कोरिया हा देश भारतापासून अतिदूर असला, तरी या देशाशी प्राचीन काळापासून त्याचे संबंध होते, ते आजपर्यंत आहेत. कोरियात बौध्द तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला होता. कोरियावर भारतीय कलेचा व स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. कोरिया आणि भारत यांच्यामधील सांस्कृतिक संबंधांवर प्रकाश टाकणारा हा लेख.
स.पूर्व पहिल्या शतकापासून कोरियामध्ये विविध राज्ये होती. त्यापैकी पेक्त्से (Baekje), शिले (Silla) आणि कोर्यो (Koryeo) ही तीन महत्त्वाची राज्ये होती. ही राज्ये शिले राजांनी एका छत्राखाली आणल्यावर कोरियाचे एकत्रीकरण झाले. दहाव्या शतकात शिले घराण्याचे राज्य संपुष्टात आले. यानंतर कोरियन साम्राज्याची सुरुवात झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जपानने कोरियावर आक्रमण केले व काही दशके कोरियावर राज्य केले. दुसऱ्या महायुध्दानंतर कोरिया स्वतंत्र झाला. पण उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया असे त्याचे विभाजन झाले.
कोरियामध्ये चीनमधून बौध्द धर्माचे आगमन झाले. इसवीसनाच्या चौथ्या शतकात चिनी सम्राटाने शून ताओ या बौध्द भिक्षूला कोरियाच्या राजाकडे पाठवले होते. कोरियन राजा सोसुरीम याने शून ताओकडून बौध्द दीक्षा घेतली, पण ते राजापुरते मर्यादित राहिले. त्यानंतर मालानंद या बौध्द भिक्षूने बौध्द धर्माचा प्रचार केला. पण कोरियामधील लोकांना बौध्द धर्मात तेव्हा फारसा रस वाटला नाही. सहाव्या शतकात योमचोक नावाचा एक बौध्द भिक्षू शिले राजाच्या दरबारात होता. या बौध्द भिक्षूने राजाच्या दरबारात स्वत:चे शिर तोडून घेतले. असे म्हणतात की त्या वेळी अनेक दैवी चमत्कार घडून आले. ते चमत्कार पाहून तेथील लोक बौध्द धर्माने प्रभावित झाले. शिले राजाने योमचोकच्या स्मरणार्थ मंदिर (Heungryunsa Temple) बांधले. लवकरच संपूर्ण कोरियामध्ये बौध्द धर्म सामान्य माणसांपर्यंत पोहोचला. पुढील काळात कोरियामध्ये Taoism d Confucianism दाखल झाले. आज दक्षिण कोरियामधील नागरिक बौध्द, Confucianism, Taoism आणि ख्रिस्ती धर्मांचे आचरण करत आहेत.
भारत देश बौध्द धर्माचे माहेरघर असल्यामुळे, चीनमधील तसेच कोरियामधील बौध्द भिक्षूंना भारताची ओढ लागली होती. सहाव्या शतकात कोरियामधील जियोमिक (Gyeomik) नावाचा एक बौध्द भिक्षू यापैकी एक. तो अतिशय लांबचा प्रवास करून भारतात आला, संस्कृत शिकला आणि त्यानंतर विनय पिटक शिकला. त्याचा उद्देश सफल झाल्यावर, मायदेशी परत जाताना शेकडो बौध्द गं्रथ घेऊन गेला! त्याने संस्कृत ग्रंथ कोरियन भाषेत अनुवादित करण्यासाठी पुढील आयुष्य वाहिले. कोरियामध्ये सध्दर्मपुंडरीक सूत्र, सुवर्णप्रभास सूत्र, कारुणिकराजप्रज्ञापारमिता सूत्र, सुखावती सूत्र आदी गं्रथ लोकप्रिय झाले होते.
भारतीय धर्माबरोबरच भारतीय कलेचा व स्थापत्याचासुध्दा कोरियावर प्रभाव पडला. भारतातील अजिंठासारख्या बौध्द गुहा, चीनमध्ये व नंतर कोरियामध्येसुध्दा खोदल्या गेल्या. कोरियामधील सोक्कुराम गुहा 8व्या शतकात खोदली गेली. ही गुहा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली गेली आहे. या गुहेत बुध्द, अवलोकितेश्वर, पद्मपाणी यांची व काही हिंदू देवतांचीसुध्दा शिल्पे पाहायला मिळतात.
कोरिया भारताशी आणखी एका कारणाने जोडला गेला आहे. या दोन देशांमधील दुवा आहे इसवीसनाच्या पहिल्या शतकातील अयोध्येची राजकन्या सुरीरत्ना. कोरियामध्ये या राजकन्येविषयी सांगितली जाणारी आख्यायिका अशी आहे - एकदा अयोध्येच्या राजाला स्वप्न पडले की कोरियाच्या राजपुत्राशी त्याच्या कन्येचा विवाह होणार आहे. तेव्हा त्याने राजकन्या सुरीरत्नाला कोरियाला पाठवण्याची व्यवस्था केली. बरोबर राजपुत्र, काही मंत्री, सेवक व थोडे सैन्य दिले. सुरीरत्ना सागरी मार्गाने नावेतून कोरियाच्या दिशेने निघाली. इकडे दक्षिण कोरियामध्ये गय राज्याचा राजपुत्र किम सुरो हा राणीच्या शोधात होता. त्याला त्याच्या मंत्र्यांनी सुचवलेली एकही कन्या पसंत पडत नव्हती. त्याच वेळी सुरीरत्नाची नाव कोरियाच्या किनाऱ्याला लागली. किम सुरो तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला. पुढे त्याने ते पहिल्यांदा भेटलेल्या ठिकाणी एक मंदिर बांधवले! लवकरच किम सुरो आणि सुरीरत्न यांचा विवाह झाला. तिचे कोरियामधील नाव होते हर ह्वांगओक. या लोकप्रिय राणीने काही दशके कोरियात राज्य केले, पण शेकडो वर्षे कोरियातील लोकांच्या मनावर राज्य करत आहे! आज, कोरियातील लाखो लोक स्वत:ला किम सुरो व सुरीरत्नाचे वंशज म्हणवतात.
बाजपेयी सरकारच्या काळात कोरियाबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी अयोध्येत सुरीरत्नाचे स्मारक उभे करण्याचे ठरवले गेले. तेव्हापासून हजारो कोरियन नागरिक अयोध्येला भेट देण्यासाठी भारतात येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या कोरिया भेटीत दोन्ही देशांनी अयोध्येतील स्मारक मोठे करण्याचा निर्णय घेतला. सुरीरत्नाने आपल्या सत्कृत्याने कोरियातील जनतेचे मन जिंकले. तिने निष्काम वृत्तीने केलेल्या कर्माचे फळ आज दोन देश चाखत आहेत!
भारतापासून अतिशय दूर असलेला, कोणत्याही सीमेने न जोडलेला कोरिया. पण त्याला भारताला जोडायचे कार्य केले ते बुध्दाच्या संदेशाने. भारताने सीमेबाहेर काही पाठवले असेल तर तो केवळ बुध्दाचा शांती संदेश पाठवला! इ.स. पूर्व तिसऱ्या शतकातील सम्राट अशोकपासून ते 13 व्या शतकात इस्लामचे आक्रमण होईपर्यंत, भारत जगाला तत्त्वज्ञान, विज्ञान, भाषा, व्याकरण, लिपी, गणित देत राहिला! 'देणाऱ्याने देत जावे' हे कदाचित कवीने भारतालाच उद्देशून म्हटले असावे!
संदर्भ :