समर्थांचा राम, राघव, रघुनंदन आणि संत तुकोबांचा विठ्ठल-पांडुरंग हे एकच आहेत, हे मागील लेखात आपण पाहिले. तसेच समर्थांच्या भक्ती व शक्ती उपासनेचा, ‘हनुमंत आमुची कुळवल्ली’ याचा विचार केला. आता या लेखात आपण समर्थांनी मनाच्या श्लोकातून केलेला हितोपदेश, नव्या भाषेत समर्थांनी सांगितलेल्या ‘डूज अँड डोन्ट्स’चा विचार करू.
मनाच्या श्लोकांचे थोडक्यात सार सांगायचे, तर ‘भव्य दिव्य उत्कटाची ओढ; आराधना व प्रयत्नपूर्वक सदाचाराचे महत्त्व प्रतिपादन होय!’ मनाच्या श्लोकांच्या केवळ नित्य पठणाने १) माणसाच्या दॄष्टीत, कृतीत आत्मविश्वास निर्माण होतो. २) मनाचे औदासीन्य - उदासी दूर होते. ३) मन निर्भय होते. जरामरणाचे भय नष्ट होते. ४) दुर्गुणाचा बोध होऊन दुर्गुणाकडून सद्गुणाकडे प्रवृत्ती होते. ५) मनात ध्यैर्याची, शौर्याची जागृती होते. ६) स्वतःबरोबरच समाजाचेही भान प्राप्त होते. ७) व्यष्टीकडून समष्टीकडे असा विकास होतो. ८) समर्पणाचा भाव निर्माण होतो. ९) पुरुषार्थाची जाणीव होते. १०) भक्ती म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे, तर जळीस्थळी सर्वत्र भरून राहिलेल्या भगवंताबद्दलचे प्रेम म्हणजे भक्ती याचा बोध होतो व सर्व चराचर सृष्टीबद्दल एकप्रकारचा आत्मभाव जागृत होतो.
मनाच्या श्लोकातील श्लोक क्र. ४पासून पुढील अनेक श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला काय कर (डूज) आणि काय करू नको (डोन्ट्स) याचा सरळ सोप्या शब्दात उपदेश केलेला आहे. समर्थांनी सांगितलेले हे डूज अँड डोन्टस्’ पुढीलप्रमाणे - समर्थ ‘डूज अँड डोन्ट्स’ सांगताना काय करू नको हे अधिक वेळा अधिक प्रकाराने सांगतात. उदाहरणार्थ, १) जनी निंद्य ते सोडून दे, २) सदाचार सांडू नको, ३) वासना दुष्ट कामा नये, ४) पापबुद्धी नको, 5) धर्मता-नीती सोडू नको, ६) पाप संकल्प नको, ७) विषयाची आठवण नको, ८) विकार नको, ९) क्रोध नको, १०) विषयवासना नको, ११) मत्सर, दंभ नको, १२) परद्रव्याचा लोभ नको, १३) स्वार्थ बुद्धी नको. इतके डोन्टस् (करू नको) सांगून समर्थ थांबत नाहीत, तर त्याचबरोबर काय कर (डू) याचेही रोखठोकपणे मार्गदर्शन करतात. समर्थ रामदास हे केवळ नकारात्मक (निगेटिव्ह) गोष्टी सांगत नाहीत. केवळ हे करू नको, ते करू नको असा नकारात्मक उपदेश करून ते श्रोत्यांना संभ्रमात टाकत नाहीत, तर काय करायचे हेही तितक्याच रोखठोकपणे सांगून एक विधायक (पॉझिटिव्ह) मार्गही दाखवतात - १) सारासार विचार कर. २) सत्यसंकल्प कर. ३) श्रेष्ठ धारिष्ट्य धर. ४) जगाचे नीच बोलणे - टीका सहन कर. ५) नम्रतेने बोल. ६) चंदनापरी शरीराने झीज, सश्रम काम कर असे सुचवितात. सश्रम काम करण्याचा उपदेश शीख गुरू नानक देव व महात्मा बसवेश्वर यांनीही ‘वचन’ साहित्यात केलेला आहे. Work is worship हे महात्मा बसवेश्वरांचे वचन सर्वश्रुत आहे.
समर्थांनी सांगितलेले हे ‘डूज अँड डोन्ट्स’ तसे नवे नाहीत. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेल्या गीतोपदेशात ते सविस्तरपणे प्रतिपादन केलेले आहेत. पण समर्थांनी काळाची गरज ओळखून, कालसापेक्ष पद्धतीने अत्यंत सरळ सोप्या बाळबोध पद्धतीने ते सांगितलेले आहे. हेच समर्थांच्या मनाच्या श्लोकांचे वैशिष्ट्य आहे. समर्थ काय, ज्ञानदेव काय, तुकाराम महाराज काय, हे नवे काहीच सांगत नसतात तर कालसापेक्ष गरज लक्षात घेऊन ‘सनातन विचार चिंतन’ ते नव्या भाषेत, नव्या पद्धतीने, नव्या शैलीत सांगत असतात. संत तुकारामांचा या संदर्भातील अभंग पाहा – ‘आम्ही वैकुंठवासी। आलो याच कारणासी। बोलले जे ऋषी। साच भावे वर्तया॥‘ आपल्या ऋषिमुनींनी आपणास सर्व काही शाश्वत-सनातन असे ज्ञान-चिंतन प्राचीन काळीच सांगून ठेवलेले आहे. आपले वेद, आपली सहा शास्त्रे, उपनिषदे ही चिरंतन ज्ञानविचारांची भांडारे आहेत. हा प्राचीन ज्ञान ठेवाच समर्थांसारख्या संतांनी जतन केला व आपणास नव्या रूपात पचनी पडेल अशा पद्धतीने, दासबोध - आत्माराम - मनाचे श्लोक या रूपात दिला. या अर्थाने समर्थांचे मनाचे श्लोक हे वेद-उपनिषद-गीता विचाराचेच नवनीत आहे.
भगवद्गीता ही उपनिषदाचे सार मानली जाते. ‘सर्वोपनिषदो गावो.....’ असे भगवद्गीतेचे वर्णन केले जाते. ‘उपनिषदे ही गाय असून भगवान श्रीकृष्ण हे त्या गायीचे दोहन करणारे गोपाळ आहेत आणि ‘भगवद्गीता’ हे दुग्धअमृत आहे.’ असा उपरोक्त श्लोकाचा अर्थ आहे. अशा भगवद्गीतेचा अध्याय १६ पाहा. त्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनास २६ दैवी गुण आणि षड्रिपु मानल्या जाणार्या ६ असुरी दोषांचे निरूपण केलेले आहे. दैवी गुण (सद्गुण) हे यशस्वी जीवनाला-मोक्षाला उपयुक्त साधन ठरतात. याउलट आसुरी दोष प्रमुख सहा असले, तरी त्यांचा प्रभाव अधिक असतो व ते बंधाला कारण ठरतात. माणसाच्या दुःखाला कारण ठरतात. गीतेचा वा ज्ञानेश्वरीचा १६वा अध्याय वाचताना आपणास प्रत्येक वेळी समर्थांच्या मनाच्या श्लोकांची आठवण होईल इतकी एकरूपता त्यामध्ये आहे. ही अंतरंग एकतेची गोष्ट लक्षात घेऊन, सांप्रदायिक अहंभावी अनुयायांनी आपली दृष्टी व्यापक करण्याची गरज आहे. समाजात आधीच इतके भेद आहेत की सांप्रदायिक अहंकारी अनुयायांनी त्यात आणखी भर न घालता सामाजिक एकतेचा विचार करून, समन्वित विचाराचे प्रतिपादन करावे. विविध पंथ-संप्रदायातील अंतरंग एकतेचा पुरस्कार करावा.
नव उपासकांनी - अभ्यासकांनी गीतेचा व ज्ञानेश्वरीचा १६वा अध्याय व समर्थ रामदासांच्या दासबोधातील दशक दोनमधील समास पाच, सहा, सात एकत्र पाहावेत. समर्थांनी दासबोधात लिहिलेले हे तीन समास अनुक्रमे ‘रजोगुण लक्षण’, ‘तमोगुण लक्षण’, आणि ‘सत्त्वगुण लक्षण’ या नावाचे असून या तीन समासात गीता-ज्ञानेश्वरीतील सर्व २६ दैवी गुणसंपत्तीचे व असुरी संपत्तीचे दर्शन घडते. असो. हा एक स्वतंत्र विषय आहे. आपण पुनःश्च मनाच्या श्लोकांकडे वळू. भगवंताची - संतांची दृष्टी कशी असते त्याचा परिचय वरील अध्यायातून व समासातून होतो. दैवी गुणांना ते संपत्ती म्हणतात, तद्वतच असुरी लक्षणांना दोष न म्हणता ‘असुरी संपत्ती’ म्हणतात. (सुर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस.) मनाच्या श्लोकातील सत्यसंकल्प, सारासार विचार, जगाचे नीच बोलणे सोस, नम्रतेने बोल, चंदनापरी झिजावे हा उपदेश दैवी संपत्तीचाच भाग आहे; तर समर्थांनी जे जे करू नको असे मनाला सांगितले आहे त्या सर्व गोष्टी असुरी संपत्तीचा भाग आहेत. तमोगुण-असुरी लक्षणे ही मनुष्याच्या पतनास कारणीभूत होतात तर सत्त्वगुण-दैवी गुणसंपत्ती मनुष्याच्या पारलौकिक कल्याणास लाभदायक ठरतात. समर्थ मनाला उपदेश करताना ‘मनाच्या श्लोकात’ ‘हे कर’ आणि ‘हे करू नको’ असे का सांगतात, तर नरदेह हा एकदाच लाभतो. ‘नाना सुकृताचे ङ्गळ। तो हा नर देह केवळ।’ असे समर्थ सर्वांना बजावतात आणि या नरदेहाचे सार्थक करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात - नरदेही आलिया येक। काही करावे सार्थक। जीवन सार्थक करण्याचे सोपे साधन म्हणजे ‘मनाचे श्लोक’ होय!
- विद्याधर ताठे
9881909775