कर्मतपस्विनी डॉ. अमिता

विवेक मराठी    08-Mar-2018
Total Views |

ज्या समाजाकडून चांगल्याची अपेक्षा करतो, त्या समाजाला आपणही चांगलं देणं गरजेचं असतं असे गर्भसंस्कार वारसा हक्काने मिळालेल्या डॉ. अमिता कुलकर्णी. त्यांनी डॉक्टर म्हणून मनाशी बांधलेली खूणगाठ म्हणजे 'आपल्याला पुढे जाऊन वंचित मुलं व आणि शोषित स्त्रिया यांच्या आरोग्य समस्यांवर काम करायचंय.' यासाठी त्यांनी 1998पासून साधारण एक तपाचा काळ डॉक्टर अमिता कुलकर्णी यांच्या जणू सामाजिक तपस्येचा म्हणायला हरकत नाही. स्वत:चं सुखासीन आयुष्य सोडून विविध सेवाभावी संस्था, नोंदणीकृत एनजीओज यांच्याबरोबर काम करताना अर्थार्जन हा शब्द दूर ठेवून पदराला खार लावत अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचं काम त्यांनी केलं.

 'शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी' हे वाक्य सार्थ करणारी व्यक्ती भेटली की त्या शुध्द बीजाचं कौतुक करावं की त्या रसाळ गोमटया फळाचं? मनाला हा प्रश्न कायम कोडयात टाकतो. एकनिष्ठ जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, अणीबाणीच्या काळात अटक झालेल्यांना मोफत कायदेशीर सल्ल्यांनी तुरुंगातून सोडवण्यासाठी धडपडणारे आजोबा व याच तुरुंगवासीयांना जेवणाचे डबे पोहोचवणारी आजी अशा शुध्द बीजाचा वारसा सांगणारी नात म्हणजेच डॉक्टर अमिता कुलकर्णी. ज्या समाजाकडून चांगल्याची अपेक्षा करताना त्या समाजाला आपणही चांगलं देणं गरजेचं असतं असे गर्भसंस्कार वारसा हक्काने मिळालेल्या कर्मनिष्ठ कुटुंबातल्या व्यक्तीने समाजॠण फेडायचं काम न केल्यास आश्चर्य वाटलं असतं. पुण्यासारखी कर्मभूमी लाभल्यावर कुलकर्णी कुटुंबावर सतत सांस्कृतिक संस्कार होत राहिले. कुठे समाजोपयोगी कामाचे, तर कुठे कायदेशीर मदत देण्याचे, तर कुठे अन्नदानाचे. समाजकामाचा पिढीजात कित्ता गिरवताना बालपणापासून कर्मयोगाची दीक्षाच जणू अमिताताईंना मिळाली होती. अमिताताई आवर्जून सांगतात की समाजसेवेचा त्या काळचा सर्वोत्तम मार्ग असायचा वैद्यकीय सेवा. अभ्यासात असलेल्या उत्तम गतीने त्यांची गाडी सहाजिकच वैद्यकशास्त्राकडे वळली. महाविद्यालयीन विश्वात रमत असतानाच रोटरॅक्टच्या माध्यामातून रोटरीच्या सेवाभावी नेत्र तपासणी शिबिरं , पोलिओ निर्मूलन, स्त्रीआरोग्य तपासण्या उपक्रमांमध्ये नियमित सहभागाने पुढील सेवाभावी कामाची जणू नांदीच झाली, असं अमिताताई आवर्जून सांगतात. कॉलेजच्या ह्या अनुभव संचयनातच निरपेक्षपणे रुग्णसेवा हाच मानवता धर्म असतो ह्याचे संस्कार मनावर बिंबवत तरुण डॉक्टर म्हणून डॉ. अमिता कुलकर्णी समाजाभिमुख झाल्या. स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सुरू होऊन जम बसायला सुरुवात झाली आणि कुठेतरी या व्यवसायात येत असलेला तोचतोचपणा माझ्या मनाला सतत टोचत होता, हे त्या आवर्जून सांगतात. अनेक सेवाभावी संघटनांनी चालवलेले धर्मार्थ दवाखान्यांत, फिरत्या रुग्णालयांत जाऊन स्वयंसेवक म्हणून वैद्यकीय सेवा देण्याचं काम सुरू असतानाच काहीतरी वेगळं आणि भरीव योगदान देण्याच्या आंतरिक ओढीने CASP - Community Aids Sponsorship Program या अंतर्गत झोपडपट्टयांमधील लोकांसाठी वैद्यकीय सेवा देण्याची संधी मिळाली आणि डॉ. अमिता कुलकर्णी यांच्या सेवाभावी कामाची दिशा ठरायला लागली. वंचित समाजातला मुलं आणि महिला हा घटक कायम मदतीच्या प्रतीक्षेत असतो. अशा ठिकाणी सातत्याने काम करणाऱ्या CRY - Child Rights and You या आंतरराष्ट्रीय संघटनेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करायच्या संधीने पांढरपेशा समाजाला न जाणवणारं सत्य अमिताताईंना दिसलं, ते म्हणजे रस्त्यावर असलेली अनाथ मुलं , घरापासून भरकटलेली आणि वाममार्गाला लागलेली लहान मुलं, पालकांनी जाणूनबुजून भीक मागायच्या मार्गाला लावलेली मुलं याच समाजात असतात आणि त्यांच्या असंख्य समस्या असतात. या समस्यांकडे कानाडोळा करून पुढे जाणं जमत नसल्याने या मुलांसाठी काम करायची इच्छा अमिताताईंच्या मनात निर्माण होऊन 'क्राय'सारख्या संघटनेबरोबर काम करताना अमिता कुलकर्णी या व्यक्तीने डॉक्टर म्हणून मनाशी बांधलेली खूणगाठ म्हणजे 'आपल्याला पुढे जाऊन ही वंचित मुलं व आणि शोषित स्त्रिया यांच्या आरोग्य समस्यांवर काम करायचंय.'

ही खूणगाठ बांधताना सर्वात महत्त्वाचं होतं की सगळयासाठी स्वत:चं सुखाचं आयुष्य सोडून काम करावं लागणार आहे. ठरावीक वेळेत चाकोरीबध्द क्लिनिक-घर-क्लिनिक आणि स्वत:चं मूल असा साचेबध्द कम्फर्ट झोन सोडावा लागणार, हे नक्की. रस्त्यावरच्या मुलांसाठी आणि स्त्रियांसाठी घरातल्या स्वत:च्या मुलाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचं संगोपन-संवर्धन करताना त्याच्यावर उत्तम व्यक्ती होण्याचे संस्कार करण्यास कमी पडण्याची भीती होतीच. आणि या वैचारिक द्वंदात अमिताताईंना आईने दिलेला बिनशर्त पाठिंबा खूप मोलाचा ठरला. लहानग्या नातवाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेऊन आपल्या लेकीला पाठबळ देणारी आई लाभणं किती भाग्याचं! 1998पासून साधारण एक तपाचा काळ डॉक्टर अमिता कुलकर्णी यांच्या जणू सामाजिक तपस्येचा म्हणायला हरकत नाही. विविध सेवाभावी संस्था, नोंदणीकृत एनजीओज यांच्याबरोबर काम करताना अर्थार्जन हा शब्द दूर ठेवून पदराला खार लावत अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्याचं काम त्यांनी केलं. स्वत:चं सुखासीन आयुष्य सोडून केलेल्या कामांमध्ये , लक्षात राहील असं काम म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या पेठ व दिंडोरी तालुक्यातल्या 34 आदिवासी पाडयांमध्ये वैद्यकीय, शैक्षणिक, पर्यावरणविषयक असे प्रकल्प एका एनजीओने राबवले होते. यातला वैद्यकीय सेवेचा भाग अमिताताई पाहत होत्या. दिंडोरीपासून साधारण 120 कि.मी.च्या परिसरातल्या ह्या पाडयांसाठी रोज प्रवास करून, प्रसंगी दहा-बारा कि.मी. चालत जाऊन वैद्यकीय सोय पुरवावी लागायची. रस्त्यांची सोय नाही, गंभीर आजारी रुग्ण रस्त्यातच दगावताना पाहणं त्या वेळी किती कठीण जात असेल, याची कल्पनाच केलेली बरी. हे सगळं करत असतानाच, या हेल्थ सेंटर्ससाठी जागोजागी प्रवास करत असताना, ठरलेले दिवस न चुकवता हजर राहण्याची कसरत करताना एक नवीन प्रकल्प उभा राहिला - RCH - Reproductive Child and Health. या उपक्रमाअंतर्गत मुलामुलींच्या वयात येतानाच्या शारीरिक बदलांपासून ते बालिका विवाह रोखणं, कुटुंबनियोजन याबाबतीत प्रबोधन करून मदत करणं, आदिवासी पाडयांमध्ये बैठका घेणं हे कठीण काम होतं. दैनंदिन आयुष्यासाठी झगडणाऱ्या लोकांना हे सगळं समजावून सांगणं हे अग्निदिव्यच होतं. हे करत असताना प्रसंगी लोकांचे शिव्याशाप खाणं, अपमान सहन करणंही अनुभवायला मिळालं. अमिताताई सांगतात की ग्रामीण आणि आदिवासी भागात कमी वयात मुलींची लग्नं झाल्याने जन्माला येणारी कुपोषित मुलं असतात. बाळंतपणात मरण पावणाऱ्या स्त्रियांची आणि मुलांच्या प्रमाणाची टक्केवारीही जास्त असते. त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सोयी अत्यंत तुटपुंज्या असतात. अशा पाडयांमध्ये एखादी बाळंतपणाची केस आली, तर ती जिल्हा रुग्णालयात पाठवली जायची. नाशिक जिल्हा रुग्णालय हे या गावांपासून किमान ऐंशी कि.मी. अंतरावर. रस्ते धड नसलेल्या परिस्थितीत अशी केस रुग्णालयात पोहोचेपर्यंत बरंवाईट होण्याची शक्यता जास्त असायची. त्या वेळी स्त्रीची होणारी तगमग, तडफड एक स्त्री आणि आणि आई म्हणून अनुभवणं यातनादायक असायचं. याच जोडीला वाचण्याची शून्य शक्यता असणाऱ्या रुग्णाला मिळालेलं जीवनदान आनंदाची परिसीमा गाठणारं ठरायचं. या भागात तीन वर्षं हे काम केल्यावर हाच प्रकल्प वेगवेगळया राज्यांमध्ये समवैचारिक समाजसेवी संस्थांनी राबवायला सुरुवात केली. यासाठी अनुभवसंपन्न व्यक्तीची - अर्थात डॉक्टर अमिता कुलकर्णींची मदत घेणं ओघाने आलंच. ''हरियाणा, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये केलेलं काम मी कधीच विसरू शकत नाही'' ह्या अमिताताईंच्या वाक्यात बाहेरच्या राज्यांतून पळवून आणून विकल्या जाणाऱ्या हजारो निरागस व अल्पवयीन मुलींच्या हृदय पिळवटवून टाकणाऱ्या वेदना आहेत. अत्यंत घातक अशा 'पारो' प्रथेचं दर्शन याच ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा अनुभवलं. काय आहे ही पारो प्रथा? हरयाणामधील फरीदाबाद, हिस्सार, कर्नाल, रोहतक, कुरुक्षेत्र, पंजाबमधील मनसा नवाशहर, जालंधर, गुरुदासपूर,भटिंडा या भागांमध्ये घसरलेल्या कन्या जन्मदारामुळे मुलींची कमतरता भासते, म्हणून अवैध लग्नांसाठी मुलींना फूस लावून, पळवून वा विकत आणलं जातं. त्यांना एकापेक्षा जास्त लोकांशी शरीरसंबंध ठेवायला भाग पाडलं जातं. ही आहे 'पारो प्रथा'. या भागात काम करताना या भयावह गोष्टींशी सामना झाला आणि सुकुमार भावना, आयुष्य करपून जाणं म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. इथे काम करताना लोकांची मानसिकता बदलणं हे या राज्यांमध्ये हे सर्वात मोठं आव्हान होतं. वेळप्रसंगी मारहाण, दगडफेक सहन करून काम करून वैद्यकीय सेवाधर्म निभावला.

या सगळया धकाधकीत, ट्रेकिंगची आवड जोपासताना तेव्हाच्या उत्तर प्रदेशाबरोबर - आताचा उत्तराखंडाबरोबर झालेला परिचय डॉक्टर अमितांना वैद्यकीय सेवेच्या निमित्ताने उत्तरांचलमध्ये घेऊन गेला. उत्तरकाशीजवळच्या छोटया गावांमध्ये हेल्थ सेंटर्स, RCH च्या माध्यमातून आरोग्य जागरूकता, बाळंतपणात होणारे माता व तान्ही मुलं यांचे मृत्युदर प्रमाण कमी करण्यासाठी, जागरूकता येण्यासाठी हे प्रकल्प राबवले जात होते. हिमालयात काम करताना आव्हानं फार मोठी असतात. रस्ते नाहीत, वीज नाही अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधा घेऊन लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे जीव वाचवायचे ही भावना उराशी कवटाळून घेतलेलं वैद्यकीय शिक्षण समाजासाठी आत्मविश्वासाने वापरायचं, हे तत्त्व अंगीकारत अमिताताई काम करत राहिल्या. हिमालयाने दिलेला सर्वोच्च अनुभव म्हणजे हिमालयात एव्हरेस्टच्या पायथ्याशी असणाऱ्या खुंदे गावात वैद्यकीय काम करण्यासाठी विचारणा होणं. पूर्वोत्तर नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टच्या पायथ्यापासून 20 कि.मी. अंतरावर खुंदे गाव व सर एडमंड हिलरी यांनी स्थापना केलेल्या खुंदे हॉस्पिटलमध्ये व दुसऱ्या फाफलू हॉस्पिटलमध्ये केलेलं काम. अविस्मरणीय. शेर्पा लोकांच्या विनंतीला मान देऊन सन 1966मध्ये सर हिलरी यांनी हिमालयन ट्रस्ट व या हॉस्पिटलची स्थापना केली. जगभरातून स्वयंसेवी डॉक्टर्स (मेडिकल व्हॉलेंटिअर्स) म्हणून अनेक डॉक्टर्सनी या दोन हॉस्पिटल्समधे आपापलं योगदान देतात. इथे सुरुवातीला दोन आठवडयांचं फील्ड वर्क करणं ही अट असते. हिमालयन ट्रस्टच्याच अनेक गावांमधल्या एखाद्या हेल्थ सेंटरमध्ये हे फील्ड वर्क करावं लागतं. या उंच ठिकाणी राहताना जवळजवळ आठ महिने जगापासून संपर्क तुटणार होता. त्यातल्या फोर्त्से गावातल्या हेल्थ सेंटरच्या हेल्थ वर्कर्सना ट्रेनिंग देणं व आपत्कालीन वैद्यकीय सेवा हे काम करायला मिळालं. अमिताताई आवर्जून सांगतात, ''दोन आठवडयांचं हे फील्ड वर्क करताना एक आयुष्य जगल्याचा अनुभव खूप काही देऊन गेला. इथे केलेले रेस्क्यू आणि खुंदे हॉस्पिटलने दिलेल्या अनुभवांनी आयुष्य किती क्षणभंगुर असतं याची जाणीव करून दिली. निसर्गात मिळणारा प्रत्येक क्षण सांगतो की हेवेदावे, मत्सर, तुझं-माझं, वर्चस्व सिध्द करणं, फुकाच्या बढाया मारणं याला अर्थ नसतो. आत्ताचा क्षण नंतर असेल का नाही हे माहीत नाही, अशा परिस्थितीत जगताना नकारात्मक भावना नसाव्यात हे हिमालयाने शिकवलं. हिमालयाला पाहिलं की आपल्या खुजेपणाची जाणीव होते. त्याच्यापुढे सगळेच सारखे आणि आपत्ती येते तेव्हा मी मी म्हणवणारे पालापाचोळयासारखे उडून जातात, हे अमिताताईंना अनुभवायला मिळालं.

हिमालयात काम करत असतानाच तिथे ओळख झालेल्या परदेशी सहकाऱ्यांमुळे परदेशातील संस्थांमध्ये काम करायचं आमंत्रण मिळाल्याने अमिताताईंना अविकसित देशांमध्ये काम करायचा अनुभव मिळाला. मलेरिया व एच.आय.व्ही. प्रादुर्भाव असलेले केनिया व टांझानिया, दक्षिण अफ्रिका यासारखे देश आणि तिथे काम करणाऱ्या अनेक संस्था वैद्यकीय क्षेत्रामुळे अनुभवायला मिळाल्या. सामान्य लोकांमध्ये जाऊन मलेरिया, एड्स जनजागृती करणं, निरोधन साधन, मस्किटो नेट्स वाटप करताना दुनियेतलं अतिशय दीन व गरीब जग अनुभवायला मिळाल्याचं अमिताताई सांगतात. त्या सांगतात की या सगळया घटनांनी मला अनुभवसमृध्द केलं, म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त अंतर्मुख केलं. मानवी क्षमता कशा वापरल्या जातात यावर सगळं अवलंबून. क्षमतांचा वापर विधायक का विघातक कार्यासाठी करायचा, हे आपल्या मानसिकतेवर ठरत असतं. कुठलेही बदल आपोआप घडत नाहीत, तर जाणीवपूर्वक करावे लागतात. स्वत:ला साचेबध्द न ठेवता, उत्स्फूर्तपणे जगताना, समाजोपयोगी काम करायचं या विचारांनी माझ्यात बदल घडत गेले. प्रत्येक अनुभवात बरंच काही शिकण्यासारखं असतं. असं अनुभवसंपन्न आयुष्य मिळालं की माणूस म्हणून जन्माला आल्याचा आनंद होतो. अमिताताई सांगतात की निसर्गाच्या सहवासामुळे निसर्गाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. माणूस कितीही मोठा झाला, तरीही निसर्गापुढे तो खुजाच असतो. निसर्गाने आपलं रौद्र स्वरूप दाखवलं, तर क्षणात होत्याचं नव्हतं होऊन जातं. म्हणूनच निसर्गापुढे कायम नतमस्तक असावं. जसा निसर्ग आपल्या भरभरून देतो, तसंच त्याला परत द्यावं. आज परदेशात स्थायिक झालेल्या लेकाकडे न जाता, हिमालयाच्या कुशीत वैद्यकीय सेवा देतच विसावायची इच्छा बाळगणारी डॉक्टर अमिता कुलकर्णी नामक कर्मतपस्विनी जेव्हा भेटते, तेव्हा

जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम् ।

इत्येषा प्रार्थनाऽस्माकं भगवन् परिपूर्यताम्

- हे परमेश्वरा, जीवनात मला जे मिळतंय, त्यापेक्षा अधिक परत देण्याची ताकद मला मिळो, ही माझी प्रार्थना तू स्वीकार कर। हे विवेकानंद केंद्र प्रार्थनेतलं शेवटचं कडवं वास्तवात जगणारी सशक्त स्त्री जगण्याचे धडे कर्मयोगाने शिकवून जाते.

roopaliparkhe@gmail.com