बाबरीचे तीन घुमट होते. एक बेगडी सेक्युलॅरिझमचा होता, एक हिंदू विद्वेषाचा होता आणि एक तुष्टीकरणवाद्यांचा होता. शूर कारसेवकांनी ते जमीनदोस्त केले. महाराष्ट्रात हे तीन घुमट आज पुन्हा उभे राहिलेले आहेत. आपल्या विचाराशी आणि आदर्शाशी प्रतारणा करून सत्ता प्राप्त केली गेली आहे. सत्तेचे तीन घुमट बाबरीचेच घुमट आहेत. आपल्या सदसद्विवेकबुध्दीला आव्हान देणारे, त्यांचे करायचे काय? आता काही काळ सहन करण्याशिवाय पर्याय नाही.
प्रारंभी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात नव्हती. कृष्णा देसाईच्या हत्येनंतर शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरली. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने यश प्राप्त केले आणि बघता बघता मुंबई-ठाणे शिवसेनेने काबीज केले. तेव्हा मुंबई-ठाणे पट्टयात लालभाईंचे साम्राज्य मोठे होते. बाळासाहेब ठाकरे कट्टर कम्युनिस्टविरोधी होते. त्यांच्या झंझावातापुढे मुंबईतील लाल बावटयाचे साम्राज्य कधी भुईसपाट झाले, हे लालभाईंनादेखील समजले नाही. कामगार क्षेत्रातील त्यांचा उरलासुरला प्रभाव दत्ता सामंत यांनी संपवून टाकला. मुंबई-ठाणे कम्युनिस्टमुक्त झाले. बाळासाहेबांनी केलेली ही फार मोठी देशसेवा आहे आणि तेवढीच मोठी हिंदू समाजसेवा आहे. काहींना हे वाक्य पटणार नाही, पण खयाल अपना अपना, पसंद अपनी अपनी...
शिवसेनेने मराठी माणसाच्या मनात स्वप्ने पेरली ती राज्यकर्ती जमात बनण्याची. बाळासाहेबांचे सर्वात मोठे योगदान कोणते असेल, तर त्यांनी कसल्याही प्रकारचे जातीय आवाहन केले नाही, शिवरायांची स्मृती जागवली. असे म्हणायला हरकत नाही की त्यांचे समकालीन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र घरोघरी नेले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीचा विचार मराठी तरुणाच्या मनात खोलवर नेला. माणूस जेव्हा ध्येयवादाने झपाटून जातो, तेव्हा तो जे काही काम करतो, ते अत्यंत प्रामाणिक असते आणि त्याचे नैतिक मूल्य खूप मोठे असते.
मी तसा संघस्वयंसेवक. संघाची विचारसरणी प्रादेशिकवाद स्वीकारत नाही. त्यामुळे मराठीपणाचे भावनिक अपील त्या काळात मला झाले नाही. भावनिक आणि मानसिकदृष्टया मी या झंझावातापासून अलिप्त होतो. माझ्या संघकामात मी आनंदाने मग्न होतो. निवडणुकीच्या काळात मी पाहत होतो की, भिंती रंगविण्यासाठी शिवसैनिक चुना, रंग आणि ब्रश घेऊन निघाले. अनेक वेळा ते आपल्या पैशानेच चुना, रंग घेत, आपल्या पैशानेच चहा, नाश्ता करीत. कल्पक घोषणा लिहीत. गाजलेल्या सिनेमा-नाटकांच्या शीर्षकावरून राजकीय घोषणा तयार होत. 'थांब लक्ष्मी कुंकू लावते, शिवसेनेला मत देऊन येते...' अशा या घोषणा असत.
परिस्थिती झपाटयाने बदलत राहते. 1986 सालापासून रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन सुरू झाले. संघकार्यकर्ते आणि विचार ही त्याची प्रेरणा. झोपलेल्या हिंदू समाजाला जागे करणे हा त्याचा उद्देश. काळ-वेळ अशी जुळून आली की, हिंदू माणूस जागा होऊ लागला. त्याच्या जागृतीचे पडसाद सर्व क्षेत्रांत उमटू लागले. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे लोकमानस जाणण्याचा अद्वितीय गुण होता. त्यांनी शिवसेनेचे मराठीपण शाबूत ठेवून या मराठीपणाला हिंदुत्वाचे व्यापक कोंदण दिले. शिवसेनाप्रमुख 'हिंदुहृदयसम्राट' झाले. अगोदर त्यांनी जातीपातीच्या भिंती तोडल्या, नंतर भाषाभेद, प्रांतभेद मोडून काढले. हिंदू अस्मिता जागृतीत त्यांचे योगदान स्वतंत्र आहे, ते नाकारता येत नाही.
हिंदुत्वाच्या कोंदणात मराठी अस्मिता घेऊन उभी राहिलेली शिवसेना शिवसैनिकांची सेना होती. हे शिवसैनिक झपाटून काम करणारे, पदरमोड करून काम करणारे, एका ध्येयासाठी काम करणारे, अस्मितेसाठी जागृत असलेले असे होते. हिंदू समाजाचे ते खङ्गअस्त्र झाले. जेव्हा आवश्यकता वाटली तेव्हा ते रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या दडपशाहीला सामोरे गेले. सेक्युलर विचारधारेच्या लोकांनी त्यातील असंख्यांवर केसेस लावल्या, त्यांना तुरुंगात पाठविले, यातील अनेकांवर तर अजूनही केसेस चालू आहेत. व्यक्तिगत भांडणतंटयाच्या या केसेस नाहीत, एका संकल्पनेसाठी केलेल्या संघर्षाची किंमत म्हणून या केसेस आहेत.
या शिवसैनिकांनी एकच स्वप्न बघितले, ते म्हणजे विधानसभेवर भगवा झेंडा फडकण्याचे. शब्दश: ते शक्य नाही, परंतु अन्वयार्थाने भगवा झेंडा म्हणजे हिंदुत्ववादी विचारधारेचे राज्य. हिंदुत्वाची विचारधारा मानणारे या राज्यात दोनच पक्ष आहेत. शिवसेना आणि भाजपा. शिवसेना आणि भाजपा यांचे राज्य म्हणजे विधानसभेवर भगवा फडकविण्याचे राज्य. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही महत्त्वाकांक्षा ठेवली नाही की, मला राज्याचा मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी झालो नाही तर माझ्या घराण्यातील कोणाला तरी करायचे आहे. त्यांनी छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून एवढेच सांगितले की, हे राज्य होणे ही श्रींची इच्छा आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकविणे हेच आपले लक्ष्य आहे.
हे लक्ष्य आता संपले. आता लक्ष्य झाले मुख्यमंत्रिपद मिळविण्याचे. ते मित्रपक्षला कोंडीत पकडून मिळविण्याचा प्रयत्न झाला. ते जमले नाही, तेव्हा असंगाशी संग करून मिळविण्यात आले. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला आणि माझ्या डोळयापुढे 66-70ची शिवसेना उभी राहिली. तो जल्लोष, तो उत्साह, ती काहीही करण्याची जिद्द कुठेही दिसली नाही. सगळीकडे सन्नाटा सन्नाटा आहे. कुठे फटाक्यांची आतशबाजी नाही, कार्यालयाची दिवाळीची रोशणाई नाही, आपण झपाटून काम केले ते कशासाठी? एवढया केसेस लावून घेतल्या.. कशासाठी? वेळप्रसंगी घरादारावर निखारे ठेवले.. कशासाठी? कारागृहाच्या वारी केल्या.. कशासाठी?
भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी तर नक्कीच नाही. शिवसेना फोडण्याचे पाप करणारे हे पहिले गद्दार. महाराजांच्या रायगडावर फितुरी झाली अशी दंतकथा आहे. आणि फितुराचे नावही तेवढेच प्रसिध्द आहे, ते म्हणजे सूर्याजी पिसाळ. भुजबळ हे सूर्याजी पिसाळ आहेत. 'बाटग्याची बांग अधिक जोरदार' अशी एक म्हण आहे. बाळासाहेबांवर त्यांनी तोफ डागली, 'टी. बाळू' असा अनेक वेळा त्यांचा उल्लेख केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी एवढा अट्टाहास केला होता का? ज्यांनी हिंदू दहशतवाद शब्द शोधून काढला, मुस्लीम दहशतवादी आहेत तसे हिंदूदेखील दहशतवादी आहेत अशी समता प्रस्तापित करण्यासाठी ज्यांनी मालेगाव खटल्याचे कुभांड रचले, त्यांच्या गळयात हात घालून नृत्य करण्यासाठी एवढा अट्टाहास शिवसैनिकांनी नक्कीच केलेला नाही.
vivekedit@gmail.com