पंचकेदार म्हणजे काय, त्यांची नावं, त्यांचं पौराणिक महत्त्व, त्यांची उत्पत्ती, याबद्दल आपण मागील भागांत माहिती घेतलीय. आपण जाऊ या आता या पंचकेदारांच्या दर्शनाला.
नमस्ते भगवान रुद्र भास्करामित तेजसें
नमो भवाय देवाय रसायाम्बुमयात्मनेेंं
पंचकेदार म्हणजे काय, त्यांची नावं, त्यांचं पौराणिक महत्त्व, त्यांची उत्पत्ती, याबद्दल आपण मागील भागांत माहिती घेतलीय.
आपण जाऊ या आता या पंचकेदारांच्या दर्शनाला. क्रमाक्रमाने.
यासाठी यांचे मार्ग सर्वप्रथम बघायला हवेत. एकदमच पंचकेदारांपर्यंत जाणं म्हणजे उडी मारून गेल्यासारखं होईल. पांडव या मार्गाने कसे गेले असावेत, याचा अंदाज व सध्या कसं जाता येतंय हे एकत्र करून आपण या प्रवासाला सुरुवात करू या. त्यासाठी देवभूमीत प्रवेश करण्यापासूनचा प्रवास करू या.
हस्तिनापूरपासून मार्गस्थ होऊन पांडव हरद्वार/हरिद्वार व हृषीकेश/ॠषिकेश इथे आले.
या प्रवासाची सुरुवात होते ती हृषीकेश/ॠषिकेशपासून.
हरद्वार/हरिद्वार व हृषीकेश/ॠषिकेश हे देवभूमी गढवालचं प्रवेशद्वार मानलं जातं. कारण इथूनच आपण चार धाम व इतर गढवालमध्ये प्रवेश करतो. हा मैदानी भाग, जिथे गंगा सर्वप्रथम मैदानी भागात उतरते. हृषीकेश/ॠषिकेश हे विष्णूंचं स्थान म्हणून हृषीकेश. ॠषिमुनींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन विष्णूंनी दर्शन दिलं, राक्षससंहार केला म्हणून हृषीकेश/ॠषिकेश. तसंच संत रिहाना ॠषी यांनी तपश्चर्या केली, त्यामुळे ॠषिकेश हे नाव. इथून पुढे गंगा ही हरिद्वारला प्रवास करते.
जेव्हा स्वर्गलोकातून गंगेचं अवतरण झालं, तेव्हा तिचा प्रचंड वेग पृथ्वीला सहन होण्यासारखा नव्हता. त्यामुळे तिचं बारा भागांमध्ये विभाजन झालं. त्यापैकी भागीरथी, अलकनंदा व मंदाकिनी या तिच्या प्रमुख शाखा. या सर्व नद्यांचा पुन्हा एकमेकींशी संगम होऊन गंगेची उत्पत्ती करतात. या सगळया संगमांना प्रयाग असं म्हणलं जातं.
* उत्तराखंडात गढवालमधले पाच प्रमुख प्रयाग - पंचप्रयाग, म्हणजे संगम.
* मुख्यत्वे भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी व इतर काही नद्या मिळून हे पंचप्रयाग होतात.
* पंचकेदार करताना आपल्याला चार प्रयागांचं दर्शन होतं.
पहिला प्रयाग - देवप्रयाग
* हृषीकेशपासून 70 कि.मी. अंतरावर पहिला प्रयाग - देवप्रयाग. देवप्रयाग -अलकनंदा व भागीरथी या नद्यांचा संगम होऊन पुढे 'गंगा' या नावाने ओळखली जाते.
* अलकनंदा ही बद्रिनाथच्या मागे सतोपंथ तळयाजवळील भगीरथ खरक व सतोपंथ या हिमनदी (ग्लेशिअर्स)च्या संगमातून उगम पावते.
* गंगोत्रीजवळ असणाऱ्या गंगोत्री ग्लेशिअर, गोमुखामधून भागीरथी उगम पावते.
* लंकेवर विजय मिळवून श्रीराम जेव्हा परतले, तेव्हा रावणासारख्या महान ब्राह्मणाचा वध केल्याचं पातक त्यांच्या शिरावर होतं. याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी देवप्रयागमध्ये भागीरथी व अलकनंदा यांच्या संगम तटावर तपश्चर्या करण्यामुळे ब्राह्मणहत्येचं पातक नष्ट होईल असं त्यांना सांगितलं होतं.
यानंतरचा रुद्रप्रयाग
अलकनंदा व केदारनाथहून येणाऱ्या मंदाकिनी नदीचा संगम हा रुद्रप्रयाग. अलकनंदा ही गौरवर्णी व मंदाकिनी ही श्यामवर्णी, केदारनाथ मंदिरामागच्या चोरबारी हिमनदीमधून उगम पावणारी. नारदांनी तिथेच एका शिलेवर बसून महादेवांची तपश्चर्या केली. भगवान शिवांनी रुद्ररूपात त्यांना दर्शन दिलं अन त्यांना वीणावादनाचं शिक्षणही दिलं, ते हे रुद्रप्रयाग. महादेवांचं मंदिर, नारद शिला, चामुंडा मंदिर व 3 कि.मी. अंतरावर असणारं कोटेश्वर महादेव मंदिर. रुद्रप्रयागहून दोन रस्ते फुटतात - एक केदारनाथला जातो, तर दुसरा बद्रिनाथकडे. तर आपण जातोय बद्रिनाथच्या दिशेने.. म्हणजेच अलकनंदेच्या तीरावरून.
आता आपल्याला तिसरा सुंदर प्रयाग दर्शन देतो..
कर्णप्रयाग
अलकनंदा व पिंडार या नद्यांच्या संगमावर वसलेलं कर्णप्रयाग. पिंडार नदी कुमाऊमधल्या बागेश्वर येथील पिंडारी हिमनदीमधून उगम पावलीय.
महाभारतातला महान योध्दा दानवीर कर्ण याच्या नावाने प्रसिध्द कर्णप्रयाग. या ठिकाणी कर्णाने सूर्योपासना केली, अशी धारणा. इथे कर्ण मंदिर आहे. असं मानलं जातं की, भगवान श्रीकृष्णांनी इथेच कर्णावर अंतिम संस्कार केले, म्हणून इथे पितरांना तर्पण देणं महत्त्वाचं मानलं जातं.
यानंतरचा प्रयाग नंदप्रयाग-
* अलकनंदा व नंदाकिनी या नद्यांचा संगम
* नंदाकिनी ही होमकुंड येथे त्रिशूल शिखराजवळील पर्वतातून उगम पावते.
* नंदादेवीचं मंदिर, यामुळे नंदप्रयाग. नंदादेवी हे गढवाली लोकांच्या आस्थेचं प्रतीक आहे व परंपरेनुसार दर बारा वर्षांनी नंदादेवी राजजात, नंदाजात यात्रेचं भव्य आयोजन केलं जातं.
आपल्याला सर्वप्रथम जायचंय ते कल्पेश्वरला. कल्पेश्वर - जिथे महादेवांच्या जटांचा भाग पूजला जातो.
आता पुढचा प्रवास आहे तो चमोली ते जोशीमठ या रस्त्यावरील हेलंग या गावापर्यंत. चमोली ते हेलंग हे अंतर साधारण 10 कि.मी. इतकं आहे. हेलंगपासून कल्पेश्वरला जायचा एक फाटा फुटतो. इथून उर्गम घाटी किंवा उर्गम खोरं 12 किलोमीटर एवढया अंतरावर आहे. उर्गमपर्यंत बऱ्यांपैकी रस्ता झालाय. वाहनं जाऊ शकतात व त्यापुढे तीन किलोमीटर अत्यंत अडचणीच्या रस्त्यावरून ट्रेक करत जावं लागतं.
तरीही ज्यांना कल्पेश्वरपर्यंत पायी जायचं आहे, त्यांच्यासाठी सभोवतालचा निसर्ग अनुभवणं ही एक पर्वणी आहे. सुमारे आठ कि.मी.ची अत्यंत खडतर अशी चढण चढून गेल्यावर एक छोटासा पूल लागतो, जो हिरण्यवती नदीवर आहे. हेलंग गाव हिरण्यवती व अलकनंदा या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. अन तो पार केल्यावर छोटी छोटी सुंदर गावं दृष्टीस पडतात. हिरणावती नदी पहाडांच्या साथीने व देवदार वृक्षांच्या सावलीतून चालताना एक प्रकारची मन:शांती व खरीखुरी शांती मिळते, कारण चार तासांच्या या वाटचालीत मनुष्यरहित वाटचाल करण्याचा सुखद अनुभव येतो. अगदी एकांतवास. पण तितकाच तो आनंददायीही. ही वाटचाल थकवा आणत नाही, तर ती स्वत:ला स्वत:शी जोडते. देवदार वृक्ष व वरून दिसणारी वळणदार वाट. अप्रतिम दृश्य..
कल्पगंगा
कल्पेश्वर कल्पगंगा खोऱ्यात, कल्पगंगा नदीच्या जवळ स्थापित आहे. कल्पगंगेचं प्राचीन कालीन नाव हिरण्यवती आहे. या नदीच्या उजव्या तीराच्या भूमीला दुर्वास भूमी हे नाव आहे अन याच ठिकाणी पंच बद्रीमधल्या ध्यानबद्रीचं मंदिर आहे. जसे पंचकेदार आहेत, तसेच पंचबद्रीही आहेत. ही नदी पुढे जाऊन हेलंग इथे अलकनंदेला मिळते.
ही चढण चढून आल्यावर दिसतं ते सालना गाव. निसर्गसौंदर्याने पुरेपूर असं. गव्हाची शेती सगळीकडे अन मध्येच पायऱ्यापायऱ्यांची शेती, उत्तराखंडाचं वैशिष्टय असणारी 'सिढीनुमा खेती'. सभोवताली हिरवंगार. शेतांच्या कडेने असणारी देवदारांची किनार.
शेतांमध्ये काम करणाऱ्या गढवाली स्त्रिया अन सोबत त्यांची गीतं हे अनुभवणं म्हणजे जादूई आहे अगदी. सालना गावातून पुढे वाटचाल करताना हा निसर्ग सोबत करतो अन थोडी चढण चढून गेल्यावर काही अंतरावर आपल्याला दिसतं ते उर्गम. हे गाव नाही, हे निसर्गरम्य असं खोरं आहे. उर्गम खोऱ्यात छोटी छोटी अशी काही गावं आहेत. सालना हे उर्गम खोऱ्यातलं पहिलं गाव आहे. हिरण्यवती नदीच्या पलीकडच्या काठावरही अशी गावं आपल्याला दिसतात. अन त्या सगळयांना जोडणारी एक पायवाट. त्या बाजूच्या भागाला भर्की हे नाव आहे. कारण तिथलं सगळयात मोठं गाव भर्की हे आहे. भर्कीपासून हिरण्यवती नदीच्या किनाऱ्यावरून जाऊन शेवटी 1700 फुटांची एक खिंड पार करून बद्रिनाथला जाता येतं.
उर्गम खोरं भौगोलिक रूपात जिथून सुरू होतं, तिथेच हेलंगहून येणारा 12 कि.मी. लांब रस्ता समाप्त होतो. हे खोरं दूरवर पसरलेलं, अन त्यामुळे 3 कि.मी. दूर असणारं कल्पेश्वर मंदिर लांबूनही स्पष्ट दिसतं. संपूर्ण उर्गम खोऱ्यात छोटी गावं, शेतं दिसतात. विशेष म्हणजे या गावांमध्ये लोकांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.
हिरण्यवती नदीवर असलेला पूल पार करून थोडया उंचीवर एका मोठया गुहेत कल्पेश्वर केदार स्थापित आहे. कल्पेश्वर केदारपर्यंत पोहोचण्यासाठी गुहेच्या आत साधारण एक कि.मी. चालावं लागतं.
इथे मंदिर असं नाहीये. एका मोठया दगडाच्या छायेत असणाऱ्या मोठया गुहेत 2-3 भिंती उभ्या करून शिवलिंग स्थापन केलंय अन त्याची पूजा होते.
कल्पेश्वर कपाट (उत्तराखंडात मंदिरांच्या दारांना कपाट म्हणतात. कपाट बंद करणं व उघडणं हे अत्यंत विधिवत होतं.) इतर केदारांप्रमाणे हिवाळयात बंद होत नाहीत. हा एकमेव केदार आहे, जिथे संपूर्ण वर्षभर दर्शन घेता येतं.
साहजिकच आहे, कल्पेश्वर - कल्पाचा, सृष्टीचा ईश्वर, तो बंद राहून कसं चालेल? सृष्टीचं चलनवलन बंद पडेल.
सर्वाधिक सुगम असणारा केदार. तीन किलोमीटर अलीकडेपर्यंत वाहनाने येता येतं अन मंदिरापर्यंत बाइकने येता येतं. 3-4 फूट रुंदीचा पक्का रस्ता आहे. हे मंदिर उर्गम खोऱ्यामध्ये समुद्रसपाटीपासून 2134 मीटर उंचीवर आहे. हे मंदिर 'अनादिनाथ कल्पेश्वर महादेव' या नावाने प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच एक कुंड आहे, ज्यातलं पाणी सदैव स्वच्छ असतं. हे पाणी प्राशन केल्यावर सर्व व्याधींपासून मुक्तता मिळते, अशी यात्रेकरूंची समजूत आहे. मोठया भक्तिभावाने हे जल प्राशन केलं जातं.
शिवपुराणातल्या केदार खंडात हा उल्लेख आहे की दुर्वास ॠषींनी या ठिकाणी असणाऱ्या वरदायी कल्पवृक्षाखाली बसून तपश्चर्या केली होती, तेव्हापासून या स्थानाला 'कल्पेश्वर' हे नाव मिळालं.
अन्य कथांनुसार देवतांनी असुरांच्या अत्याचारांमुळे त्रस्त होऊन कल्पस्थली नारायणस्तुती करून भगवान शिवांचं दर्शन घेतलं व अभयाचं वरदान मिळवलं.
पुराणांनुसार देवराज इंद्राला दुर्वास ॠषींनी शाप दिला होता की तू श्रीहीन होशील, अन त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी करताना कसं करावं याची संपूर्णपणे काळजी घेऊनच पर्यटनासाठी जावं. आपल्याला आज जिकडे तिकडे अत्यंत बेजबाबदारपणे वागणारे लोक आढळतात. या असा देवस्थानांच्या ठिकाणी गडबड गोंधळ करणं, तसंच उत्तराखंडातल्या अवघड रस्त्यांवरून माहिती नसताना वाटेल तसं वाहनं चालवणं, हे सगळयाच घातक गोष्टींना निमंत्रण दिल्यासारखं आहे. त्याहीपेक्षा पर्यावरणाला हानी होईल असं वागणं हेही चुकीचं आहे. ही सर्व स्थानं देशाचा सांस्कृतिक वारसा आहेत अन त्यांना अबाधित ठेवणं, तेथील पर्यावरण नष्ट होऊ नये याची काळजी घेणं हे जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे.
आस्थेचा एक प्राण..
ॐ नम: शिवाय...
पुढच्या भागात जाऊ या 'रुद्रनाथ'ला...