रोजचं धावपळीचं आयुष्य जगत असताना आपण कित्येक गोष्टी आणि आजूबाजूची अनेक माणसंही गृहीत धरत असतो. ती माणसं, त्या गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि त्या तशाच कायम असतील या भ्रमात आपण जगत असतो. आणि मग एक दिवस अचानक, नियती नावाची अदृश्य शक्ती एक जोरदार थप्पड लगावते. आपण भेलकांडतो त्याने. मन सैरभैर होऊन जातं. नेमकं काय झालंय, काय गमावलंय हे कळायलाही थोडा काळ जावा लागतो. जेव्हा ते भान येतं, तेव्हा खर्चाच्या बाजूला केवढं मोठं भगदाड पडलंय याची जाणीव होते. आज हा लेख लिहिताना मनाची अशीच अवस्था आहे.
विवेक समूहाचे व्यवस्थापक श्री. शहाजी जाधव यांच्यावर श्रध्दांजलीपर लेख लिहिण्याची वेळ आपल्यावर आली आहे, हे मानायला मन तयार नाही. जुलै महिन्याची 20 तारीख उजाडली तीच ही अभद्र, अविश्वसनीय बातमी घेऊन. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जाधवसाहेबांचा अकाली बळी घेतला. वय असावं 55च्या आसपास. अजून निवृत्त व्हायलाही 2-3 वर्षं बाकी होती. जाधवसाहेब म्हणजे रोजच्या जगण्यात अतिशय शिस्तशीर असलेली व्यक्ती. जी शिस्त ते कामात काटेकोरपणे पाळत, तिचाच अवलंब प्रत्यक्ष जगण्यातही करत. कधी प्रकृतीची हेळसांड करणार नाहीत की आजारपण आल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार वा पथ्यं कधीही टाळणार नाहीत.
जाधवसाहेब त्यांच्या तरुण वयातच साप्ताहिक विवेकशी नोकरीच्या माध्यमातून बांधले गेले. वास्तविक ते कधी संघस्वयंसेवक नव्हते की संघविचारांची त्यांना पार्श्वभूमीही नव्हती. तरीही त्यांचं आणि विवेकचं गोत्र जुळलं ते कायमसाठी. व्यवस्थापक ही जोखमीची जबाबदारी आणि पूर्णवेळ पडद्याआड राहून केलं जाणारं काम. याची कल्पना असूनही त्यांनी या जबाबदारीचा मन:पूर्वक स्वीकार केला. विवेकचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रमेश पतंगे - जे दीर्घकाळ विवेकचे संपादक होते, या दोघांच्या बरोबरीने विवेकच्या इथवरच्या प्रवासात शहाजी जाधवांनी साथ दिली. करंबेळकरांनी विवेकसाठी नवनवीन स्वप्नं पाहायची आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जाधवसाहेबांनी अबोलपणे साथ द्यायची, असा जणू त्यांच्यात अलिखित करारच होता. वास्तविक तिघेही अतिशय भिन्न प्रकृतीचे, पण विवेकच्या हितासाठी, प्रगतीसाठी आवश्यक त्या गोष्टी करताना त्यांच्यातली स्वभावभिन्नता कधीही आड आली नाही.
साप्ताहिक विवेक ते विवेक समूह इथवर विवेकचा प्रवास झाला तो अशाच अनन्यसाधारण निष्ठावंतांच्या योगदानावर. प्रसारमाध्यमात काम करायचं, तर 'डेडलाइन'शी गाठ कायमची बांधलेली असते. तिचा धाक फक्त संपादकीय विभागालाच जाणवतो असं नाही, तर सर्वच जण ती पाळण्यासाठी धडपडत असतात. तिचं पालन व्हावं यासाठी सगळयांवर जाधवसाहेबांची करडी नजर असायची. त्याच वेळी डेडलाइन पाळण्यासाठी सहकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व गोष्टी पुरवण्याची जबाबदारीही ते चोख पार पाडायचे.
कोणत्याही संस्थात्मक कामात - त्यातही विवेकसारखी विशिष्ट विचारसरणीला बांधील असलेली संस्था असेल, तर आर्थिक गणितं सांभाळणं ही त्या संस्थेच्या व्यवस्थापकासाठी मोठी कसरत असते. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या, म्हणजेच विवेकच्या सत्तर वर्षांच्या आयुष्यात अनेक आर्थिक चढउतार आले. राजकीय-सामाजिक काळ प्रतिकूल असतानाही तग धरून राहणं हेच प्रसारमाध्यमांसाठी एक मोठं आव्हान असतं. ते आव्हान पेलत असतानाच, संस्थेची चहूदिशांनी वाढ होण्यासाठी आणखी काही आव्हानं आनंदाने स्वीकारणं ही विवेकमधील उच्चपदस्थांची खासियत. जाधवसाहेब अशांमधले एक! आज समाजात विवेकची जी ओळख निर्माण झाली आहे, त्यात त्यांच्या पडद्यामागे राहून दिलेल्या योगदानाचा वाटा अमूल्य आहे.
निष्ठावंत मनुष्यबळ हा विवेक समूहाच्या कुंडलीतील भाग्ययोग आहे. समूहाची ही सर्वात मोठी पुंजी आहे. जाधवसाहेब या परिवारातले एक ज्येष्ठ सदस्य होते. ज्येष्ठ आणि कर्तव्यात चोख असे सदस्य. ते आहेतच आणि असणारेत कायम बरोबर, या विश्वासावर त्यांचे सहकारी नवनवीन स्वप्नं पाहत होते. या निश्चिंततेमुळे आपापल्या कामात एकाग्र होऊ शकत होते.
विवेक समूहाचा हा आधारच 20 जुलैच्या मध्यरात्री काढून घेतला गेला. परमेश्वर म्हणा वा नियती... जे कोणी असेल त्याचं हे धक्कातंत्र माणसाला त्याच्या मर्यादांची जाणीव करून देणारं, एक प्रकारे खिजवणारंच. जाधवसाहेबांचं आकस्मिक जाणं त्यांच्या पत्नी-मुलासाठी आणि परिवारातल्या अन्य सदस्यांसाठी जितकं धक्कादायक, तितकंच विवेक परिवारासाठीही. ईश्वर त्यांना सद्गती देवो अशी मन:पूर्वक प्रार्थना करतानाही, त्या शक्तीच्या या अनाकलनीय वागण्याचा रागही मनात दाटला आहे. याची
दाद आता मागायची तरी कोणाकडे?