अगदी 70 वर्षांची एक ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना डॉ. जयश्री राजगोपालन षोडशीच्या उत्साहात हजारो वर्षांपूर्वीच्या लेण्यांमधील शिल्पांतून नृत्यमुद्रा कशा प्रकट झाल्या आहेत हे सांगताना सहजच तशा मुद्रा करून दाखविते. पंचाहत्तरीचे विख्यात सिनेदिग्दर्शक पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन नृत्यांवरच्या आपल्या माहितीपटाची माहिती देताना आपल्या लहानपणीच्या कलासंस्कारांत रमून जातात. नृत्यासाठी प्रकाशयोजना कशी आणि किती महत्त्वाची आहे याचे पैलू उलगडून दाखविताना आपले गुरू गौतम भट्टाचार्य यांचे स्मरण करताना संदीप दत्त गहिवरून जातात. कला पत्रकार सुहानी सिंग यांना छोटया विद्यार्थिनीने प्रश्न विचारताच आपण आई उमा डोग्रा यांच्याकडून प्रत्यक्ष कथ्थक शिकलो, हे सांगताना त्यांच्या शब्दांत कलेबाबतचा अभिमान झळकत राहतो. कला समीक्षक कुणाल रॉय हे सजगपणे नृत्याच्या पैलूंवर चर्चा करताना माध्यमांनी केलेला अन्याय मांडतात आणि ऐकणाऱ्यांच्या काळजाला घरे पडतात. हे सगळे घडवून आणणाऱ्या ओडिसी कथ्थक नृत्यांगना पार्वती दत्ता इंग्लिश-हिंदी भाषेचे पूल साधत आपल्या शिष्यांना, कलारसिकांना अभिरुचीच्या वेगळयाच पातळीवर घेऊन जात असतात.
ही दृश्ये आहेत 29 एप्रिल या जागतिक नृत्य दिनानिमित्त औरंगाबाद येथे महागामी गुरुकुलात झालेल्या चार दिवसीय कार्यक्रमांमधली. 29 एप्रिल हा दिवस नृत्य दिवस म्हणून 1982पासून जगभरात साजरा केला जातो. बॅले नृत्याचे महान कलाकार जीन जॉर्जेस नोव्हेरे याच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
आपल्याकडे तर नृत्याची परंपरा अगदी शिवाच्या तांडव नृत्यापासून सांगितली जाते. शिवाय जागतिक नृत्य दिवस 29 एप्रिल आहे, या काळाशीही भारतीय संदर्भ जुळून येतो. हा काळ जवळपास वसंत ॠतूचा काळ आहे. आपल्याकडे तसेही वसंत उत्सव साजरा करण्याची परंपरा आहेच.
औरंगाबादेत 21, 22, 28 व 29 एप्रिल असे चार दिवस हा जागतिक नृत्य दिवस साजरा झाला. केवळ नृत्याचे सादरीकरण इतक्यापुरता हा महोत्सव असला असता, तर त्याची फारशी दखल घेण्याचे काही कारण नव्हते. पण या निमित्ताने नृत्याच्या विविध पैलूंवर त्या त्या क्षेत्रातील विद्वान बोलावून चर्चा घडवून आणल्या गेल्या, हे विशेष.
ज्येष्ठ भरतनाटयम नृत्यांगना डॉ. जयश्री राजगोपालन यांनी जुन्या लेण्यांमधील शिल्पांतून ज्या नृत्य मुद्रा प्रकट होतात, त्यांचे सप्रयोग स्पष्टीकरण सोप्या भाषेत मांडले. यातून आपल्या नृत्यपरंपरेचे भक्कम पुरावेच समोर आले. अगदी आधुनिक काळात शंकराचार्यांनी 1980मध्ये महाराष्ट्रात साताऱ्याला मंदिर निर्माण करून त्यावर नृत्यमुद्रा कशा आवर्जून कोरून घेतल्या, ही माहिती त्यांनी दिली तेव्हा प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. कारण हे मंदिर महाराष्ट्रात असून केवळ धार्मिक कर्मकांड करणाऱ्या शंकराचार्यांकडून अशी कलाविषयक उत्तम कृती व्हावी, हे जरा अनपेक्षित होते. पुढे अदूर गोपालकृष्णन यांच्याही विवेचनात नृत्यकलेच्या संगोपनात मंदिरांचा अतिशय मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले.
जागतिक कीर्तीचे प्रकाशयोजनाकार संदीप दत्त यांचे अनुभव विस्मयचकित करणारे होते. आधुनिक काळात प्रकाशयोजनेचा वापर करून नृत्याच्या हावभावांना कसा उठाव देता येतो, हे त्यांनी सप्रमाण सिध्द करून दाखविले. आदल्याच दिवशी अष्टप्रहर हा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम या महोत्सवात सादर झाला होता. या कार्यक्रमास संदीप दत्त यांची प्रकाशयोजना लाभली होती. पहाटेच्या रागांसाठी आल्हाददायक उजळ प्रकाशयोजना, दुपारच्या रागांसाठी तीव्र प्रकाश, संध्याकाळच्या रागांसाठी काळोखाची छाया दर्शविणारी हुरहुर लावणारी, रात्रीच्या पहिल्या प्रहराची फिकी निळसर छटा असलेली, उशिराच्या प्रहराची गदड निळया रंगाची अशा कितीतरी छटा त्यांनी दाखविल्या होत्या. प्रकाशयोजनेत एलईडी दिव्यांचा प्रकाश नृत्याला कसा हानिकारक आहे, हे बारकावे त्यांनी सप्रमाण दाखविले.
सुहानी सिंग या कला पत्रकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी नृत्यविषयक कार्यक्रमांचे वार्तांकन करताना येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने यांची सविस्तर चर्चा केली. एक पत्रकार म्हणून केवळ पारंपरिक नृत्यच नव्हे, तर आधुनिक प्रकारच्या नृत्यांचीही कशी दखल घ्यावी लागते हेही त्यांनी विशद केले. ज्येष्ठ कलाकारांशी वागताना किती काळजी घ्यावी लागते, त्यांच्याकडून माहिती काढून घेताना स्वत:चे असलेले या विषयातील ज्ञान कसे उपयोगी पडते हेही त्यांनी सांगितले.
पद्मविभूषण अदूर गोपालकृष्णन यांचे दोन माहितीपट या महोत्सवात दाखविले गेले. महान कथकली कलाकार कलामंडलम गोपी यांच्यावरचा माहितीपट अतिशय महत्त्वाचा आहे. कथकली कलाकारांना चेहऱ्याची रंगरंगोटी (मेक अप) करण्यासाठी अक्षरश: चार चार तास लागतात. त्यांची पूर्वतयारीच कित्येक तास चालते. गोपी यांच्यावरील हा माहितीपट करण्यासाठी अदूरजींनी अतिशय मेहनत घेतली. इतकेच नाही, तर चित्रीकरण काळातही या कलेचे पावित्र्य जपले जाईल याकडे कटाक्ष ठेवला. एक कलाकार एकदा मद्यपान करून आलेला लक्षात आल्यावर त्यांनी त्या संपूर्ण दिवसाचे चित्रीकरण स्थगित ठेवले. त्या कलाकाराला आपली चूक कळल्यावर पुन्हा कुणी तसे वागले नाही.
दुसरा माहितीपट मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारावर बेतलेला आहे. मोहिनीअट्टमच्या चार मान्यवर गुरू आणि त्यांच्या शिष्या असा हा माहितीपट आहे. हे नृत्य मंदिरात जसे सादर केले जाते, तसेच चित्रीकरण अदूरजींनी केले आहे. विशेष म्हणजे हे माहितीपट मल्याळम भाषेतच आहेत. आपल्याकडे मातृभाषेत काही करायचे म्हणजे आपण दुय्यम दर्जाचे समजतो. पण अदूरजींसारखी माणसे आपल्या मातृभाषेत, आपल्या संस्कृतीत आपल्या कलाप्रकारांतूनच आपली कलाकृती निर्माण करतात आणि त्याला जागतिक मान्यता मिळवून देतात, हे मराठी माणसांनी लक्षात घेण्यासारखे आहे.
अरुण खोपकर यांनी भरतनाटयम नृत्यांगना लीला सॅमसन यांच्यावर केलेला माहितीपट, तसेच सुप्रसिध्द ओडिसी नर्तक गुरू पद्मविभूषण केलुचरण महापात्रा यांच्यावरील माहितीपटही या महोत्सवात दाखविण्यात आले.
चर्चा-माहितीपट याबरोबरच नृत्य सादरीकरणाचे दोन सुंदर प्रयोग महागामी गुरुकुलाने रसिकांसमोर ठेवले. पार्वती दत्ता यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी 'अष्टप्रहर' या नावाने कथ्थकचे सुंदर सादरीकरण केले. तसेच 'उत्कल क्रांती' नावाने ओडिसी नृत्याचेही सादरीकरण झाले. ओडिसी नृत्याच्या सादरीकरणात ओडिशाच्या पारंपरिक मर्दलम म्हणजेच पखावज (मृदंग)सह सादर होणारा नृत्यप्रकार सादर झाला. ओडिसी नृत्यात पल्लवी हा नृत्यप्रकार म्हणजे शुध्द कला समजली जाते. त्याचे सादरीकरण करताना तरुण नृत्यांगना त्यातील भाव समजून नृत्य करत होती, हे विशेष. अन्यथा नृत्य म्हणजे केवळ यांत्रिक कवायत ठरू शकते. त्यातून रसिकांना आनंद मिळणे शक्य नाही.
पार्वती दत्ता यांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी या सादरीकरणात मराठी संतांच्या रचनांचाही अंतर्भाव केला. ज्ञानेश्वरांची रचना 'चंद्र तेथे चंद्रिका । शंभु तेथे अंबिका । संत तेथे विवेका । असणे की जे' ओडिसी नर्तनात प्रत्यक्ष समोर येणे ही एक वेगळीच अनुभूती होती. चांगली कला नेहमीच प्रदेशाचे, भाषेचे, काळाचे बंधन ओलांडून पुढे जाते हे खरे आहे.
रसिकांनी मोठया विद्वानांकडून चार दिवस जी चर्चा ऐकली, त्याचा अनुभव कथ्थक व ओडिसी नृत्याच्या सादरीकरणातून रसिकांना घेता आला.
जागतिक नृत्य दिवसानिमित्त जागोजागी असे कार्यक्रम व्हायला हवेत. पण तसे फारसे घडलेले दिसत नाही. माध्यमांनीही अशा कार्यक्रमांना पुरेशी प्रसिध्दी दिलेली दिसत नाही. बहुतांश सामान्य रसिक नृत्यसाक्षर नसल्याने त्यांना आपल्याकडच्या नृत्यप्रकारांकडे खेचून आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत.
केवळ शास्त्रीयच नव्हे, तर लोकनृत्यांचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. त्यांचेही जतन होणे गरजेचे आहे. जागतिक नृत्य दिवसाच्या निमित्ताने आपण सगळयांनी हा विचार करायला हवा. शालेय पातळीवर आता मोठया थाटात, उत्साहात, बऱ्यापैकी खर्च करून स्नेहसंमेलने साजरी केली जातात. त्यासाठी मोठी बिदागी देऊन बाहेरून कोरिओग्राफर - नृत्यशिक्षक बोलाविले जातात. यापेक्षा शालेय अथवा महाविद्यालयीन पातळीवर नियमित स्वरूपात नृत्याचे शिक्षण दिले जावे, जेणेकरून विद्यार्थ्यांची कलाविषयक जाणीव प्रगल्भ होत जाईल.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद
9422878575