रूपकुंड सफरनामा - 3

विवेक मराठी    14-Jan-2019
Total Views |

 

 

रूपकुंड सफरनामामधील हा शेवटचा टप्पा. हा टप्पा भगुवाबासा ते रूपकुंड-जुनारगली असा असणार आहे. भगुवाबासा ते रूपकुंड सफरयात्रेतील रोमांचकारक प्रवास आपल्याला या लेखात अनुभवायला मिळणार आहे.


भगुवाबासा ते रूपकुंड-जुनारगली (5029 मी. / 16,499 फूट) 12 कि.मी. अन परत पथार नाचाणी.

भगुवाबासाहून आपल्याला जायचंय रूपकुंडपर्यंत. त्यासाठी पहाटे किंवा त्याही आधी उठून निघायची तयारी करावी लागते. भगुवाबासापासून रूपकुंडपर्यंत साधारण 2-3 तास लागतात. हळूहळू चढत जाणारा रस्ता अन त्यातही याचा शेवटचा भाग अगदी तीव्र चढाईचा.

आधीच्या भागात लिहिलंय त्याप्रमाणे भगुवाबासाला रात्रीचं तापमान शून्याच्याही खाली घसरतं अन हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी पडते. त्यासाठी विशेष काळजी घ्यावी.

हा मार्ग भगुवाबासाच्या वरून चढत जातो. चिरियांग नावाच्या एका ठिकाणापर्यंत पायऱ्यांसदृश जागा, जिथून रूपकुंडपर्यंत हा रस्ता चढायला लागतो. कडाक्याची थंडी, सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही अन सभोवती भव्य हिमालयीन शिखरांचा घोळका. कमी प्रकाशात हे अंतर चालावं लागतं. समुद्रसपाटीपासूनची उंची, विरळ होत जाणारी हवा व थंडी यामुळे AMSची शक्यता असते. त्यातही ऑॅक्सिजन कमी मिळाल्यामुळे मेंदूचं कार्य बाधित होण्याचीही शक्यता. Hallucinations हा सगळयात मोठा धोका. तर यासाठी सर्व ती काळजी घेऊनच चालायचंय.

लवकर निघून आपण फार ऊन होण्याच्या आत रूपकुंडला पोहोचावं, या हिशोबाने निघण्याची तयारी हवी. भगुवाबासा ते रूपकुंड हे अंतर 3.5 कि.मी. इतकं आहे. सुरुवातीचे 3 कि.मी. त्यातल्या त्यात बरे. कमी चढ-उतार असलेले. नंतरचा अर्धा कि.मी. हा टोकापर्यंतचा, तीव्र चढण असणारा, छोटे दगड व वाळूतून जाणारा. या मार्गाची रुंदी एका माणसाला आपले पाय ठेवता येतील इतकीच.

भगुवाबासापासून चालायला सुरुवात केल्यानंतर काही वेळा आपल्याला भरल्स - म्हणजे हिमालयीन ब्ल्यू शीप्स (एक प्रकारची हरणं) दिसतात.

शेवटचा अर्धा कि.मी. हा जीवघेणा. ऑॅक्सिजनची पातळी कमी होत गेलेली. श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, तसंच दगडांमधून जाणारा रस्ता अन जोरदार, थंड वारे, जे आपल्या चालण्यात अडथळा बनू शकतात.

रूपकुंडाच्या जवळ पोहोचल्यावर आपल्याला दिसतं ते माता नंदादेवीचं छोटंसं मंदिर, अगदी उत्तराखंडीय वैशिष्टयाचं. फरशांनी बांधलेलं.

नंदादेवीची पूजा करून, तिचे आशीर्वाद घेऊन रूपकुंडाकडे वाटचाल सुरू झाली.

रूपकुंड तळं संपूर्णपणे गोठलेलं होतं. 16,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असणारं हे तळं 2-3 मी. खोल आहे. या तळयाला पाणी पुरवणारा एकही झरा, ग्लेशिअर दिसून येत नाही, जे इतर सर्व तळयांच्या बाबतीत आपण बघतो.. हे एक आश्चर्यच.

सर्व बाजूंनी पर्वत शिखरांनी वेढलेलं हे रूपकुंड.

रूपकुंड... कैलासाला जाण्यापूर्वीचं नंदादेवीचं विश्रांतीचं ठिकाण. नंदादेवी आपल्या माहेराहून कैलासाला प्रवास करत असताना तिला खूप तहान लागली. तिची तहान भागवण्यासाठी महादेवांनी त्रिशूल जमिनीत खुपसून निर्माण केलेलं सुंदर, अलौकिक तळं.

नंदादेवीने महादेवांना ''या तळयाचं नाव काय ठेवावं?'' हे विचारल्यावर महादेव म्हणाले की ''देवीने या तळयात वाकून पाणी पिताना पाण्यात स्वत:चं रूप बघितलं, त्यामुळे याचं नाव रूपकुंड.''


नंदाजात म्हणजे नंदादेवीची यात्रा. 'जात म्हणजे देवयात्रा'. लोकांची दृढ धारणा आहे की नंदादेवी भाद्रपद कृष्ण पक्षात आपल्या माहेरी येते व अष्टमीला माहेराहून तिची पाठवणी केली जाते. नंदाजात ही चमोली जिल्ह्यातल्या कर्णप्रयाग तहसीलमध्ये असलेल्या नौटी गांवातल्या नंदादेवी मंदिरापासून सुरू होऊन 280 कि.मी. पायी यात्रा करून हिमालयाच्या पर्वतशिखरांमध्ये असणाऱ्या होमकुंड या ठिकाणी पूजा करून पुन्हा नौटीला येऊन संपूर्ण होते. ही यात्रा दर बारा वर्षांनी होते.

रूपकुंडाला 'सांगाडयांचं तळं' म्हटलं जातं. सर्वात पहिल्यांदा 1942 साली एका वनरक्षक अधिकाऱ्याला या ठिकाणी शेकडो सांगाडे आढळले. त्यानंतर अनेक संशोधनं, तपासण्या अन नंतर कार्बन डेटिंगने त्यांचं अचूक वय ओळखलं गेलं. साधारण 600-1000 वर्षांपूर्वीचे 500-600 मानवी सांगाडे अस्तित्वात आहेत. त्यांचे आकारही सामान्य मनुष्याच्या आकारापेक्षा मोठे.

संशोधनाअंती हे सिध्द झालंय की डोक्यावर प्रचंड मोठा आघात झाल्यामुळे सर्वांचा मृत्यू झाला, जो खूप मोठया प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे असावा.

कथा अशी की, कन्नौजचा राजा यशधवल, सैन्य व परिवारासह कैलास यात्रेला जात असताना देवीच्या कोपामुळे रूपकुंडाजवळ हिमवर्षावात दबले गेले.

आणखी एका कथेनुसार महाराष्ट्रातल्या कोकण प्रांतातले 200 यात्रेकरू नंदादेवी राजजातला जात असताना एका हिमप्रपातात बळी पडले. 2004मध्ये नॅशनल जिओग्राफिकने केलेल्या संशोधनात असं आढळून आलंय की, या सांगाडयांच्या डीएनएचा नमुना कोकणातल्या चित्पावन लोकांच्या डीएनएशी मिळताजुळता अन त्यांनी प्रसिध्द केलेल्या 'Riddles of the Dead' या एका सिरीजमध्ये त्यांनी हे उत्तम प्रकारे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे.

बर्फ वितळल्यावर हे सांगाडे, अवशेष पाण्याबाहेर दिसायला लागतात. अनेक रहस्यं याभोवती गुंफली गेली आहेत. उल्कावर्षाव, प्रचंड मोठे हिमाघात, भूस्खलन, सेना जी वाट चुकली, व्यापारी, ट्रेकर्स यापैकी कोणीही यातल्या कोणत्यातरी आघातामुळे मृत्युमुखी पडले असावेत. काही हाडांना चिकटलेलं मांस स्पष्ट दिसतं. अत्यंत थंड तापमानामुळे कुजण्याची प्रक्रिया होत नाही.

रूपकुंड बघण्याचा अनुभव एकदम अलौकिक असा!

नंदादेवी राजजात ही रूपकुंडाहून पुढे होमकुंडपर्यंत जाते, ती जुनारगलीहून.

जुनारगली हे रूपकुंडापासून 500 फूट उंच आहे. सर्वांनाच जुनारगलीपर्यंत जाणं शक्य होत नाही. जीवघेणा रस्ता, उंचसखल वळणं व चढ. त्रिशूल, नंदाघुंगटी आणि चण्याकोट या शिखरांनी रूपकुंड वेढलेलं.

जुनारगली अरुंद असं स्थान. अगदी सुरीच्या धारेसारखं. त्यावरून पाय घसरला की रूपकुंडातल्या हाडांमध्ये आपल्या हाडांची भर पडेल, असं धोकादायक.

जुनारगलीच्या एका बाजूला शिलासमुद्र ग्लेशिअर, राँटी सॅडल व दुसऱ्या बाजूला रूपकुंड व अनेक पर्वतशिखरं. एक पाऊल चुकलं की कपाळमोक्षच.

रूपकुंडावरून परत पथार नाचाणी. मग अली बुग्याल, बेदिनी बुग्याल व वान असा परतीचा प्रवास करून आपण परत येतो.

pourohitamita62@gmail.com