पंढरीची वारी - एक वेगळा विचार!

विवेक मराठी    16-Jul-2018
Total Views |


 

 

 

 

कुणी कितीही टीका करो, या भूमीतील परंपरा या अव्याहतपणे चालत राहिलेल्या आहेत. त्यांच्यात बदल निश्चितच झाले. पण ही परंपरा मिटलेली नाही. उलट वर्धिष्णू होत राहिलेली आहे. शांततेच्या मार्गाने दहा-बारा लाख लोक भजन-कीर्तन करत स्त्री-पुरुष, तरुण-वृध्द शेकडो किलोमीटर चालत जातात, हे एक जागतिक आश्चर्य आहे. सात-आठशे वर्षे चालत असलेली असली अपूर्व घटना जगाच्या इतिहासात दुसरी नाही. आपण वारीचा असा वेगळा विचार केला पाहिजे.

सध्या तरुणांमध्ये स्टँड-अप कॉमेडीची चांगली क्रेझ आहे. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सररास फिरत असतात. त्यांना मोठा प्रेक्षकवर्गही लाभला आहे. सोशल मीडियावर एका तरुण मित्राच्या पाहण्यात निवृत्तीमहाराज देशमुख इंदूरीकर यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ आला. तो उत्स्फूर्तपणे म्हणाला, ''अरे, ही तर स्टँड-अप कॉमेडीच आहे.'' त्या तरुणाला हे कीर्तन आवडले आणि त्याने त्याच्या मित्रांमध्ये तो लोकप्रिय करून टाकले.

निवृत्तीमहाराज वारकरी परंपरेतील कीर्तन करतात. त्या कीर्तनाला त्यांनी चालू घटनांचे संदर्भ देऊन आपल्या शैलीची फोडणी देऊन चटकदार बनवले. परिणामी संतवाङ्मयाचा मोठा विचार आकर्षक परिभाषेत सामान्य जनतेला जाऊन भिडतो आहे. चालू काळाशी जुळवून घेणे हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्टय गेली शेकडो वर्षे महाराष्ट्रात दिसून येते आहे. किमान सातशे वर्षांपासून वारकरी संप्रदायाचे प्रमुख लक्षण असलेली आषाढीची वारी दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे लोकप्रियच होत गेलेली दिसून येते आहे.

संतांनी जो अध्यात्म विचार सांगितला, त्यावर गेल्या काही शतकांमध्ये वारकरी संप्रदायातील अभ्यासकांनी आणि स्वतंत्रपणे विद्यापीठीय पातळीवरही प्रचंड अभ्यास झाला आहे. समाजमनावर धर्माचा असलेला पगडा मोठा आहे. त्यामुळे वारीसारख्या गोष्टींना लोकप्रियता लाभणे स्वाभाविकही आहे.

आषाढीची वारी म्हणजे पंढरपूर, देहू-आळंदीवरून निघालेल्या पालख्या, आषाढीच्या काळात पंढरपूरला झालेली गर्दी, भाविकांची सोय-गैरसोय, सामान्य वारकऱ्यांचा भक्तिभाव याचीच सगळी चर्चा होत राहते. पण या निमित्ताने गावोगावी एक वेगळे सामाजिक ऐक्य पाहायला मिळते, त्याचा विचार व्हायला पाहिजे.

आषाढीची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निघते. या निमित्ताने जे लोक वारीला जायला निघतात, त्यांना निरोप देण्यासाठी आख्खा गाव लोटतो. काही अंतरापर्यंत लोक त्यांच्याबरोबर पायी चालतात. ही दिंडी पायीच करायची असते. जे लोक वारीला निघतात, त्यांनी आपल्याबरोबर अतिशय किमान सामान घेतलेले असते. गरिबी आहे म्हणून सामान कमी असते असे नसून श्रीमंत असला तरीही तो वारीत साधेच राहतो, हे महत्त्वाचे.

गावोगावी जिथून ही पालखी जाणार असेल, तिथे तिथे वारकऱ्यांची खाण्यापिण्याची, राहण्याची सोय केली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरीला निघतात, तेव्हा ज्यांना जाणे शक्य नाही, ते या पालख्यांचे दर्शन घेऊन आपली भावना व्यक्त करतात.

परभणी हे माझे जन्मगाव. शेगावहून निघालेली गजानन महाराजांची पालखी दर वर्षी पंढरीला जाताना परभणीला थांबते. त्या दोन दिवसांत गावात एक वेगळा उत्साह संचारलेला मी अनुभवला आहे. पूर्वी घरोघरी वारकऱ्यांसाठी अन्न शिजायचे. हे अन्न गोळा करून वाटले जायचे. आता जरा आधुनिक पध्दतीने आचारी लावून वारकऱ्यांना अन्नदान केले जाते.

लाखो लोकांची पाण्याची, अन्नाची, निवासाची सोय उभा महाराष्ट्र या काळात करतो. यासाठी कसलाही जी.आर. काढायची गरज शासनाला पडत नाही. कुठेही कुणाला ठराव घ्यावा लागत नाही. कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. वारीच्या काळात सगळे सामाजिक भेद गळून पडलेले आढळून येतात.

तरुणांचा सहभाग गावोगावी मोठया प्रमाणात दिसून येतो. स्वयंसेवक म्हणून हे तरुण मोठया उत्साहाने काम करताना आढळून येतात. एरव्ही तरुण सहभागी होत नाहीत म्हणून ज्येष्ठ लोक तक्रार करत असतात. पण आषाढीच्या काळात महाराष्ट्रभर ज्या दिंडया निघतात, त्यांच्या संयोजनात फार मोठया प्रमाणात तरुणाई उत्स्फूर्तपणे काम करताना दिसते.

जैन, बौध्द आणि अगदी मुसलमानही या दिंडयांच्या काळात आपल्या आपल्या परीने योगदान देऊन आषाढी वारी हा महाराष्ट्राचा सगळयात मोठा सामाजिक सण आहे हे अधोरेखित करतात.

वारकरी संप्रदायाने जो सोपेपणा अध्यात्मात आणला, तो लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही वारकरी आहात म्हणजे काय? तर तुम्ही तुळशीची माळ गळयात घातली पाहिजे, शाकाहार केला पाहिजे, धूतवस्त्र परिधान करून विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीला फुले वाहणे, तुळशीची मंजिरी वाहणे. दर महिन्यात एकादशीला उपवास करणे. वर्षातून पंढरीची एक वारी करणे. (खरे तर एकूण चार वाऱ्या आहेत. आषाढी-कार्तिकी-माघी-चैती. पण यातील आषाढी आणि त्या खालोखाल कार्तिकी जास्त लोकप्रिय आहे.) प्रत्येक वारकऱ्याने दुसऱ्या वारकऱ्याच्या ठायी देव आहे असे समजून त्याच्या पाया पडणे. बस्स, झालात तुम्ही वारकरी.

वारकरी संप्रदायाचे तीन प्रमुख ग्रंथ 'प्रस्थान त्रयी' म्हणून मानले जातात - 1. ज्ञानेश्वरी, 2. एकनाथी भागवत व 3. तुकाराम गाथा. वारकऱ्याने या ग्रंथांचे वाचन करावे असे अभिप्रेत आहे. या ग्रंथांचे सप्ताह आयोजित केले जातात. वारकरी कीर्तन करणारे याच ग्रंथांतील रचनांचे दाखले देतात.

ब्राह्मणी परंपरेत मठ आणि त्यांचे अधिपती यांचे मोठे प्रस्थ होते. गुरुपरंपरा होती. त्याला विरोध करत वारकरी संप्रदाय उदयाला आला. आज ब्राह्मण तर सोडाच, बहुजन समाजातील महाराज व बुवा, त्यांचे मठ, त्यांचे भले-बुरे उद्योग, त्यांच्या आश्रमांशी संबंधित जमीनजुमल्यांची प्रकरणे हे सगळे समोर घडताना पाहून सात-आठशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर-नामदेव-तुकाराम या संतांना किती दूरदृष्टी होती, हे कळून चुकते. त्यांनी आपल्या समाजाला ओळखून वारकरी संप्रदायाची आखणी केली आणि तो साधेपणा जोपासला.

वारी पायीच करण्यात एक फार व्यापक समाजदृष्टी दिसून येते, हे लक्षात घेतले पाहिजे. आज विविध व्यापात नको तेवढे गुंगून गेलेली माणसे 'स्ट्रेस' कमी करण्यासाठी हजारो, लाखो रुपये देऊन उपाय करताना आढळून येतात, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतात, तेव्हा लक्षात येते की आषाढीची वारी म्हणजे एक प्रचंड मोठे 'स्ट्रेस बस्टर'च आहे.

आणखी एक मुद्दा म्हणजे भारतीय मानस हे समाजप्रिय म्हणूनच ओळखले जाते. एकटयाने वारीला जाणे अभिप्रेत नाही. त्यासाठी बरोबर दिंडी असली पाहिजे ही संकल्पनाही सामाजिक बंध घट्ट करणारी आहे.

वारीत जे दहा-पंधरा लाख लोक सहभागी होतात, हा आकडा केवळ दिसणारा आकडा आहे. खरे तर आख्खा 12 कोटीचा महाराष्ट्रच वारीत सहभागी झालेला असतो. या निमित्ताने गावोगावी अभंगांचे कार्यक्रम आयोजित होतात. अभंगवाणीला पूर येतो. संतांच्या रचना नव्याने समोर येतात. या रचनांचा अन्वयार्थ लावणारे अभ्यासक समोर येत राहतात. नवीन गायक मंडळी या रचनांना आर्तपणे आळवताना दिसतात.

पंढरीची वारी ही केवळ काही लाख लोकांची पंढरीच्या दिशेने निघालेली दिंडी उरत नाही. ही वारी म्हणजे आख्ख्या महाराष्ट्राची स्वत:च्या काळजात लपलेल्या विठ्ठलाचा शोध घेत निघालेली एक अंतर्यात्रा आहे.

आधुनिक विचार करणाऱ्यांना अशी मांडणी पचत नाही. आधुनिक म्हणवणाऱ्या कित्येकांनी मुळात वारकरी सांप्रदायावर टीकेचा आसूड ओढलेला आहे. ते स्वाभाविकही होते. पण आजच्या काळात वारीचा सगळयांनीच एक वेगळा विचार करावा, याची आवश्यकता वाटते.

माणूस एकटा पडत चालला आहे. आधुनिक जगात वावरताना एकत्र कुटुंबपध्दतीवर आघात होत असताना, नातेसंबंध क्षीण होत जात असतान एकाकीपणाची भावना तीव्रतेने घेरत जाते. मग सामाजिक पातळीवर कुठल्याही स्वार्थाशिवाय कुठल्याही व्यावहारिक उद्दिष्टांशिवाय माणसे जमवायची कशी? त्यांच्यात संवादाचे पूल बांधायचे कसे? कुठलाच आधुनिक उपाय इतक्या मोठया प्रमाणात समर्थपणे आपल्याला योजता आलेला नाही.   

कुणी कितीही टीका करो, या भूमीतील परंपरा या अव्याहतपणे चालत राहिलेल्या आहेत. त्यांच्यात बदल निश्चितच झाले. पण ही परंपरा मिटलेली नाही. उलट वर्धिष्णू होत राहिलेली आहे. शांततेच्या मार्गाने दहा-बारा लाख लोक स्त्री-पुरुष, तरुण-वृध्द भजन-कीर्तन करत शेकडो किलोमीटर चालत जातात, हे एक जागतिक आश्चर्य आहे. सात-आठशे वर्षे चालत असलेली असली अपूर्व घटना जगाच्या इतिहासात दुसरी नाही. आपण वारीचा असा वेगळा विचार केला पाहिजे.

(मी स्वत: वारी केलेली नाही. मी वारकरी नाही. मी मनुस्मृती-चातुर्वण्याचा किंचितही समर्थक नाही. पण वारकरी संप्रदाय ही सामाजिक पातळीवरची मोठी क्रांती आहे, असे मानतो.)

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575