योग्य आहार नसल्याने हवी तेवढी झोप न मिळणं, एकाग्रता कमी होणं, चिडचिड होणं, चंचलता वाढणं, hyperactivity, स्थूलता वाढणं हे आणि असे अनेक परिणाम दिसून येतात. या अशा अनियमित आहाराच्या सवयीबाबत आणि त्यामुळे वरवर दिसणाऱ्या काही परिणामांबाबत पालक तक्रार करतात. परंतु त्या गोष्टीकडे तितकंसं गांभीर्याने लक्ष देत नाहीत. या अशा आहाराच्या सवयींचं काही विकारांमध्येही परिवर्तन होऊ शकतं, याबाबत आपल्याला तितकीशी माहिती नसते.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारामध्ये - विशेषतः मुलांच्या आहारामध्ये बराच बदल झालेला आढळतो. फास्ट फूडची, जंक फूडची क्रेझ सध्या एकदम वाढली आहे. बाजारात आलेले वेगवेगळे ब्रँड्स, त्यांचे वेगवेगळे पदार्थ हे सगळं मुलांना आणि त्याचबरोबर बऱ्याचदा मोठयांनादेखील आकर्षित करतात.
कुमारवयीन मुलांमध्ये दिसत असलेल्या अनेक समस्यांचं कारण त्यांचा बदललेला आहार हेदेखील असू शकतं. या वयात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, मेंदूची होणारी वाढ या सगळयासाठी त्यांचा आहार पोषक असणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु या वयातील त्यांच्या आवडीनिवडीमुळे त्यांना पोषक आहार मिळतच असेल असं नाही. बऱ्याचदा जेवणाच्या बाबतीत मुलांची तक्रार असते. ठरावीकच भाज्या आवडणं, पाव, मॅगी हे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं हे सगळं बऱ्याचदा दिसून येतं. काही पालक विशेषत: आई आपल्या मुलाच्या शरीरात पौष्टिक अन्न गेलं पाहिजे यासाठी वेगवेगळया रेसिपीज बनवत असते. परंतु आजकाल दोन्ही पालक नोकरीमध्ये व्यग्र असल्याने आणि बऱ्याच शाळांमध्ये कॅन्टीनची व्यवस्था असल्याने मुलांना हवं ते खाण्याची मुभा आपसूकच मिळते.
मी शाळेत समुपदेशक म्हणून काम करत होते, तेव्हा बरेच शिक्षक मुलांमध्ये असलेल्या खाण्याच्या सवयींची, ते घरून आणत असलेल्या डब्याची तक्रार घेऊन यायचे. एका मुलाच्या डब्यात रोज दोन पाव आणि सॉस असं असायचं. अगदी रोज. त्या मुलाच्या आईशी मी बोलले, तेव्हा त्यांचं उत्तर होतं की ''तो पाव सोडून इतर काहीच खात नाही. दुपारी, रात्री जेवतानासुध्दा पाव असेल तरच खातो, नाहीतर जेवतच नाही. मग उपाशी राहण्यापेक्षा मी त्याला पावच देते.'' आणखी एका मुलाला फक्त मटकीची उसळ आणि साबुदाणा एवढंच आवडायचं. त्यामुळे त्याची आई त्याला एक दिवस उसळ आणि एक दिवस खिचडी असाच डबा द्यायची. काही मुलं स्वत:चा डबा खाऊन शिवाय कॅन्टीनमधून दोन वडापाव खायचे.
या अशा सगळया विचित्र खाण्याच्या सवयींचा त्यांच्या बौध्दिक, मानसिक विकासावर, त्यांच्या एकाग्रतेवर, वागणुकीवर परिणाम होताना दिसतो. योग्य आहार नसल्याने हवी तेवढी झोप न मिळणं, एकाग्रता कमी होणं, चिडचिड होणं, चंचलता वाढणं, hyperactivity, स्थूलता वाढणं हे आणि असे अनेक परिणाम दिसून येतात. या अशा अनियमित आहाराच्या सवयीबाबत आणि त्यामुळे वरवर दिसणाऱ्या काही परिणामांबाबत पालक तक्रार करतात. परंतु त्या गोष्टीकडे तितकंसं गांभीर्याने लक्ष देत नाहीत. या अशा आहाराच्या सवयींचं काही विकारांमध्येही परिवर्तन होऊ शकतं, याबाबत आपल्याला तितकीशी माहिती नसते.
या वयातील मुलं खाण्यासाठी जेव्हा नखरे करताना दिसतात, तेव्हा त्याचं कारण त्यांच्या आवडीनिवडींबरोबरच त्यांच्या शरीराबद्दल असलेली चिंतादेखील असू शकते. विशेषत: मुलींमध्ये हे आढळून येतं. मुली आपल्या शरीराच्या बाबतीत जास्त सावध असतात. हे खाल्ल्याने माझं वजन वाढेल, माझी फिगर बिघडेल अशी चिंता त्यांच्या डोक्यात असते आणि त्यामुळे कमी खाणं, ठरावीक गोष्टीच खाणं किंवा अगदी लहान वयातच डाएटिंगचं फॅड त्यांच्या डोक्यात येतं.
परंतु यातूनच आहारासंबंधीच्या काही विकारांची सुरुवात होऊ शकते, ज्यांना Eating Disorders असं म्हणतात. सर्वसाधाराणपणे आढळून येणाऱ्या काही Eating Disorders पुढीलप्रमाणे -
1) Anorexia Nervosa - या आजारामध्ये वजन वाढेल अशी भीती सतत मनात असते. आपण खूप जाड आहोत असं ठाम मत असतं. बऱ्याचदा ही मुलं बारीक असतात. परंतु त्यांना स्वत:ला मात्र आपण खूप जाड आहोत असं सतत वाटत राहतं आणि मग वजन कमी करण्यासाठी ते सतत धडपड करत राहतात. भूक असूनसुध्दा भूक नाहीये असं सांगणं, गरजेपुरतंसुध्दा न खाणं, अती व्यायाम कारणं, आपल्या वजनाबद्दल, शरीराबद्दल सतत चिंतित राहणं हे यामध्ये दिसून येतं. ही मुलं बऱ्याचदा एकटी राहतात, चिडचिड करतात, सतत कसल्यातरी चिंतेत असतात, शाळा-कॉलेजला न जाण्याचा हट्ट करतात.
Eating Disordersचे हे दोन मुख्य प्रकार आहेत. या disorders लहान मुलापासून अगदी मोठयांपर्यंत कोणामध्येही दिसू शकतात. लहान मुलांमध्ये आहाराच्या सवयी बिघडण्यामागे अनेक कारणं असू शकतात.
कुटुंबामध्ये असलेले काही ताणतणाव, पालकांमधील मतभेद, भांडणं, स्वत:च्या प्रतिमेबद्दल, शरीराबद्दल संकोच, आई-वडिलांना डाएटिंग करताना बघून त्यांचं अनुकरण करायला जाणं अशा काही गोष्टींचा आहारावर नकळत परिणाम होत असतो. काही वेळा मुलांना आपला कोणत्याच गोष्टीवर कंट्रोल नाहीये असं वाटत राहतं आणि मग तोच कंट्रोल आपल्याला खाण्याच्या बाबतीत मिळतोय असा समज ते करून घेतात. तसंच आजकालची मुलं सकाळपासून रात्रीपर्यंत शाळा आणि क्लास यामध्ये इतकी व्यग्र असतात की त्यांच्या शरीराला हवी तेवढी चालना मिळत नाही. मैदानी खेळ खेळले जात नाहीत. काही पालक स्वत:च्या रूटीनप्रमाणे मुलाचं रूटीन ठरवतात. ते रात्री ऑॅफिसमधून 10ला घरी आले की त्यानंतर 12-1पर्यंत मुलाचा अभ्यास घेणं असं त्यांचं वेळापत्रक असतं. परंतु यामुळे मुलांची झोप आणि परिणामी त्यांचा आहार यावर परिणाम होतो.
पोषक आहार हा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर गरजेचा असतो. आपल्या शरीराची, मेंदूची योग्य वाढ होण्यासाठी, सशक्त राहण्यासाठी पोषक आहाराची गरज असते. आजकालच्या मुलांमध्ये दिसत असलेल्या आहाराच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना आहाराबाबत योग्य माहिती असणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचे पदार्थ आपल्या शरीरात जाण्याची का आवश्यकता असते? हे त्यांना पटवून देण्याची गरज आहे. आपल्या शरीराला काही प्रमाणात फॅट्सचीसुध्दा आवश्यकता असते आणि डाएट करणं हे मुलांसाठी गरजेचे नाही हे त्यांना समजावून दिलं पाहिजे. मुलांना त्यांच्या खाण्याचा अंदाज येत नसेल, तर पालकांनी त्यावर कसा कंट्रोल ठेवायचा हे मुलांना शिकवलं पाहिजे. शाळेत आपला मुलगा डबा व्यवस्थित खातो की नाही, डबा खाऊन बाकी कॅन्टीनमधून किंवा इतरांच्या डब्यातून खातो का? थोडक्यात, गरजेपेक्षा जास्त खातो का, याची माहिती शिक्षकांकडून घ्यायला हवी. जंक फूड, फास्ट फूड किती प्रमाणात द्यायचं, हे पालकांनी ठरवायला हवं. मुलांचा आहार संतुलित असावा याची दक्षता घ्यायला हवी आणि त्यासाठी इतर काही गोष्टीसुध्दा योग्य वेळेत, योग्य प्रमाणात व्हायला हव्यात. मुलाचं रोजचं एक ठरावीक वेळापत्रक असेल, तर मुलांना त्याची सवय होते. मुलांची झोपण्याची वेळ, खाण्याच्या वेळा या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत. कारण जेवण आणि झोप या दोन गोष्टी वेळेत आणि योग्य तेवढया असतील, तर बाकीच्या गोष्टीदेखील सुरळीत व्हायला मदत होते. त्याचबरोबर मुलांची काही ना काही physical activity होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. मैदानी खेळ किंवा इतर काही activities, ज्यामध्ये मुलांची शारीरिक हालचाल होईल यासाठी त्यांना प्रोत्साहित करायला हवं. पालकांच्या सोयीनुसार नाही, तर मुलांच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्यांचं वेळापत्रक आखायला हवं.
तसंच वर नमूद केलेल्या Eating Disordersची काही लक्षणं मुलांमध्ये आढळून येत असतील, तर त्यासाठी डॉक्टर, समुपदेशक अशा त्यातील तज्ज्ञांचा सल्ला वेळीच घेणं आवश्यक आहे.
muditaa.7@gmail.com