सेवाव्रती देवो भव

विवेक मराठी    30-Jan-2019
Total Views |

 स्वामी विवेकानंद यांनी 'दरिद्रनारायणा'ची सेवा करण्याचा संदेश दिला. विवेकानंदांचे वाचन केलेल्यांना तो पाठ असतो. डॉ. अशोक कुकडेंनी तो जगून दाखविला.

 

काही मोठया माणसांविषयी असे म्हटले जाते की 'दुरून डोंगर साजरे असतात'. त्यांच्या फार जवळ जाऊ नये. त्यांच्या फार जवळ गेले की, त्यांचे मातीचे पाय दिसायला लागतात आणि आपल्या मनातील त्यांच्या प्रतिभेला मोठे तडे जातात. पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे याला संपूर्णपणे अपवाद आहेत. मोठा माणूस कोण? तर तो ज्याच्या जवळ गेले असता त्याचे मोठेपण आपल्याला अजिबात जाणवत नाही, तो आपल्यातीलच एक वाटू लागतो.

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

भगवान श्रीकृष्णाविषयी हेच म्हटले, तर तो विश्वसंचालक, सर्व ब्रह्मांडाचा कर्ताधर्ता. परंतु यशोदेला तो आपला खटयाळ मुलगा वाटला. गाई चरायला घेऊन जाणाऱ्या सवंगडयाला तो आपला खेळगडी वाटला. गोपींना तो आपला सखा वाटला. भीष्म पितामहांना तो आपला तत्त्वज्ञ वाटला आणि अर्जुनाला आपला जवळचा मित्र वाटला. कुरुक्षेत्रावर जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाने आपले विश्वरूप दाखविले, तेव्हा स्तंभित झालेला अर्जुन म्हणाला, ''मी तुला जाणलेच नाही. माझा सखा, मित्र म्हणून बरोबरीने वागविले. त्याबद्दल मला क्षमा कर.'' मोठया माणसाचे मोठेपण त्याच्या लहानपणातच असते. डॉ. अशोकराव कुकडे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. माझ्या मते, त्यांचा हा त्यांच्या मोठेपणाचा सन्मान नसून त्यांच्या लहानपणाचा आहे. म्हटले तर डॉ. अशोकराव कुकडे वैद्यकीय क्षेत्रातील गोल्ड मेडालिस्ट आहेत. निष्णात सर्जन आहेत. वैद्यकीय चिकित्सेचे त्यांचे ज्ञान अफाट आहे. एवढया भांडवलावर ते स्वत:चे स्वतंत्र रुग्णालय थाटू शकत होते. आजच्या भाषेत ज्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालय म्हणतात, असे रुग्णालय ते उभे करू शकत होते. लक्ष्मीचा गंगाप्रवाह आपल्या घरी ते अक्षयपणे आणू शकत होते. परंतु त्यांनी यापैकी काहीही केले नाही.

काहीही केले नाही म्हणजे रुग्णालय सुरू केले नाही असे नाही. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे केले नाही असे नाही, हे सर्व त्यांनी केले. 1960 साली मागास असलेल्या लातूर नावाच्या छोटया शहरात, सामान्यातील सामान्य माणसाला - पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भाषेत सांगायचे तर 'शेवटच्या पंक्तीतील शेवटच्या माणसाला' आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग व्हावा, यासाठी ते लातूरला आले. शहर अनोखे, लोक फारसे परिचित नाहीत. साधने जवळजवळ काहीच नाहीत. परंतु त्यांच्यासारखी झपाटलेली आठ-दहा डॉक्टर मंडळी त्यांच्यासह लातूरला आली. अडचणींचे डोंगर त्यांनी पार केले आणि नंतर त्यांची 'कथा ध्येयसाधनेची' ही गाथा निर्माण झाली. ती पुस्तकरूपाने प्रसिध्द झाली. हा सर्व प्रवास थक्क करणारा आहे.


पुण्यातील सुखासीन जीवन सोडून लातूरला जाण्याचा निर्णय आणि लातूर हीच कर्मभूमी बनविण्याचा निर्णय संघप्रेरणेचा निर्णय आहे. डॉ. हेडगेवार सांगून गेले की, समग्र हिंदू समाज आपला समाज आहे. त्यांची सुखदु:खे ही माझी सुखदु:खे आहेत. त्याचे गुणदोष माझे आहेत. त्याला निरोगी करण्याचे काम मलाच करायचे आहे. हे संघाचे साधे सोपे तत्त्वज्ञान आहे. ते जगावे लागते. भाराभार पुस्तके लिहून आणि खंडीभर भाषणे करून त्याचा काहीही उपयोग नसतो. हे तत्त्वज्ञान आपल्या जगण्यात कसे जगायचे, याचा चालता बोलता आदर्श म्हणजे डॉ. अशोकराव कुकडे आहेत. 'विचारधन' या श्रीगुरुजींच्या पुस्तकात 'चालते बोलते आदर्श व्हा' या शीषर्काचे एक प्रकरण आहे. श्रीगुरुजी स्वतःच चालत्या बोलत्या आदर्शाचे परिपूर्ण रूप होते. त्यांचे शब्द मंत्राचे सामर्थ्य घेऊन येत. डॉक्टरांच्या मनावर आणि हृदयावर या प्रकारचा संस्कार केव्हा, कधी, कोठे झाला असेल हे मी काही सांगू शकत नाही; परंतु आपण सर्वांनी त्यांना या प्रकारे जीवन जगताना पाहिले आहे आणि अनुभवले आहे.

डॉ. अशोकरावांविषयी वाईट शब्द बोलणारा माणूस शोधून सापडणे कठीण आहे. तुकाराम महाराज सांगून गेले - 'नम्र झाला भूता, तेणे कोंडिले अनंता।' जो सर्व प्राणिमात्रांपुढे नम्र झालेला आहे, तो सदैव ईश्वराच्या सान्निध्यात असतो. देवांना आपल्याला तसे पाहता येत नाही, परंतु पूर्ण नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा करणारे देवरूपच असतात. म्हणून आपली संस्कृती आपल्याला सांगते की, 'मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव' - माता, पिता व आचार्य ही देवतास्वरूप रूपे आहेत. त्याच्यामध्ये 'सेवाव्रती देवो भव' ही जोड दिली पाहिजे. स्वामी विवेकानंद यांनी 'दरिद्रनारायणा'ची सेवा करण्याचा संदेश दिला. विवेकानंदांचे वाचन केलेल्यांना तो पाठ असतो. डॉ. अशोक कुकडेंनी तो जगून दाखविला.

त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवाभावाने सुरू केलेल्या रुग्णालयाचे नावही 'स्वामी विवेकानंद रुग्णालय' असे आहे. विवेकानंद रुग्णालय सुरू केले, ते खासगी मालकीचे नाही. ते आहे सार्वजनिक न्यासाच्या मालकीचे. या न्यासाचे सेवक म्हणून अशोकराव रुग्णालयात कार्यरत झाले. विवेकानंद लोकांना माहीत आहेत. त्यांच्या नावामुळे रुग्णालय उत्तम चालेल असा कोणताही विचार हे नाव देण्यामागे नाही. विवेकानंद रुग्णालय म्हणजे विवेकानंद जगण्याचे रुग्णालय. विवेकानंदांसारख्या थोर पुरुषांना ग्रंथाच्या रूपाने जसे जिवंत ठेवता येते, तसे त्यांचे विचार प्रत्यक्ष जगून जिवंत ठेवता येते. हा दुसरा मार्ग खडतर आहे. 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' निर्माण करणारा आहे. या मार्गावरून चालताना आपणच आपले मित्र आणि आपण आपले गुरू असतो. डॉ. अशोकराव कुकडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही वाट चालायला सुरुवात केली. आज या पाऊलवाटेचा विस्तीर्ण महामार्ग तयार झाला आहे. हजारो पावले डॉ. अशोकरावांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करत आहेत.


 

या खडतर वाटेवरील त्यांची जीवनसाथी डॉ. ज्योत्स्ना यांचे योगदान असेच अजोड आहे. आपल्या संस्कृतीने आपल्यापुढे अर्धनारीनटेश्वराची प्रतिमा ठेवली आहे. ही प्रतिमा हे सांगते की, मनुष्यजीवन म्हणजे स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व यांचे समसमान मिश्रण आहे. एकाशिवाय दुसऱ्याला अस्तित्व नाही आणि दुसऱ्याशिवाय पहिल्याला सृष्टिचक्रात स्थान नाही. डॉ. अशोकराव आणि डॉ. ज्योत्स्नाताई म्हणजे हे अर्धनारीनटेश्वराचे जिवंत रूप आहे.

डॉ. अशोकरावांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला हे जेव्हा मला समजले, तेव्हा आनंदाची लाट माझ्या मनात निर्माण झाली. प्रामाणिकपणे सांगायचे, तर असा आनंद यापूर्वी माझ्या मनात कधी प्रकटल्याचे मला स्मरत नाही. ही माझ्या एकटयाची अवस्था नाही. अशोकरावांच्या संपर्कात जे जे आले आहेत, ते या आनंदाच्या डोहात न्हाऊन निघाले आहेत. हा निर्मळ आणि सात्त्वि आनंद डॉ. कुकडे आपल्या जीवनयज्ञातून निर्माण करू शकले आहेत. त्यांचे अभिनंदन करावे एवढा माझा अधिकार नाही. मी या आनंदातच न्हाऊ इच्छितो.

vivekedit@gmail.com