अयोध्येत जमीन भरपूर होती. तो कुठेही बांधू शकत होता. पण तो आक्रमक होता. त्याला भारतावर राज्य करायचे होते. भारतावर राज्य म्हणजे हिंदुवर राज्य करायचे होते. राज्य करण्यासाठी त्यांचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक होते. त्यांच्या श्रध्दा भंग करणे आवश्यक होते. मी मंदिर पाडू शकतो. मला हात लावायची कुणात हिम्मत आहे काय?, हा त्याचा संदेश होता. त्याने मंदिर पाडणे आणि मंदिराच्या खांबावरच मश्जिद उभी करणे. हा केवळ एक प्रार्थनास्थळ गेले आणि दुसरे उभे राहिले, एवढा बदल नाही. हे आमच्या सेक्युलर महापंडितांना समजत नाही. त्यांना बाबराचे जोडे चाटण्यात धन्यता वाटते.
हा बदल दोन संस्कृती बदलाचा निदर्शक आहे. एक आहे आक्रमक बाबराची, रानटी, आक्रमक, अतिशय हिंसक, कमालीची असहिष्णू, सर्व मानवी मूल्ये पायदळी तुडवणारी, बापाला बाप न म्हणणारी आणि आईला आई न म्हणणारी संस्कृती आहे. आणि दुसरी संस्कृती आहे 'पितृवचना लागे रामे वनवास केला' हे मूल्य जपणारी. बाबराने आपली मानवी मूल्याची संस्कृती अयोध्येत उध्दवस्त केली आणि त्याजागी स्वतःच्या रानटी संस्कृतीची निशाणी उभी केली.
काळ विपरित होता. आपण दुर्बळ झालो होतो. महाशक्तीशाली रामाचे तेज आपण हरवून बसलो. रामबाणाची मारकता अत्यंत क्षीण झाली. त्याची असंख्य कारणे आहेत. आणि हळुहळू जसजशी ही कारणे मिटत चालली तशी तशी रामशक्ती, रामअनुभूती, हिंदू जनतेतत निर्माण होऊ लागली. आपण दुर्बल असतानादेखील रामजन्मस्थानावरील बाबरी ढाचा जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केला. चारशे वर्ष हा संघर्ष चालला. चाराच्या पटीत कैक हजार लोक त्यात हुतात्मा झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. आणि त्यामुळे राजीव गांधींना मंदिराचे टाळे काढावे लागले आणि पुढे जाऊन शीलान्यासाची अनुमती द्यावी लागली.
हा केवळ मंदिर बांधण्याचा खटाटोप ना. आपला पिंड मूर्तीपूजेचा. तसाच नवनवीन देवता निर्माण करण्याचा. त्यामुळे देशात रोज कुठे ना कुठे मंदिर बांधण्याचा उपक्रम चालूच असतो. काहीजण अतिभव्य मंदिर बांधत बसतात. या मंदिराच्या संख्येत अयोध्येतील रामाचे आणखी एक मंदिर, असा हा विषय नाही. आणि राम मंदिरात असतो, असेही नाही. हे कुणी आणखी दुसऱ्याने संघाला सांगायची गरज नाही. मग तरीही अयोध्येत राम मंदिर का पाहिजे?
माणसाला जगण्यासाठी जसे बळ लागते तसे राष्ट्राला उभे राहण्यासाठी बळ लागते. व्यक्तीचे बळ त्याच्या शिक्षण, संस्कार आणि धनात असते. राष्ट्राचे बळ, राष्ट्राच्या अस्मितेत असते, राष्ट्राच्या श्रध्देत असते. ही श्रध्दा केंद्रे उभी करावी लागतात. त्याची जपवणूक करावी लागते. ही श्रध्दा केंद्रे राष्ट्राची जपवणूक करतात. अमेरिकेचे उदाहरण घेऊया. न्यूयॉर्कच्या लिबर्टी बेटावर 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' उभा आहे. 93 मीटरचा हा स्टॅच्यू आहे. अनेक वर्ष त्याचे काम चालले. अमेरिकेच्या अस्मितेचे ते प्रतीक आहे. तो उभा करण्यासाठी करोडो डॉलर लागले. अनेकजण हे अवघड काम करताना प्राणास मुकले. तेथे कुणी असा प्रश्न उभा करणारा झाला नाही की, कशाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिजे? त्याऐवजी हॉस्पिटल काढा, शाळा काढा. असा जर कुणी बोलला असता तर, अमेरिकेत रस्त्यावर शेण मिळत नसल्याने अमेरिकन जनतेने त्याच्या तोंडात काय घातले असते, हे मी नाही सांगू शकत.
अमेरिकेचे दुसरे उदाहरण आहे. साऊथ डकोटा या राज्यात माऊंट रशमोर (रशमोर पर्वत आहे) या पर्वतावर अमेरिकेचे राष्ट्रनिर्माते जॉर्ज वॉश्गिंटन, थॉमस जेफरसन, अब्राहम लिंकन आणि थियोडर रुझवेल्ट, यांची भव्य शिल्पे आहेत. आकाराने महाकाय आहेत. एक-एक शिल्प जवळजवळ 18मीटरचे आहे आणि फक्त चेहरेच आहेत. ते बघण्यासाठी दरवर्षी 20-25लाख अमेरिकन जातात. हे शिल्पाचे काम चालू असताना, कुणी असा प्रश्न केला नाही की, या शिल्पांची गरज काय? तेवढयाच पैशात आपण हॉस्पिटल बांधू, गरिबांना अन्न देऊ. असा जर तिथे कुणी काही बोलला असता तर त्याच्या डोक्यावर अमेरिकन माणसाने डोंगर पोखरुन जी खडी बाहेर काढलेली होती, ती हाणली असती.
राष्ट्राला अस्मिता देण्यासाठी त्याच्या महापुरुषांच्या स्मृती जागरुक ठेवाव्या लागतात. बाबर, अकबर, औरंगजेब हे आमचे राष्ट्रपुरुष नव्हेत. हे आक्रमक आणि रक्तपिसाट नराधम होते. त्यांचे आमच्यावरील राज्य हा एक काळा अध्याय आहे. आमचा देश रामाचा देश आहे. त्याची स्मृती जागृत ठेवणे, म्हणजे राष्ट्रपुरुषाची स्मृती जागृत ठेवणे आहे. संघाचे काम हेच मुळी राष्ट्रीय काम आहे. संघाचे विषय राष्ट्रीय असतात. जे राष्ट्रहिताचे ते संघाचे. जे राष्ट्र मारक आणि घातक त्याचा विनाश, हाच संघाचा ध्यास. संघाचे अवतार कार्य याच्यासाठीच आहे.
रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनात संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरला. या सर्व काळातील संघाचे प्रतिनिधी सभेचे जे ठराव आहेत, ते अत्यंत सूचक आहेत. सरकारचा प्रयत्न चालला होता की, अयोध्येची विवादाची भूमी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी. काही लोकांनी राम खरोखरच झाला होता का? याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पुस्तके लिहिली. 1987च्या ठरावात प्रतिनिधी सभेने म्हटले की, समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी तथाकथित इतिहासकारांचे लेख आणि विचार यांचा प्रचार करण्याची मोहीम चालविली जात आहे. फक्त रामजन्मभूमीच नव्हे तर रामकथा हीच खोटी आहे, असे सांगण्याचा प्रयत्न चालला आहे. या इतिहासकारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की, करोडो हिंदुच्या हृदयात युगानुयुगे रामाची प्रतिमा आहे आणि रामजन्मस्थानाविषयी पूर्ण श्रध्दा हिंदुच्या मनात आहे. या भंपक इतिहासकारांच्या प्रमाणपत्रांची त्यांना गरज नाही.
हिंदू समाजाचे दुर्दैव असे आहे की, त्याला संघर्ष हिंदुशीच करावा लागतो. राम झाला की नाही, रामायण खरे की खोटे, रामाच्या जन्म तारखेचा दाखला आहे की नाही, वानर रुपातील हनुमान खरोखरच अस्तित्त्वात होता का? असले प्रश्न मुसलमान विचारत नाहीत, ख्रिश्चन विचारत नाहीत. विचारणारे हिंदुच असतात. ते स्वतःला पंडित समजतात, इतिहासकार समजतात, संशोधक समजतात. माध्यमांत त्यांचे भाऊबंद बसलेले असतात. ते त्यांना प्रसिध्दी देतात आणि सत्तेत बसलेले तुष्टीकरणवादी त्यांना संरक्षण देतात. त्यांची ताकद खूप मोठी आहे. त्याविरुध्द सामान्य हिंदू संघटन लढू शकत नाही. त्यांच्या आवाजाला हे महापंडित भीक घालत नाहीत.
या भावनेचे प्रतिबिंब 2006साली अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने केलेल्या ठरावात आपल्याला दिसेल. या ठरावाची एक पार्श्वभूमी आहे. विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक सप्टेंबर 16 आणि 17 रोजी दिल्ली येथे झाली. या ठरावात जन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर शीर्घ बांधले जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दिल्लीत तेव्हा इटालियन सोनिया गांधीची सत्ता होती. या ठरावाला अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने पाठिंबा दिला. ठराव म्हणतो की, दोन लाख पंच्याहत्तर हजार खेडयातून करोडो हिंदुनी 1989साली श्रीरामाचे मंदिर जन्मस्थानावर उभे केले जावे, रामजन्मभूमी न्यासाच्या या मागणीला पाठिंबा दिला. (रामशीला पाठविल्या) रामाच्या मंदिराची प्रतिकृती घरोघर पोहचली. सर्व हिंदू भावनिकदृष्टया या प्रतिकृतीशी संलग्न झालेले आहेत. प्रतिकृतीप्रमाणे पत्थर कटाईचे काम अयोध्येत सुरु झाले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सर्व हिंदुना रामजन्मभूमी मंदिराचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी निर्धारपूर्वक आंदोलनाच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.
केंद्रात इटालियन सोनिया गांधीचे सरकार असताना आणि कळसूत्री पंतप्रधान असताना मंदिराचा विषय पुढे जाणे शक्य नव्हते. सोनिया गांधीच्या तो आस्थेचा विषय नव्हता आणि मनमोहन सिंग यांच्या सेक्युलर राजकारणाचा तो विषय नव्हता. हिंदुची मनस्थिती बदलत चालली होती. त्यांच्यातील रामतत्व आता हळुहळू जागे होऊ लागले होते. रावणशाही त्यांना समजू लागली होती. काळ बदलतो तसे रावण बदलतात. रामाच्या काळातील रावणाला दहा तोंडे होती. याचा अर्थ असे की, त्याची दहा शक्तीस्थाने होती. तुष्टीकरणवादाच्या काळात आणि बेगडी सेक्युलॅरिझमच्या काळात तोंडे दहाच राहिली, परंतु त्यांची रुपे बदलली. सेक्युलर, डावे, जडवादी, चंगळवादी, मॅकोलेपुत्र, माक्र्सपुत्र, नेहरुपुत्र, तुष्टीकरणवादी, संस्कृतीभंजक, हिंदू निंदक, अशी ही दहा तोंडे झाली. तिने खूप आग आणि विष हिंदू समाजावर ओकले. हिंदू , शंकराचाच अवतार असल्यामुळे ते विष त्याने प्राषण केले, पण त्याला काही झाले नाही. त्याची पाचनशक्ती अफाट आहे. त्याचा एवढाच परिणाम झाला की, त्याच्या मनात झोपलेले रामतत्त्व जागे होऊ लागले. आणि त्याला लक्षात आले की, नुसत्या धार्मिक यात्रा, तिर्थयात्रा, देव-देवतांचे पूजा-महोत्सव उपयोगाचे नाही. आता वेळ मतपेटीच्या पूजेची आलेली आहे. ते त्याने 1998पासून सुरु केले आणि 2014साली आणि नंतर 2019साली ही पूजा काय असते, हे जगाला दाखवून दिले.
तुष्टीकरणवाद्यांचे सरकार 2014साली जाऊन रामभक्तांचे सरकार आणण्यात झाले. जनतेची अपेक्षा अशी राहिली की, आता सरकारने कायदा करावा. रामजन्मभूमी आपल्या ताब्यात घ्यावी आणि तेथे भव्य मंदिर बांधावे. प्रकरण न्यायालयात होते. 2018च्या विजयादशमीच्या उत्सवात मोहनजी भागवत यांनी सरकारने आता कायदा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ते आणखीन म्हणाले की, रामजन्मभूमी हा श्रध्देचा विषय आहे. हा विषय राजकारणाचा नाही. कुंभमेळयात भाषण करताना सांगितले की, रामजन्मभूमीवर रामाचे भव्य मंदिर उभे राहिले पाहिजे. शासनाने हे काम केले तर त्यांना भगवान रामाचा अशिर्वाद मिळेल.
रामजन्मभूमी मुक्ति आंदोलन, शीलान्यास, कारसेवा, बाबरी ढाचा जमिनदोस्त, जमिनीचे सरकारी अधिग्रहण, अलाहाबाद हायकोर्टाचा जमीन विवादाचा निर्णय आणि जमिनीचे त्रिभाजन, सर्वोच्च न्यायालयातील खटला आणि जमिनीच्या मालकीचा विषय, असा सर्व प्रवास आहे. सर्वोच्च न्यायालयात जन्मस्थानावर मंदिर होते की नाही, हा विषय नव्हता तर जमिनीची मालकी कुणाकडे आहे, हा होता. गुंतागुंतीचे प्रश्न केवळ कायद्याने सुटत नाहीत. ज्या विषयामागे धर्म आहे, न्याय आहे, ते प्रश्न धर्म-न्यायाचे आहेत म्हणून निकाली होत नसतात. श्रीकृष्णाचा भगवद् गीतेत एक शाश्वत संदेश आहे - धर्माचा प्रश्न सोडवायचा असला तरी त्याच्या मागे शक्ती उभी केली पाहिजे. रामदास स्वामींनी संदेश देऊन ठेवला आहे की, दुर्बळाला जगात कुणी विचारत नाही. 'शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती-युक्ती जये ठायी, तेथे श्रीमंत धावती।'
संघाने शक्तीने आणि युक्तीने रामभक्तांच्या हाती राज्य जाईल, हे पाहिले. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनाने केलेले हे नवयुग निर्माण करणारे प्रवर्तन आहे. रामभक्तांनी तुष्टीकरणवाद्यांची कबर बांधलेली आहे. या आंदोलनाची हेतू तुष्टीकरण वाद संपविणे हा होता. त्यात चांगले यश मिळालेले आहे. शंभर टक्के यशासाठी आज काही काळ थांबावे लागेल. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनाचा दुसरा विषय घटनेचे 370कलम रद्द करण्याचा होता. हे कलम तुष्टीकरणाचे श्रीखंड होते. ते आता मृतखंड झाले आहे. रामजन्मभूमी मुक्ति आंदोलनाचा तिसरा विषय समान नागरी कायद्याचा आहे. तिहेरी तलाक संपला. आता समान नागरी कायद्याची वाट प्रशस्त झाली आहे.
हे एक राष्ट्र आहे. हे हिंदुराष्ट्र आहे. हिंदुराष्ट्रात राहणारे सगळे हिंदू आहेत. पूजापध्दती भिन्न असतील. कुणी मश्जिदीत जातो, कुणी गुरुद्वारात, कुणी चर्चमध्ये, कुणी अग्यारीत, तर कुणी विहारात. आम्ही सर्व एकाराष्ट्राचे अंग आहोत. हिंदुराष्ट्राचे अंगभूत घटक आहोत. ही भावना सर्व समाजात जागृत करुन एक शक्तीशाली राष्ट्र उभे करणे, म्हणजे भव्य राम मंदिर उभे करणे आहे. लौकिकाने राम मंदिर दगड, चुना, विटा, यांनी बांधले जाईल. ते बांधण्याचा कालखंड आता जवळ आला आहे. ते थांबविण्याची आता कुणात शक्ती नाही. जे मूर्खपणाने तसा प्रयत्न करतील, ते अही-मही रावणाच्या वाटेने जातील.
परंतु या राम मंदिरातून जे राष्ट्रमंदिर उभे राहील, ते दगड, चुना, विटा याचे नसेल. ते जिवंत माणसांचे असेल. आत्मिय भावेनेन एकमेकांशी जोडलेली, समरसतेचा व्यवहार करणारी, परस्परपूरक जीवन जगणारी, ही राष्ट्रीय जनता असेल. मंदिरातून राष्ट्र मंदिराकडे जाण्यचा हा प्रवास आहे.
रमेश पतंगे