हर्षद तुळपुळे
एकेकाळी आपला देश नद्यांचा देश म्हणून ओळखला जात होता. आज देशातील अनेक नद्यांचे अस्तित्व लोप पावत आहे. काही नद्या प्रदूषित झाल्या आहेत. पुण्यातील मुळा-मुठा नद्या या त्यांपैकीच. भारतीय नदी दिनाचं औचित्य साधून जीवितनदी फाऊंडेशनसारख्या काही संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मुळा-मुठेचं रूप पालटण्याचा प्रयत्न केला आहे. या स्तुत्य व विधायक उपक्रमाविषयी...
2015 सालापासून दि. 28 नोव्हेंबर हा दिवस 'भारतीय नदी दिन' म्हणून दर वर्षी साजरा केला जातो. मातेसमान असणाऱ्या भारतातल्या नद्यांची सध्या झालेली दुरवस्था दूर करून त्यांना पूर्वीसारखंच स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्याच्या ध्येयाने 2014 साली भारतातल्या आठ अशासकीय संस्था एकत्र आल्या. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ऍंड कल्चरल हेरिटेज (INTACH), वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर - इंडिया (WWF - INDIA), टॉक्सिक लिंक, पीस इन्स्टिटयूट चॅरिटेबल ट्रस्ट, साउथ एशिया नेटवर्क ऑॅन डॅम्स, रिव्हर्स ऍंड पीपल (SANDRP), इंटरनॅशनल रिव्हर्स, पीपल्स सायन्स इन्स्टिटयूट आणि अर्घ्यम ट्रस्ट या त्या आठ संस्था होत. या संस्थांनी 'आपल्या नद्यांना वाहतं करू या' असा जाहीरनामा प्रसिध्द केला आणि 2015पासून 28 नोव्हेंबरला 'भारतीय नदी दिन' साजरा होऊ लागला. वास्तविक 'भारतीय नदी दिन' हा 'भारतीय नदी सप्ताहा'चा भाग आहे, जो दि. 25 नोव्हेंबर ते दि. 1 डिसेंबर दरम्यान साजरा होतो.
पुण्यात 'जीवितनदी फाउंडेशन'सारख्या अनेक स्वयंसेवी संस्था लोकसहभागातून नदी स्वच्छतेचं काम गेली अनेक वर्षं तळमळीने करत आहेत. तीन वर्षांपूर्वी स्थापन झालेली 'जीवितनदी' संस्था पुण्याच्या मुळा-मुठा नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी काम करते. रिव्हर वॉक आयोजित करून पुणेकरांना नदीकिनारी आणणं, मुळा-मुठा नद्यांची भौगोलिक आणि पर्यावरणीय माहिती देणं, 'दत्तक घेऊ या नदीकिनारा' उपक्रमांतर्गत नदीकिनारे स्वच्छ करणं, विषमुक्त जीवनशैलीचा प्रचार करणं, प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रदूषणविषयक उपाययोजनांचा पाठपुरावा करणं असा चौफेर कार्यक्रम ही संस्था राबवते. 2020पर्यंत मुठाई घनकचरामुक्त करायची आणि 2025पर्यंत सांडपाणीमुक्त करायची, हे जीवितनदी फाउंडेशनचं ध्येय आहे. याशिवाय पुण्याच्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी, राम या नद्यांना स्वच्छ, प्रवाही, शुध्द, निर्मळ करण्यासाठी इतर अनेक संस्था उभ्या राहिल्या आहेत आणि अत्यंत कौतुकास्पद काम करत आहेत. या सर्व संस्थांनी एकत्र येऊन 25 नोव्हेंबरला 'भारतीय नदी दिवस' साजरा केला.
मुठा नदी ही पुण्याची जीवनदायिनी. भारतात प्राचीन काळापासून जशी नद्यांच्या किनारी नगरं वसवली गेली, तसंच या मुठेच्या काठी पुणं शहर वसलं. पुण्याची मुठा नदी ही कृष्णा नदी खोऱ्याचा भाग आहे. पुण्यापासून 35-40 किलोमीटर लांब असलेल्या वेगेरे नामक गावात उगम पावून ती नैर्ॠत्येकडून ईशान्येकडे वाहत वाहत पुण्यात येते. बाबासाहेब पुरंदरेंनी तिचं वर्णन 'नैर्ॠत्येकडून नागिणीसारखी सळसळत येणारी मुठा' असं केलंय. अंबी आणि मोशी या मुठेच्या उपनद्या. खडकवासला धरणाच्या अगोदर या नद्या मुठेला मिळतात. मुळा नदी पुण्याच्या पश्चिम दिशेला उगम पावून पश्चिम-पूर्व वाहत येते आणि पुण्यात आणल्यावर दक्षिणेकडे वळते. राम नदी, पवना नदी आणि देव नदी या मुळा नदीच्या उपनद्या होत. मुळा आणि मुठा नद्या पुण्यात शिवाजीनगरजवळ असलेल्या कॉलेज ऑॅफ इंजीनिअरिंगपाशी एकत्र मिळतात. पुढे ही नदी मुळा-मुठा म्हणून ओळखली जाते. मुळा-मुठा नदी पूर्वेकडे वाहत जाऊन शिरूर तालुक्यात भीमा नदीला मिळते. भीमा नदी पुढे कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते आणि कृष्णामाई शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते.
पुण्यातून वाहणाऱ्या नद्यांची सध्या बघवत नाही इतकी दुरवस्था झाली आहे. मुठेवरच्या कुठल्याही पुलावरून खाली पाहिलं की काळंकुट्ट पाणी दिसतं. घरगुती सांडपाणी, मैलापाणी, औद्योगिक सांडपाणी, घरातला प्लास्टिकचा कचरा, निर्माल्य हे सगळं एकटी मुठाई रोजच्या दिवसाला बिनतक्रार झेलते. नदीच्या जवळ गेलं की घाण वास येतो. पाण्यातून मिथेन वायूचे बुडबुडे येताना दिसतात. आजूबाजूला एरंडाची झाडं, काँग्रेस गवत फोफावलेलं दिसतं. मुळा आणि पवना नद्यांमध्ये प्रदूषित पाण्याचं सूचक असणारी जलपर्णी बेसुमार वाढलेली दिसते. मुठेच्या पाण्यात विरघळलेल्या ऑॅक्सिजनचं प्रमाण शून्याच्या आसपास आहे (जे आठ पीपीएम असलं पाहिजे). पुण्यातल्या नद्यांची झालेली ही दुरवस्था दूर करून तिला पूर्वीसारखंच स्वच्छ-शुध्द करण्यासाठी पुण्यात मोठया प्रमाणावर संस्थात्मक काम होतंय. भारतीय नदी दिनाचं औचित्य साधून या सर्व संस्था एकत्र आल्या आणि ही चळवळ अधिक बळकट करण्याचा आणि जास्तीत जास्त पुणेकरांना या चळवळीशी जोडण्याचा चांगला प्रयत्न झाला. 'स्वच्छ सर्वेक्षण 2019'मध्ये पुणे शहराला क्रमांक मिळवून देण्यासाठी महानगरपालिकाही सरसावली आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेला पालिकेचंही सहकार्य मिळत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, तसंच महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अनेक कर्मचारी यात सहभागी झाले होते. रविवार, 25 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता मुठा नदीच्या सिध्देश्वर-वृध्देश्वर मंदिर घाटापाशी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते 'मुठाई महोत्सवा'चं उद्घाटन झालं. मुठा नदीचा सिध्देश्वर-वृध्देश्वर घाट, पतंगा घाट, पांचाळेश्वर घाट, एस.एम. जोशी घाट, रजपूत वीटभट्टी, ॐकारेश्वर घाट, स्फूर्ती घाट, पटवर्धन घाट, पाषाण, विठ्ठलवाडी, येरवडा, औंध, बाणेर अशा अनेक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम पार पडली. सकाळी सात ते साडेआठ मुठा नदीची स्वच्छता करण्यात आली. शेकडो पुणेकर या मोहिमेत उत्साहाने सहभागी झाले. वसुंधरा स्वच्छता अभियान, देवराई फाउंडेशन, पराडकर फाउंडेशन, जलनदी फाउंडेशन, समग्र नदी परिवार, सागरमित्र, जलदेवता सेवा अभियान, रोटरी क्लब ऑॅफ वाल्हेकरवाडी, अंकुर प्रतिष्ठान, जलबिरादरी, एन्व्हायर्नमेंट कॉन्झर्व्हेशन असोसिएशन, थेरगाव स्वच्छता अभियान, हिरवाई, सेव्ह सलीम अली बर्ड सँक्च्युरी ग्रूप, अशा अनेक निसर्गप्रेमी संस्था स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या. ॐकारेश्वर घाटावर 'शिक्षणविवेक'शी संलग्न असलेल्या एनइएमएस शाळेचे सहा विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. सोमेश्वरवाडी, औंध येथे पुणे महानगरपालिका शाळा क्र. 54चे विद्यार्थी, शिक्षक जमले होते. त्यांनी राम नदीचा किनारा स्वच्छ केला. पुणे मेट्रोनेही सक्रिय सहभाग नोंदवत नदीतला गाळ काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन, डंपर, स्पायडर मशीन इ. यंत्रं आणि कर्मचारी पुरवले. या स्वच्छता मोहिमेत साधारणपणे 30 टन इतका सुका कचरा गोळा करण्यात आला.
रोटरी क्लब ऑॅफ वाल्हेकरवाडी या संस्थेतर्फे केजुबाई घाट, थेरगाव इथे पवना नदीची स्वच्छता करण्यात आली. यात सहभागी झालेल्या 200 स्वयंसेवकांनी सात ट्रक जलपर्णी नदीतून बाहेर काढली आणि पवनामाई स्वच्छ आणि जलपर्णीमुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. दर आठवडयाला रोटरी क्लबचे स्वयंसेवक केजुबाई घाटावर येऊन जलपर्णी काढण्याचं काम करतात. आतापर्यंत सुमारे दीड हजार ट्रक जलपर्णी काढण्यात आली आहे. सोमवारी 27 तारखेला केजुबाई बंधाऱ्यावर अमृता विद्यालयाचे 100 विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. याच दिवशी निलेश मरळ यांनी 'शिवरायांचे पर्यावरणविषयक धोरण' या विषयावर मुलांना मार्गदर्शन केलं. 28 तारखेला याच ठिकाणी 'पवनामाईची आरती' करण्यात आली. हडपसर-मुंढवा साहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने कवडीपाट इथे मुळा-मुठा नदी पात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यात काचेच्या बाटल्या, चपला, बूट, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, टायर असा सुमारे साडेचार टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत कल्याणी स्कूल, नेलडा फाउंडेशन, ग्लोबल शेफर्स, निसर्गयात्री ग्रूप इत्यादी संस्थांनी सहभाग घेतला होता. देहू येथे इंद्रायणी नदीकाठावर पाच हजार पणत्या लावून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सुरेल संगीत आणि पारंपरिक संबळ वाद्याने वातावरण भारून गेले होते. 'नमामि इंद्रायणी' चे सोमनाथ (आबा मसुडगे) यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
एकंदरच पुण्यात सकारात्मक आणि कृतिशील पर्यावरण चळवळीने बाळसं धरलं आहे. नदीला आई मानून या सगळया संस्था आणि ही सगळी माणसं घाम गाळून काम करताहेत.
डॉ. माधव गाडगीळ नेहमी एक गमतीशीर प्रसंग सांगतात - 'पुण्यातच राहणारा माझा एक जर्मन पत्रकार मित्र आहे. तो लहानपणी जर्मनीत असताना ऱ्हाईन नदीत पोहायचा. त्यानंतर ऱ्हाईन नदी प्रचंड प्रदूषित झाली. अलीकडे काही लोकांच्या प्रयत्नाने ती पुन्हा स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा हा ऱ्हाईन नदीत पोहायला गेला आणि त्याला स्वच्छ झालेल्या नदीत पोहताना हर्षवायू झाला! आम्हीही लहान असताना पुण्याच्या मुळा-मुठा नदीत पोहायचो. माझीही आज तीव्र इच्छा आहे की, कधीतरी या मुठेच्या पाण्यात सूर मारावा आणि आपल्यालाही हर्षवायू व्हावा!'' पुण्यात बालपण गेलेल्या आणि मुळा-मुठेचे स्वच्छ रूप पाहिलेल्या अशा अनेकांची ही इच्छा असेल आणि ती पूर्ण होण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने होत राहायला हव्या.
9405955608