दुर्ग हा विषय महाराष्ट्रिकांच्या जिव्हाळयाचा. या विषयास शिवछत्रपतींचं कोंदण लाभलेलं. त्यामुळे हा विषय अभिमानाचाही. जगात कुण्याही देशास लाभला नाही असा दुर्गवारसा आपल्या देशास, आपल्या महाराष्ट्रास लाभला आहे. समाजमाध्यमांमुळे या विषयाबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुती ध्यानी आल्या. जाणवलं की, या विषयाची शास्त्रीय ओळख करून देणं गरजेचं आहे. त्यासाठीच सुरू केलेल्या दोन अभ्यासक्रमांविषयी.
काही क्षण कधीकधी आयुष्याला अकस्मात कलाटणी देऊन जातात. दुर्ग भटकायची सुरुवातही अशीच झाली होती. अठ्ठयाहत्तर साली डोंगरात पहिलं पाऊल पडलं अन ती पावलं डोंगरांची कधी झाली ते कळलंच नाही. कधीकधी वाटून जातं की, हे बहुधा विधिलिखित असावं. अन्यथा दुर्गांच्या वाटा चालू पाहताना गो.नी. दांडेकरांच्या हाती हात गेला नसता. त्या क्षणापासून सारंच बदललं. दुर्ग भटकणं, ते नेटके पाहणं, त्याच्याशी संबंधित वाचणं, आलेले अनुभव मनी साठवणं... हे सारंच कालौघात हळूहळू घडत गेलं. किंबहुना आयुष्याची वळकटी उलगडायची ती सुरुवात होती.
भटकणं सुरूच राहिलं. दुर्गांच्या वाटा पायांखाली येताच राहिल्या. तटाबुरुजांचं, विराण अवशेषांचं, इतिहासाचा रंग पांघुरलेलं ते अद्भुत वातावरण मनाचा कानाकोपरा व्यापत राहिलं. थेंबाथेंबाने तळं साचावं तसं अनुभवाच्या पडशीत गोळा होत राहिलं. काही काळ लोटला आणि पावलं पुढल्या शिक्षणाच्या वाटेवर पडली. विषय अंतरीचाच होता. ज्या दुर्गांमुळे जगण्यातला आनंद सापडला, तो आनंद अभ्यासाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवावा असं मनाने घेतलं. सतरा वर्षांच्या एका लांबलचक दु:सह काळानंतर, मानसिक विघटनाच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या माझ्या हाती 'दुर्ग' या विषयात डॉक्टरेटची पदवी आली अन आयुष्याने पुन्हा एक सुरेख वळण घेतलं. जी स्वप्नं पहिली होती, ती आता हसतमुखाने एक एक सामोरी येऊ लागली. रूप, रंग, गंध असं सारं एकाच क्षणी अनुभवता येऊ लागलं.
2011 या वर्षी डॉक्टरेट मिळाली आणि तिसऱ्याच महिन्यात, जुलै 2011मध्ये गिरीमित्र संमेलनात माझा प्रबंध बाबासाहेब पुरंदरेंच्या हातून मोठया थाटामाटात प्रकाशित झाला. जो मी सहसा कुणाला ठाऊक नव्हतो, तो या ग्रंथामुळे माहीत झालो. या ग्रंथाचं अवघ्यांनीच मनापासून स्वागत केलं. साडेपाचशे पानांच्या या ग्रंथाची काहीशी महागडी आवृत्ती तीन वर्षांत हातोहात संपली. याहून महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथामुळे 'दुर्ग' या विषयासंदर्भातलं एक वेगळं दालन या विषयाशी नाळ जोडलेल्या दुर्गमित्रांसाठी खुलं झालं.
2014च्या सरत्या महिन्यात काही सोबत्यांच्या आग्रहामुळे आणि सहकार्यामुळे वारसा पर्यटनाच्या क्षेत्रात पाऊल घातलं. हे काम खरं तर 2005पासून सुरू होतं. मात्र ते आता अधिक विचाराने अन् योजनापूर्वक करायला सुरुवात केली. आपल्यापाशी जे आहे ते वाटलं, तर मिळणारा आनंद कैक पटींनी वाढतो, ही जाणीव याच काळात होऊ लागली. काही थोडे पैसे मिळत होते. मात्र अनुभव उलगडून दाखवताना मिळणारा जो आनंद होता, तो निरतिशय सुखाचा होता.
प्राचीन भारतीय संस्कृती हा एम.ए.च्या अभ्यासाचा प्रमुख विषय होता. किंबहुना ती मूळ बैठक होती. तो विषय शिकवायची संधी माझा एक मित्र डॉ. सूरज पंडित याच्यामुळे मिळाली. त्यामुळे दुर्ग हा विषय खेरीज करून मूळ विषयाचे निरनिराळे पैलू शिकवता आले. आनंदाची आणखी एक पुरचुंडी हाती लागली. आनंद वेचायची सवय देवदत्त असते. म्हटली तर उत्तम, नपेक्षा मनस्तापाचं कारण.
अभ्यासक्रमाची माहिती
पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने, होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या संस्थेने 'प्राचीन भारतीय संस्कृतीबंध' आणि 'दुर्ग - शास्त्र, स्थापत्य व मीमांसा' या दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची आखणी केली आहे.
मराठी माध्यमातून शिकवले जाणारे व सहा महिन्यांचा कालावधी असलेले हे दोन्ही अभ्यासक्रम, दि. 22 डिसेंबर 2018पासून दर शनिवारी दुपारी 2 ते 5 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या शेजारी, मुंबई - 400001 या ठिकाणी सुरू होतील...
अधिक माहितीसाठी डॉ. मिलिंद पराडकर - 8169448757 किंवा नीलाक्षी पाटील - 8369089128 (दुपारी 1 ते सायंकाळी 5) यांच्याशी संपर्क साधावा.
असंच काहीसं एका क्षणी वाटलं. मनात उमटलं की, आपला वारसा, आपली संस्कृती, आपला इतिहास असे अनेक शब्द आपण बोलण्याच्या नादात सहजच उच्चारत असतो. संदर्भ तर कळत असतो, मात्र त्यामागचा व्यापक अर्थ उमगत नसतो. या विषयाचा आवाका किती प्रचंड आहे, हेही आपल्याला कधीकधी नेमकं ठाऊक नसतं. कुणाला अर्थ विचारावा, तर त्यांना तो नेमका सांगता येत नाही. दुसरी गोष्ट अशी की, या विषयाच्या संदर्भात प्रत्येकाला अपार कुतूहल असतं, मात्र नेमकं समजावून सांगणारं वेळेला कुणी नसतं. या दृष्टीने आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? किंबहुना जेवढी जास्त माणसं या क्षेत्रात प्रयत्न करायला उतरतील, तेवढी हवीच आहेत. मात्र हेतू प्रामाणिक असायला हवा. मग या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. 'होरायझन' या माझ्या आस्थापनेचं नाव बदलण्यापासून सुरुवात करायला हवी होती. कारभार ज्यातून व्यक्त होईल असं नाव हवं होतं. खल होऊन 'होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीज' असं नवीन बारसं झालं. आस्थापनेची नोंदणी झाली. अकाउंट उघडलं गेलं अन 2017च्या वारसा सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ठाण्याच्या शिवसमर्थ शाळेत 'प्राचीन भारतीय संस्कृतीबंध' या नावाने आमचा पहिला वर्ग सुरू झाला. तत्पूर्वी वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या. लोकांचे फोन्स येत होते. त्यांना समजावून सांगणं सुरू होतं. या अशा अभ्यासक्रमाच्या संदर्भात सर्वसाधारण लोकांनी फारसं न ऐकलेलं. त्यामुळे नाना प्रकारचे प्रश्न समोरून विचारले जात होते. हे सारं दहा-बारा दिवसांच्या अवधीत होत होतं. त्या तेवढया काळात अडीचशे-तीनशे कॉल्स आले. होता होता पंचविशी ते साठी या वयोगटातले बारा-पंधरा विद्यार्थी 23 नोव्हेंबरला पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. जामखेडकर सरांच्या समोर बसले होते. त्यांच्याबरोबर महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे नवनियुक्त संचालक डॉ. तेजस गर्गे होते. काळजी करू नकोस, मी आहे, असे न सांगता जाणवू देणारा डॉ. सूरज पंडित होता. या साऱ्या प्रवासात साथ देणारी नीलाक्षी पाटील मनोजसकट हजर होती. बालपणीचा मैतर शंकर राऊत आवर्जून आला होता. सरस्वतीची पूजा करून आशीर्वाद देत सरांनी वर्ग सुरू केला. मन गोडावलं. आणखी एक मैलाचा दगड मागे पडला होता.
सहा महिने सुरू असलेल्या या वर्गाला उत्तम विद्यार्थी लाभले होते. विषयाची मनापासून आवड असलेले. नवीन शिकण्यास, जाणून घेण्यास उत्सुक असलेले. चोवीस शनिवार कसे उलटले, ते कळलंच नाही. शेवटचा वर्ग महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गेंनी घेतला. त्यांच्याच हस्ते प्रमाणपत्रांचं वितरण झालं. त्या लहानशा घरगुती कार्यक्रमात विद्यार्थीही भरभरून बोलले. आता यापुढचे काही शनिवार तरी चुकल्यासारखं वाटेल, हे मानस व्यक्त करत निरोपानिरोपी झाली. या सहा महिन्यांच्या काळात विद्यार्थी-शिक्षकाचं नातं मैत्रात बदललं होतं. अभ्याससहलींच्या माध्यमातून ते अधिकच घट्ट झालं होतं. आज यातल्या चार विद्यार्थ्यांचा तरी एम.ए.च्या दिशेने वाटचाल करायचा विचार पक्का झाला आहे. एका विद्यार्थ्याने अर्धवट राहिलेलं बी.ए.चं शिक्षण पूर्ण करायचा चंग बांधला आहे. सहा महिन्यांच्या या मेहनतीचं हे फलित निश्चितच पुढल्या प्रवासाची ओढ लावणारं आहे!
शेवटचं लेक्चर झाल्यावर डॉ. तेजस गर्गे म्हणाले होते, ''पुढल्या वर्षीपासून हा अभ्यासक्रम पुरातत्त्व विभागाच्या सहकार्याने करू या.'' त्यांनी दिला शब्द प्रामाणिकपणे पाळला. या वर्षीपासून 'प्राचीन भारतीय संस्कृतीबंध' आणि 'दुर्ग - शास्त्र, स्थापत्य आणि मीमांसा' हा नवीन अभ्यासक्रम असे हे दोन्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये विभाग यांच्या सहकार्याने त्यांच्याच कार्यालयात होताहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाची जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे.
दुर्ग हा विषय महाराष्ट्रिकांच्या जिव्हाळयाचा. या विषयास शिवछत्रपतींचं कोंदण लाभलेलं. त्यामुळे हा विषय अभिमानाचाही. जगात कुण्याही देशास लाभला नाही असा दुर्गवारसा आपल्या देशास, आपल्या महाराष्ट्रास लाभला आहे. समाजमाध्यमांमुळे या विषयाबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुती ध्यानी आल्या. जाणवलं की, या विषयाची शास्त्रीय ओळख करून देणं गरजेचं आहे. ज्यांना दुर्ग या विषयाबद्दल प्रामाणिकपणे जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी दुर्ग हा विषय ताकदीने उभा करणं गरजेचं आहे. म्हणून मग दुर्ग, त्यांमागची संकल्पना, प्राचीन साहित्यातील त्यांचं स्थान, त्यांच्या जागतिक वारशाची ओळख, त्यांचं स्थापत्यशास्त्र, त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या योगदानाची शास्त्रीय कारणमीमांसा या अशा विविधांगांनी हा विषय आजच्या शास्त्रशुध्द बैठकीवर विश्वास असणाऱ्या तरुण पिढीसमोर येणं गरजेचं आहे. दुर्ग हा विषय दुसऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी निवडण्याची ही कारणं आहेत.
हे दोन्ही अभ्यासक्रम शिकवणारे प्राध्यापकही त्यांच्या त्यांच्या विषयातली दादा मंडळी आहेत. प्राचीन भारतीय संस्कृती या मूळ विषयाशी प्रामाणिक असणारी आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा झाला तर फायदाच होणार आहे. पुढे जाण्यासाठी उचललेलं हे पाऊल ध्येयापाशी नेणारा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, याविषयी मन निश्चिंत आहे!