इसिसची पाळेमुळे

विवेक मराठी    26-May-2018
Total Views |

धर्मांधता आणि काफिरद्वेष हे सुन्नी-वहाबी विचारसरणीचा अविभाज्य भाग आहेत. त्यातूनच इसिससारख्या दहशतवादी संघटनांचा उदय झाला. इसिस संपल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी जगभरात ज्या प्रकारच्या दहशतवादी कारवाया चाललेल्या दिसतात, त्यावरून इसिसची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे लक्षात येते.

सहा महिन्यांपूर्वीपर्यंत चाललेल्या लष्करी कारवाया, रशिया आणि अमेरिका व मित्र राष्ट्रांचे हल्ले यामुळे अधिकच मोडकळीस आलेले इसिसचे लुटुपुटूचे साम्राज्य नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर दिसत होते. राक्का, मोसुल, अलेप्पो अशा ठिकाणी इसिसच्या सैन्याने दिलेल्या प्रतिकारांचे आणि घनघोर लढायांचे वृत्त येत होते. त्यात रशिया आणि अमेरिका यांच्यात चाललेल्या चुरशीने मीठ-मसाला पडून इराक आणि सीरियातील अरबांची ससेहोलपट अधिकच वाढताना दिसत होती. राक्का या इसिसच्या महत्त्वाच्या ठाण्याला ऑक्टोबर 2017मध्ये खिंडार पडले. सीरियातील फुटीर लष्करी गटाने त्यावर कब्जा मिळविण्याचा दावा केला. (इंडियन एक्स्प्रेस, दि.9 ऑक्टोबर 2017). महिन्याभराने आलेल्या बातमीप्रमाणे अगदी शेवटचे ठिकाण बौकमाल या ठिकाणी जी काही इसिसच्या लोकांची तुकडी होती, तिने लढाई न करता पळ काढून वाळवंटी प्रदेशात आश्रय घेतला. तेथे इसिसचे जवळपास 2 ते 3 हजार अतिरेकी असावेत. त्यात त्यांच्या म्होरक्यांचा समावेश होता. ते जवळच्या प्रदेशात विखुरले. त्यांच्या पाठलागावर सीरियातील सैन्ये होती. एक प्रकारे इसिसच्या अमलाचा अस्त झाला, तरी त्यांचा नेता आणि स्वघोषित खलिफा अबू बक्र बगदादीचा ठावठिकाणा लागला नाही. तो मेला की जिवंत आहे, याबाबबत रशिया व स्थानिक लोकांकडून आलेल्या बातम्यांची शहानिशा होत नव्हती. याच दरम्यान इराकने इसिसचा पाडाव झाल्याचे जाहीर केले, विजयोत्सव साजरा केला. इसिसव्याप्त प्रदेशातील महिलांनी बुरखे काढून फेकले, तर पुरुषांनी वाढविलेल्या दाढया काढून टाकल्या. राक्काचा पाडाव झाल्यानंतर इसिसच्या कारवाया थांबतील असे अनेकांना वाटत नव्हते. इसिसचा पाडाव झाल्यावरही त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू राहातील, असे मी स्वत: पूर्वीच्या काही लेखांत नमूद केले होते.

    याचे कारण अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला इसिसचा प्रवक्ता अबू मुहम्मद अल अदनानी याने मरण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी विखरून जाऊन छोटया समूहांतून अतिरेकी कारवाया करत राहण्याचा सल्ला दिला होता. त्या वेळी त्याने केलेले विधान फार सूचक होते. तो सहकाऱ्यांना म्हणाला, ''(तुमचा) पराजय म्हणजे तुमच्या संकल्पाचा, इच्छाशक्तीचा व लढण्याची इच्छा नष्ट होण्यात असेल. आम्ही (इसिस) तेव्हाच पराजित होऊ, जेव्हा तुम्ही (इसिसविरोधी ख्रिश्चन देश) मुस्लिमांच्या हृदयातून कुराणाला बाहेर काढाल.'' (इंडियन एक्स्प्रेस, दि. 30 ऑक्टोबर 2017). इसिसच्या अतिरेकी कारवायांची पाळेमुळे त्यांच्या स्वत:ला झोकून देऊन लढण्याच्या आणि गैर सुन्नी जनतेवर नृशंस अत्याचार करण्याच्या मानसिकतेत आहेत. ही त्यांनी कुराणाच्या लावलेल्या अर्थानुसार आहे. तसे वास्तवही होते. कुराणातील तात्कालिक संदर्भ असलेल्या आयतांना सुमारे दीड हजार वर्षांनंतर अमलात आणण्याची ही मानसिकता होती. ते आजच्या घटकेला योग्य आहे काय किंवा योग्य ठरेल काय हा सारासार विवेक त्यांनी केला नाही.

इसिसने डोके वर काढले

इसिस इतिहासजमा झाली असे म्हणता येण्यापूर्वीच जगात अनेक ठिकाणी अतिरेकी घटना घडून येत आहेत. त्यांची जबाबदारी इसिस घेते आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या निवडणुकांची तयारी आणि मतदार नोंदणी सुरू आहे. त्यातील एका मतदार नोंदणी केंद्रात, खोस्त या गावी आत्मघातकी हल्ला होऊन एका मशिदीच्या आवारातच दि. 6 मे रोजी 13 लोक मारले गेले, तर 33 लोक जखमी झाले. त्यापूर्वी दि. 22 एप्रिल रोजी एका आत्मघातकी हल्ल्यात साठ लोक मारले गेले, तर शंभराहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त काबुलमधून आले होते. अतिरेकी कारवायांची ही व्याप्ती केवळ अफगाणिस्तान, इराक यासारख्या अस्थिर मुस्लीम देशांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. रविवार, दि. 13 मेला पॅरिसमध्ये चेचनियन मूळ असलेल्या 20 वर्षांच्या मुस्लीम तरुणाने गर्दीत चाकूचे वार करीत एकाचा खून केला, तर चार इतर लोकांना जखमी केले. त्यानंतरच्या कारवाईत तो मारला गेला. खामझत नावाचा हा तरुण फ्रान्सच्या पूर्व भागात, स्ट्रासबर्ग येथे मोठा झाला होता. या भागात चेचन्यातून आलेल्या मुस्लिमांची मोठी वस्ती आहे. एकंदरीत झालेल्या प्रकाराची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे (दि. हिंदू, दि. 14 मे.) फ्रान्समध्ये मोकळया वातावरणात वाढलेल्या या तरुणाच्या मनात काफिरांविषयी द्वेष किती ठासून भरला असेल ते लक्षात यावे. तसेच स्ट्रासबर्गच्या मुस्लीम वसाहतीत कोणत्या प्रकारचे धार्मिक विद्वेषाचे वातावरण असावे, याची कल्पना करता येते. घरचे किंवा अंतस्थ अतिरेकी (Home grown jihadi) युरोपात तयार होत आहेत. त्यामागची प्रेरणा इसिसची आहे. तसेच त्या तरुणाने व्यक्तिगत स्तरावर जरी काफिरद्वेषापोटी तो हल्ला केला असला, तरी इसिसला त्याची फुकटात जबाबदारी घ्यायला काय होते?

त्याच वेळी अतिपूर्वेस इंडोनेशियामध्ये इसिसच्या विचारांनी भारलेल्या एका अतिरेकी कुटुंबाने सुराबाया या ठिकाणी तीन चर्चवर हल्ला करून कमीत कमी 13 लोकांना यमसदनी पाठविले, तर डझनावरी लोकांना जखमी केले. दि हिंदूत आलेल्या बातमीप्रमाणे (दि. 14  मे) एकाच कुटुंबातील आई, वडील, 9 व 12 वर्षांच्या दोन मुली आणि 16 व 18 वर्षांचे दोन मुलगे यांनी मिळून हे तीन बाँबस्फोट घडवून आणल्याची बातमी होती. हे कुटुंब सीरियातून पळून आले होते. लगेच दुसऱ्या दिवशी एका कुटुंबाकडून तसाच हल्ला घडविण्यात आला. ती दोन्ही कुटुंबे इसिसची विचारसरणी (Ideology) पाळणारी संस्था, जमा अशारूत दौलाह या संघटनेची सदस्य होती. दि. 13 व 14 मेच्या हल्ल्यांची जबाबदारी इसिसने घेतली आहे. इंडोनेशियातील अतिरेकी अमन अब्दुरहमान हा जरी सध्या तुरुंगात असला, तरी गेल्या दोन वर्षांपासून - म्हणजे इसिसची पिछेहाट सुरू झाल्यानंतर, इंडोनेशियात घडलेल्या अतिरेकी कारवायांमागे त्याचा हात असल्याचे उघड झाले आहे.

तिकडे जलालाबादमध्येही अतिरेक्यांनी प्रशासकीय इमारतीवर हल्ला चढविला. दुपारी एकच्या सुमारास कार बाँबचा स्फोट केला. अतिरेक्यांनी अफगाण सुरक्षा दलाच्या जवानांशी 4 तास झुंज दिली. कार बाँबस्फोटात तीन कर्मचारी व काही इतर नागरिक मारले गेले व जखमी झाले. काबुलच्या पूर्वभागात असलेला जलालाबाद व आसपासचा परिसर इसिसचा पराजय होण्याच्या पूर्वीपासून इसिसच्या प्रभावाखाली असल्याचे ज्ञात होते. हा भाग अबू बक्र बगदादीच्या खिलाफतीचा नसला, तरी इसिसशी संलग्न होता. याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे.

भारतातच इसिसचा प्रसार करणाऱ्या, विशेषत: सुन्नी मुस्लीम तरुणांना इसिसकडे ओढणाऱ्या फिलिपिन्समधील महिलेला पकडण्यात आले असून राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) तिची कसून तपासणी व विचारपूस करण्यास मनिला, फिलिपिन्सला जाऊन आली. तामिळनाडूतील आणि कर्नाटकातील काही तरुण तिच्या संपर्कात होते. या महिलेचे नाव कारेन आईशा हमिदोन असे सांगण्यात आले. ती इतर अनेक भारतीय मुस्लीम तरुणांच्या संपर्कात होती. ती फेसबुक, व्हॉट्स ऍप इ.वरून तरुणांना भारित करून अतिरेकी कारवाया करण्यासाठी प्रेरित करत होती.

काफिरद्वेषाची (Kaphirophobiaची) शिकवण

अबु बक्र बगदादीने अल कायदाच्या दोन पावले पुढे जाऊन स्वत:ची खिलाफत जाहीर केली. त्यांच्या अतिरेकी संघटनेने आर्थिक जाळे मजबूत विणले. तसेच आजच्या काळाला धरून संपर्क माध्यमांतून प्रचार व प्रसार यंत्रणा उत्तम रितीने बांधली. सुरुवातीला त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत मजबूत होती, इतकी की युरोपातील देशांना एकत्र येऊन Financial Action Task Force या नावाची वेगळी यंत्रणा स्थापन करून इसिसच्या आर्थिक नाडया आवळण्याची आवश्यकता भासली. विशेष म्हणजे पाकिस्तानातून अतिरेकी कारवायांसाठी जमा होणाऱ्या निधीवरही ही संघटना लक्ष ठेवून होती. युरोपातून अतिरेकी कारवायांसाठी होणाऱ्या मदतीवर आळा घालण्याचे काम ही यंत्रणा करते. (दि हिंदू, 9 मे.) एकीकडे लुटुपुटूचे खिलाफतीचे साम्राज्य धुळीस मिळालेले आणि अतिरेक्यांच्या आर्थिक नाडया आवळल्या जात असताना केवळ आठवडयाभरात काही देशांमधून इसिसच्या कारवाया, बाँबस्फोट इ. कसे घडतात, याचे मर्म समजून घेतले पाहिजे. काफिरद्वेषातून ते होते. इसिसची खिलाफत ही एखाद्या देशाचे अथवा टगेगिरी करून स्वत:चे राज्य निर्माण करणाऱ्या गुडांचे संघटन नव्हते. त्याला वहाबी आणि इतर अतिरेकी विचारधारांनी गेल्या काही दशकांपासून योजनाबध्द रितीने बांधत आणलेली विचारसरणी कारणीभूत होती. त्याचे प्रमुख मुद्दे इस्लामचे, विशेषत: सुन्नी इस्लाममध्ये, पायाभूत मानले गेले आहेत. काफिरांच्या आणि मूर्तिपूजकांच्या कत्तली कराव्यात, असे पवित्र कुराणात अनेक ठिकाणी आदेश आहेत. या धर्माज्ञा त्या वेळच्या परिस्थितीला कदाचित योग्य ठरल्या असतील, तरी त्या आजच्या परिस्थितीतही तितक्याच खऱ्या आहेत, आवश्यक आहेत हे विशेषत: तरुणांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न भारलेपणात (Radicalisationमध्ये) आणि काफिरद्वेषात (kafirophobiaमध्ये) रूपांतरित होतो. अनेक सुन्नी देशांकडून, खासकरून आखाती देशांच्या पेट्रोडॉलर्सच्या साहाय्यामधून गैर इस्लामी देशात योजनाबध्द तऱ्हेने हा काफिरद्वेष फैलावण्याचे काम केले जात आहे. भारत, फिलिपिन्स, ऑॅस्ट्रेलिया आणि इतर गैर इस्लामी देशांतून त्याची लागण झाली आहे.

सर्वांसाठी अल्ला एकच असून पै. महंमद हे शेवटचे प्रेषित आहेत ही श्रध्दा, तसेच गैर मुस्लिमांना कोणत्याही मार्गांनी इस्लाम स्वीकारायला लावून सर्व जगात इस्लामचा प्रसार हे मुस्लिमांचे आद्य कर्तव्य ठरते, हा इस्लामचा पायाभूत सिध्दान्त आहे. त्यामुळे परधर्म वर्ज्य, परधर्मद्वेष आणि गैर मुस्लिमांना नष्ट करण्याची मानसिकता प. कुराणातील आयातींना धरून या मुस्लीम तरुणांच्या मनावर बिंबविली जाते. (सा. विवेक, 14 फेव्रु. 2016). त्यातही हिंदू, बौध्द, जैन यासारखे मूर्तिपूजक धर्म हे सुन्नी-वहाबी मुस्लिमांच्या आत्यंतिक द्वेषाचे लक्ष्य ठरतात. म्हणूनच कारेन आईशासारखी भारलेली फिलिपिनी महिला भारतीय मुस्लीम तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी उद्युक्त करू शकते. भटकळ बंधू व इंडियन मुजाहिद्दीनसारख्या संस्था स्थापन करणारे तरुण त्या प्रचाराला बळी पडतात. इस्लामव्यतिरिक्त धर्म ईश्वर, अल्लाकडे जाण्याचे सारख्याच महत्वाचे मार्ग आहेत, याचा त्यांना विसर पडतो.

सामूहिक अन्यायाची अतिरेकी जाणीव

भारतात आणि इतर अनेक देशांमधून मुस्लिमांशी बोलताना मला एक जाणवले की त्यांना आपल्यावर जगाने फार अन्याय केल्याची भावना असते. ती सामूहिक असते. गैर मुस्लीम देश हे त्यांना दार- उल-हर्ब - शत्रूंचे देश वाटतात. तेथे राहावे लागणे हाच त्यांना सामूहिक अन्याय वाटतो. ते देश दार-उल-इस्लाम करण्याची त्यांची इच्छा असते. तसे करणे ते कर्तव्य मानतात. त्याच वेळी जिथे जिथे इस्लाम पसरला, तेथे स्थानिकांच्या कत्तली आणि संस्कृती नामशेष करतांना किती सामूहिक अन्याय झाला असेल हे ते सोयिस्कररित्या विसरतात. सामूहिक अन्यायाच्या जाणिवेतून छोटया छोटया घटनांमुळे मुस्लीम समाज उसळून उठतो. किंबहुना असे घडून येण्यासाठी त्यांनी तयारी करून ठेवलेली असते. त्यांना अतिरेकी कृत्ये करण्यास भडकविणे सोपे असते. त्याचमुळे मुस्लीमबहुल वस्त्या या दंगलींची व अतिरेकी कारवायांची केंद्रे ठरतात. अन्यायाचा सामूहिक प्रतिकार करण्याच्या भावनेत या हिंसक प्रवृत्तीचे मूळ असते. या प्रवृत्तीतूनच इसिसची पाळेमुळे सर्वत्र पसरली आहेत.

खिलाफत आणि स्वर्गाचे दार

राज्याचा धर्मप्रमुख व राजप्रमुख अशी दोन्ही जबाबदाऱ्या असणाऱ्या खलिफाला सर्व जगात इस्लाम प्रस्थापित करण्याचा संदेश आहे. पै. महंमदांनी मदिना वास्तव्यात इस्लाम स्वीकारण्यासाठी तत्कालीन इतर राजांना पत्रेही पाठविली होती. पण चौदाशे वर्षांपूर्वीची एकछत्री, हुकूमशाही राजवट आजच्या युगातही स्थापन करण्याची स्वप्ने पाहणारे तरुण अबू बक्रच्या आवाहनाला प्रतिसाद देतात. इंग्लंड ते ऑॅस्ट्रेलियापर्यंतच्या देशांमधून कधी उघडपणे, तर कधी चोरून लपून खिलाफतला सामील होतात. हे वैचारिक गुलामगिरीचे द्योतक आहे. प्रत्येक खलिफा अगदी सद्गुणांचा पुतळा, अत्यंत न्यायी असेलच असे मानणे ही सामाजिक विकृती वाटते. सर्व जगात केवळ खिलाफत स्थापन झाल्यास जगात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित होईल हे मानणे बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण ठरते. इसिसला सामिल होणाऱ्यांनी तशी बौध्दिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. सर्व जगाने इसिसच्या राज्यात चालणारी नृशंस कृत्ये पाहिली आहेत. प. कुराणाच्या आधारे त्या कृत्यांचे समर्थन होताना पाहिले. आता जे इसिसची पाठराखण करतात, आत्मघातकी-अतिरेकी कृत्ये करतात, ते मनोरुग्ण आहेत. त्यांना धर्माचरण, मानवता, शांतता-इस्लाम कळलेलाच नाही. अशांच्या प्रचाराला बळी पडणारे तरुण इसिसचे स्थानिक शिलेदार बनत आहेत. त्यांना आता त्यासाठी इराक-सीरियाला जाण्याची आवश्यकता नाही. इसिसची पाळेमुळे अशी धार्मिक द्वेषावर आधारलेली आहेत. जे अधिक प्रमाणात भारले जाऊन तीव्र मनोरोगाचे शिकार झाले आहेत, त्यांना आत्मघातकी हल्ल्यांनंतर लगेच स्वर्गाचे दार उघडण्याची शाश्वती दिलेली असते. खरे तर ते पवित्र कुराणाच्या शिकवणीच्या विरोधात आहे. पण मुल्लाशाहीने स्वर्गाचे दार तत्काळ उघडण्याची शाश्वती सातत्याने बिंबविल्यामुळे ते आत्मघातास प्रवृत्त होतात.

सर्व खिलाफत जगात कधी काळी पसरेल हे जरी सांगता आले नाही, तरी धर्मांधता आणि काफिरद्वेष यांची पाळेमुळे सुन्नी-वहाबी विचारसरणीने जगातील अनेक देशात पक्की रोवली आहेत. ती उखडून काढण्यासाठी तसाच वैचारिक लढा योजनाबध्द रितीने आखण्याची आवश्यकता आहे. येत्या तीन दशकांच्या काळात इस्लाममध्ये बदल घडविण्यासाठी 'इस्लाम 2047'च्या दिशेने पावले टाकली पाहिजेत.

ddrpvpathak@yahoo.co.in

9975559155