लाहोर हे पाकिस्तानमधील महत्त्वाचे शहर. या शहरात भारतीय संस्कृतीच्या अनेक पाउलखुणा सापडतात. वाल्मिकींचे प्राचीन मंदिर लाहोरमध्ये आजही अस्तित्वात आहे. हे शहर पाकिस्तमानमध्ये असले तरी भारतीय लोकांचे पदस्पर्श या शहराला लागले आहेत.
सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/
भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणांवरून जाणारी यात्रा. आजचे तीर्थस्थळ आहे रघुकुलतिलक श्रीरामपुत्र लवने वसवलेली नगरी - लवपुरी. आजच्या पाकिस्तानमधील लाहोर नगरी. रामाशी नाते जोडणाऱ्या या नगरीत अनेक मंदिरे होती. त्यापैकी एक प्राचीन मंदिर होते लव आणि कुश यांच्या गुरूंचे - म्हणजेच वाल्मिकींचे!
रामाची अजरामर कथा लिहिणाऱ्या आदिकवींचे, वाल्मिकींचे मंदिर लाहोरमध्ये आजही आहे. या मंदिरात रोज वाल्मिकींची पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेला वाल्मिकी जयंती साजरी केली जाते आणि दिवाळीसुध्दा याच मंदिरात साजरी केली जाते.
1992मध्ये अयोध्येतील बाबरी ढांचा पाडल्यावर, पाकिस्तानमधील शेकडो हिंदू मंदिरांवर हल्ला केला गेला. त्यापैकी एक वाल्मिकी मंदिर होते. आता अर्ध्या मंदिराचा ताबा ETPBने (Evacuee Trust Property Board Z{) घेतला आहे. फाळणीच्या वेळी जे पाकिस्तान सोडून गेले, त्यांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणारी सरकारी संस्था. ही संस्था आता या मंदिराकडून भाडे आकारण्याच्या तयारीत आहे!
लाहोरमध्ये कृष्णाचे एक जुने मंदिर आहे. फाळणीच्या आधी, लवाचे एक 'लोह मंदिर' होते, जे आता अनेक वर्षे बंद आहे. रामाचे मंदिर होते, आर्य समाजचे मंदिर होते, शीतलादेवीचे व इतर अनेक मंदिरे होती. अनेक गुरुद्वारा व जैन मंदिरेसुध्दा होती. त्यापैकी आज अगदी मोजकीच टिकून आहेत.
लवाने बांधलेल्या या नगरीवर अगदी अलीकडे राज्य केले ते महाराजा रणजीत सिंगने. मुघल राज्य कमकुवत झाल्यानंतर रणजीत सिंगांनी आपले राज्य वाढवले आणि लाहोर येथे राजधानी स्थापन केली. रणजीत सिंग यांच्या मृत्यूनंतर, 1850च्या दरम्यान ब्रिटिशांनी लाहोरचा ताबा घेतला.
1857नंतर अनेकांनी लाहोरला घडवले. त्यापैकी एक होते - राजा दयाल सिंग. या अनाथ बालकाने कष्टाने शिक्षण घेऊन स्वत:ला घडवले. पुढे त्यांनी ब्राह्मो समाजाचे आणि अमृतसरच्या सुवर्ण मंदिराचे ट्रस्टी म्हणून काम केले. पंजाब नॅशनल बँकची स्थापना करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांनी लाहोरची पहिली लायब्ररी, लाहोरचे पहिले वर्तमानपत्र - The Tribune आणि दयाल सिंग कॉलेज यांची स्थापना केली. राहत्या हवेलीसकट त्यांनी आपली सर्व संपत्ती या कॉलेजला दान दिली.
लाहोरचा आणखी एक सुपुत्र म्हणजे लाला लाजपत राय. भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणारे लाला लाजपत राय कुणाला माहीत नाहीत? लाहोरमध्ये त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ गुलाबदेवी चेस्ट हॉस्पिटल सुरू केले होते. आज पाकिस्तानमधील सर्वात मोठया हॉस्पिटल्सपैकी हे एक आहे. लाहोरमध्ये त्यांनी 'लक्ष्मी इमारत' बांधली होती. या इमारतीत त्यांनी इन्श्युरन्सचे ऑॅफिस सुरू केले होते, जे नंतर LICमध्ये विलीन केले गेले. या इमारतीवर लक्ष्मीची एक मोठी मूर्ती होती. फाळणी होताच ही मूर्ती तोडण्यात आली. आता त्या इमारतीवर मधल्या रिकाम्या पोकळीच्या दोन बाजूंना अभिषेक करणारे दोन हत्ती मात्र दिसतात. 1928मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या लाठी हल्ल्यात लालांचा मृत्यू झाल्यावर, त्यांचा एक पूर्णाकृती पुतळा लाहोरमध्ये उभारला होता. फाळणीनंतर लालांचा पुतळा सिमला येथे हलवावा लागला.
लाहोरचे पिता म्हणून ज्यांना ओळखले जाते, ते होते सर गंगाराम. त्यांनी लाहोरला उभे केलेले गंगाराम हॉस्पिटल आजही लाहोरवासीयांची शुश्रुषा करत आहे. लाहोरमधील अनेक इमारती - लाहोर म्युझियम, लाहोर पोस्ट ऑॅफिस, Aitchison कॉलेज इमारत, Womens College या आणि इतर अनेक इमारतींची रचना सर गंगाराम यांनी केली होती. लाहोरवर जिवापाड प्रेम आणि सढळ हातांनी केलेले दान, यामुळे त्यांना Father Of Lahore म्हटले जात होते. लाहोरमध्ये एक महाराजा रणजीत सिंगची समाधी आहे आणि एक सर गंगाराम यांची.
लाहोर खरे तर भारतातच असावयाचे. पण फाळणीदरम्यान, पाकिस्तानकडे कराची सोडल्यास एकही मोठे शहर नाही, म्हणून पाकिस्तानला दिले गेले. फाळणी होताच, ज्या गावामध्ये लक्ष्मीची मूर्ती तोडण्यात आली, सर गंगाराम यांच्या पुतळयाची मोडतोड करण्यात आली, लालांचा पुतळा जिथून हलवावा लागला, त्या गावातील हिंदू आणि शीख लोकांचे काय झाले असेल ते विचारांच्या पलीकडे आहे.
लाहोरच्या पुत्रांमध्ये समावेश आहे लक्ष्मी नारायण यांचा. स्वामी विवेकानंदांबरोबर 1893मध्ये शिकागोच्या World Parliament of Religionला लाहोरचे एक वकील लक्ष्मी नारायणसुध्दा गेले होते. त्यांनी या सभेत ब्राह्मो समाजाचे (की कायस्थांचे?) प्रतिनिधित्व केले होते.
विवेकानंदांबरोबरचा त्यांचा फोटो पाहताना राहून राहून जाणवते की, आज लाहोरच्या फोटोंमध्ये ना भव्य मंदिरे आहेत, ना उच्च हुद्दयावर असलेला एखादा शीख नागरिक आहे, ना दानशूर श्रीमंत हिंदू आहे. 1947च्या आधी लाहोरमधील हिंदू-शीख लोकसख्ंया जवळजवळ 40% होती. आज ती 1%पेक्षा कमी आहे. लाहोरने स्वत:च्या भूतकाळाशी संबंध तोडायचा कितीही प्रयत्न केला, तरी तो पुसता येईल का?