प्राचीन काळापासून बाराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती दूरदूरपर्यंत पोहोचली होती. भारतीय धर्म, देव, भाषा, लिपी, साहित्य, तत्त्वज्ञान, अंकगणित, कालमापन पध्दती इत्यादींच्या खुणा जिथे सापडल्या आहेत, त्या स्थळांची ही यात्रा.
साधारण इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून ते नवव्या शतकात इस्लामचे आक्रमण होईपर्यंत पाकिस्तानमध्ये व अफगाणिस्तानमध्ये बौध्द धर्म भरभराटीस आला होता. आज त्या प्रांतातील बौध्द धर्माच्या खुणांचा एक मागोवा...
सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. तरी सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी
https://www.facebook.com/VivekSaptahik/ पेज likeकरावे....
धन्यवाद
इ.स.पूर्व पाचव्या शतकात गौतम बुध्दाने अहिंसेचा संदेश दिला. बुध्दाने सांगितलेल्या चार सत्य व आठ साम्यक आचारांचा मार्ग लोकप्रिय झाला. त्यानंतर दोन-अडीचशे वर्षांनी इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक गादीवर आला. कलिंगच्या लढाईतील संहार पाहून अशोकला बुध्दाच्या अहिंसेचा मार्ग खुणावू लागला. पुढच्या काळात अशोकने पाटलीपुत्र येथे बौध्द धर्माची तिसरी परिषद भरवली. त्याने बुध्दाच्या स्मरणार्थ अनेक स्तूप उभारले आणि अहिंसेच्या मार्गाचा प्रचार करण्यासाठी ठिकठिकाणी शिलालेख लिहिले. पंजाब, गांधार, काश्मीर या प्रांतांना बुध्दाची पहिली ओळख करून दिली ती सम्राट अशोकाने. अशोकाने कंदाहर, जलालाबाद, शहाबाझगढी, मन्सेरा, तक्षशिला येथे लिहिलेले शिलालेख आहेत. त्याने उभारलेल्या स्तूपांचे अवशेष आहेत. त्याचा मुलगा कुणाल याने तक्षशिला येथे बांधलेल्या स्तूपाचे व मठाचे अवशेष आहेत.
अशोकाच्या नंतर बुध्दाच्या संदेशाने प्रभावित झालेला सम्राट होता - Menander. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात, गांधार-पंजाबमधील हा यवन (Indo-Greak) राजा होता. बौध्द साहित्यात Menanderचे नाव 'मिलिंद' असे येते. नागसेन या बौध्द भिक्षूबरोबरचा राजा मिलिंदचा संवाद 'मिलिंदपन्ह'मध्ये ग्रथित आहे. मिलिंदचे धर्माविषयी प्रश्न आणि नागसेनाने दिलेली उत्तरे या ग्रंथात आहेत. बौध्द शिकवणीने प्रभावित झालेल्या मिलिंदने अनेक लोकोपयोगी कामे केली. मिलिंदपन्हनुसार या राजाने वृध्दापकाळात मुलाला गादीवर बसवून राज्यत्याग केला. तर ग्रीक इतिहासकारांच्या अनुसार या प्रजावत्सल राजाच्या मृत्यूनंतर जनतेने त्याच्या अस्थींवर स्तूप बांधले होते.
ग्रीकांनंतर कुशाण राजांनी या प्रांतात राज्य केले. इ.स. दुसऱ्या शतकातील कुशाण सम्राट कनिष्क बौध्द धर्माने प्रेरित झाला होता. त्याने काश्मीरमध्ये बौध्द धर्माची तिसरी परिषद भरवली. त्याच्या दरबारातील कवी अश्वघोष याने लिहिलेले 'बुध्दचरित' हे संस्कृत महाकाव्य म्हणून प्रसिध्दीस आले. कनिष्कने पेशावर येथे 560 फूट उंच स्तूप बांधला होता. चौथ्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याने या स्तूपाची नोंद केली आहे. या स्तूपाचे अवशेष 'शहाजी की डेरी' म्हणून ओळखले जातात.
आज अफगाणिस्तानमध्ये व पाकिस्तानमध्ये मिळणाऱ्या असंख्य स्तूपांच्या, बुध्दमूर्तींच्याआणि विहारांच्या अवशेषांवरून येथे बौध्द धर्म किती लोकप्रिय होता याची कल्पना करता येते. पाकिस्तानमध्ये कटास राज येथे एक 200 फूट उंच स्तूप होता, हे शुआनझांगच्या सातव्या शतकातील नोंदींवरून कळते. सिंधमधील मीरपूरखासमध्ये मोठे स्तूप व विहार होते. स्वात खोऱ्यात तर अनेक बौध्द स्तूप व विहार होते. पाकिस्तानमधील एकटया रावळपिंडी नगरीत 55 बौध्द स्तूप आणि 28 बौध्द विहार होते. असे अवशेष ठिकठिकाणी आहेत.
अफगाणिस्तानच्या काबुलजवळच्या टेपे नारंज या ठिकाणी साच्यातून तयार केलेल्या मातीच्या बुध्द मूर्ती मिळाल्या आहेत. काबुलच्या जवळ मेस-अयनाक येथे टेकडीवर चार तटबंदीयुक्त बौध्द विहार मिळाले आहेत. गझनीच्या जवळ टेपे सरदार येथे बौध्द विहाराचे अवशेष मिळाले आहेत. जलालाबाद जवळचे नगराहार (हड्डा) हे एक प्रसिध्द बौध्द केंद्र होते. या परिसरातील टेपे काफिरीहा, टेपे कलान, टेपे शुतूर इत्यादी ठिकाणी लहान-मोठया विहारांचे, चैत्यांचे व स्तूपांचे अवशेष मिळाले आहेत.
भारत, चीन आणि इराण यांना जोडणारा व्यापारी मार्ग अफगाणिस्तानमधून जात असे. या महामार्गावर उत्तर अफगाणिस्तानमधील तख्त-ए-रुस्तम येथे दगडात कोरलेला मोठा स्तूप व अनेक बौध्द गुहा आहेत. याच महामार्गावरील बामियानच्या लांबच लांब पसरलेल्या डोंगरकडयावर पाचव्या-सहाव्या शतकात शेकडो बौध्द गुंफा खोदल्या गेल्या. महाराष्ट्रात अजिंठाच्या गुहा तयार होत असताना अफगाणिस्तानच्या बामियानमध्ये 750 गुहा तयार केल्या गेल्या! यातील काही गुहांमध्ये स्तूप होते. काही गुहांच्या छतांवर व भिंतींवर आजही अतिशय सुरेख रंगीत चित्रे पाहायला मिळतात. परंतु बामियानचे मुख्य आकर्षण होते तेथील कडयावर कोरलेल्या दोन महाकाय बुध्दमूर्ती. दगडात कोरलेल्या, वरून मातीचे काम केलेल्या व रंगवलेल्या मूर्ती पाहायला लोक दूरदुरून येत असत. चीनमधून आलेला शुआनझांगने बामियानबद्दल भरभरून लिहिले आहे.
अफगाणिस्तानमध्ये बुध्दाच्या इतक्या मूर्ती तयार केल्या गेल्या की येथे आठव्या-नवव्या शतकात आलेले अरब कोणत्याही 'मूर्ती'ला बुध्द / बुत् म्हणू लागले आणि हजारो मूर्तींचे भंजन करणाऱ्या राजांनी मोठया प्रौढीने 'बुत् शिकन' ही पदवी घेतली. अफगाणिस्तानमधील नव-बुत्शिकन म्हणजे तालिबान होत. इ.स. 2001मध्ये तालिबानने बामियानच्या दोन प्रचंड बुध्दमूर्ती उद्ध्वस्त केल्या.
दीपाली पाटवदकर
9822455650