कुकडेश्वरचा देव..!

विवेक मराठी    06-Apr-2018
Total Views |

 

माझ्या आठवणीतलं जुन्नर आजच्या जुन्नरपेक्षा कितीतरी वेगळं आहे... ते आहे विटांनी बांधलेल्या भल्यामोठ्या वाड्यांचं. लाल लाल कौलांच्या टुमदार घराचं. अगत्यशील गावरान माणसांचं. फारशी गर्दी नसलेल्या पेठांचं. आठवडा बाजाराच्या रंगीबेरंगी गर्दीचं. जुन्नरच्या काळ्या मातीत पिकलेल्या रसरशीत फळांच्या अन ताज्या भाजीपाल्याच्या बाजाराचं. गढीभोवती उडणाऱ्या पांढऱ्या करकरीत धुळीचं. चार आणे तासाने मिळणाऱ्या भाड्यांच्या सायकलींचं. गदारोळ उसळलेल्या कळकट एसटी स्टँडाचं, दुतर्फा बाभळीच्या विरळ सावलीने झाकलेल्या लेण्याद्रीच्या निरुंद खडबडीत मार्गाचं...

या अवघ्या चित्राच्या पाठीशी उभा ठाकलेला शिवनेरीचा तो लेण्यांनी पोखरलेला प्राचीन दुर्ग तेवढ्याच प्राचीन जुन्नरावर कधीकाळीचा सावली धरून आहे. शिवनेरीच्या कडेलोटाखालील रस्त्याने पश्चिमेला निघालं की आपटाळ्याला जाणाऱ्या रस्त्याला आपण लागतो. या रस्त्याला दोन ठिकाणी फाटे आहेत. एक येणेऱ्याला जातो, तर दुसरा घाटघरजवळून अंजनावळ्याच्या दिशेला जातो. मुख्य वाट मात्र वीसेक मैल चालून थेट नाणेघाटात उतरते. या वाटेच्या नेमक्या मध्यावर चावंडचा धिप्पाड दुर्ग आहे. चावंडवाडी ओलांडून पुढे गेलं की एक लहानसा पूल लागतो. तो ओलांडला की गाडीरस्त्याशी फटकून एक छोटी वाट डावीकडे वळते.  

पूर्वी ही वाट दगडाधोंड्यांची होती. खाचखळग्यांनी भरून वाहत होती. साधं चालणंही मुश्कील व्हावं अशी दुष्कर होती. वाटेच्या दोहो बाजूंना लाल मातीतलं गर्द रान होतं. शेजारून वाहणाऱ्या कुकडीच्या धारेचा गारवा या रानात दुपारचाही टिकून असायचा. उन्हं उतरू लागली, की पलीकडल्या शंभूच्या शिखराची सावली रानावर पसरायची. गारवा धरून ठेवायची. अशा वाटेवरून अर्धा-पाऊण मैल चालून गेलं की गर्दावल्या रानात लपलेलं भुरकट काळ्या पाषाणात रचलेलं एक देखणं, लहानखुरं मंदिर दृष्टीस पडायचं. इतस्ततः वाढलेलं रान. डोकी उंचावलेली झुडपं. सावलीदिवलीचा खेळ मांडलेले माथ्यावरचे भले दांडगे वृक्ष. मातीचा जाणवेल न जाणवेलसा वास. मधूनच रानाला गुदगुल्या करीत जाणारी वाऱ्याची झुळूक. या साऱ्याला मधूनच छेद देणारे पक्ष्यांचे स्वर. या निगूढ वातावरणात देवाधिदेव महादेव ध्यानस्थ बसलेले असायचे. त्यांच्या अस्तित्वाची स्पंदनं सजग मनाला अधूनमधून हलकेच जाणवायची.

देऊळ तसं लहानच म्हणायचं. आकाराने आणि शिल्पवैभवाच्या दृष्टीनेही. लहान म्हणजे अंबरनाथच्या अन सिन्नरच्या गोंदेश्वराच्या तुलनेत लहान. मात्र त्या तशा आडरानात हे इतकं देखणं मंदिर कुणी उभारलं असेल, असा विचार करायला लावणारं. मी ८५ साली पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा ते पार कोलमडू निघालं होतं. छत अर्धं कोसळलं होतं. दाराच्या दगडी कमानी उचकटल्या होत्या. आतले बाहेरचे खांब कलले होते. भिंतींच्या सांदीसापटीतून झाडांनी मुळं धरली होती. मंदिराच्या मंडोवरावरील शैवशिल्पं जणू हे सारं कोसळायची वाट पाहत होती. हे मंदिर काहीसं वेगळं आहे. वेसर शैलीचा प्रभाव असलेली हेमाडपंती मंदिरं ही सहसा पंचभूम वा सप्तभूम - म्हणजेच पाच वा सात मजली असतात. हे मंदिर त्रिभूम आहे. कर्ण आणि दोन उपरथ अशी गर्भगृहाची बाह्य रचना आहे. सभामंडप आणि गर्भगृह यांमध्ये अंतराळ आहे. कोसळणारं पर्जन्यजल वाहून नेण्यासाठी सलिलांतरं आहेत. आपल्या आवडत्या गणगोतांसमवेत शिवपार्वती आहेत. शिवाचे लाडके, अस्थिपंजर असलेले शृंगी-भृंगी आहेत. शिवपंचायतनाचा अविभाज्य भाग असलेला विष्णू वराहरूपात आहे. देवीरूपं आहेत. ब्रह्म, सूर्य यांच्या प्रतिमा नाहीत. मात्र त्या निश्चित होत्या. कालौघात त्या इतस्ततः गेल्या, हे नक्की. शिवतत्त्वज्ञान मूर्त रूपात सांगणारं हे देखणं मंदिर या आडबाजूच्या रानात का उभं राहिलं असावं, हा प्रश्न नकळत मनी उभा राहतो. तापसाचं तपश्चर्यास्थळ कसं असावं हे सांगताना ज्ञानोबा माउली म्हणतात - 'होआवा निगूढ मठ अथवा शिवालयो'... कुकडेश्वर नेमकं तसंच आहे!

कुकडेश्वराचं हे सुरेख मंदिर बहुधा अकराव्या-बाराव्या शतकात बांधलं गेलं. दहाव्या शतकात राष्ट्रकूट सत्ता लोपेपर्यंत लयन निर्मितीची कला अस्तित्वात होती. वेरूळचं विख्यात कैलास लेणं ही जणू राष्ट्रकूटांनी जगास दिलेली देणगी आहे. मात्र बहुधा त्यानंतर हळूहळू लेणी कोरण्याची ही कला लोपत चालली. लयनमंदिरांची जागा घडीव दगडी चिऱ्यांच्या बांधकामांनी घ्यायला सुरुवात झाली. देवगिरीच्या विख्यात यादव साम्राज्याचा मुख्य प्रधान हेमाद्रीपंत. त्या काळात त्याच्या नावाने एक शिल्पशैली नावारूपास आली. हेमाडपंती शिल्पशैली. दोन दगडांच्या मधल्या सांध्यात चुना न वापरता दगडांवर दगड रचून उभी केलेली अशी अगणित शुष्कसांधी मंदिरं महाराष्ट्रात जागोजागी आढळतात. हे सारेच चिरे आतल्या बाजूने एकमेकात गुंतवलेले असतात. बाहेरून दिसताना प्रत्येक चिरा वेगळा, मात्र सारंच बांधकाम आतल्या बाजूने जणू एकजीव झालेलं असतं. त्यामुळे ते अभंग राहतं, अडीग राहतं. मात्र याच पद्धतीची, उत्तम शिल्पवैभवाने नटलेली मंदिरं शिलाहारांनी निर्मिली. शिलाहारांचा काळ यादवांच्याही अगोदरचा. अर्थ असा की, ही शुष्कसांधी शिल्पशैली हेमाद्रीपंडिताच्या कितीतरी आधीपासून अस्तित्वात होती. नाव जरी हेमाडपंतांचं लागलं, तरी तो जो कुणी अनाम शिल्पी, ज्याने ही शैली शोधून काढली, तो इतिहासास अज्ञातच राहिला आहे. निदान आजवर तरी..!

आज हे मंदिर महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याच्या प्रयत्नाने पुन्हा उभं राहिलं आहे. या तऱ्हेचा प्रयोग महाराष्ट्रातील मंदिरांच्या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणेतरी पहिल्यांदाच झाला आहे. या मंदिराचा प्रत्येक दगड काढून वेगळा केला गेला. जेथे गरज होती तेथे नवीन घडवून लावला गेला. सभामंडपातील खांब घडवले गेले - मात्र हेमाडपंती नव्हे, तर नव्या पद्धतीने, चुना वापरून पुन्हा सांधले गेले. नेमकं जुन्यासारखं नव्हे, मात्र कोसळू पाहणारं हे मंदिर पुन्हा नव्या दिमाखाने उभं राहिलं आहे.  इरादे नेक असतील, स्वतःच्या वारशाचा अभिमान असेल तर पुरातत्त्व खात्याचे अधिकारी हे असंही काम करू शकतात, याचं कुकडेश्वर हे उत्तम उदाहरण आहे. हे असं वारंवार, जागोजागी घडावं, महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या लेण्यांना, मंदिरांना अन् विख्यात दुर्गांना पुनश्च गतवैभव प्राप्त व्हावं अन त्या  वैभवाचा डंका चहूदिशा गर्जावा, असंच सरतेशेवटी म्हणावंसं वाटतं..!