आली विकासगंगा अंगणी

विवेक मराठी    23-Nov-2019
Total Views |

आज 'विकास' हा परवलीचा शब्द झाला आहे आणि विकास मोजण्याची वेगवेगळी परिमाणेही उपलब्ध आहेत. असे असले, तरी 'शाश्वत विकास' ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यावश्यक अशी संकल्पना आहे, याचा अनुभव आपण सर्व जण घेऊ लागलो आहोत. विकास म्हटले की स्थलांतर, बेसुमार वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रदूषणाला आमंत्रण या गोष्टींचा सामना करावा लागतो. त्याशिवाय विकास साध्य होत नाही. या उलट स्थानिकांचे स्थलांतर थांबवत स्थानिकांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देतानाच निसर्गाने जे भरभरून दिले आहे त्याचे दोहन करून आवश्यक ती प्रक्रिया करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देतानाच निसर्ग, मानव यांचे संबंध उत्तम राहतील यांची काळजी घेणे म्हणजेच शाश्वत विकास. अर्थात, ही झाली शाश्वत विकासाची ढोबळ व्याख्या. जेव्हा जेव्हा शाश्वत विकासाचा विचार होतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या विविध पैलूंचा खूप खोलवरचा विचार करावा लागतो, याचे उदाहरण म्हणजे सावंतवाडीजवळच्या माणगाव येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प होय. डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षात प्रत्येक जिल्ह्यात सेवाप्रकल्प उभा राहावा असा संघाने निर्णय घेतला आणि स्थानिक गरजा, स्थानिक साधनसुविधा यांचा अभ्यास करून या प्रकल्पाची सुरुवात करावी आणि त्यात निरंतर नवेनवे आयाम जोडले जावेत, ही अपेक्षा व्यक्त केली. त्या अपेक्षेची पूर्ती म्हणजे 'डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प'.

 

*****

एकनाथने मोटरसायकलला किक मारली आणि आम्ही सावंतवाडीच्या राजवाडयाला वळसा घालून मुंबई-गोवा हायवेच्या दिशेने निघालो. एकनाथ डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाचा पूर्णवेळ कार्यकर्ता. प्रकल्पाच्या माध्यमातून जे जे उपक्रम चालतात, त्यांच्यात समन्वय आणि संपर्क ठेवण्याचे काम एकनाथ करतो. सावंतवाडीतून निघालो आणि पावसाची रिमझिम सुरू झाली. वाटेत धो धो पाऊस सुरू झाला तर अडकून पडू, अशी भीती मनात दाटून आली, पण एकनाथला खात्री होती हा पाऊस फार वेळ राहणार नाही. झालेही तसेच. शहर सोडून हायवेला लागेपर्यंत पाऊस थांबला. उघडीप झाली. रस्त्याच्या बाजूला मोटरसायकल थांबवून एकनाथने रेनकोट काढला आणि म्हणाला, ''आपण माळगावला जाऊ. तेथे आपला एक शेतकरी गट आहे.'' पुन्हा मोटरसायकल सुरू झाली. एकनाथ बोलू लागला. ''या परिसरात दूध डेअरी हा व्यवसाय यशस्वी होत नव्हता. बऱ्याच वेळा दूध उत्पादकांची फसवणूक होत असे. सहकारी दूध संघ हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला होता. त्यामुळे शेतकरी दूधदुभत्यातून चार पैसे मिळतील आणि आपल्या संसाराला त्याचा हातभार लागेल असा विचारच करत नव्हते. अर्थात त्याला त्यांचा पूर्वानुभव कारणीभूत होता. दुधाचे भाव पाडणे, दूध नासवणे अशा अनेक क्लृप्त्या करून दूध उत्पादकांना नाडले गेले होते. आणि मग दूधदुभते नकोच ही मानसिकता तयार झाली. दूध डेअरी आणि राजकारण हाही एक पैलू होताच. हे सारे चक्र भेदून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला पूरक ठरेल असा दुधाचा व्यवसाय करणे हे या परिसरात एक दिवास्वप्न होते.

पण डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाने शेतकऱ्यांना सबळ, सक्षम करण्याचा निर्धार केला आणि मग मळगावमध्ये परिवर्तनाची चक्रे फिरू लागली. मळगाव... मुंबई-गोवा महामार्गाहून आतल्या बाजूला तीन-चार किलोमीटरवर वसलेले छोटे गाव. या गावात आता कल्पवृक्ष शेतकरी गटाची दूध डेअरी चालते. त्याचबरोबर 'बेबी कॉर्न'चे उत्पादनही मोठया प्रमाणात घेतले जाते. बेबी कॉर्नला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची हमी प्रकल्पाने घेतली आहे. बेबी कॉर्नला योग्य भाव मिळतो, त्याचबरोबर जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत हिरवा चाराही उपलब्ध होतो. या चाऱ्यामुळे जनावरे दूध जास्त देतात. दूध वाढले, मग त्याचे करायचे काय? स्वत:च डेअरी सुरू करू असा विचार पुढे आला आणि मग कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाशी करार करून मळगावात डेअरी सुरू झाली.'' एकनाथ बोलत होता. मी केवळ ऐकण्याचे काम करत होतो. शेवटी मळगाव आले.

एकनाथने आधीच सूचना दिल्यामुळे कल्पवृक्ष गटाची मंडळी डेअरीच्या कार्यालयात जमा झालेली. 20 जणांचा गट. वीसही लोकांनी आपल्या शेतात बेबी कॉर्नची लागवड केलेली आणि डेअरीचे सभासदही झालेले. खरे तर या गावात प्रकल्पाने प्रवेश केला 2015 साली. संतोष सावंत यांना प्रोत्साहन देऊन 20 गुंठयांत बेबी कॉर्न लागवड करायला लावली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग एक एक करत गटात सामील झाले. सुनील उकिडवे, अभय भिडे यांनी या मंडळींना एकत्र केले. शेतकरी गट तयार करून रजिस्ट्रेशन केले. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने शेतकरी मेळावे घेतले. एक एक करत अनेक शेतकरी बेबी कॉर्नची लागवड करू लागले. मुबलक प्रमाणात हिरवा चारा आणि घरात असणारी दुभती जनावरे यांच्या आधाराने एक नवा आर्थिक स्रोत उत्पन्न झाला.

प्रकल्पाला केवळ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करायचे नव्हतेच, तर त्यांना सर्वार्थाने विकासाच्या प्रक्रियेचा भाग बनवायचे होते. त्यामुळे शेतकरी मेळावे हॉलमध्ये न घेता शेतकऱ्यांच्या बांधावर घेऊन प्राप्त परिस्थितीचे आकलन करत नव्या वाटा शोधण्यास सुरुवात झाली. डेअरीत बसलेले गटाचे सदस्य आपआपली यशोगाथा सांगत होते. कुणी दहा गुंठयात, कुणी वीस गुंठयांत बेबी कॉर्नची लागवड केली आणि हाती पैसा खेळू लागला. बेबी कॉर्न हे या गावकऱ्यांसाठी नगदी पीक झाले. मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध झाला आणि त्यामुळे दुभत्या जनावरांचे दूध वाढले. एक एक सदस्य बोलत होता, तेव्हा त्यांच्या डोळयात चमक होती. केवळ पारंपरिक शेतीवर आपण तग धरू शकत नाही याची जाणीव झालेल्या या मंडळींना प्रकल्पाच्या रूपाने देवदूतच भेटला होता, जो स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्याच ताकदीतून आणि परिश्रमातून नव्या विकासगंगेची ओळख करून देत होता.

मळगावात कल्पवृक्ष गटाने डेअरी सुरू केली, पण सुरुवातीची भांडवली गुंतवणूक आणि डेअरीला आवश्यक असणाऱ्या वस्तू, उपकरणे यांची उभारणी कशी करायची? हा प्रश्न होता. प्रकल्पाने पुढाकार घेऊन डेअरी उद्योगाला आवश्यक उपकरणे खरेदी करून दिली. या डेअरीत सध्या शे-दोनशे लीटर दुधाचे संकलन होते आणि प्रत्येक लीटरला 40 रुपये दरही मिळतो. सहकारी दूध संघाची पिळवणूक आणि भ्रष्टाचार यांच्यापासून मुक्त होत मळगावची डेअरी यशस्वीपणे काम करते आहे. प्रकल्पालासुध्दा हेच अपेक्षित आहे. स्थानिक माणूस स्थानिक उपलब्धतेचा पुरेपूर वापर करून विकासगंगेत सहभागी झाला पाहिजे, हेच तर प्रकल्पाचे ध्येय आणि ते ध्येय साकार करण्यासाठी प्रकल्प माणूस उभा करत आहे. या माणसाच्या कामाला सरकारी पातळीवरही मान्यता मिळाली. कल्पवृक्ष गटाच्या उल्लेखनीय कामासाठी महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिला.

*****

आपले कोकण... मुंबईहून येणाऱ्या 'मनीऑर्डर'वर ज्या भूभागाचे अर्थकारण चालते ते कोकण. निसर्गाने भरभरून देऊनही त्याचा आपल्या चरितार्थासाठी सर्वार्थाने योग्य उपयोग करू न शकलेले कोकण. 1989 सालची गोष्ट. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघस्वयंसेवकांनी जिल्ह्याचे सर्वेक्षण केले. जन्मशताब्दी वर्षांत सेवा प्रकल्प सुरू करायचा होता. पण काय? आणि कसे? हे याचा अंदाज घेण्यासाठी हे सर्वेक्षण. त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. अनेक वाडयावस्त्यामध्ये तरुण व्यक्तीच नव्हती. सारे मुंबई-ठाण्याला गेलेले. म्हाताऱ्या माणसांनी गाव राखावा आणि तरुणांनी स्थलांतरित व्हावे, ही विदारक स्थिती बदलायची असेल तर काहीतरी केले पाहिजे, तरुणांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यांचे स्थलांतर थांबले पाहिजे हा पूरक उद्देश आणि निसर्गाने जे भरभरून दिले आहे त्याचा उपयोग करत रोजगारनिर्मितीला चालना देत विकासाची पावले वाडयापाडयात पोहोचवण्याचे स्वप्न. 1991पासून माणगाव येथे डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प सुरू झाला. जे सर्वेक्षण केले होते, त्यांच्या आधाराने प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि आज जवळजवळ आठ हजार तरुणांना प्रशिक्षण देऊन संस्थेने जिल्ह्यात उद्योजकीय वातावरण निर्माण केले आहे.


 

कोणत्याही यशस्वी प्रयोगाची सुरुवात ही अगदी छोटया गोष्टीतून होते. त्याचप्रमाणे तळकोकणात विपुल प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या काजू, आंबा, कोकम यांच्यावर प्रक्रिया केली तर स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, हे प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांच्या ध्यानात आले आणि मग सुरुवात झाली. बांद्याचे काजू व्यापारी श्रीपाद काणेकर यांनी काजू प्रक्रियेची कल्पना मांडली. ते स्वत: काजू व्यापारी. त्यांचा काजू प्रक्रियेचा अभ्यास होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू पिकतो, पण त्यांच्यावर प्रक्रिया होत नाही. परप्रांतातील लोक काजू खरेदी करत. इथेच काजूवर प्रक्रिया केली तर चार पैसे जास्त मिळतील, हा त्यांचा कयास होता. तेव्हाचे जिल्हा कार्यवाह प्रा. अरविंद रानडे आणि उद्योजक दत्ताभाई बांदेकर यांनी ही कल्पना उचलून धरली आणि मग संघविचाराला अधिष्ठान मानून सुरू झाला एक प्रवास, जो स्थानिकांना स्वयंपूर्ण करण्याकडे जाणारा होता. निसर्गाने जे भरभरून दिले, त्याचा उपयोग करत स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देताना सन्मान देणारा, आर्थिक शोषण, लाचारी यापासून मुक्त करणारा हा प्रवास होता.

दिशा निश्चित झाली. संस्थेची नोंदणी झाली आणि कृषिविकासातून स्वयंपूर्णतेकडे जाणारा प्रकल्प आकाराला येऊ लागला. आज हा प्रकल्प सतरा एकर परिसरात विस्तारला आहे. गोशाळा, शेतीचे विविध प्रयोग आणि काजू व अन्य फळांवर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे प्रशिक्षण देणारे परिपूर्ण प्रशिक्षण केंद्र या परिसरात उभे आहे. प्रकल्पाला कृषिविकासातून गाव जागवायचा आणि जगवायचा होता, त्याचबरोबर ज्या तात्कालिक गरजा होत्या त्याही पूर्ण करायच्या होता. उदा., माणगाव खोऱ्यात शिक्षणाची सुविधा फारच अपुरी. हायस्कूल, महाविद्यालय यासाठी माणगाव हेच केंद्र. बारमाही रस्ते नव्हते. नदी, नाले ओलांडून पायी प्रवास करत माणगावला येणे अनेकांना इच्छा असूनही शक्य नव्हते. अशांसाठी विश्व हिंदू परिषद 1982 साली एक वसतिगृह चालवत होते. ते वसतिगृह 1990 साली प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले. प्रकल्पाचा एक आयाम म्हणून वसतिगृहाचे काम चालू झाले ते अगदी 2015पर्यंत. 2015पर्यंत रस्ते झाले. गावागावात शाळा सुरू झाल्या आणि हळूहळू वसतिगृहाची आवश्यकता संपली. प्रकल्पाने वसतिगृह बंद केलेआणि कृषिविकासातून परिवर्तन घडवून आणण्यावर आपले लक्ष पूर्णपणे केंद्रित केले.

1991 साली प्रत्यक्षात उद्योजकता प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. काजू प्रक्रिया या विषयातील पहिली बॅच सुरू झाली, तोवर काजू उद्योग हा पैसेवाल्यांचाच विषय आहे असा समज परिसरात होता. पण छोटया छोटया प्रयोगांतून सर्वसामान्य माणसाला काजू प्रक्रियेचे महत्त्व आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांचे दर्शन प्रकल्पाने घडवले. 1991 ते 2019 या काळात प्रकल्पातून 5500 व्यक्तींनी प्रशिक्षण घेतले. यामध्ये 15 ते 75 या वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी अशिक्षित ते पदवीधर अशा सर्व स्तरांतून, महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र, ओडिशा, नागालँड, मेघालय, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांतून प्रीशक्षणार्थी प्रकल्पात आले. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेले काही उद्योजक येथेच प्रशिक्षण घेऊन उद्योगात आले आणि आपल्या कर्तृत्वाने आणि प्रकल्पाच्या मार्गदर्शनाने यशस्वी झाले.


 

'झेपेल तसा प्रयत्न कर आणि मोठा हो. बँकेच्या मोठया कर्जात अडकून बसू नको, छोटी सुरुवात कर आणि टप्प्याटप्प्याने पुढे जा' हा प्रकल्पाने प्रत्येक प्रशिक्षणार्थीला संदेश दिला आणि केवळ संदेश देऊन न थांबता त्याच पध्दतीने आणि मार्गाने प्रशिक्षणार्थीची वाटचाल होते की नाही याचाही पाठपुरावा केला. 1992मध्ये फळप्रक्रिया केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. 1992 ते 2017 या काळात सुमारे 3000 व्यक्तींना या परिसरात असलेल्या आंबा, कोकम, जांभूळ, आवळा आदी फळांवरील विविध प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा ग्राामीण विकास यंत्रणा, पडीक जमीन विकास कार्यक्रम आदी शासकीय विभागांनीही त्यांच्या योजनातून प्रशिक्षणासाठी मदत केली आहे.. आज माणगाव परिसरात 150 फळप्रक्रिया उद्योग सुरू आहेत. त्यापैकी 120 उद्योजकांचे प्रशिक्षण प्रकल्पात झाले आहे.

*****

मळगावमधून आम्ही बाहेर पडलो आणि पुन्हा मुंबई-गोवा महामार्गाने कुडाळच्या दिशेने जाऊ लागलो. मळगावपासून सात-आठ किलोमीटर पुढे आलो आणि एकनाथने मोटरसायकल एका छोटया वाटेवर घेतली. ''आपण संतोष सामंतच्या युनिटमध्ये जाऊ.'' एकनाथ म्हणाला. दोन्ही बाजूला शेती आणि नारळीची झाडे असणाऱ्या छोटया वाटेने आम्ही पुढे जात राहिलो. शेवटी एका शेडजवळ थांबलो. आजूबाजूला शेती आणि मधोमध पत्र्याची शेड. दरवाजा उघडून आम्ही आत गेलो. आत सहा-सात महिला मोदक बनवत होत्या. प्रकल्प या वर्षी गणेशोत्सवानिमित्त आंबा मोदक, काजू मोदक मोठया प्रमाणात तयार करत होत्या. संतोष सामंत यांचे युनिट काजू प्रक्रिया करणारे, पण त्याला जोडून असे छोटे मोठे उद्योगही तेथे होतात. प्रकल्प जे सुचवले ते करायचे हा सामंतांचा शिरस्ता. काजू आणि आंबा मोदक ही कोकणाची वैशिष्टये जपणारी आणि देश-विदेशात सिंधुदुर्गाचे नाव गाजवणारी उत्पादने. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोदक तयार करून विविध शहरांत पाठवण्यासाठी जवळजवळ 60 युनिट्स काम करत होती. प्रकल्पात ही बाकीची उत्पादने थांबवून मोदक बनवण्यावरच भर दिला होता. पण फक्त प्रकल्पात मोदक बनवून आवश्यकता पूर्ण होणार नव्हती, त्यामुळे वेगवेगळया युनिट्समध्ये हे काम वाटून दिले होते. मोदक बनवणाऱ्या महिला स्वच्छ गणवेशात होत्या. एखाद्या लघुउद्योगाने आपल्या उत्पादनाची निर्मिती करताना जी काळजी घेतली पाहिजे, जे नियम पाळले पाहिजेत ते सर्व या छोटया युनिटमध्ये पाहायला मिळत होते.

 

या युनिटमध्ये हंगामानुसार काम चालते - उदा., मोदक बनवणे, काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया. ज्या वेळी जो हंगाम चालू असेल तो उद्योग करायचा. बहुतेक सर्वच महिला उत्तमरीत्या प्रशिक्षण घेतलेल्या दिसत होत्या. मोदकाच्या पॅकिंगचा आणि रॅपिंगचा वेगळा विभाग दिसत होता. तेथे बनवलेले काजू मोदक खाल्ले. ''किती दिवस टिकतील हे मोदक?'' मी विचारले. एकनाथ काही बोलणार त्या आधीच एक महिला म्हणाली, ''चाळीस-पन्नास दिवस चांगले राहतील. अजिबात खराब होणार नाहीत.'' मी जेव्हा त्या युनिटमध्ये होतो. तेव्हापासून गणेशोत्सव केवळ पंधरा दिवसांवर होता आणि मुंबईला मोदक पाठवण्याचा आजचा शेवटचा लॉट होता. आपल्या कामाबद्दल एवढया आत्मविश्वासाने ती महिला बोलली. अर्थात, हे एका दिवसात शक्य झालेले नाही. अनेक वर्षांपासून डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाने जे या मातीत पेरले, ते आता आत्मविश्वास आणि विकासाची दृष्टी ठेवून उगवले आहेत.

माणगाव, सिंधुदुर्ग, कुडाळ परिसरात अशा छोटया छोटया युनिट्सना काम देऊन प्रकल्प उत्पादन तयार करून घेतो. मार्केटिंगची जबाबदारी प्रकल्पाची. या सर्वच युनिट्समधून एकाच दर्जाचे उत्पादन तयार होईल आणि सर्व मानांकने राखली जातील याची काळजी घेतली जाते. आम्ही पुन्हा गोवा-मुंबई हायवेवर आलो आणि एकनाथने कुडाळच्या दिशेने मोटरसायकल वळवली. नुकताच पाऊस येऊन गेला होता. संध्याकाळ झालेली. अशा वेळी आम्ही तुफान वेगाने बिबवणेच्या दिशेने निघालो. मध्येच कोकण रेल्वेचा पूल ओलांडून आम्ही एका छोटया चढणीला लागलो. ''या गावात एक प्रशिक्षिणार्थी आहे. त्याचे स्वत:चे युनिट सुरू केले आहे.'' एकनाथ म्हणाला. तोपर्यंत आम्ही गिरोबा फूड्सच्या दारात पोहोचलो होतो. एकनाथला पाहताच युनिटमधील काम करणारी पोरे पुढे आली आणि एकनाथशी गप्पा मारू लागली. एका बैठया घरात युनिट उभे करताना आवश्यक ते फेरफार करून घेतले होते. आधुनिक यंत्रसामग्री आणि स्वच्छता पाहताना उद्योजकीय प्रेरणा इथल्या जगण्याच्या अग्रभागी स्थिर झाल्याचे लक्षात येत होते. एवढयात शैलेश राऊळ आले. हेच या गिरोबा फूड्सचे मालक. बावीस-तेवीस वर्षांचा तरुण. प्रकल्पात प्रशिक्षण घेतले आणि दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या हिमतीवर उद्योग सुरू केला. एक एक पायरी चढत परिपूर्ण युनिट निर्माण केले. जॅम, आंबा पल्प, कोकम सरबत, काजू प्रक्रिया अशी वेगवेगळे आयाम त्यांच्या उद्योगाला जोडले गेले. स्वत:चा उद्योग अल्पावधीत स्थिरस्थावर करणारे शैलेश राऊळ बिबवणेचे पोलीस पाटील म्हणूनही काम करतात.

''मी आज आहे तो प्रकल्पामुळे. डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पात मी प्रशिक्षण घेतले. प्रकल्पाने मार्गदर्शन केले म्हणूनच हा उद्योग उभा करू शकलो. माझ्या जीवनात प्रकल्प आला नसता तर कदाचित माझे जीवन वेगळे असते.'' शैलेश राऊळ बोलत होते. कोकम सरबत, आंबावडी, आवळा ज्यूस अशी विविध उत्पादने घेणारे शैलेश राऊळ भावुक होऊन बोलत होते. शैलेश राऊळांनी मागच्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वत:चा उद्योग सुरू केला आणि स्वत:बरोबर गावाच्या विकासाचा ध्यास घेतला. अर्थात ही प्रेरणा त्यांना मिळाली प्रकल्पाकडूनच. प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे असंख्य शैलेश उभे राहिले आहेत, ज्यांनी स्वत:च्या विकासाबरोबरच गावाच्या विकासाची स्वप्ने आपल्या उराशी कवटाळली आहेत.

*****

संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील उकिडवे सांगत होते, ''आम्ही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देताना सातत्याने अभ्यासक्रमातील बदल करत राहिलो. आम्ही बदलत्या काळाप्रमाणे बदलते तंत्रज्ञान शिकवले. अन्न तंत्रज्ञान शिकविताना आम्ही एमएसस्सी फूड टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेला प्रशिक्षक नियुक्त केला. नाबार्डबरोबर आम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटचा विषय हाताळला. इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) समवेत संशोधनात सहभागी होत आम्ही फळप्रक्रियेला अधिक अद्यावत करण्याचा प्रयत्न केला. काजूच्या बोंडूपासून काय तयार करता येईल याचे संशोधन चालू आहे. कोकण कृषी विद्यापीठ, आयसीटी मुंबईचा अन्नप्रक्रिया विभाग यांच्याशी आम्ही आमचे केंद्र संलग्न ठेवले. मुंबईतील डॉक्टरेट, एमएस्सी करणारे तरुण दर वर्षी आमच्याकडे संशोधनासाठी येतात. आंब्याचा पल्प, त्यापासून विविध पदार्थ, कोकम सिरप, विविध प्रकारचे सिरप ही प्रशिक्षणे आणि निर्मिती तर या केंद्रात होतेच, तसेच आरटीएस नावाच्या नव्या तंत्रज्ञानात रेडी टू सर्व्ह कोकम सरबत आम्ही विकसित केले. सिरप तयार करणे आणि साठवणे सोपे असते. त्यातील साखरेमुळे ते दीर्घकाळ टिकते. पण साखरेचे प्रमाण कमी होऊन पाण्याचे प्रमाण वाढू लागले की ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी काही खास प्रक्रिया कराव्या लागतात. आम्ही ती सुविधा आणली.''

प्रकल्पात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रारंभिक आधार देण्याची जबाबदारी प्रकल्प उचलतो. येथे प्रशिक्षण घेणारी व्यक्ती जेव्हा उद्योगात उतरते, तेव्हा त्याला लगेच ऑर्डर कोण देणार? त्यांनी निर्माण केलेले पदार्थ खरेदी कोण करणार? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रकल्पाने 'सिंधुदुर्ग जिल्हा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित माणगाव'ची निर्मिती केली. प्रकल्पात प्रशिक्षण घेतलेल्या उद्योजकांच्या मालाचे मार्केटिंग करणे आणि आवश्यक तो कच्चा माल पुरवणे असे काम या संस्थेच्या पुढाकाराने केले जाते. आतापर्यंत सुमारे 25 उद्योजकांना स्थिर करण्यात या संस्थेची मदत झाली. नवा उद्योग उभा करण्यास मदत करणे, उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, उद्योग विस्तारासाठी बँकेचे अर्थसाहाय्य मिळवून देणे अशी असंख्य कामे प्रकल्पाच्या माध्यमातून केली जातात. एकदा का उद्योग स्वयंपूर्ण झाला, की त्याचा आधार हळूहळू काढून घेतला जातो.

प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ उद्योजक उभे करण्याचा, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न होत नाही, तर प्रकल्पात स्वत:ची अशी काही उत्पादने आहेत आणि त्यांना खास अशी बाजारपेठही आहे. फळांचा पल्प, कोकम सिरप आणि सरबत आदी पदार्थ प्रकल्पाच्या माध्यमातून बाजारात आणलेले आहेत. मुंबईतील 'रुक्मिणी फूड इंडेक्स' नावाच्या कंपनीशी संस्थेने करार केलेला असून त्यातून विक्रीचे जाळे उभारले आहे. या वर्षी प्रकल्पात तब्बल 3 लाख लीटर कोकम सरबत तयार झाले आणि तेवढेच बाजारात विकले गेले. याशिवाय हजारो किलो आंबा पल्प व अन्य फळांचे गर बाजारात आले. कैरीचे पन्हे, आवळा सिरप, लेमन जिंजर सरबत अशी विविध उत्पादने तयार होतात. चार प्रकारची रेडी टू सर्व्ह सरबत येथे निर्माण होतात. आंबापोळी, फणसपोळी असे पारंपरिक पदार्थही येथून बाहेर पडतात. परदेशातील दोन ऑर्डर संस्थेने पूर्ण केल्या असून दोन कन्टेनर माल परदेशात पाठवला आहे. या प्रकल्पाची आर्थिक उलाढाल आता 4 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रशिक्षण आणि स्वत:ची उत्पादने विकसित करण्यासाठी संस्थेची स्वत:ची यंत्रणा आहे. अत्यावश्यक चाचण्या करता येऊ शकतील अशी मध्यम प्रकारची प्रयोगशाळा आहे. भविष्यात एसएसएआय च्या मानांकनानुसार अन्न पदार्थाची चाचणी करता येईल अशी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. पण सध्याची गरज भागेल एवढी यंत्रणा संस्थेकडे आहे.

तळकोकणाचा आत्मा म्हणजे शेती. शेती अत्याधुनिक झाली, नवे नवे प्रयोग केले, तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देत सातत्याने नवे नवे प्रयोग करण्याचा प्रयत्न डॉ. हेडगेवार स्मृती सेवा संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. आजवर शेतीपूरक उद्योग म्हणून ज्या गोष्टीचा कुणी विचार करत नव्हते, असे विषय घेऊन प्रकल्प नवे नवे प्रयोग करत आहे. 'शेती' हा मुख्य विषय आहे. ती फायद्याची व्हावी यासाठी समूहशेती हा विषय प्रकल्पाने लावून धरला आहे. गट शेतीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहेत आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. भविष्यात बागायत हा मोठा आर्थिक स्रोत राहू शकतो. त्यातून निश्चित उत्पन्नाची हमी देता येते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला पूरक नगदी पिकांची जोड मिळाली तर त्यातून आर्थिक स्थैर्य मिळू शकते. उसाची लागवड करून रसवंती आणि गुळाचे गुऱ्हाळाची निर्मिती, जरबेरा, लिली आदी फुलांची शेती यासारखे उपक्रम हाती घेतले गेले आहेत. प्रकल्पाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात बांबू लागवड केली जात आहे. या आणि अशा वेगवेगळया प्रयोगांतून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचा आणि स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे.

दीर्घकाळ उद्योजकीय प्रेरणा जागवत उद्योजक निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला काळाच्या पावलांची जाणीव झाली आहे आणि त्यातूनच भविष्याचा वेध घेत प्रकल्पाला नवे आयाम जोडण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे सांगतात, ''आम्ही नवीन उद्योजकांसाठी इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी इमारतीचे बांधकाम 2019च्या उत्तरार्धात पूर्ण होत आहे. नव्या उद्योजकांना मोठी गुंतवणूक शक्य नसते. विशेषत: जांभूळ वगैरेंसारख्या अल्पकाळ चालणाऱ्या फळांसाठी तर मोठी गुंतवणूक अशक्यच असते. अशा स्थितीत सरकारने गुंतवणूक करावी आणि उद्योजकांनी त्या यंत्राचे फक्त भाडे भरून आपल्या उत्पादनासाठी त्याचा वापर करावा, अशा प्रकारे आम्ही यंत्रणा उभारत आहोत. सरकारने पैसा गुंतवावा, आम्ही त्या यंत्राचा सांभाळ करावा आणि उद्योजकांनी त्याचा सशुल्क वापर करून आपली प्रगती साधावी असे त्यात अपेक्षित आहे. उच्चशिक्षित तरुणांनी शेतीत यावे आणि टिकावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून तेथे प्रकल्पात काही नवीन उपक्रम सुरू करण्याचा आमचा मानस आहे. काजू बोंडापासून इथेनॉल तयार करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करत आहोत. हा प्रयोग यशस्वी झाला तर शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम होईल.''

*****

अजूनही पाऊस पडत होता आणि आमची मोटरसायकलही चालली होती. लहान-मोठया टेकडया पार करत चढ-उतार पार करत नागमोडी वळणाच्या रस्त्याने आम्ही घावनळे नावाच्या गावात पोहोचलो. एकनाथने एका घरासमोर मोटरसायकल थांबवली. मोटारसायकलचा आवाज ऐकून एक मध्यमवर्गीय बाई बाहेर आली. ''स्वप्नील नाय हाय'' ''हो, तो प्रकल्पात आहे. माहीत हाय माका'' एकनाथ बोलला आणि आम्ही घरात गेलो. पाणी पिता पिता पाऊस, शेती अशा इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि एकनाथ मला घराच्या मागे असणाऱ्या गोठावजा शेडमध्ये घेऊन गेला. चार-पाच चार-पाच वेगवेगळी यंत्रे आणि सोललेल्या काजूच्या पाच-सहा गोणी तेथे पडल्या होत्या. आज युनिट बंद. कारण स्वप्निल प्रकल्पाच्या कामासाठी गेलेला. एक वर्षापूर्वी स्वप्निलने स्वत:चे युनिट सुरू केले. प्रकल्पाने यंत्रसामग्री दिली. प्रकल्पाकडून कच्चा माल मिळतो आणि तयार झालेला मालही प्रकल्पच खरेदी करतो. छोटया जागेत अत्यंत खुबीने रचना करून यंत्रसामग्री लावली होती. बाजूला काजूच्या सालीने भरलेले पोते पडले होते. ''या सालीचे काय करता?'' मी सहज विचारले. ''यांचे खत होते, गुराचे खाद्य होते. लय उपयोग आहे.'' स्वप्निलची आई सांगत होती. प्रत्येक गोष्टीचा उपयोग आणि त्यांच्याशी जोडलेले अर्थकारण आता सर्वांनाच कळू लागले होते आणि त्यामागे प्रकल्पाने केलेले अनमोल मार्गदर्शन होते. युनिट पाहिले, पण स्वप्नील भेटला नाही. ज्याला भेटायला इतक्या लांब आलो तोच भेटला नाही. मनाला थोडी चुटपुट लागली. आम्ही माणगावला परतलो. प्रकल्पात गेलो, तर तेथे स्वप्निलची गाठ पडली.

अठरा-एकोणीस वर्षांचा तरुण. एकनाथने त्यांची ओळख करून दिली आणि स्वप्नील बोलू लागला, ''प्रकल्पाच्या वसतिगृहात मी राहत असे. माणगावात शिक्षण घेऊन नंतर प्रकल्पात प्रशिक्षण घेतले आणि कॉलेज करता करता प्रकल्पात पार्ट टाईम नोकरी करू लागलो. खूप चांगला अनुभव होता तो. शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रकल्पात पूर्णवेळ नोकरी करण्याचा विचार करत होतो. पण प्रकल्पाने मला नोकरी देण्याऐवजी स्वत:चे युनिट सुरू करण्यास सांगितले. त्यासाठी मदत केली आणि यंत्रेसुध्दा दिली. आता माझे स्वत:चे छोटे युनिट असून त्यातून खूप चांगले उत्पन्न मला मिळाले. मी, माझी आई या युनिटमध्ये काम करतो. जेव्हा काम वाढते, तेव्हा गावातील काही व्यक्तींना मी कामावर बोलावतो. त्याचप्रमाणे जेव्हा प्रकल्पात कामाचे लोड असते, तेव्हा मी माझे युनिट बंद करून प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देतो. आजही मी युनिट बंद ठेवले, कारण प्रकल्पातून आज मोदकांचा शेवटचा लॉट जाणार आहे. त्यासाठी मी इकडे आहे.'' ''पण तुझे युनिट बंद असल्यामुळे नुकसान नाही का होणार?'' ''नाही. प्रकल्प त्याची काळजी घेतो. आज जे मी काही आहे ते प्रकल्पामुळेच. प्रकल्प माझ्या जीवनात आला नसता तर कदाचित मी माझा गाव, माझी माणसे सोडून मुंबईला पलायन केले असते. गावाचा, गावमातीचा संबंध तुटला असता. प्रकल्पामुळे मी आहे.'' स्वप्नील म्हणाला. असे हजारो स्वप्निल प्रकल्पाच्या आधाराने आपले आयुष्य घडवत आहेत. आपल्या गावात राहून स्वत:बरोबर गावाचा विकास करत आहेत.

*****

तर अशी ही डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाची विकासगंगा. स्थानिक माणसाला केंद्र मानून निसर्गाने जे भरभरून दिले, त्याचा पुरेपूर उपयोग करत नवनिर्माण करण्याचे काम. 'संघ संस्कार'ची शिदोरी आणि आधुनिकतेची अनावर ओढ यातून प्रकल्पात नित्यनूतन घडत गेले. 1989 साली प्रकल्पाच्या संस्थापक सदस्यांनी जो विचार केला, त्याला अधिक सशक्त करत नवी नवी परिमाणे जोडत माणूसकेंद्री चळवळ निर्माण करण्यात आणि त्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यात प्रकल्पाला यश आले आहे. स्थलांतर थांबले, आर्थिक सुबत्ता आली, जीवनमान सुधारले अशा एक ना अनेक अंगाने प्रकल्पाला यश लाभले. संघविचार आणि संघकाम हे व्यक्तिकेंद्री नसते. ते समूहाचा विचार करते आणि म्हणूनच प्रकल्पाच्या स्थापनेपासून अनेक संघस्वयंसेवक या प्रकल्पाच्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत राहिले. पण आपले वैयक्तिक मत, विचार आणि उपक्रम बाजूला ठेवून त्यांनी स्वत:ला प्रकल्पांशी जोडून घेतले. प्रकल्पाशी समरस झालेले कार्यकर्ते आणि त्यातून निर्माम होणारी सकारात्मक ऊर्जा यांचा ज्यांना अनुभव घ्यायचा असेल, त्यांनी माणगावच्या डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पांना नक्की भेट द्यावी. एखादी संस्था दीर्घकाळ एकाच विषयात कार्यरत राहिली की तिथे संस्थान व्हायला वेळ लागत नाही आणि स्वत:भोवतीचा परीघ घट्ट करून आपले विश्वही मर्यादित होत आहे याची त्यांना जाणीव होत नाही. डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प यांना अपवाद आहे. या प्रकल्पाने आपला परीघ काळानुरूप विस्तारत नेला. संस्थेला, प्रकल्पाला अत्याधुनिक करताना संघविचार सोडला नाही. त्याचबरोबर आधुनिकतेला, नवतेला नाही म्हटले नाही आणि यातच या प्रकल्पाच्या यशाचे गमक दडलेले आहे.

*****


डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प

मु.पो. माणगाव (तांबळवाडी), कुडाळ,

जिल्हा सिंधुदुर्ग - 416511

दूरध्वनी : 02362- 236258

dr.hedgewarprakalp@gmail.com