नभासारिखे रूप या राघवाचे।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे।
गेल्या लेखात रामनवमीच्या निमित्ताने आपण मनाच्या श्लोकातून होणार्या श्रीरामाचे शब्ददर्शन घेतले. आता या प्रस्तुत लेखात आपण आणखी एका विषयाची माहिती घेऊ. मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोकावर क्रमश: विवरण वा निरूपण असे या लेखमालेचे स्वरूप नाही, कारण तसे केले तर २०५ लेख लिहावे लागतील. आपण ठरावीक लेखांमध्ये मनाच्या श्लोकांचा विषयानुरूप समग्र विचार करणार आहोत. प्रस्तुत लेखात आपण ‘जनी सर्व सुखी असा कोण आहे?’ या चरणाचा, म्हणजेच समर्थांच्या मनाच्या श्लोकातील सुख-दु:ख चिंतनाचा विचार करू या.
समर्थांच्या मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. १०, ११, १२, २५ आणि १६१ अशा पाच श्लोकांत मानवी जीवनातील सुख-दु:खाचा विचार आढळतो. या पाचपैकी श्लोक क्र. १०मध्ये समर्थ एक सनातन सत्य प्रश्न रोखठोकपणे विचारतात. तो प्रश्न म्हणजे – जनी सर्व सुखी असा कोण आहे? समर्थांच्या मते प्रपंच हा दु:खमूलक असून त्यामध्ये सर्वसुखी माणूस भेटणे शक्य नाही. कारण प्रपंच अपूर्ण व अशाश्वत आहे. ‘या प्रपंचाऐसे दु:ख। आणिक नाही।’ असे म्हणत समर्थ श्रोत्यांचे मन परमार्थाकडे वळवण्याचा उपदेश करतात.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘केवळ माणूसच सुखासाठी धडपड करतो असे नाही, तर या सृष्टीतील सर्वच पशू, पक्षी, किडामुंगी सुखासाठी धडपडत असतात. ‘‘सुखाची अपेक्षा व सुखासाठी धडपड हे जिवाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. परंतु सुख म्हणजे नेमके काय? हे कोणालाच सांगता येत नाही. कारण सुखाची व्याख्या – कल्पनाही स्थळ, काळ, वय, स्थिती, ज्ञान यानुसार सारखी बदलत असते. जे लहानपणी सुखाचे वाटते, ते तरुण वयात सुखाचे ठरत नाही. कारण सुखाची कल्पना व अपेक्षा बदलते. बालपणी सागरगोटे, खेळणी, कागदी नावा, आईने दिलेला खाऊ, आईचे प्रेम हेच सुखाचे विश्व असते. तारुण्यात या गोष्टी सुखावह वाटत नाहीत, तर सायकल, स्कूटर, मित्रमैत्रिणींचा सहवास, चित्रपट, गाणी, खेळ या गोष्टी सुखाचा स्वर्ग वाटतात. पुढे नोकरी-धंदा सुरू झाल्यावर पैसा, प्रमोशन व प्रतिष्ठा या गोष्टीत सुख वाटू लागते. वृद्धापकाळी सुखाच्या कल्पना पुन्हा बदलतात. ईश्वरी चिंतन, तीर्थयात्रा, कथा, कीर्तन यांत गोडी वाटू लागते. मग पैसा, प्रतिष्ठा असूनही व्यर्थ वाटतात व ईश्वरभेटीची ओढ जीवन व्यापून टाकते. मग ‘दिन गेले भजनाविण सारे। बालपण रमण्यात गमविला। यौवनात धन लौकिक प्यारे। दिन गेले भजनाविण सारे।’ असा सतत खेद वाटू लागतो. काही वृद्धांना पैसा-संपत्ती असूनही मुले-सुना विचारत नाहीत, म्हातारपणीजवळ कोणीच नाही. ‘है भीड इतनी, पर दिल अकेला’ असे एकटेपण नकोसे वाटते. थोडक्यात काय, तर या जगात एकच एक अशी वस्तू, स्थान वा काळ नाही की जो सर्वांना सर्वकाळ सुखाचा वाटेल.
माणसाच्या या सनातन सुखाच्या शोधाबद्दल पाश्चात्त्य विचारवंतांनीही खूप चिंतन व लेखन केलेले आहे. अॅरिस्टॉटल या जगप्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने आपल्या नीतिशास्त्राच्या ग्रंथारंभीच म्हटले आहे की "All men desire happiness.'' ‘सर्व मनुष्य व प्राणिमात्र सुखाचीच अपेक्षा करीत असतात.’ आद्य शंकराचार्यांनीही आपल्या शतश्लोकी ग्रंथात सुखदु:ख विचाराचे चिंतन मांडले असून ते म्हणतात - ‘‘कोणीच दु:ख व्हावे असे म्हणत नाही, सर्वांची ओढ-प्रयत्न सुखासाठीच असतात.
पण या जगाचे जीवनाचे स्वरूपच असे आहे की येथे निर्भेळ, शाश्वत स्वरूपाचे सुख प्राप्त होणे शक्यच नाही. कारण जीवन अपूर्ण व अशाश्वत आहे. आज विज्ञानयुगात उपभोगाची, साधनांची प्रचंड विपुलता निर्माण झालेली आहे. रोज नव्या उपभोगाच्या सुखसोई निर्माण होत आहेत. पण पूर्वीच्या माणसापेक्षा-पिढीपेक्षा आजचा माणूस-पिढी अधिक सुखी आहे का? आज शयनगृहात एसी, वातानुकूलन यंत्रणा असते. सोई वाढल्या, पण आजचा माणूस सुखेनैव झोप घेतो का? प्रचंड पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती असूनही नव्या युगातील धावपळीत माणूस निश्चिंत झोप, सुग्रास जेवण आणि आरोग्य गमावून बसला आहे. जेवढ्या सुविधा सोई वाढल्या, तेवढ्याच नव्या व्याधी-रोग माणसाच्या पाठी लागलेले आहेत. विज्ञानयुग जसे वरदान ठरले आहे, तसेच ते शापही आहे. नव्या जीवनशैलीने नव्या पिढीला प्रचंड पैसा, समृद्धी आणि स्वातंत्र्य दिले, पण ती पिढी निसर्गसान्निध्याला, स्वस्थ जीवनाला आणि एकत्र कुटुंबातील एकमेकासाठीच्या त्यागातून मिळणार्या सुखाला वंचित झालेली आहे. आजी-आजोबांच्या सहवासात वाढण्याचा-विकसित होण्याचा-घडण्याचा आनंद मुलांना पाळणाघरात, बोर्डिंग स्कूलमध्ये कसा मिळणार? म्हणूनच समर्थ म्हणतात – जनी सर्व सुखी कोण आहे? हा प्रश्न शाश्वत सत्य प्रश्न आहे आणि ‘विचारी मना तूचि शोधुनी पाहे।’ असे समर्थ विचारी मनालाच शोधण्यास सांगतात. या प्रश्नाचे उत्तर समर्थ पुढील ओळीत - चरणात देतात. ते म्हणतात – ‘मनात्वाचि रे पूर्वसंचित केले। तयासारखे भोगणे प्राप्त झाले।’ समर्थांचे हे निदान आजच्या पिढीला योग्य वाटणार नाही. पण भारतीय चिंतन परंपरेतील ‘पुनर्जन्म’ या विचाराची त्याला पार्श्वभूमी आहे. ‘जैसी करणी वैसी भरणी।’ ‘जे पेराल तेच उगवेल’ हे निसर्गचक्राचे सनातन तत्त्व आहे. संतांच्या मते, ॠषिमुनींच्या मते आपण पूर्वजन्मात जे केले, त्याचेच फळ आपणास या व पुढील जन्मात सुख-दु:खाच्या रूपाने भोगावे लागते.
या श्लोकातील ‘पूर्वसंचित’ हा शब्द पूर्वजन्मातील पाप-पुण्य कर्माशी (Profit & Lossशी) संबंधित आहे. पाप-पुण्य म्हणजे तुम्ही केलेले सत्कर्म आणि पाप म्हणजे तुम्ही केलेली दृष्कृत्ये होय. Good & Bad या कल्पनाच व्यापक अर्थाने पाप-पुण्य होत! पूर्वसंचित संदर्भातच ‘नशीब’, ‘प्रारब्ध’, ‘नियती’ असे काही शब्द येतात. प्रयत्न व अपेक्षा यापेक्षा एखाद्याला जेव्हा खूप काही अधिक मिळते, त्याला ‘नशीब’ म्हणतात. ‘प्रारब्धयोग, विधिलिखित असेही म्हणतात. एखादा नामवंत व यशस्वी चित्रपट अभिनेता (उदा. अक्षयकुमार) प्रचंड परिश्रम घेऊन एखादा चित्रपट तयार करतो, पण तो खात्रीने त्या चित्रपटाचे यश ठरवू शकत नाही. अनेक उत्तम चित्रपट अपयशी का झाले? दिग्दर्शक, अभिनेते यांनी पूर्वी गाजलेल्या त्यांच्या चित्रपटाएवढेच परिश्रम केले, पण हुकमी यश मिळाले नाही. का? या कार्यकारणभाव न समजणार्या गोष्टीला पूर्वसंचिताचे फळ म्हणतात. हे फळ जेव्हा चांगले (यश) मिळते तेव्हा त्याला नशीब म्हणतात आणि हे फळ जेव्हा वाईट (अपयश, नुकसान, संकट) रूपात मिळते, तेव्हा त्याला ‘नियती’ म्हणतात. शेक्सपिअर, शिरवाडकर यांच्या अजरामर नाट्यकृती पाहा. त्यामध्ये ‘नियती’ नावाचा एक घटक दिसतो. जी.ए. कुलकर्णी-चिं.त्र्यं खानोलकर यांच्या कथा-कादंबर्या पाहा. त्यातील अनेक प्रसंगात या पात्रांच्या वाट्याला असे दुख: का आले? या प्रश्नाचे उत्तरच सापडत नाही. हीच ती ‘नियती’ होय.
मानवी जीवनाचे वस्त्र हे सुख-दु:खाच्या उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेले असते असे म्हणतात. त्या वस्त्राचे रूपवर्णन करताना ग.दि. माडगूळकरांसारखा महाकवी म्हणतो - ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे। जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे।’ संत तुकाराम महाराजांनीही मानवी जीवनातील सुखदु:खांबद्दल ‘सुख पाहता जवापाडे ।दु:ख पर्वता एवढे।’ असे म्हटलेले आहे. दोन वेगवेगळ्या काळातील दोन महाकवी, पण एकच गोष्ट आपल्या शैलीत व्यक्त करतात. आणि हेच समर्थांनी ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ या प्रश्नातून व्यक्त केले आहे. या पूर्वसंचितामुळे मिळणार्या, भोगाव्या लागणार्या दु:खावर उपाय काय? तर समर्थ म्हणतात - ‘देह दु:ख ते सुख मानीत जावे।’दु:खाचा शोक, चिंता करून ते वाढविण्यापेक्षा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास समर्थ व सर्व संत सांगतात. ‘मनीमानसी दु:ख आणू नको रे’, ‘शोक चिंता नको रे’ असा हितोपदेश करून समर्थ विवेकाबरोबरच ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी।’ अशी सहजसोप्या सुलभ परमार्थाची दिशा दाखवतात. कारण प्रपंचात नव्हे, तर परमार्थातच शाश्वत सुख लाभू शकते. ते कसे, ते पुढील लेखात पाहू.
विद्याधर ताठे
९८८१९०९७७५