मराठवाडयातील पाण्याची कमाई

विवेक मराठी    24-Sep-2018
Total Views |

दुष्काळ म्हटले की मराठवाडा डोळयासमोर येतो. या विभागात कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. तीच लोकांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. आतबट्टयाची शेती, शेतकरी आत्महत्या,  दुष्काळ हे विषयदेखील ऐरणीवर आहेत. मराठवाडयातील शेती आणि शेतकरी आत्महत्येचे प्रश्न सोडवायचे असेल, तर सिंचन क्षेत्राची तूट भरून काढावी लागणार आहे. जायकवाडी धरण वगळता कोणतेही मोठे धरण या भागात नाही. असे असले, तरी इच्छा असेल तर मार्ग दिसतोच... अशीच पाण्याची कमाई करणाऱ्या गावांची कहाणी जालना व संभाजीनगर या जिल्ह्यात घडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जलगतिविधी समितीच्या प्रेरणेने लोकसहभागातून नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे काम यशस्वी करण्यात आले आहे.

 कोणतीही योजना यशस्वी करायची असेल, तर त्यास चळवळीचे रूप प्राप्त झाले पाहिजे. घनसांगवी तालुक्यातील खापरदेव हिवरा, सिंदखेड आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तीन गावांतील गावकऱ्यांनी जलसंधारणाच्या कामाला चळवळीचे रूप आणले. त्यामुळेच या गावांत जलक्रांती घडून आली आहे. तिन्ही गावांतील दुष्काळ संपण्याच्या मार्गावर आहे. जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने जे कार्य केले आहे ते कौतुकास्पद आहेच, शिवाय या कामाला गती मिळण्यासाठी लोकचळवळीची गरज होती. ही गरज या तिन्हींही गावांनी पूर्ण केली आहे.

केल्याने होत आहे..

मराठवाडयात पाण्याचे सतत दुर्भिक्ष असते. उन्हाळयात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ग्रामविकास विभाग व जलगतिविधी कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य हाती घेतले आहे. या कामाचे फलित म्हणजे खापरदेव हिवरा, सिंदखेड व विटा या गावांत झालेल्या नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम होय.

या कामाची पार्श्वभूमी सांगताना संघाचे प्रांत कार्यवाह विलास दहिभाते म्हणाले, ''घनसांगवी तालुक्यात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे भूजल पातळी खालावली होती. दुष्काळपण, खालावलेली जमीन पाहून शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाला होता. 'शिरपूर पॅटर्न'च्या धर्तीवर घनसांगवी तालुक्यात जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत असे वाटू लागले. समविचारी मित्रांना माझे मत सांगितले. सगळयांना पटले. शिरपूर पॅटर्न पाहण्यासाठी घनसांगवी तालुक्यातून आम्ही दहा जण गेलो होतो. सर्वांना जलसंधारणाची ती आदर्श पध्दत आवडली. शासनाच्या मदतीविना अशा स्वरूपाचे काम दहिगव्हाण गावात सुरू करण्याचा निश्चय केला. गावकऱ्यांची दोन-तीन वेळा बैठक घेतली. सरकारच्या मदतीशिवाय हे काम कसे यशस्वी होईल? असे गावकऱ्यांनी विचारले. सरकारवर विसंबून न राहता लोकांनी लोकांसाठी कामे केली तर त्याचे चांगले फळ मिळते यावरच आमचा विश्वास होता. सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन लोकसहभागातून नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास सुरुवात केली. काही लोकांनी तर पळसाची फुले विकून नाल्याच्या कामात खारीचा वाटा उचलला. दहिगव्हाणच्या कामाला गती मिळाली होती. गावकऱ्यांत उत्साह संचारला होता. सगळयांना पाण्याचे महत्त्व कळले होते. या काळात खापरदेव हिवरा, सिंदखेड शिवारात मी तीन चार वेळा फिरलो होतो. या गावाची स्थिती ही दहिगव्हाणसारखी होती. ना येथे मोठा तलाव आहे, ना धरण. गावाच्या वरच्या बाजूला छोटी भैरवी नदी आहे. गावाला नदीचा कुठलाच फायदा होत नाही. लांब ओढा हिच तिचे रूप आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यातच भैरवी नदी कोरडी पडते. सिंदखेड व खापरदेव हिवरा गावातील नाल्यातील पाणी पावसाळयात वाहून जात होते. नाल्याचा आकारही कमी होत चालला होता. त्यामुळे हिवाळयातच पाणी आटायचे. नाल्यातील पाणी साठवण क्षमता वाढायची असेल, तर नाला रुंदीकरण व खोलीकरणाशिवाय पर्याय नव्हता. संबंधित गावातील तळमळीच्या शेतकऱ्यांना हे सर्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. संघाने हा विषय आपल्या अजेंडयावर घेतला. ग्रामविकास देवगिरी प्रांतप्रमुख विनय कानडे, जलगतिविधी प्रमुख दत्तात्रेय मोहिते आदींच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व जलगतिविधी अंतर्गत आठ जणांची समिती स्थापन करण्यात आली. या आठ जणांवर विविध गावांची जबाबदारी सोपविण्यात आली. माझ्यावर खापरदेव हिवरा व सिंदखेड या दोन गावांचे दायित्व सोपविण्यात आले. घनसांगवी तालुक्यात सर्वाधिक लोकवर्गणी खापरदेव हिवरा गावात जमा झाली. या गावातील कामाचे शासनस्तरावर कौतुक करण्यात आले. नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला संघाने योग्य दिशा दिल्यामुळेच खापरदेव हिवरा, सिंदखेड व विटा गावात परिवर्तनाचे नवे क्षिातिज दिसू लागले आहे.''

पाण्यासाठी भ्रमंती करणाऱ्या या गावांची आता जलसमृध्दीकडे वाटचाल होत आहे. 'गाव करी ते राव न करी' या म्हणीची प्रचिती आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून पाण्यासाठी काम करण्याची दिशा मिळाली. हरिश्चंद्र बापू मते, महादेवराव मते, रामभाऊ कबाडे, उध्दवबापू नाईकवाडे, जलमंगल जाधव, नारायण देवकते, किसन राऊत यांच्या माध्यमातून हे कार्य तडीस नेले.

आदर्शवत आचारसंहिता

पाण्याची कमाई करण्यासाठी राजकीय व्यक्तींना थेट हस्तक्षेप करता येऊ नये, यासाठी तिन्ही गावांनी अलिखित आचारसंहिता तयार करून तिचे पालन केले. पाण्याची आस असलेल्या या गावांना स्वार्थी राजकारण मंजूर नाही. पाणी प्रश्नाकडे कोणत्याही पक्षीय अथवा राजकीय भूमिकेतून न पाहता सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळयाचा प्रश्न म्हणून पाहावे, लोकांनी लोकांसाठी सुरू केलेले हे काम असल्यामुळे राजकीय नेत्यांनी यामध्ये कुठेही आडकाठी न आणता गावाच्या पाण्यासाठी झटणे, काम सुरू असताना पारदर्शक व्यवहाराचे काटेकोरपणे पालन करणे. 'पाणी' या विषयाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची व संस्थाची मदत घेणे व त्यांच्या अनुभवाने कामास गती देणे अशी आदर्शवत आचारसंहिता गावकऱ्यांनी अंगीकारली.

स्वयंसेवी संघटनांचा सहभाग

दुष्काळप्रवण भागातील गावांत समाजसेवी संघटनांनी या कामास हातभार लावला आहे. यामध्ये समस्त महाजन, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, संभाजीनगर या संस्थांनी सहभाग घेतला. गावकऱ्यांच्या सहकार्याने व सल्ल्याने जलसंधारणाचे काम तडीस नेले. विशेष म्हणजे जलगतिविधी समितीने केलेल्या प्रचंड आणि व्यापक स्वरूपाच्या कामामुळे मराठवाडयात अत्यंत चांगले, उत्साहवर्धक परिणाम दिसू लागले आहेत. स्थानिक पातळीवर सर्व लोकांनी एकत्रित प्रयत्न केले तर पाणी टंचाईवर मात करता येईल, असा जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

हिवरावासीयांचे पाण्यासाठी भगीरथ प्रयत्न

सतत दुष्काळाशी सामना करणाऱ्या घनसांगवी तालुक्यातील खापरदेव हिवरा गावातील गावकऱ्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी भगीरथ प्रयत्न केले आहेत. लोकसहभागातून सुमारे चार किलोमीटर नाला खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात शिक्षणाचे प्रमाण 60 टक्के आहे. ऊस आणि कापूस ही प्रमुख पिके आहेत. संघाचे प्रांत सहकार्यवाह विलास दहिभाते यांनी या गावाशी सतत संपर्क ठेवल्यामुळे नाला रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामाला गती मिळाली. बापूराव रोडे, भीमराव रोडे, प्रकाश परदेशी, राधाकिसन परदेशी, राकेश परदेशी, महारुद्र रोडे, दीपक परदेशी, त्र्यंबक येवले, अर्जुन परदेशी, सर्जेराव रोडे, रामसिंग परदेशी, श्रीराम रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीस युवकांची समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी बापूराव रोडे यांची निवड करण्यात आली. प्रथम लोकसहभागातून काम करण्यास ग्रामस्थांनी निरुत्साह दाखवला. बापूराव रोडे यांनी कोणत्याही परिस्थितीत गावात जलसंधारणाची कामे झाली पाहिजेत यासाठी चंग बांधला. या कामासाठी त्यांना गावातील तरुणांनी पाठिंबा दिला. दोन-तीन वेळा ग्रामस्थांना एकत्र बोलावून बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर गावकऱ्यांच्या मनात हळूहळू चित्र बदलू लागले. एका शेतकऱ्याकडून प्रतिएकरी चारशे रुपयेप्रमाणे निधी जमा करण्यात आला. लोकवर्गणीतून तब्बल 10 लाख रुपये जमा झाले. गावकऱ्यांचा उत्साह पाहून शासकीय अधिकारी अचंबित झाले. जालना जिल्ह्यात सर्वाधिक लोकवाटा खापरदेव हिवरा गावाने उचलला, याचा आवूर्जन उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.

दहा ते पंधरा फूट रुंद असलेल्या नाल्याचे पात्र रुंदीकरण व खोलीकरण केल्यामुळे आता या नाल्याची रुंदी साठ ते सत्तर फूट झाली आहे. 2017च्या पहिल्या पावसात नाल्यातील पाणी वाहून गेले. त्यामुळे मोठया प्रमाणात गाळ साचला होता. पुन्हा लोकांनी लोकवर्गणी गोळा करून कामाला गती दिली. बंधाऱ्यासाठी शासनाकडे अनेक वेळा चकरा मारूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. तहसीलदार कैलास अंडील यांनी पाहणी केली. त्यानंतर शासनाकडून दोन बंधारे बांधण्यात आले. पहिल्या वर्षी अर्ध्या किलोमीटरपर्यंत पाणीसाठा झाला होता.

सिंदखेडच्या जिद्दी तरुणाईचा जलसहभाग

गावाला विकासाच्या दिशेने नेण्याची इच्छा असूनही काही सुजाण तरुणांना काही करता येत नाही. गावातील राजकारणामुळे तरुणांना बळ मिळत नसते. पण हा बदल घडून दाखविला आहे घनसांगवी तालुक्यातील विटा या छोटयाशा गावातील जिद्दी तरुणांनी. तरुणाईच्या बळावर गावात जलक्रांती कशी घडवून आणता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. साधारण अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. कापूस, सोयाबीन, तूर ही प्रमुख पिके आहेत. दिगंबर आदुडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. ज्ञानेश्वर आधुडे, भरत मुळे, पद्माकर आधुडे आणि गजानन आधुडे या तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे दीड लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करण्यात आली. अगोदर लोकवर्गणी जमा करताना अडथळे निर्माण होत असत. 21 जानेवारी 2017 रोजी नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामास प्रारंभ झाला. 4 लाख रुपये खर्चात 4 किलोमीटरपर्यंत नाल्याचे काम करण्यात आले. नाल्याच्या पात्रात पूर्वी कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची कामे झालेली होती आणि त्या बंधाऱ्याचे दरवाजे काही शेतकऱ्यांनीच पळविले होते. पावसाळयात पाणी वाहून जाऊ नये, यासाठी बंधाऱ्यास दरवाजे असणे आवश्यक होते. ज्या शेतकऱ्यांकडे बंधाऱ्याचे दरवाजे आहेत याचा शोध समितीने घेतला. सुदैवाने बंधाऱ्यांचे सर्व दरवाजे मिळाले. हे दरवाजे पुन्हा बसविताना तरुणांनी मोठी मेहनत घेतली. दरवाजे बसविण्यात आल्याने पहिल्याच वर्षी 1 कोटी पेक्षा जास्त पाणीसाठा नाल्यात जमा झाला. नाल्यातील पाणी पाहून नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सुजाण तरुण एकत्र आल्यानंतर गावात सकारात्मक बदल कसे होऊ शकतात, हे सिंदखेडवासीयांनी दाखवून दिले आहे. या बदलाचा परिणाम आजूबाजूच्या गावातील तरुणांवर झाला आहे.


पाण्याचे पुनर्भरण, जीवनाचे संवर्धन 

विटा गावात संदीप भोजणे यांची 21 एकर शेती आहे. हे मोठे क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी भराडे कुटुंबीय जिवाचे रान करत आहेत. शेतात कूपनालिका, विहीर असूनही पाण्याचा एक थेंबही निघू शकला नाही. नाल्याच्या बाजूला 91 फूट विहीर खोदली. हिवाळयातच विहिरीतले पाणी आटायचे. बागायती पिके घेणे कठीण. 91 फूट विहीर खोदून काय फायदा? असे वाटू लागले. नाला खोलीकरणातून विहिरींचे पुनर्भरण केल्याने पाणीपातळी वाढली आहे. या विहिरीतून शेततळयात पाण्याची साठवण होत आहे. विहीर पुनर्भरण केल्यामुळे खूप आनंद झाला आहे. विहिरीतील पाण्याचा अंदाज घेऊन ठिबकद्वारे कांदा लागवड करणार असल्याचे शेतकरी संदीप भोजणे यांनी सांगितले.

 

विटा गावाची टँकरमुक्त दिशेने वाटचाल

कन्नड व वैजापूर या दोन तालुक्यांच्या सीमेवर विटा हे 3 हजार लोकसंख्येचे गाव आहे. कापूस आणि मका ही मुख्य पिके आहेत. टँकरच्या पाण्यावर अवलंबून असणारे गाव म्हणून विटयाची ओळख होती. या गावात पाऊस कमी झाला की ग्रामपंचायतीची विंधन विहीर, नदी, नाले कोरडे पडलेले असत. डिसेंबर महिन्यातच गावाला टँकरने पाणीपुरवठा होत असे. जलगतिविधी समितीचे सर्जेराव वाघ, संघ प्रचारक रवींद्र कुलकर्णी हे गावाच्या पाणी समस्येविषयी जाणून होते. संदीप भोजणे, दीपक खरात, विलास भोजणे, बाळू निकम, सचिन शिंदे, अवधूत भोजणे, माधव भोजणे, रामराव बागूल, संदीप शिंदे, रघुनाथ भोजणे यांच्या आधिपत्याखाली ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. गावाला टँकरमुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून 4 लाख 84 हजार रुपये निधी गोळा केला. 11 लाख 30 हजार रुपयांच्या एकूण खर्चात 12 नाल्यांना एकत्र करून तीन किलोमीटर लांबीच्या नाल्याचे काम करण्यात आले. हे काम पूर्ण करण्यासाठी 41 दिवस मशीन चालू होते. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, संभाजीनगर व एलआयसी हाउसिंग फायनान्स, मुंबई यांची लाखमोलाची साथ मिळाली.

पूर्वी विटा गावाचा जलयुक्त शिवार योजनेत सहभाग होता. पण काही लोकांनी योजनेला विरोध केल्यामुळे काम झाले नाही. गावाला दिवसेंदिवस पाण्याची समस्या अधिक जाणवत गेली.

नवी आशा नवी दिशा

 खापरदेव हिवरा, सिंदखेड आणि विटा ही तीन गावे दुष्काळी तालुक्यातली आहेत. इथला बहुसंख्य शेतकरी हा वर्षानुवषर्े खरीप पिकांवर अवंलबून आहे. पर्जन्यमान कमी होत चालल्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेणे अवघड आहे. पावसाचा प्रत्येक थेंब साठविला तरच शेती करणे सोपे जाणार आहे, हे लक्षात घेऊन नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम यशस्वी करण्यात आले. विशेष म्हणजे एकाच नाल्यावर साखळी पध्दतीने बंधारे बांधल्यामुळे गाळ येण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पाण्याची साठवण होणार आहे. पहिल्या पावसात साठलेल्या पाण्यामुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली होती. बऱ्याच विहिरींना व कूपनलिकांना जानेवारी-फेबु्रवारी महिन्यापर्यंत पाणी राहिले.

''खापरदेव हिवरा येथील नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण केल्यामुळे शेतकऱ्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. नाल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 2017च्या पहिल्या पावसात अर्ध्या किलोमीटरपर्यंत पाणी साचले होते. भविष्यात मोठा पाऊस होऊन संपूर्ण नाल्यात पाणीसाठा झाला, तर हिवरासह बाचेगाव, पिंपळगाव, भारडी, भाळेगाव या शिवारात भूजल पातळीत वाढ होईल'' असे खापरदेव हिवरा जलसमितीचे अध्यक्ष बापूराव रोडे यांनी सांगितले.

''माझी चार एकर शेती असून ऊस, मोसंबी, भाजीपाला अशी पिके घेतो. 2016च्या उन्हाळयात माझ्या विहिरीतले पाणी कमी झाले होते. नाला खोलीकरणाचे काम झाल्यामुळे 2017 सालचा उन्हाळा सुरू होईपर्यंत विहिरीतले झरे जिवंत होते. नाल्यात मोठया प्रमाणात पाणी साठवण झाल्यास आणखीन पिके घेण्याची संधी निर्माण होणार आहे,'' असा आशावाद खापरदेव हिवरा येथील शेतकरी दत्तू गणपती येवले यांनी व्यक्त केला.

''सिंदखेड गावात नाला खोलीकरणाचे काम करणे अवघड होते. काही राजकीय व्यक्तींनी या कामाला खो देण्याचा प्रयत्न केला. पण गावाविषयी तळमळ असणाऱ्या युवकांनी साथ दिल्यामुळे चार किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरणाचे काम उभे राहिले. हे काम गावातील बुजुर्ग लोकांना आवडलेच, शिवाय आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी कामाचे कौतुक केले. पहिल्या पावसात दोन किलोमीटरपर्यंत नाल्यात पाणी साठले. त्यामुळे नाल्याच्या बाजूंना शेती असलेल्या काही शेतकऱ्यांनी कांदा व भाजीपाल्याची लागवड केली. या पाण्यामुळे पीकपध्दतीत बदल झाला आहे.'' असे सिंदखेड ग्रामसमितीचे अध्यक्ष दिगंबर आधुडे यांनी सांगितले.

''विटा हे दुष्काळी गाव म्हणून प्रसिध्द आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात गावात भीषण पाणीटंचाई जाणवत होती. शिवारात कोणत्याच कूपनलिकांना वा विहिरींना पाणी नसायचे. त्यामुळे नागरिकांना सांडपाणी व पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर अवंलबून राहावे लागत असे. नाला खोलीकरणाचे काम केल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. समाधानकारक पाऊस झाल्यास विटा गाव टँकरमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही'' असा विश्वास दीपक खरात यांनी व्यक्त केला.

नाला खोलीकरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पाण्याची कमाई करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लागणारे कष्ट, पाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, लोकसहभाग या सर्व कष्टाचा विचार करून पाण्याची कमाई झाल्यामुळे ग्रामस्थांना नवे क्षितिज दिसू लागले आहे.

पाण्याचे व्यवस्थापन

केवळ पाण्याची कमाई करून काम संपले असे नाही, तर आहे ते पाणी कसे टिकेल, जमिनीत कसे झिरपेल यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. वाहून जाणारे पाणी अडवून त्यावर ठिकठिकाणी बधारे बांधून साठवणक्षमता वाढवण्याची शक्कल तिन्ही गावांच्या ग्रामस्थांनी लढविली आहे. बंधाऱ्यातील पाणीगळतीचा शोध घेणे, पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेणे अशा विविध गोष्टी आत्मसात करून पाणी व्यवस्थापनाचे वृत्त अंगीकारले आहे.

राज्यातील कृषिक्षेत्रावर विविध संकटांचे ढग असले, तरी मराठवाडयातील या तीन गावांनी दिलासादायक असे कार्य घडवून आणले आहे. गावकऱ्यांच्या एकीतून पाण्याची कमाई कशी होते याचे ज्वलंत उदाहरण उभे केले आहे. इतर गावांनी या गावांचे अनुकरण केल्यास पाण्याच्या समस्येतून महाराष्ट्राची निश्चितच सुटका होईल.