राजयोगी

विवेक मराठी    29-Aug-2018
Total Views |

अटलबिहारी वाजपेयी हे प्रभावी वक्ते, लोकनेते, राजकारणी असले तरी या पलीकडे जाऊन कवी म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. आपल्या व्यग्र वेळापत्रकातूनही त्यांनी आपला कविता करण्याचा छंद नेहमीच जोपासला. एखाद्या प्रचारसभेतील, संसदेतील भाषणात कविता सादर करून ते सर्वांनाच मंत्रमुग्ध करीत असत. त्या कवितांमध्ये भावस्पर्शी शब्दांबरोबरच दूरदृष्टी असायची, तर कधी विरोधकांना एखादी टपलीही असायची. अटलजींच्या अशाच काही कवितांचे विश्लेषण करणारा लेख...  

 स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय राजकारणाच्या सरोवराचे हळूहळू दलदलीत रूपांतर होत असताना त्यात एक अलौकिक कमळ फुलत होतं! त्याला होत्या बहुरंगी व्यक्तित्वाच्या पाकळया, हिंदुत्वनिष्ठेचं पक्कं देठ, राष्ट्रप्रेमाचे केसर नि हृदयातून येणारा प्रेमाचा, आशावादाचा सुगंध अन बाजूला होती मोहाचा, स्वार्थाचा स्पर्शही न होणारी मूल्यांची पद्मपत्रं!

तो कर्में र्करी सकळें। परी कर्मबंधा नाकळे। जैसें न सिंपे जळीं जळें। पद्मपत्र॥

या ज्ञानेश्वर माउलींच्या ओवीचं मूर्त उदाहरण असलेले, राजकारणी - नव्हे, 'राजयोगी' म्हणजे अटलजी!

या कमळाच्या एक एक गुणमंडित पाकळया म्हणजे जणू दैवी गुणसंपदेचं मूर्त रूप!

अटलजी म्हणजे आत्मविश्वास.

अटलजी म्हणजे अविचल निष्ठा. 

अटलजी म्हणजे अजातशत्रू.

अटलजी म्हणजे अजेय योध्दा. 

अटलजी म्हणजे अमृत वक्ता.

अटलजी म्हणजे अकलंक.          

अटलजी म्हणजे ओजस्विता.

अटलजी म्हणजे अस्मिता.

अटलजी म्हणजे औदार्य.

अटलजी म्हणजे आदर्श व्यवहार.

अटलजी म्हणजे आशावाद.

अटलजी म्हणजे अतिकोमल कविमन आणि अटलजी म्हणजे अतिप्रखर आत्मभान!

वडील कृष्णबिहारी यांच्याकडून मिळालेल्या कवित्वाच्या दुर्लभ देणगीला ते फारसा न्याय देऊ  शकले नाहीत, याची खंत त्यांना होतीच.

''राजकारणाने माझ्या काव्यसरितेला अवरुध्द केलं, पण तरीही मी खरं तर कवितेतच जगत असतो, कविताच मला नितळ राजकारणाची प्रेरणा देते'' असं ते म्हणत. राजकारणातील ओढाताणीने जेव्हा जेव्हा निराशा येई, तेव्हा तेव्हा त्यांनी कवितेचाच आश्रय घेतला.

खरं तर राजकारणात कवी, लेखक, साहित्यिक गेले तरच राजकारण सुसंस्कृत होईल; किंवा राजकारणी जर कला, साहित्य, संगीत याच्या संपर्कात राहिले, तर त्यांच्यातील मानव्य सुकणार नाही, अशी त्यांची धारणा होती! एखादा कवी हुकूमशहा जरी बनला, तरी तो निष्पापांच्या रक्ताने आपले हात रंगू देणार नाही असं वाटण्याइतका कवितेमुळे जाग्या राहणाऱ्या मानवी भावनांवर त्यांचा विश्वास होता.

हिरोशिमाच्या नरसंहाराच्या आठवणीनेदेखील ते व्याकूळ होतात अन विचारतात - एका क्षणात लाखो जीव ज्यांच्यामुळे गेले, त्या शास्त्रज्ञांना त्या रात्री झोप लागली असेल? त्यांना 'आपलं चुकलं' अशी जाणीव क्षणभर तरी झाली असेल का? पुढे त्याही माणसाच्या पराधीनतेच्या मर्यादा जाणून ते म्हणतात की

अगर यदि हुई, तो वक्त उन्हें कटघरे में खड़ा नहीं करेगा

किन्तु यदि नहीं हुई तो इतिहास उन्हें

कभी माफ नहीं करेगा!

मानव कल्याणासाठी राजकारण करता करता आपण मूळ हेतूच विसरत चाललो आहोत, हे विदारक वास्तव त्यांना अस्वस्थ करायचं.

पाच हजार वर्ष की संस्कृति : गर्व करे या रोएँ?

स्वार्थ की दौड में कहीं आजादी फिर से न खोएँ 

ही जाणीव ते सतत करून देत राहिले.

राजकारण प्रवेश ही आपली घोडचूक होती, 'सबकुछ दाव पर लगा, घाटे का व्यापार हुआ' असं वाटावं असे प्रसंग अनेकदा येत.

हरी हरी दूब पर

ओस की बूंदे अभी थी, अभी नही है

ऐसी खुशियाँ जो हमेशा हमारा साथ दे

कभी नहीं थी, कभी नहीं हैं

राजकारणाचं क्षणभंगुरत्व त्यांना नीट उमगलं होतंच, तसंच त्यातला हरवत चाललेला विवेक, सत्तेसाठी नैतिकतेची पायमल्ली या गोष्टींनी त्यांचं मन विदीर्ण होत होतं.

आणीबाणीच्या कालखंडावर त्यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये सर्वत्र होत असलेल्या मुस्कटदाबीचं, 'अनुशासन के पर्व पर अनुशासन का खून' असं अचूक वर्णन आहे.

तरीही ना कधी त्यांच्यातला देशभक्त हताश झाला, ना कधी त्यांच्यातला कवी निराश झाला.

आग्नेय परीक्षा की

इस घड़ी में-

आइए, अर्जुन की तरह

उद्धोष करें :

''न दैन्यं न पलायनम्।''

हा वज्रनिश्चय कायम राहिला. दु:ख झालं तरी स्वप्नांचा पाठलाग सुटला नाही, म्हणून तर शोक करतानाही,

अंतर रोये, ऑंख न रोये

धुल जायेंगे स्वपन संजोये!

हे भान त्यांच्यातला कवीला होतं!

जे सोबती वाटले, त्यांनीच सुरा खुपसल्याचा अनुभव आल्यावर ते विषण्णपणे 'गीत नहीं गाता हूँ' लिहून गेले.

'अपनोंके मेलेमें मीत नहीं पाता हूँ' ही व्यथा आहे, पण यातून आता सुटकाही नाही. 'मुक्तिके क्षणोंमे बार बार बँध जाता हूँ' असे म्हणून तो कवी आपले भागधेय स्वीकारत होता.

पण केवळ अविश्वास वा अपयश नाही, यशही माणसाला एकटं पाडतं, ही खंतही ते 'उंचाई' कवितेत व्यक्त करतात.

जो जितना ऊँचा, उतना एकाकी होता है,

हर भार को स्वयं ढोता है

चेहरे पर मुस्कानें चिपका,

मन ही मन रोता है

हे वास्तव सांगतानाच,

जरूरी यह है कि

र्ऊंचाई के साथ विस्तार भी हो, जिससे मनुष्य,

ठूँठ सा खडा न रहे, औरों से घुले-मिले,

किसी को साथ ले, किसी के संग चले

हेही आवर्जून सांगताना त्यांच्यातला माणूस जोडणारा स्वयंसेवक दिसतो!

आणि असलं शिखरावरचं एकाकी मोठेपण मला देऊ  नको -

अपनोंसे गले न मिल सकूँ

इतनी रुखाई कभी मत देना

असं अनोखं दान ते परमेश्वराजवळ मागतात! माणूस व मनं सांभाळणं त्यांना महत्त्वाचं वाटे. त्यांना माणसं जिंकायची होती. आत्मविश्वास देऊन ती उभी करायची होती.

मन हारकर मैदान नही जीते जाते

न मैदान जीतनेसे मनही जीते जाते है

 

छोटे मन से कोई बडा नहीं होता

टूटे मनसे कोई खडा नहीं होता

 

आदमी को चाहिए कि वह जूझे

परिस्थितियोंसे लडे

एक स्वप्न टूटे तो दूसरा गढे

असा दुर्दम्य आशावाद मनात जागता असल्यानेच राजकारणच काय, मृत्यूचं दर्शनही त्यांना कधी निराश करू शकलं नाही.

सावरकरांसारखंच ते मृत्यूला ठणकावून सांगत होते की

तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ,

सामने वार कर फिर मुझे आजमा

तर विरोधकांच्या फौजा विचारांवर, अस्तित्वावर हल्ले चढवत असतानाही

ऑंखों में वैभव के सपने

पगमें तूफानोंकी गति हो

राष्ट्रभक्तिका ज्वार न रुकता

आए जिस जिसकी हिम्मत हो

असं ते ठणकावत होते! एखादा योध्दयाला शोभेलशी विजिगीषा त्यांच्यात ठासून भरलेली होती. हा देश माझी माता आहे हे वाटणं इतकं खरं होतं की फाळणीच्या जिव्हारी लागलेल्या दु:खानंतर 'दूध मे दरार पड गयी!' असे एका आईचे व्याकूळ उद्गार सहजपणे बाहेर पडले. तिचं दु:ख दूर करण्याची मुलाची जबाबदारी ते जाणून होते. त्यामुळेच कानपूरला वसतिगृहात असताना दुखऱ्या मनाने साजऱ्या केलेल्या खंडित स्वातंत्र्याच्या उत्सवात त्यांनी लिहिलं होतं,

पंद्रह अगस्त का दिन कहता

आजादी अभी अधूरी है।

सपने सच होने बाकी है,

रावी की शपथ न पूरी है॥

पण हा स्मरणसल मनात बाळगतानाच

उस स्वर्ण दिवस के लिए आज से

कमर कसें बलिदान करें।

जो पाया उसमें खो न जाएँ,

जो खोया उसका ध्यान करें॥

असं म्हणत हा राष्ट्रप्रेमाने भारलेला युवक, भारतमातेचा पुत्र,  खरोखरच कंबर कसून कामाला लागला होता.

भारताला खंडित करणारे अनेक राजकीय मनसुबे नंतरही अनेकदा रचले गेले. त्यांच्या धांदोटया उडवताना त्यांची लेखणी राष्ट्रवेदीवर बली चढलेल्या हुतात्म्यांच्या रक्तातली आग आणि तेज घेऊन येई. 'एखादा जमिनीचा तुकडा भारतात असला काय, नसला काय!' असल्या कृतघ्न विचारांना 'भारत जमीनका टुकडा नहीं, एक जीताजागता राष्ट्रपुरुष है' हे धगधगीत उत्तर आहे. वंदे मातरम या काव्याने भारतमातेचं जसं परिपूर्ण वर्णन केलं, तसंच हे  भारत नावाच्या परमसामर्थ्यशाली मृत्युंजय राष्ट्रपुरुषाचं वर्णन!

भारत जमीन का टुकडा नहीं,

जीता जागता राष्ट्रपुरुष है।

हिमालय मस्तक है, कश्मीर किरीट है,

पंजाब और बंगाल दो विशाल कंधे हैं।

पूर्वी और पश्चिमी घाट दो विशाल जंघायें हैं।

कन्याकुमारी इसके चरण हैं, सागर इसके पग पखारता है।

यह चन्दन की भूमि है, अभिनन्दन की भूमि है,

यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है।

इसका कंकर-कंकर शंकर है,

इसका बिन्दु-बिन्दु गंगाजल है।

हम जियेंगे तो इसके लिये

मरेंगे तो इसके लिये।

हे वाचताना मन राष्ट्राभिमानाने भरून येतं.

शेवटच्या संकल्पाला आपणही जोडले जातो.

'आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनोंके विघ्नोनें घेरा' असं असतानाही 'आओ फिरसे दिया जलाये' म्हणत मनात आशावाद जागता ठेवण्याचं हे सामर्थ्य चकित करणारं आहे. या आशावादामुळेच 98च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'गीत नया गाता हूँ' म्हणत त्यांनी साऱ्या देशाला नवी उमेद दिली. 'हार नहीं मानूँगा, रार नही ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ' हे म्हणण्याची धमक त्यांच्यात वयाच्या 74व्या वर्षीही कायम होती.

त्यामुळेच पोखरण अणुचाचणी करताना त्यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास होता.

या आत्मविश्वासामागे होती हेतूची शुध्दता व मूल्यांवरची ठाम श्रध्दा. कारण राष्ट्रनेत्याच्या आत दडलेलं कविमन

हमें चाहिए शांति, जिंदगी हमको प्यारी,

हमें चाहिए शांति, सृजन की है तैयारी,

हमने छेड़ी जंग भूख से, बीमारी से,

आगे आकर हाथ बटाए दुनिया सारी।

हरी-भरी धरती को खूनी रंग न लेने देंगे

जंग न होने देंगे।

या निर्धाराला सदैव बांधील होतं. 'स्वत:तील कवीशी प्रामाणिक राहण्यासाठी मला फार मोल वेचावं लागलं आहे' असं ते म्हणत. त्यांच्या अनेक नि:स्पृह निर्णयांतून, वागण्यातून ते सिध्द होत होतं. 

स्वत:चं हिंदू असणं म्हणजे काय, हे त्यांच्या 'परिचय' कवितेतून आपल्याला लख्ख समजतं. हिंदुत्वाच्या विचाराची स्पष्टता 'हिन्दू तन मन हिन्दू जीवन रग रग हिन्दू मेरा परिचय' या कवितेत आहे. ही केवळ आत्मप्रौढी वा वल्गना नाही, तर केवढी मोठी जबाबदारी आहे हेच त्या कवितेतून जाणवतं. साऱ्या मानवजातीचं कल्याण, त्याला योग्य मार्ग दाखवणं हे हिंदू म्हणून आमचं दायित्व.

जगती का रच करके विनाश, कब चाहा है निज का विकास?

भूभाग नहीं, शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय!

मै तो समाज की थाति हूं, मै तो समाज का हूं सेवक

मै तो समष्टि के लिए व्यष्टि का कर सकता बलिदान अभय!!

अशा ओळी वाचल्या की वाटतं - हिंदुत्व आणखी काय वेगळं सांगायला हवं! हे हिंदुत्व सिध्द करण्याची जबाबदारी अटलजींनी  आपल्यावर सोपवलीय.

भारतमातेला समृध्द शक्तिशाली, विश्वपथदर्शक बनवण्याचा मार्ग आज प्रशस्त झालेला दिसतो आहे तो अटलजींच्या धीरोदात्त मार्गक्रमणामुळेच. घोर निराशेचे, उपेक्षेचे प्रसंग आले, तरी आणीबाणीसारख्या 'अनुशासन' पर्वाची 'दु:शासन पर्व' म्हणत खिल्ली उडवत, लोकसभेच्या विशाल सभागृहात केवळ दोन डोकी असतानाही 'अंधियारा छटेगा कमल खिलेगा' म्हणण्याचा आत्मविश्वास असलेल्या अटलजींनी

कभी थे अकेले

हुए आज इतने

नही तब डरे तो

भला अब डरेंगे

या स्थितीला आणून ठेवलं! आता वेळ आहे आता मिळालेली जबाबदारी नीट पार पाडण्याची.

अटलजींची संयमित, मानवी, सर्वसमावेशक नीतीच शाश्वत, शांततामय सहजीवन स्थापित करू शकेल.

केवळ कार्यकर्त्यांसाठी नव्हे, केवळ हिंदूंसाठीही नव्हे, देशाला प्रगत बनवू इच्छिणाऱ्या सर्व भारतीयांसाठी, अखिल मानवजातीचं कल्याण इच्छिणाऱ्या सर्वांसाठीच त्यांनी एक आवाहन करून ठेवलं आहे...

कदम मिलाकर चलना होगा!

आम्हाला मिळून हे आव्हान पेलावं लागेल. संकटं चालून येतील, प्रलयंकारी मेघ दाटून येतील. पायातळी अंगार तर माथ्यावर ज्वाळा बरसतील. तरीही हसत हसत आपल्याच हातांनी या आगीत खेळावं लागेल. आपल्याला मिळून चालावं लागेल.

हसू असो वा आसू, वादळे येवोत वा बळी जावोत, उद्यानातून असो वा मरुभूमीतून, मान मिळो वा अपमान होवो, आपल्याला आपलं मस्तक उन्नत, छाती ताठ ठेवून साऱ्या त्रासांतून जावं लागेल. आपल्याला एकत्र पावलं टाकत चालावं लागेल.

उजेड-अंधार काही असो, भर प्रवाहात-काठावर कुठेही राहावे लागो, तिरस्कार मिळो वा प्रेम, क्षणिक यश मिळो वा पराभवाला सामोरे जायला लागो, आपल्याला आपल्या आयुष्यातील वैयक्तिक शेकडो स्वप्नांची आहुती द्यावी लागेल अन चालत राहावं लागेल.

आपल्या समोर प्रगतीचा विकासाचा मार्ग  दिसतो आहे. त्यावर पुढे पुढे जावंच लागेल. 

या मार्गाला अंत कुठला! आणि चालायचं तेही प्रसन्नतेने, आनंदाने. दमून भागून चालणार नाही. आपले मनोरथ सफल होवोत वा विफल, चालणं आहे. आपलं सारं काही देऊन बदल्यात कशाचीही अपेक्षा न करणारा जलद होऊन आपल्याला बरसायचं आहे, आपल्याला मिळून चालायचं आहे!

हा मार्ग कंटकाकीर्ण आहे. आपलं तारुण्य तीव्र प्रेमाच्या अनुभूतीपासून वंचित राहील. आपल्या आयुष्याच्या फूलबागांमध्ये वाजेल ते शांततेचं संगीत! आपलं तन-मन आपल्यासाठी उरलं नाही. ते समाजाला अर्पण केलं आहे. आपल्या आयुष्याला शेकडो वेळा तावून सुलाखून पणाला लावावं लागेल.

या मार्गावर आपल्याला पाय रोवून चालावं लागेल!

कदम मिलाकर चलना होगा

बाधाएँ आती हैं आएँ

घिरें प्रलय की घोर घटाएँ

पावों के नीचे अंगारे

सिर पर बरसें यदि ज्वालाएँ

निज हाथों में हँसते-हँसते

आग लगाकर जलना होगा

कदम मिलाकर चलना होगा

 

हास्य-रुदन में, तूफानों में

अगर असंख्यक बलिदानों में

उद्यानों में, वीरानों में

अपमानों में, सम्मानों में

उन्नत मस्तक, उभरा सीना

पीड़ाओं में पलना होगा

कदम मिलाकर चलना होगा

 

उजियारे में, अंधकार में

कल कहार में, बीच धार में

घोर घृणा में, पूत प्यार में

क्षणिक जीत में, दीर्घ हार में

जीवन के शत-शत आकर्षक

अरमानों को ढलना होगा

कदम मिलाकर चलना होगा

 

सम्मुख फैला अगर ध्येय पथ

प्रगति चिरंतन कैसा इति अब

सुस्मित हर्षित कैसा श्रम श्लथ

असफल, सफल समान मनोरथ

सब कुछ देकर कुछ न माँगते

पावस बनकर ढ़लना होगा।

कदम मिलाकर चलना होगा।

 

कुछ काँटों से सज्ज्ाित जीवन,

प्रखर प्यार से वंचित यौवन,

नीरवता से मुखरित मधुबन,

परहित अर्पित अपना तन-मन,

जीवन को शत-शत आहुति में,

जलना होगा, गलना होगा।

कदम मिलाकर चलना होगा।