सदर : निमित्तमात्र
एका साडीच्या खरेदीनेही आनंदित झालेली आजी आणि साडयांनी भरलेल्या कपाटासमोर उभं राहून 'कोणती साडी नेसू?' अशी प्रश्नचिन्हांकित मी. मनाजोगी साडीची निवड हा विषय अनेकांना क्षुल्लक वाटावा. आहेही. मात्र त्याला लागणारा 'माझी निवड, माझी पसंती' हा अदृश्य 'टॅग' मला महत्त्वाचा वाटतो. बाईचं कुटुंबातलं स्थान या विषयात आजही स्थिती पूर्णपणे बदलली आहे असं छातीठोकपणे नाही म्हणता यायचं. केवळ विचार करायचं स्वातंत्र्य देऊन भागत नाही, ते विचार मोकळेपणे मांडण्याचं, त्यानुसार कृती करण्याचं स्वातंत्र्यही द्यावं लागतं.
परत कधी जेव्हा माझ्यासाठी साडी आणायला जाशील ना, तेव्हा मीही येईन बरोबर. अगं, स्वत:साठी साडी आणायला गेलेच नाही कधी...'' मी भेट दिलेल्या साडीवरून मायेने हात फिरवत आजीने जेव्हा अगदी सहज ही इच्छा बोलून दाखवली, तेव्हा मी चकित झाले. हा प्रसंग घडला, तेव्हा ती नव्वदीच्या उंबऱ्याशी पोहोचली होती. 'म्हणजे इतक्या वर्षांत एकदाही हिने स्वत:च्या पसंतीची साडी घेतलेली नाही?' मनात उमटलेल्या या प्रश्नामागचं वास्तव मला झेपलंच नाही. तिने माझ्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नाचं प्रतिबिंब वाचलं. म्हणाली, ''अगं, आमच्या वेळचं कुटुंब म्हणजे पंचवीस जणांचं खटलं. तेव्हा कापडखरेदी व्हायची ती वर्षातून एकदा, तीही सर्वांची एकाच वेळी - दिवाळीला. आमच्या आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषाने आणलेला - त्याच्या पसंतीचा साडीचा एक जोड घरातल्या प्रत्येकीला मिळे. आणि नवे कपडे घालून, नटूनथटून मिरवायला वेळ होता कोणाकडे? एवढया मोठया घरात पहाटेपासून कामाला सुरुवात करायची ती रात्री अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत... आजूबाजूला सगळया आमच्यासारख्याच. त्यामुळे त्यात कधी काही चुकीचंही वाटलं नाही बघ. आधी त्यांनी त्यांच्या पसंतीच्या साडया आणल्या. त्यांच्यानंतर मुलांनी-लेकींनी-सुनांनी वेगवेगळया कारणांच्या निमित्ताने साडया घ्यायला सुरुवात केली. जिथे वर्षातून दोन साडयांपलीकडे झेप जात नव्हती, तिथे न मागता एकदम सात-आठ साडया वर्षाला मिळायला लागल्या. चोवीस तास घरात असलेल्या बाईला या खूपच झाल्या गं! त्यामुळे नंतर खरेदी करण्याची ऐपत आली, तरी तशी वेळ आलीच नाही. स्वत:च्या पसंतीची साडी खरेदी करणं राहूनच गेलं ते गेलंच.''
जराही तक्रारीचा सूर न लावता अगदी सहजपणे ती बोलत होती. साधीसुधी, सहज पुरी होण्यासारखी तिची ही इच्छा कोणत्याही कारणाने का असेना, राहून गेली याची बोच जरी नसली तरी ती काळजात अगदी जपून ठेवली होती तिने.
मी तिची नात... अगदी हातरुमालाच्या खरेदीवरही स्वत:च्या पसंतीची मोहोर उमटली पाहिजे असं मत आणि तशी कृती असणाऱ्या पिढीची प्रतिनिधी. त्यामुळे आपल्या आजीने आयुष्यात एकदाही स्वत:साठी दुकानात जाऊन साडी खरेदी केली नाही, हे सत्य मला बोचलंच. म्हणूनच नंतरच्या खेपेस साडी खरेदीसाठी तिला आवर्जून बरोबर घेऊन गेले.
त्या वेळी ती मनातून हरखली होती. मात्र ते हरखून जाणंही तिच्या स्वभावाला साजेसं, अगदी कळेल न कळेल असं चेहऱ्यावर उमटलं होतं. दुकानदाराने समोर मांडलेल्या साडयांच्या ढिगातल्या एकेका साडीवर ती कौतुकाने हात फिरवत होती. या ढिगातून तिने स्वत:साठी पांढऱ्या रंगावर हलक्या निळया रंगाचं नाजूक डिझाइन असलेली मऊसर सुती नऊवारी साडी निवडली. तिच्या पसंतीची, तिने दुकानात जाऊन आणलेली ती पहिली साडी.
निर्व्याज आनंद देणारी तिची ही इवलीशी इच्छा मला पूर्ण करता आली, याचं मलाही समाधान लाभलं.
पूर्वीच्या मध्यमवर्गाच्या तुलनेत आज हातात आलेला पैसा, छोटी झालेली कुटुंबं आणि खरेदीची वाढलेली हौस या सगळयाचा परिणाम घरातल्या कपाटांवर झाला आहे. कुठे वर्षाला दोन साडया मिळण्याचा तो काळ आणि कुठे आजचा बहुतेकींच्या कपाटाला आलेला महापूर. मीही याला आजपर्यंत तरी अपवाद नाही.
एका साडीच्या खरेदीनेही आनंदित झालेली आजी आणि साडयांनी भरलेल्या कपाटासमोर उभं राहून 'कोणती साडी नेसू?' अशी प्रश्नचिन्हांकित मी.
अर्थात प्रश्न साडीची निवड या विषयापुरता मर्यादित नव्हताच आणि नाहीही. सरधोपट कापडखरेदीच्या मागे घरांमध्ये येणारा तुटपुंजा पैसा हे महत्त्वाचं कारण असलं, तरी त्या काळी एकुणातच बाईचं मत विचारात घेण्याच्या बाबतीत उदासीनतेचं प्रमाण खूप होतं. काही सन्माननीय अपवाद असले तरी माझ्या आजीच्या पिढीतल्या अनेकींच्या वाटयाला आलेलं दुय्यम स्थान नाकारता येण्याजोगं नाही.
मनाजोगी साडीची निवड हा विषय अनेकांना क्षुल्लक वाटावा. आहेही. मात्र त्याला लागणारा 'माझी निवड, माझी पसंती' हा अदृश्य 'टॅग' मला महत्त्वाचा वाटतो. बाईचं कुटुंबातलं स्थान या विषयात आजही स्थिती पूर्णपणे बदलली आहे असं छातीठोकपणे नाही म्हणता यायचं. एकुणातच सामाजिक बदलाची गती संथ, स्त्रीविषयक विचारांची तर कूर्मगती म्हणावी इतकी संथ. आपल्या घरात वा आपल्या आजूबाजूला कदाचित पटकन सापडणार नाहीत, पण आजही अशी अनेक उदाहरणं देता येतील, जिथे महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत घरातल्या बाईचं/मुलीचं मत आजही विचारात घेतलं जात नाही. विचारलं गेलंच, तरी ते दुय्यम महत्त्वाचं असतं. किंवा ते केवळ पुष्टयर्थ असू शकतं.
जे विषय थेट तिच्या आयुष्याशी निगडित असतात, उदा., शिक्षण कोणत्या विद्याशाखेतलं घ्यायचं याबाबतचा निर्णय असो किंवा करिअरची निवड असो की जीवनसाथीची निवड असो... अशा विषयांसंदर्भात आजही अनेक घरांमधून मुलीच्या/बाईच्या मताला गृहीत धरलं जातं. केवळ विचार करायचं स्वातंत्र्य देऊन भागत नाही, ते विचार मोकळेपणे मांडण्याचं, त्यानुसार कृती करण्याचं स्वातंत्र्यही द्यावं लागतं.
यावरून एक घटना आठवली. गोष्ट फार जुनी नाही. जेमतेम 4 वर्षांपूर्वीची. मुलीसाठी स्थळ शोधणं चालू होतं. मॅट्रिमोनियल साइट्सवरून मुलीने आणि आम्ही स्थळांची निवड केली की, संबंधित व्यक्तींशी संपर्क साधण्याची जबाबदारी माझी असे. अनेकदा समोरून बोलणारे मुलाचे वडीलच असत. त्यातल्या काहींना मुलीची आई का बोलते आहे असा प्रश्न पडे. ते त्यांच्या बोलण्यातूनही माझ्या लक्षात येई. एकदोघांनी तर मुलीच्या वडलांना फोन करायला सांगा, असंही मला आडून सुचवलं होतं.
एका स्थळाच्या बाबतीत तर किस्साच झाला... पहिले 3-4 जे फोन झाले ते मी आणि मुलाची आई असेच झाले. त्यांच्या मालकीची कंपनी होती. मुलगा आणि वडील मिळून ती चालवत असत. आई गृहिणी होती. 3-4 वेळा आमचं बोलणं झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम निश्चित करावा असं मला वाटलं. तसं मी त्या बाईंना सुचवलं. त्यावर त्या काही सेकंद शांत राहिल्या, आणि नंतर थोडं दबलेल्या सुरात मला म्हणाल्या...''मी काय म्हणते, आपण दोघीच बोलतो आहोत एकमेकींशी. पुरुषमाणसांना बोलून घेऊ दे का एकदा?''
प्रश्न थोडा अनपेक्षित आणि गंमतीचा वाटला. त्याचा रोख पटकन लक्षात न आल्याने मी म्हटलं, ''आपण भेटू, तेव्हा ते दोघं बोलतीलच की. भेटीची तारीख त्यांच्या सोयीने ठरवू, म्हणजे झालं.''
त्या जे सुचवू पाहत होत्या, ते मला 'बाउन्सर' गेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तत्परतेने त्या म्हणाल्या, ''तसं नव्हे हो. आपण बायाबायाच बोलतो आहोत कधीच्या. एकदा घरातल्या पुरुषमाणसांनाही फोनवर बोलू दे. मग तेच ठरवतील पुढे भेटायचं की कसं ते.''
मी तोवर कधी असा विचार केला नसल्याने मला हे खटकलं. या विषयात आपल्याला न समजण्यासारखं काय आहे, ही तर आपल्या समजशक्तीविषयीच थेट शंका आहे, असं मनात आलं. प्रत्यक्ष न भेटलेल्या त्या समोरच्या बाईविषयी मनात कणव निर्माण झाली आणि तिच्या बोटचेपेपणाबद्दल काहीशी चीडही. मी शांत स्वरांत त्यांना म्हटलं, ''अहो, जन्मापासून सगळी जबाबदारी घेऊन मुलांना वाढवतो आपण. त्यांचं मायेने करतो. दुखलंखुपलं पाहतो. मग लग्न करताना आपल्याला त्यांचं भलंबुरं कळणार नाही का? तुम्ही काय किंवा मी काय, आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करूनच पुढे जाऊ ना? आणि घरातल्या सर्वांचा विचारही आपण घेऊच की. त्यासाठी कधी भेटायचं इतकं तर आपण दोघी ठरवू शकतो ना?''
तिला पटलं असावं माझं. पण तसं वागण्याची मुभा आणि सवयही नसावी. दुखऱ्या आवाजात पलीकडून उत्तर आलं, '' तुमचं पटतंय हो मला... पण एकदा पुरुष बोलले एकमेकांशी तर बरं होईल. तुम्ही मुलीच्या वडलांना एकदा फोन करायला सांगा ना..''
तिच्या स्वरातली अजिजी टोचली मनाला. याहून जास्त 'ग्यान' देऊन उपयोग नाही, हेही लक्षात आलं. आणि एका सुशिक्षित, उच्चभ्रू घरात राहणाऱ्या बाईच्या मर्यादाही प्रकर्षाने जाणवल्या.
हे उदाहरण सार्वत्रिक नाही याची कल्पना आहे. आजच्या युगात तसं ते असूही नये हीच अपेक्षा आहे. पण काहींच्या बाबतीत हे आजही वास्तव आहे, ही बाबही अस्वस्थ करणारी आहे.
नुसती पदव्यांची आरास व्यक्तीला निर्णयस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य देत नाही. ते स्वातंत्र्य प्राप्त होतं अनुकूल सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीतून. कोणतहंी स्वातंत्र्य दान म्हणून पदरात पडत नाही, हेदेखील मान्यच. पण ते दर वेळी झगडूनच मिळायला हवं असाही नियम नाही. ते माणूस म्हणून सहजपणे उपलब्ध व्हायला हवं. तशी 'इकोसिस्टिम' तयार करायला हवी. त्यातून जे स्वातंत्र्य लाभतं, ते जबाबदारीचं भानही देतं आणि कर्तव्याची जाणही.
अश्विनी मयेकर
9594961865