मधुसूदन गायकवाड. चळवळीतला माणूस. नामांतराचे आंदोलन टिपेला पोहोचले असतानाच्या काळात गायकवाड औरंगाबादमध्ये शासकीय नोकरीत होते. लहानपणीच सामाजिक संस्कार आणि चळवळीचे बाळकडू मिळाले होते. औरंगाबादेत नोकरी करता करता सामाजिक चळवळीत सक्रिय होऊन त्यांनी आपले दायित्व दाखवून दिले.
काही काही बहुआयामी माणसे आपल्या आयुष्यात उशिरा का येतात? जर ती खूप आधीच भेटली असती, तर दोघांपैकी एकाच्या जगण्याची दिशा नक्की बदलली असती. अर्थात कोण कधी भेटावे आणि त्याने आपल्या जीवनात हक्काचे स्थान निर्माण करावे हे आपल्या हाती नसते. पण जेव्हापासून मैत्री होते, परिचय होतो, तेव्हापासून त्या व्यक्तीसाठी एक जागा काळजाच्या कोपऱ्यात निर्माण झालेली असते. अशा व्यक्तींमध्ये मधुसूदन गायकवाड यांना मला वरचा क्रमांक द्यावा लागतो, इतका लळा त्यांनी अल्पावधीत लावला आहे. गोष्ट तशी फार जुनी नाही. फार फार तर आठ वर्षे झाली असतील. आमच्या भांडूपमध्ये कोणत्याही प्रकारचे साहित्यिक उपक्रम होत नाहीत, ही माझी खंत. अशातच किशोर मोघेंनी निरोप दिला आणि मी चंद्रप्रभा हॉलमध्ये बैठकीला गेलो. भांडूप पूर्वेला साहित्य संमेलन व्हावे, या हेतूने संबोधी फाउंडेशनने ती बैठक आयोजित केली होती. किशोर मोघे आणि अर्जुन डांगळे सोडले, तर बाकी चेहरे अनोळखी. बैठक झाली. त्यात डांगळेंनी मधुसूदन गायकवाडांचा परिचय करून दिला. “हे गायकवाड संबोधी फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. आपण यांच्याबरोबर काम करू या.” रूढ साहित्य संमेलनापेक्षा वेगळ्या धाटणीच्या साहित्य संगितीचे आयोजन झाले आणि एक नव्हे, तर तीन साहित्य संगितींमध्ये मला गायकवाडांबरोबर काम करण्यांची संधी मिळाली.
मधुसूदन गायकवाड. चळवळीतला माणूस. नामांतराचे आंदोलन टिपेला पोहोचले असतानाच्या काळात गायकवाड औरंगाबादमध्ये शासकीय नोकरीत होते. लहानपणीच सामाजिक संस्कार आणि चळवळीचे बाळकडू मिळाले होते. औरंगाबादेत नोकरी करता करता सामाजिक चळवळीत सक्रिय होऊन त्यांनी आपले दायित्व दाखवून दिले. दलित रंगभूमी हा मधुसूदन गायकवाडांच्या आस्थेचा विषय. अष्टपैलू कलावंत ही त्यांची चळवळीतील ओळख. नामांतर आंदोलनाच्या काळात गाजलेले ‘थांबा रामराज्य येत आहे’ हे नाटक आणि त्यात मधुसूदन गायकवाडांनी साकारलेली पाटलाची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. मधुसूदन गायकवाड हे दलित रंगभूमी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. या संस्थेने अनेक नवे उपक्रम करून प्रस्थापितांना हादरे दिले होते. दलित रंगभूमीच्या एका अधिवेशनाचे ते अध्यक्षही होते. त्यांनी औरंगाबादमध्ये चळवळीत दीर्घकाळ काम केले. अशातच मुंबईला बदली झाली आणि मधुसूदन गायकवाड मुंबईकर झाले. तसे ते मूळचे इथलेच. वडील व्ही.डी. गायकवाड यांना डॉ. आंबेडकरांचा जवळचा सहवास लाभलेला. ते पिपल्समध्ये महत्त्वाच्या पदी होते. अशा प्रकारे मधुसूदन गायकवाड यांनी घरात आंबेडकरी चळवळ अनुभवली होती. मधुसूदन गायकवाड मुंबईत आले, भांडूप पूर्वेला राहू लागले आणि स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र करून प्रबोधनात्मक, रचनात्मक काम करू लागले. मधुसूदन गायकवाड यांच्या पुढाकाराने बुद्धविहार साकार झाले. धम्मकार्याबरोबरच सामाजिक कामाचे केंद्र म्हणून या विहाराकडे पाहिले जाऊ लागले. तर अशा या मधुसूदन गायकवाडांशी साहित्य संगितीच्या निमित्ताने ओळख झाली आणि काही दिवसांतच मधुसूदन गायकवाड हे मैत्र जिवाचे झाले. सामाजिक कामात आपआपली विचारधारा बाजूला ठेवून समाजहिताचे असेल ते करण्यात गायकवाडांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. भांडूपमध्ये चांगले वाचनालय नाही, ही माझ्यासारखीच गायकवाडांनाही खंत होती. एका बैठकीत मी ही खंत व्यक्त केली .काही सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून आम्ही संबोधी वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गायकवाडांनी त्यांच्या मित्राकडून तीन कपाटे मिळवली आणि मी माझ्या प्रकाशक, पत्रकार मित्राकडून पुस्तके दान स्वरूपात मिळवली. वाचनालय सुरू झाले. यामागे मधुसूदन गायकवाडांचा ध्यास आणि पाठपुरावा हिमालयासारखा आधाराला होता. त्यांचा पाठिंबा नसता, तर वाचनालय सुरूच झाले नसते. साहित्य संगितीच्या आयोजनात गायकवाडांच्या नियोजनशक्तीचा मी अनुभव घेतला होता. एखादी गोष्ट पूर्वनियोजनातून कशी साकारता येते, याचा धडा मला मधुसूदन गायकवाड यांनी आपल्या व्यवहारातून दिला होता. अनेक मान्यवर साहित्यिक, राजकीय नेते आणि स्थानिक कार्यकर्ते यांचा समन्वयाचा सेतू गायकवाडांनी बांधला होता. त्यामुळेच भांडूपच्या इतिहासात नोंद होतील अशी देखणी संमेलने साकार होऊ शकली. मधुसूदन गायकवाड सध्या एका पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. संबोधी फाउंडेशनचेही ते महासचिव आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणूनच केवळ प्रबोधनावर भर न देता आपल्या व्यवहारातून आदर्श उभा करण्यावर त्यांचा भर असतो. फक्त आंबेडकरी चळवळच नाही, तर परिसरातील सर्व सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा आत्मीय संबंध असतो. हा समाज माझा आहे, त्याच्या भल्याबुऱ्याला मी जबाबदार आहे, त्यामुळे मी शांत राहून चालणार नाही, ही भूमिका मनात ठेवून मधुसूदन गायकवाड सेवामुक्त झाल्यावरही कार्यरत आहेत आणि त्यांच्या कामात पत्नी शकुंतला गायकवाड यांची साथ लाभत आहे. आपले उर्वरित आयुष्य समाजाच्या मालकीचे आहे, ही त्या दोघांची धारणा आहे.