श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजींच्या सहवासात

विवेक मराठी    09-Nov-2019   
Total Views |

संघप्रचारक आणि भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजी यांचे जन्मशताब्दी वर्ष 10 नोव्हेंबर 2019पासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडणारा आणि त्यांच्या आठवणी जागवणारा लेख.

 

थोर माणसांचा सहवास लाभणे, भाग्यात असावे लागते. आपण सर्व पुनर्जन्म मानणारे आहोत. मागील जन्मात माझ्या हातून काही पुण्य घडले असावे, त्यामुळे श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजींसारख्या थोर पुरुषाचा सहवास मला लाभला. दत्तोपंतांचे एका वाक्यात वर्णन करायचे तर ऊस जसा अंतर्बाह्य गोड असतो, तसे दत्तोपंत ठेंगडी म्हणजे अंतर्बाह्य गोडवा.

माझा जेव्हा त्यांच्याशी परिचय झाला तेव्हा मी वयाने केवळ लहान होतो असे नाही तर सर्वच बाबतीत मी त्यांच्यापुढे एक सामान्य माणूस होतो. आम्हा दोघांना जोडणारा दुवा म्हणजे आम्ही दोघे संघस्वयंसेवक होतो. ते प्रचारक होते, मी प्रचारक नव्हतो, एवढाच आमच्यातील फरक. दत्तोपंताचे मोठेपण यात होते की, ते माझ्यासारख्या सामान्य स्वयंसेवकाशी माझ्या पातळीवर येऊन संवाद करीत, ही फार अवघड गोष्ट आहे. माणूस मोठा झाला की, तो इतरांना दुर्लभ होत जातो. सामान्य माणूस आणि त्याच्यामध्ये खूप अंतर पडत जाते. तसे दत्तोपंताच्या बाबतीत नव्हते. 'अलौकिक असावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती' याचे मूर्तिमंत उदाहरण दत्तोपंत होते.

संघात त्यांचा दर्जा सरसंघचालक समकक्ष होता. ते अतिशय बुध्दिमान होते. त्यांचे वाचन अफाट होते. तेवढेच मनन, चिंतनदेखील अफाटच होते. संघटनशास्त्रातील ते महातज्ज्ञ होते. वेगवेगळया संस्थांच्या उभारणीतील त्यांचे योगदान अद्वितीय होते. राष्ट्र, समाज, समाजापुढील प्रश्न, राजकीय प्रश्न, सामाजिक प्रश्न अशा सर्व विषयांतील ते 'मास्टर' होते. त्यांच्या सहवासात गेल्यानंतर यापैकी काहीही जाणवत नसे. आपण आपल्या मित्राशी बोलतो आहोत किंवा घरातील वडिलधाऱ्या व्यक्तीशी बोलत आहोत, असेच वाटत असे. माणूस कितीही मोठा झाला तरी तो जेव्हा घरात असतो, तेव्हा तो कुणाचा भाऊ असतो, काका-मामा असतो, पती असतो, अशा विविध नात्यात तो जगतो. या नातेसंबंधातील सर्वांना असा माणूस आपला वाटतो. कारण तो त्यांच्यापुढे बसला असताना तत्त्वज्ञानावर भाषण करीत नाही. भाजी कशी झाली, नाटक कसे होते, कपडे छान आहेत, घरातील एखादी नवीन वस्तू असेल तर, ती कुणी आणली, कोठून आणली, असेच विषय चालतात.

आणीबाणीचा कालखंड 1975-77 असा आहे. या कालखंडात मी पार्ले नगराचा कार्यवाह होतो. त्यावेळी पार्ले नगर म्हणजे पार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी अशी तीन उपनगरे येत. आणीबाणी पुकारल्यानंतर मी भूमिगत झालो. या काळात संघाचे बहुतेक ज्येष्ठ अधिकारी भूमिगत झाले होते. आणीबाणीला चार-पाच महिने झाल्यानंतर संघाच्या ज्येष्ठ भूमिगत अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था, त्यांच्या बैठकांची व्यवस्था, हे काम मुंबईत सुरू झाले. माझ्याकडे, माझ्या नगरापुरता विषय आला.

दत्तोपंत ठेंगडी यांच्या निवासाची व्यवस्था करायची आहे, असा निरोप आला. मी त्यासाठी घर शोधू लागलो. अंधेरी पश्चिमेला टाटा कॉलनीत गोखले यांचे घर खूप मोठे होते. त्यांच्या घरी दत्तोपंताच्या निवासाची व्यवस्था करावी, असा निर्णय झाला. गोखले पती-पत्नीने त्याला मान्यता दिली. आजोबा आपल्या घरी राहायला येणार आहेत, असे घरातील मुलांना सांगण्यात आले. मी त्यांच्या व्यवस्थेत राहिलो. म्हणजे 24 तास त्यांच्यासोबतच राहिलो. त्यापूर्वी माझा दत्तोपंतांशी कधी प्रत्यक्ष संबंध आला नव्हता. त्यांचे अनेक बौध्दिक वर्ग मी ऐकले होते. प्रत्येक बौध्दिक वर्ग ऐकल्यानंतर आज काहीतरी विलक्षण ऐकले, अशी जाणीव व्हायची. संघ विचारांची आणि दर्शनाची माझी कक्षा खूप वाढत गेली. अशा तत्त्वज्ञ दत्तोपंतांसमवेत मी कसा राहणार, याचे माझ्या मनावर प्रचंड दडपण होते.

दुसरे दडपण त्यांच्या सुरक्षेचे होते. पोलीस आणि गुप्तचरांना त्यांचा सुगावा लागता कामा नये, याची काळजी करावी लागत होती. पहिले काम मला करावे लागले. ते म्हणजे दत्तोपंतांना धोतर आणि झब्यातून, पॅण्ट-शर्टमध्ये आणावे लागले. तेव्हा मी टेलर काम करीत होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे मी त्यांच्यासाठी टेरिवुलचे कापड आणले, त्यांचे माप घेतले आणि दोन पॅण्ट व बुशशर्ट शिवून आणले. पोशाखात बदल झाल्यामुळे तात्काळ ओळखण्याची खूण गेली. हळूहळू दत्तोपंतांबरोबर राहण्याची मला सवय होत गेली.

काही काम नसले की संध्याकाळी फिरायला जाण्याचा विषय असे. मी त्यांना घेऊन जुहू चौपाटीवर जात असे. जुहू चौपाटीवर गेल्यानंतर भेळ खायचा आनंद घ्यायचा असतो. पण दत्तोपंताना कसे विचारणार, 'भेळ खाणार का?' माझी अडचण दत्तोपंतानी सोडवली. तेच म्हणाले,'रमेश, आपण भेळ खाऊ आणि नंतर उसाचा रस घेऊ.'' त्यांच्या बरोबर खाल्लेली भेळ आणि उसाचा रस आणि त्याची गोडी माझ्या मनात अजून कायम आहे. एक दिवस असेच फिरत असताना दत्तोपंत मला म्हणाले,''तुला हे गाण माहीत आहे का?'' असे म्हणून त्यांनी बैजू बावरातील 'मोहे भूल गये सावरियाँ' हे लतादीदींचे गाणे गुणगुणायला सुरुवात केली. त्यातील 'प्रीत है झुठी, प्रितम झुठा, झुठी है सारी नगरयिाँ'' ही ओळ म्हणून ते थांबले आणि थोडे गंभीरही झाले. संघाचा ज्येष्ठ प्रचारक, तत्वज्ञ, सिनेमातील गाणे तोंडपाठ म्हणताना ऐकून मी भारावून गेलो. न बोलताच दत्तोपंतानी असे काही संस्कार माझ्या मनावर केले की, ते नंतर कायमचे कोरले गेले.

पार्ल्यातच एक बैठक होती आणि बैठकीला अखिल भारतीय स्तरावरील 15-16 कार्यकर्ते होते. कोण-कोण असणार आहेत, याची नावे माझ्याकडे आली. यातील 5-6जणांची पथ्ये होती. एका अधिकाऱ्याला बिना तिखटाचे जेवण पाहिजे होते, दुसऱ्याला बिना तेला-तुपाचे जेवण पाहिजे होते. काही जणांना अमुक भाज्या चालणार नव्हत्या. या सर्वांची काळजी घरातील महिलांनी घेतली. बैठक दिवसभर होती. बैठकीच्या मध्यांतरात चहापान, तेही बिनासाखर-साखर, कॉफी, दूध आणि पेय असे प्रकार होते. तेही काटेकोरपणे पाळले गेले. या सर्व व्यवस्थांचे विलक्षण दडपण माझ्या मनावर होतेच. कोणतीही चूक होता कामा नये, यासाठी जागरुक राहून बघावे लागले. पुन्हा हे सर्व कार्यकर्ते भूमिगत, पोलीस त्यांच्या मागावर होते. सगळेजण एकत्र आले नाहीत, जातानाही एक तासाचा कालावधी ठेवून हळूहळू सर्वजण गेले.


 

बैठक संपली. आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो. दत्तोपंतानी मला जवळ घेतले आणि म्हणाले,''आज तुला खूप त्रास झाला, खूप श्रम करावे लागले.'' असे होते दत्तोपंत. सामान्य स्वयंसेवकाची अत्यंत आपुलकीने काळजी करणारे. आणीबाणीच्या काळात एकूण दीड़-दोन महिने तरी मी त्यांच्या बरोबर राहिलो असेल. या काळात त्यांच्याशी मी कुठलाही वैचारिक संवाद केला नाही. आज माझी ओळख महाराष्ट्रातील एक विचारवंत अशी करून दिली जाते. माझ्यासारखा सामान्य स्वयंसेवक विचारवंत कसा झाला? असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला उत्तर मिळते की, हा परिणाम बहुतेक दत्तोपंताच्या सहवासाचा असावा. सुगंधाच्या सहवासात आपण गेलो, तर तो सुगंधही आपल्या कपडयाला आपोआपच लागतो, असे बहुधा झाले असावे.

आणीबाणीच्या काळात मी त्यांना दोन प्रश्न विचारले होते,''आणीबाणी किती काळ राहील? आणि संघावरची बंदी कधी उठेल?'' दत्तोपंतानी मला दिलेले उत्तर असे होते,''संघकार्य ईश्वरी कार्य आहे, या श्रध्देने आपण संघकाम करतो. आणीबाणी ईश्वरी योजनेने आली आहे आणि ईश्वरी योजनेनेच तिचा अंत होईल. आपण त्याची काळजी करण्याचे कारण नाही. राहिला प्रश्न व्यक्तीचा, व्यक्तीला असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे, पण आपली व्यक्तिगत असुरक्षा संघटनेशी जोडण्याचे कारण नाही. या संघर्षात आपण विजयी होणार आणि विजयी होऊनच बाहेर पडणार. संघकार्य ईश्वरी कार्य आहे, हा केवळ व्यर्थ बडबडण्याचा विषय नाही. ती आपली मूलभूत श्रध्दा आहे.'' यानंतर माझ्या मनात आणीबाणी कधी उठणार, संघबंदी कधी संपणार, हे विषय आले नाहीत. आज जे माझ्याकडे काम आहे, तेच मी केले पाहिजे, बाकी सर्व गोष्टी गौण आहेत, ही गोष्ट माझ्या मनात रुजली.

'संघकार्य ईश्वरी कार्य आहे,' हे वाक्य अनेकदा ऐकले. माझ्या बौध्दिक वर्गातूनदेखील मी ऐकविले आहे. तोपर्यंत या वाक्याच्या अर्थावर मी कधी चिंतन केले नाही. आज मी असे म्हणू शकतो की, 'संघकार्य ईश्वरी कार्य आहे,' हा मंत्र आहे आणि त्याचे सामर्थ्य अफाट आहे. त्यावर एक पुस्तकदेखील लिहिता येईल. दत्तोपंत हे वाक्य जगत होते.

यथावकाश आणीबाणी संपली. दत्तोपंताचे देशभर प्रवास सुरू झाले. मजदूर संघाचे ते संस्थापक होते. मजदूर संघाच्या कामानिमित्त त्यांचा सतत प्रवास होत राहिला. मीदेखील आणीबाणीनंतर हुतात्मा चौकातील मजदूर संघाच्या कार्यालयात उद्योग-कृषी विकास मंडळाचे काम घेऊन बसलो. दत्तोपंताचे तिथे वर्षातून एक-दोनदा येणे होत असे. दत्तोपंत एकटे असे कधी कुणी पाहिले नाही. त्यांच्याभोवती पंधरा-वीस कार्यकर्त्यांचा गराडा कायम असे. मी काही मजदूर संघाचा कार्यकर्ता नव्हतो. त्यांचे विषयही मला नवीन होते. पण कार्यालयात दत्तोपंत मला आपुलकीने जवळ घेत आणि आलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद सुरू होई. चहापान होई. दत्तोपंतांना चहा मनापासून आवडे. आणीबाणीच्या काळात त्यांच्याबरोबर दिवसातून किमान सात-आठ वेळा चहा मला घ्यावा लागे. त्यामुळे त्यांची चहाची 'चाह' याच्याशी मी चांगलाच परिचित होतो. या चहाचा तेव्हा मला कधी त्रास झाला नाही. त्याचे कारण असे असावे की, दत्तोपंताबरोबरचा चहा दत्तोपंताच्या स्नेहाने मिश्रित असे. त्यामुळे पोटात त्यांचा स्नेहच जाई. त्याचा त्रास कसा होणार?

दत्तोपंतांचे निवासाचे आवडते गाव म्हणजे पुणे होते. पुण्यातच त्यांचा मुक्काम खूप काळ राही. ते कधी संघकार्यालयात राहत नसत. राहण्यासाठी ते कुठल्यातरी कार्यकर्त्याचे घर पसंत करी. कधी मोहनराव गवंडी यांचे घर असे, तर कधी साठे यांचे घर असे. 1983 साली त्यांनी सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. मोहनराव गंवडी मंचाचे अध्यक्ष झाले. 1983 साली डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तिथी आणि इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे 14 एप्रिलला आली. हा एक अपूर्व योगायोग होता. या योगायोगाचे महत्त्व जाणून दत्तोपंतांनी सामाजिक समरसता मंचाच्या स्थापनेची घोषणा केली. तेव्हा मी मुंबई महानगरचा सहकार्यवाह झालो होतो.



 

दत्तोपंतांनी भूमिका मांडली की, सामाजिक समता निर्माण करण्यासाठी समाजात बंधुभाव निर्माण होणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तत्त्वज्ञानात बंधुतेला फार मोठे स्थान दिले. डॉ. हेडगेवारांनी संघ शाखांच्या माध्यमातून बंधुभाव निर्माण करण्याचे एक तंत्र विकसित केले. दोन महापुरुषांच्या विचारांतील हा एक समान दुवा आहे. या समान दुव्याला मुख्य आधार मानून समरसता मंचाची स्थापना करण्यात आली. 'समरसतेशिवाय समता अशक्य', या शीर्षकाची एक पुस्तिका पुढे प्रकाशित झाली. स्थापनेच्या दिवशी दत्तोपंतानी केलेल्या भाषणाची ही पुस्तिका आहे. या स्थापना दिवशी मी पुण्याला उपस्थित नव्हतो. समरसता मंचाचे काम मला करावे लागेल, असे तेव्हा मला वाटले नाही.

मुंबईच्या चेंबूर हायस्कलमध्ये महाराष्ट्र, गुजरात, विदर्भ या प्रांतांचा द्वितीय वर्षाचा संघशिक्षा वर्ग होता. या वर्गाचा मी कार्यवाह होतो. हा क्षेत्राचा वर्ग असल्यामुळे दत्तोपंत ठेंगडी यांचा वर्गात तीन दिवसांचा प्रवास होता. या काळात मीदेखील सामाजिक समता, दलित प्रश्न, आंबेडकरी चळवळ यावर लिहायला सुरुवात केली होती. त्यासाठी मी जमेल तसे वाचन करीत होतो. महाराष्ट्रातील प्रचलित शब्द होता समता. समरसता हा शब्द नवीन होता. समरसता शब्दामागे कोणतीही सामाजिक चळवळ नव्हती. त्याचा अर्थ स्पष्ट करणारी पुस्तकेदेखील नव्हती.

वर्गात संध्याकाळच्या वेळेला संघस्थानावर फेऱ्या मारताना मी दत्तोपंताना विचारले,''समता, हा प्रचलित शब्द असताना आपण समरसता हा शब्द कशासाठी घेतला?'' दत्तोपंतानी मला त्याचे कोणतेही तात्विक उत्तर दिले नाही. रमेशला कोणत्या भाषेत उत्तर दिले असताना त्याच्या शंकेचे समाधान होईल, हे ते उत्तम जाणून होते. ते मला म्हणाले,'रमेश, असे आहे, समता हा शब्द डाव्या विचारसणीचा शब्द आहे. तो जर आपण घेतला तर आपण त्यांची उष्टावळ चाटतो असे होईल. आपले वेगळेपण त्यातून व्यक्त होणार नाही. ते व्यक्त करायचे असेल तर समरसता हा शब्दप्रयोग करायला पाहिजे. याचा अर्थ आपल्याला सामाजिक समता नको, असे नााही. सामाजिक समता तर आपल्या कार्याचा प्राण आहे. पण ती आणायची असेल आणि टिकवायची असेल तर समरस भावना निर्माण करणे आवश्यक आहे.''

दत्तोपंतांचे एवढेच सांगणे मला पुरे होते. न बोलताच दत्तोपंतानी अनेक गोष्टी सांगितल्या. डाव्यांच्या समतेचा अर्थ काय होतो, याचा अभ्यास कर. समरसतेच्या अर्थाचादेखील अभ्यास कर. आपल्या प्राचीन विचारात समतेचा अर्थ काय होतो. समरसता ही कशी सांगितली गेली आहे, याचादेखील अभ्यास कर. माझ्या डोक्यातील विचारचक्र फिरू लागली. क़ुणाचीही पालखी आपल्या खांद्यावर घ्यायची नाही. आपल्याच विचारांची फांदी आपल्या खांद्यावर राहील. प्रारंभी खूप टीका होईल. या चळवळीत असणारे लोक आपल्यावर हसतील, त्याची चिंता करायची नाही. आपण दमदारपणे पुढे जायचे. एवढे सगळे काही दत्तोपंतांनी मला सांगितले नाही, पण न सांगताच त्यांनी जे सांगितले ते असे आहे.

यानंतर समरसता मंचाचा कार्यवाह म्हणून माझ्यावर जबाबदारी आली. आणि ती मी दत्तोपंतांच्या मार्गाने पार पाडली. 'मी, मनू आणि संघ' आणि आताच प्रकाशित झालेले 'समरसतेचा वाटसरू' ही दोन पुस्तके समरसतेच्या प्रवासासंबंधीची आहेत. आज समरसता हा विषय संघाने अखिल भारतीय केलेला आहे. समाजातील सर्व क्षेत्रात समरसता या शब्दाला मान्यता प्राप्त होत चालली आहे. नरसिंह राव सरकार असताना त्यांनी हुगळीला (कोलकाताला) जाणाऱ्या गाडीचे नावदेखील 'समरसता एक्सप्रेस' ठेवले. दत्तोपंतांचे द्रष्टेपण यात आहे. आपण आपल्या विचारावर ठाम असले पाहिजे. आपले कार्य ईश्वरी कार्य आहे, हे केवळ बोलण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. ईश्वरी कार्याला मरण नसते आणि अपयश नसते, याची अनुभूती मी माझ्या जीवनामध्ये निरंतर घेत असतो.


रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.