आजूबाजूला कुणीही नाही. मग हे सत्य आहे का आभास? ह्या आवाजाला चेहरा नाही. या वाट पाहण्याला अंत नाही. मरणानंतर सुध्दा न संपलेली तहान म्हणजे 'कोई दूर से आवाज दे चले आओ' हे गीत.
हृदयाचा आवाज ऐकणे सोपे आहे का? दुसऱ्यांचा तर सोडाच, स्वतःचा तरी आवाज ऐकू येतो का? बाहेरील कोलाहलात आपण इतके गुंगून गेलेलो असतो की स्वतःला आवाज आहे याची जाणीवसुध्दा बऱ्याच जणांना नसते. असली, तरी ती ऐकण्याचे धैर्य नसते, इच्छा नसते. आतला आवाज स्वीकारणे समाजाचा एक भाग असणाऱ्या, त्याची जाणीव असणाऱ्या माणसासाठी अधिक कठीण असते. इच्छेपेक्षा जेव्हा कर्तव्ये प्रबळ असतात, तेव्हा तर तो दडपण्याकडेच मनाचा कल असतो.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक
तरीही कधीतरी एक वेळ अशी येते की तो आवाज ऐकल्यावाचून पर्याय नसतो. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा मनाचा कौल असणारा दरवाजा हिंमत करून उघडावा लागतो. स्वतःच्या मनाचा कौल, तो स्वीकारण्याची हिंमतसुध्दा तेव्हा आपोआप येते.
चित्रपटात अनेक वेळा नायक-नायिकेच्या मनाचा कौल सांगण्यासाठी अशा पार्श्वगीतांचा आधार घेतला जातो. ही गाणी कथा पुढे सरकवतात. या गाण्यांचा आवाका नायक-नायिकेपुरता मर्यादित नसतो. आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर, आपला आतला आवाज बनून ही गाणी आपली सोबत करतात.
देहास आठवे स्पर्श, तू दिला कोणत्या प्रहरी
कीं धुके दाटले होते, या दग्ध पुरातन शहरी
कवी ग्रोस यांची ही कविता, उर्मिला.
कवितेच्या या चरणाशी जिचे नाते जुळू शकेल, अशी हिंदी चित्रपटाच्या इतिहासात भूमिका आहे ती साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटामधील छोटी बहूची. ही एका नाकारलेल्या, एकाकी पत्नीची कथा आहे, जी आपल्या पतीची वाट पाहत आहे, जो कधी तिचा झालाच नाही.
कोई दूर से आवाज़ दे चले आओ
चले आओ, चले आओ, चले आओ
साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटाच्या सुरुवातीलाच हे गीत येते.
पडद्यावर दिसते एक मोडकी हवेली. खूप वर्षांपूर्वी ती वैभवशाली असावी. आता मात्र उरले आहेत प्राचीन वैभवाच्या खुणा अंगावर वावरत असलेले केवळ अवशेष. ही हवेली पाडण्याचे काम चालू आहे. कामावर असणारे मजूर आपले काम संपवून जेवण करण्यासाठी निघून गेले आहेत. राहिला आहे फक्त एक मध्यमवयीन ओव्हरसिअर.
फार पूर्वी या हवेलीशी त्याचा संबंध आलेला आहे. त्या जीर्ण परिसरात फिरत असताना, गतकाळाच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. हळूहळू भूतकाळ नजरेसमोर साकारायला सुरुवात होते. कुणीतरी अदृश्य शक्ती त्याला खेचून घेत असते.
जिया बुझा बुझा, नैना थके थके
पिया धीरे धीरे चले आओ
ओळखीचे हे सूर वाऱ्यावर तरंगत येतात.
आजूबाजूला कुणीही नाही. मग हे सत्य आहे का आभास? ह्या आवाजाला चेहरा नाही. या वाट पाहण्याला अंत नाही. मरणानंतर सुध्दा न संपलेली तहान म्हणजे 'कोई दूर से आवाज दे चले आओ' हे गीत.
दूर कुठूनतरी येणारे हे विरहिणीचे सूर आपली कहाणी सांगायला सुरुवात करतात. ही कहाणी असते एका उच्चभ्रू समाजातील श्रीमंत पण परंपरेत जखडलेल्या एका स्त्रीची. जमीनदाराच्या घराण्यातील सर्वात छोटया मुलाच्या पत्नीची. ह्या चित्रपटात तिला नाव नाही. जग तिला छोटी बहू या नावाने ओळखते. घराण्याची सून एवढीच तिची ओळख. तेच तिच्या अस्तित्वाचे कारण. छोटया बहूचा नवरा हा त्या वेळच्या तमाम रईस जमीनदारांसारखा व्यसनी, ऐय्याशी. मद्यधुंद होऊन नायकिणींच्या सहवासात रात्र घालवणे त्याचा नित्यक्रम. हे दुःख त्या काळात अनेक स्त्रियांच्या वाटयाला आले होते. त्यांनी ते मुकाट सहनही केले. छोटी बहू मात्र ते करायचे नाकारते. परंपरांना मानणारी, कमी शिक्षण आणि कसलाही आधार नसलेली एक सर्वसामान्य स्त्री जेव्हा स्वतःच्या स्त्रीत्वाचा अपमान होतो, तेव्हा मात्र नशिबाला दोष न देता परिस्थितीबरोबर दोन हात करते. जमीनदाराच्या घराची सून असली, तरी ती त्यांची प्रतिनिधी नाही. ती वेगळी आहे. कदाचित या वेगळेपणातच तिच्या शोकांतिकेची बीजे रोवली गेली आहेत.
गरीब घरातून आलेली ही स्त्री, पतीला देव मानते. पतिव्रता धर्म मनापासून मानते. नवऱ्यापलीकडे तिला दुसरे विश्व नाही. दागिने मोडावेत, नवीन करावेत, सुंदर वस्त्रे परिधान करावीत, वेळ जाण्यासाठी सारीपाट खेळावा ह्यात गुंतलेल्या, घरातील इतर स्त्रियांना तिची ही तडफड समजत नाही.
पतीने बाहेरख्याली असावे हे छोटया बहूला आवडत नाही. तो तिला स्वतःच्या सुंदरतेचा, पातिव्रत्याचा आणि स्त्रीत्वाचा अपमान वाटतो. रात्र झाली की कोठयाचे दिवे उजळतात. नृत्य-गायनाला सुरुवात होते. मद्याचे पेले रिकामे होतात. डोळे नशेने धुंद होतात. नर्तिकेवर पैशाची खैरात होते. आपल्या दालनात नवऱ्याची वाट पाहत एकाकी असलेल्या छोटया बहूचे हुंदके अंधारात विरून जातात.
रात रात भर इंतज़ार है
दिल दर्द से बेक़रार है
साजन इतना तो न तडपा चले आओ
आपल्या या एकटेपणाला ती नवऱ्याला जबाबदार धरते. पत्नीच्या जबाबदारीबरोबरच तिला तिच्या हक्कांचीही जाणीव आहे. ती जिद्दी आहे. पतीला परत मिळवण्यासाठी ती जिवापाड प्रयत्न करते. शृंगार करून त्याला रिझवण्याचा आटापिटा करते. इतकेच नव्हे तर बाहेरख्याली नवऱ्याला घरी बांधून ठेवण्यासाठी पातिव्रत्य आणि शालीनता अपुरी पडते, हे लक्षात आल्यावर ती त्याच्या समाधानासाठी एकच प्यालासुध्दा स्वीकारते.
ज्याला सर्वस्व वाहिले, त्यानेच विश्वासाला चूड लावली हे जाणवल्यावर मात्र तिचा तोल ढळतो. ''तुला काय कमी आहे?'' या प्रश्नाला उत्तर देताना ती नवऱ्याच्या मर्मावर आघात करताना म्हणते, ''मला आई म्हणणारा कुणी आहे का? तुम्ही देऊ शकता का?'' सर्व बंधनांत जखडलेली असूनही, स्वतःच्या शारीरिक गरजा आणि मातृत्वाची ओढ स्पष्ट सांगण्याची हिंमत तिच्यात आहे.
तिच्या नशिबी मात्र येते ती वंचना. एकाकीपणा, साऱ्या कुटुंबाचा तिरस्कार.
मीनाकुमारी यांच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट भूमिका मानली जाते.
आस तोड़ के मुख मोड़ के, क्या पाओगे साथ छोड़ के
बिरहन को अब यूँ ना तरसाओ, चले आओ
सुरुवातीला इथे वाद्यांची मोजकी साथ आहे. हळूहळू वाद्यांचा कल्लोळ कमी होतो आणि राहतात ते आर्ततेत भिजलेले गीता दत्त यांचे झपाटून टाकणारे सूर. तिच्या सादाला कुणाचाही प्रतिसाद नाही. या वेदनेला उतार नाही. पडद्यावर छोटया बहूच्या तोंडी हेमंत कुमार यांनी संगीतबध्द केलेली, गाजलेली दोन गीते आहेत. 'पिया ऐसो जिया में' आणि 'न जावो सैया'. हे गीत मात्र ती गाताना दिसत नाही. आसमंतात भरून गेलेले हे उदास सूर, अंधारात वाट पाहत असलेल्या तिच्या आकृतीला अधोरेखित करतात. तिच्या दुःखाला वाचा फोडतात.