बजेटची बाराखडी

विवेक मराठी    01-Feb-2018
Total Views |

 

 दोन-चार दारांमधून येऊ शकणारा पैसा वाढवायचा कसा आणि आलेला पैसा योग्य त्या खिडक्यांमधूनच बाहेर पाठवून सत्कारणी लावायचा कसा, हे समजणं ही फार मोठी कला आहे! कारण येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशाच्या या प्रवाहावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं. हा प्रवाह मॅनेज करायला जमलं, तर आपण या भवसागरात वगैरे तरतो... 

आज ‘बजेट’चा दिवस. दिवसभर सर्व माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर बजेटविषयी - म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी जोरदार चर्चा सुरू असेल. ‘हे बजेट विकासाला चालना देणारं आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारं आहे’ असं मत सरकार समर्थक नेते आणि अर्थतज्ज्ञ मांडत असतील, तर ‘हे बजेट महागाईला चालना देणारं आणि गरिबांचं जगणं अवघड करणारं आहे’ असं मत सरकारविरोधी नेते आणि अर्थतज्ज्ञ मांडत असतील.

 मी जेव्हापासून बजेटचा दिवस बघत आलो आहे, तेव्हापासून दर वर्षी, कोणतंही सरकार आणि कसंही बजेट असलं, तरी तंतोतंत ह्याच प्रतिक्रिया ऐकत आलो आहे! देशाच्या अर्थव्यवस्थेचा अफाट मोठा गाडा चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि त्यासाठीचं उत्पन्न यांचा अंदाजे जमाखर्च किंवा अंदाजपत्रक म्हणजे बजेट. त्यात असलेले प्रचंड मोठे आकडे, योजनांची नावं, अर्थशास्त्रीय संज्ञा वगैरे वाचून खरं तर आपलं डोकं गरगरायला लागलेलं असतं. नेत्यांची आणि अर्थतज्ज्ञांची टोकाची विरोधी मतं ऐकून त्या गरगरण्यात आणखीनच भरच पडत असते!

 मला एक प्रश्न नेहमी पडत आला आहे. वर्षातले हे दोन-चार दिवस आपण देशाच्या अर्थसंकल्पाचा जेवढा विचार करतो, तेवढा आपण वर्षात कधीतरी स्वतःच्या अर्थसंकल्पाचा विचार करतो का? अर्थात, पैशांचा विचार कळत-नकळत आपण सततच करत असतो. किती पैसे येणार आणि ते कसे खर्च करायचे, हे दर महिन्याला आपल्या डोक्यात असतंच. त्यानुसार आपण खर्च करतच असतो. पण मुळात हे आपण शिस्तशीरपणे कागदावर मांडून करतो का? हे करण्यासाठी अंदाजपत्रकाचं ‘अ आ ई’ किंवा ‘बजेटची बाराखडी’ आपल्याला माहीत असते का?

जो आपलं घर चालवतो, अशा प्रत्येक संसारी माणसाला पुढील साक्षात्कार कधी ना कधी होतोच – ‘घरात पैसे येण्यासाठी एखाद-दोन दारंच असतात, पण घरातून पैसे जाण्यासाठी अनंत खिडक्या असतात!’

 नवरा-बायकोचे पगार, त्यांच्या ठेवींवरचं व्याज, गुंतवणुकींवरलं उत्पन्न वगैरे पैसा येण्याची निवडक दारं आणि घराचा हप्ता किंवा घरभाडं आणि वीज, गॅस, पेट्रोल यापासून ते किराणा, भाज्या, मुलांच्या शाळेच्या फी, ट्रिपा, युनिफॉर्म वगैरेंपासून ते कामवाल्या बाया, इस्त्रीवाला, गाडी धुणारा, माळी वगैरेंसारखे सेवादाते हे खर्च. याशिवाय, मोबाइल रिचार्ज, सिनेमे, हॉटेलिंग, टीव्ही रिचार्ज इत्यादी काय वाटेल त्या रूपाने घरातून पैसा बाहेर नेणाऱ्या खिडक्या असतात.

 अन एखाद-दुसऱ्या दारातून घरात येऊन अनंत खिडक्यांमधून घराबाहेर पडणाऱ्या पैशाला आपल्याला 'मॅनेज' करावं लागतं. ह्या मॅनेज करण्यालाच 'बजेट' प्रक्रिया म्हणतात!!

 जे घराचं, तेच देशाचं! देशालाही पैसा येण्यासाठी दोन-चारच मोठे दरवाजे असतात. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर वगैरे हे दरवाजे. पण देशासाठी खर्च करण्याच्या मात्र अनंत खिडक्या असतात. संरक्षण, संशोधन, शिक्षण, सामाजिक सुरक्षितता यांपासून ते नवं इन्फास्ट्रक्चर बांधणं, नवे प्रकल्प उभे करणं अशा अनंत खिडक्या असतात आलेला पैसा बाहेर जाण्याच्या.

 दोन-चार दारांमधून येऊ शकणारा पैसा वाढवायचा कसा आणि आलेला पैसा योग्य त्या खिडक्यांमधूनच बाहेर पाठवून सत्कारणी लावायचा कसा, हे समजणं ही फार मोठी कला आहे! कारण येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशाच्या या प्रवाहावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं. हा प्रवाह मॅनेज करायला जमलं, तर आपण या भवसागरात वगैरे तरतो... नाहीतर गाटांगळ्या खातो आणि बुडतो!

 आपण म्हणजे, एक घर म्हणूनही किंवा देश म्हणूनही!

 आता जेटलीबुवा आणि मोदीसाहेब देशाच्या अफाट अर्थसागराचा प्रवाह कोणत्या दिशेनी नेतायत, ते आज कळेलच. त्यांची कला आज दिसेल. पण या सागरातल्या ‘आपल्या’ बादलीच्या किंवा चमच्याच्या पाण्याचं काय करायचं, हे आपणच ठरवायला लागेल.

 ही कला आपली आपल्याला जमायला हवी!! ती जमवायची कशी, याची काही सोपी तंत्रं आणि मंत्र पुढच्या लेखामध्ये.

 प्रसाद शिरगावकर

prasad.shir

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
 मग
like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
धन्यवाद
https://www.facebook.com/VivekSaptahik/