पाऊस पाऊस

विवेक मराठी    13-Nov-2018
Total Views |

 चितदरवाजा ते वाळसुऱ्याची खिंड हा पहिलाच टप्पा पार दम काढणारा. मात्र तो कधी संपला ते कळलंच नाही. पायाखालचा रस्ता अकस्मात डावीकडे वळला, तेव्हा भान आलं की बहुधा वाळसुऱ्याची खिंड आली. वरून चळतधारा अक्षरश: कोसळत होत्या अन त्या पाण्याच्या पडद्याआडून हातभरावरचंही काही दिसत नव्हतं. धुकं अंगाशी झटत होतं. थंडीने शरीर दाठुरलं होतं. संवेदना बधिरतेच्या सीमारेषेवर उभ्या होत्या. हातापायांचे तळवे पांढरे पडू लागले होते. गात्रं थडथडत होती. मात्र मन? ते तर त्या राजाच्या आठवणीत रमून गेलं होतं...

 

 सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून 
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/

 कधी हातात गरम चहाचा वाफाळलेला कप असतो. मांडीवर 'चकवाचांदण' असतं. बाहेर कोणत्याही क्षणी ऊर फुटून कोसळेल असं दाटलेलं काळंकरडं आभाळ असतं. हवा कुंदावलेली असते. चितमपल्लींच्या आत्मानुभूतीच्या एखाद्या वाक्यात रेंगाळलेलं मन दाटल्या आभाळात हरवून जातं. एका क्षणी कळत-नकळतशी हलकी झुळूक कुंडीतल्या पामची पानं हलवत बाल्कनीतून घरात शिरते. मानेला हलका स्पर्श करत ती शरीर मिठीत घेते. तलखलेले डोळे हलकेच मिटतात. चहाचा मग दोन्ही तळव्यात येतो. त्या उबेने मवारलेलं मन बाहेर कोसळणाऱ्या पावसधारांची झड अंगावर घेत डोंगरांच्या वळचणीला धावतं...

मनावर असा पाऊस घेतला की, धुकटाचं पागोटं माथी लपेटलेला गर्द हिरवा, ओलासाण धक्कधिंग रायगड कधीकधी मिटल्या डोळयांपुढे साकारतो. हरखून मन तत्क्षणी गतकाळात धावतं. तीन तपांपूर्वी पाहिलेला रायगडचा पहिला पाऊस लख्ख आठवतो अन् चिंब झालेलं माझं मन त्या नुसत्या आठवणीनेच न्हाऊन धुऊन सुस्नात होतं.

आजवर चारेकशे वेळा रायगडी माथा टेकवून आलोय. तेथले सारेच ऋतू मनमुराद अनुभवलेत. कितेकदा महिना महिना तेथे मुक्काम केलाय. डोळे झाकून सोडलं, तरी कोठलाही कोपरा शोधीन इतका हा दुर्ग अंतरी गच्च बसलाय. मला वाटतं ऐंशी साली पहिल्यांदा मला रायगडाचं दर्शन घडलं. वैशाखातल्या एका तळपत्या दुपारी, माझ्या पाठीवरल्या पिशवीत इतर सामानासह दोन-तीन कलिंगडं वागवीत आम्ही गडमाथा गाठला होता. दोनतीन दिवस मुक्कामाचा बेत होता. ते तिन्ही दिवस निखळ सुख अनुभवलं होतं. कडकडत्या उन्हात पाहिलेल्या या दुर्गाने प्रथमक्षणी मनात घर केलं.

भटक्या अन् विमुक्त जमातीत नुकताच प्रवेश झाला होता. डोंगरातून घरी परतताक्षणी पुन्हा पळूपळू होत होतं. वर्षाच्या पहिल्या आठवडयात वर्षभराच्या भटकंतीचं वेळापत्रक तयार होत होतं. साथीला कुणी असलं तर ठीक, नपेक्षा आईला चक्क थापाडून एकटाच भटकायला पसार होत होतो. दोन विता लांबीरुंदीच्या पाठपिशवीवर अन् लाल डब्याच्या आधारावर चार-सहा दिसांची भटकंती निर्विघ्नपणे पार पडत होती. सोस केवळ भटकायचा होता. दुर्गांच्या वाटावर उमटलेली थोरल्या राजाची पावलं निरखण्याचा होता. मनमुराद छायाचित्रणाचा होता.

हल्ली भटक्यांना टेंट लागतो. शंभर लीटर्सची पाठपिशवी लागते. हायड्रेशन सिपर लागतो. डीएसएलआर, ट्रायपॉड - त्यांच्या वेगळया थैल्या, बायनॉक्युलर्स, यूव्हीप्रूफ टोप्या, ग्लेअर्स, हवा खेळती ठेवणारे क्विक ड्राइंग टी-शर्ट्स, अल्पाइन स्लिपिंग बॅगा, हजारो रुपये किमतीचे ट्रेकिंग शूज, वॉकिंग पोल्स, स्विस नाइफ, सोलर चार्जर्स असा बराच पॅराफर्नेलिया लागतो. ढुंगणाखाली गाडी लागते. मगच गडी सेल्फीसाठी वन-डे ट्रेकला तयार होतो..!

माझ्या उमेदवारीच्या काळात हे असलं काहीच नव्हतं. फक्त इतिहासाची आवड होती. वाचनाचा अपार सोस होता. आजच्या एका पिझ्झाच्या बिलाच्या रकमेत पाच-सहा उत्तम पुस्तकांची संग्रहात भर पडत होती. त्यांची पारायणं करत दुर्गांच्या अस्पर्श वाटा तुडवल्या जात होत्या. याच दुर्गांनी जीताजागता शिवाजीराजा पाहिला, या एवढया एकाच विचाराने छाती दाटून येत होती अन् डोळयांच्या कडा ओलावत होत्या. दुर्ग भटकायला तेवढं निमित्त पुरत होतं. आणखी वेगळया कशाचीही गरज भासत नव्हती.

हळूहळू इतिहासाच्या आवडीच्या सोबतीने ऋतुचक्रं न्याहाळायची सवय जडली. चौ ऋतूंत दिसणारा निसर्ग लोभावून टाकत होता. मन सुखावत होतं. ऋणाइतासारखं जे जे मिळेल ते कवळत होतं. जे जे दिसत होतं, ते ते शब्दरूप घेऊन मनी रुजत होतं. मूळ धरत होतं. याहीवर वाचनाचे संस्कार होतच होते. आप्पांच्या देवदत्त शब्दकळेची भुरळ पडली होती. सत्तांतरासारखं अद्भुत वाचताना, न मागताही माडगूळकर खूप काही देऊन जात होते. संतवाचन सुरू होतं. माउलींना वाचताना त्या अपूर्व शब्दकळेने अंतरंग उजळून निघत होतं. या अवघ्यांच्या वर्षावात मुक्त न्हाऊन निघत होतो. आता विमुक्त भटकण्याला ऋतूंच्या रंगदेखण्या छटा लाभत होत्या. नजर नितळ होत होती अन् अशा माझ्या उमेदवारीच्या काळात रायगडचा पहिला पाऊस मी अनुभवला..!

कोऱ्या करकरीत कॅन्व्हासवर काढलेल्या पहिल्या चित्रासारखा हा पाऊस गेली अडतीस वर्षं माझ्या मनात मुक्कामी आहे. डोळे मिटले की अवघ्या बारकाव्यांनिशी हा कोसळू लागतो.

बहुधा एक्क्याएेंशी साल असावं. जुलै संपत आला होता. एकटाच होतो. आठवडयाभराचा मुक्कामाचा बेत होता. तेव्हा ओझं वाहायची हौस असायची. म्हणून मग पाठीवर मस्त ओझं होतं. एस.टी. मिळाली खरी, मात्र धावताना त्यातून निघणारे चित्रविचित्र आवाज ऐकून मन शंकाकुळलं होतं. सहसा असे अभद्र होरे चुकत नाहीत. नेमकं तेच झालं. सकाळची साडेदहाची महाड-रायगड कोंझरच्या अलीकडे एअरलॉक होऊन बंद पडली. गाडी पुढे जायचा प्रश्नच नव्हता. आता गडावर जायचं म्हणजे दोन पायांशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा आतासारख्या हात दाखवून थांबणाऱ्या टमटम, मोटरसायकली नव्हत्या. दिवसभरात दोनतीन यष्टया त्या रस्त्यावरून धावायच्या. त्या चुकल्या तर पायापिटीशिवाय पर्याय नसायचा. त्या दिवशी नेमकं तेच घडलं. कोंझरला उतरणारी चारदोन डोकी उतरून दिसेनाशी झाली. पाचाडचे चारसहा उतारू होते. बोल बोल म्हणता तेही दिसेनासे झाले. उरलो मी अन् चालक-वाहकाची जोडगोळी. त्यांनी झाडाखाली जात निवांतपणे चुनातंबाखूच्या पुडया काढल्या. मनी म्हटलं - आता इथून हलायला हवं. मग भक्कम ओझं उचललं. पाठीवर लादलं अन् रायगडाच्या चढावर पाऊल घातलं.

आषाढात पावसाने धुमाकूळ घातला होता. भोवतालचं रान अमाप पोसलं होतं. रानाला आंबा होता. जांभूळ होती. चुकार साग फुलोरला होता. आईन होता. अंजन, बेहडा, हिरडा होता. शेवाळल्या बुंध्याच्या त्या थोरल्या दांडग्या वृक्षांनी रानावर सावली धरली होती. पायाखालची पावटी मळलेली होती. बऱ्यापैकी वापरातली होती. पावटीच्या दोहो बाजूंस कंबरभर झुडपं माजली होती. रसरसल्या गवताला सोबत म्हणून कुडा-करवंदांनी मूळ धरलं होतं. वीत वीत वाढलेला तेरडा डोकं वर काढून नव्या जगाची नवलाई न्याहाळत होता. फुलारून तृप्तावलेली टणटणी आता पुन्हा नव्या जोमाने मूळ धरू लागली होती. देखणी कळलावी गौरा-गणपतींच्या आगमनाची चाहूल देत होती. अधीमधी रानअळूची बेटं तरारली होती. निळघंटीच्या वेलींनी एखाद्या दणकट बुंध्याला मिठीत घ्यायला सुरुवात केली होती. वनस्पती ओळखू जाता एखादा जाणताही भांबावून जाईल असं रान गच्चगर्द दाटलं होतं. मूळ रंग एकच. हिरवा. मात्र त्या हिरव्याच्या रंगछटा पानापानागणिक वेगळया होत्या. माथ्यावरलं आभाळ भुरकं पांढुरकं अन् निळसर होतं. उन्हाचा सावली-दिवलीचा खेळ सुरू होता. भिजल्या रानाचा थंडावा अंगाला चावत होता. लालजर्द पायवाट धुतल्यागत स्वच्छ होती. सरत्या श्रावणाला निरोप द्यायला भाद्रपद दाराशी येऊन उभा राहिला होता. रान प्रसन्न भासत होतं. त्यागुणे मनही हलकं होतं.

चढाच्या पहिल्या शेपाचशे पावलात छातीचा भाता सुरात आला. पाठीचं भक्कम ओझं शरीराचा भाग बनून गेलं. चढत्या पावलागणिक न दिसणारा रायगड पावलापावलाने जवळ येऊ लागला. थोरल्या राजाची ही राजधानी किती अवघड आहे, हे कोंझरवरून चढताना शब्दश: अगदी पावलागणिक जाणवतं. आज गाडया थेट चितदरवाजाला भिडतात. गाडीतून निघालेलं पाऊल थेट पायरीवर उतरतं. निम्म्याहून अधिक उंची आपण इंजीनाच्या जोरावर पार करतो. मात्र उरलेली चौदाशे पायऱ्यांची उंची पार करता करता आपल्या छातीच्या रेडिएटरमधून धूर यायला सुरुवात होते.

पावलापावलाने पाचाड जवळ येत होतं. पायांखालची गवताने बांध धरलेली पायवाट मधूनच रान सोडून डांबरी सडकेच्या गळयात पडत होती अन् एखाद्या अवघड वळणावर तिच्याशी फारकत घेत पुन्हा रानाशी सोयरीक जुळवत होती. शरीरातून घामाच्या धारा निघत होत्या. कोंझरच्या रानात शिरलो, तेव्हा भलं गार वाटत होतं. अकस्मात हवेला काय झालं असं मनी उमटलं अन् त्याच वेळी आभाळाकडे नजर गेली. मघा दिसणारे आभाळाचे निळे तुकडे गायब झाले होते. काळया करडया गलेलठ्ठ ढगांनी जागा मिळेल तशी गर्दी करायला सुरुवात केली होती. गवताची पाती हलवीत धावणारी हलकी झुळूकही स्तब्धावली होती. मघाशी रानात चैतन्य जाणवत होतं. दाटत्या आभाळाबरोबर बहुधा तेही दाठुरलं होतं. मघा नाना गंध सवे घेऊन येणारा श्वासही आता पारोसा भासत होता. सिकाडयांची रानातली जागल शांत झाली होती. झाडांच्या गर्दावल्या छताआड जाणवणारी पक्षांची मुक्त हालचालही कुणी शपथ घातल्यागत निचळ झाली होती. बहुधा त्या दाटल्या रानात त्याक्षणी बहुधा मीच एकटा चुळबुळमुंगळा हालताडुलता होतो.

पावलांनी आता आपसूकच वेग घेतला. बहुधा अंतर्मनाला कुठेतरी अघटित अकल्पिताची चाहूल लागली होती. काळंकरडं आभाळ झाडांच्या छताआडून डोळे वटारून पाहात होतं.

मन कुठतरी कुचकुचलं. अनुभव असा की, कुशंकांच्या पाली तर नेहमीच खऱ्या ठरतात. वातावरणात जणू एक विचित्र उकडहंडी लागली होती. चढामागून चढ भसाभसा पार होत राहिले. ओलसर लाल मातीने पाय माखत राहिले. पाचाडच्या अलीकडला चढ आला. तो पार झाला अन् पायांखालची वाट सपाटली. मांडया भरून आल्या होत्या, त्या काहीशा हलक्या झाल्या. फुललेला श्वास आवरू निघाला. मात्र कोंदाटलेलं मन मात्र काही केल्या मोकळं व्हायला तयार नव्हतं.

आभाळ आता उतरू निघालं होतं. ओथंबलेले ढग हिरकणी टोकावरून घरंगळायला सुरू झाले. ती घसरंड वाळसुऱ्याच्या खिंडीत आदळून अर्धी हिरकणीवाडीच्या उतारावर, तर उरलेली अर्धी रायगडवाडीच्या रानात कोसळायला सुरुवात झाली होती. धुकटाचे काही लोट तळातल्या वाळसुऱ्यातून रायगडाची भिंत चढायचा प्रयत्न करीत होते. ढगाधुक्याची सरमिसळ होत होती. कुंद वातावरण अजून सर्दावून जात होतं. माथ्यावरलं आभाळ इतकं काळवंडलेलं मी तरी आजवेरी पाहिलं नव्हतं. वारा निचळ होता. नि:शब्द धुक्याने आता अवघ्या वातावरणाचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती.

पाचाडातल्या घरांची धुऊन लख्ख झालेली लाल लाल कौलं हिरवटलेल्या खोडांआडून नजरेस पडली अन् मी मनी थोडका सावरलो. माणसात आल्याची भावना बहुधा सुखावून गेली. मात्र पाचाडातल्या साऱ्याच हालचाली बंद दाराआड होत होत्या. गुरंवासरंही छपराच्या आडोशाला शिरली होती. एरवी उगा वणवणणारी गावकुत्रीही नाकं वर करून हवा हुंगीत, येऊ घातल्या पावसाचा अदमास घेत झाडाबुडाशी अंग घासू लागली. वर पाहिलं तर गडाने धुकटाचं टोपडं चढवलं होतं. हिरकणीवाडीच्या दिशेचं आसमंत धुरकट व्हायला सुरुवात झाली होती. नजर फिरत फिरत चितदरवाजाच्या खिंडीच्या दिशेने वळली अन् तिथंच खिळून राहिली...

पाचाडातून रायगडाच्या दिशेने वर पाहिलं की, उजव्या हाती खूबलढा बुरूज दिसतो. डाव्या हाती वाघबीळ दिसतं. या दोहोंच्या मध्ये चितदरवाजाची खिंड दिसते. आज रायगडावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या लागतात, त्या याच खिंडीतून सुरू होतात. या क्षणी त्या खिंडीतून पांढऱ्या शुभ्र ढगांचा एक भला थोरला दोदाणा पाचाडच्या दिशेने अक्षरश: कोसळायला सुरुवात झाली होती. मन क्षणभर अवाक झालं. डोळे त्या दृश्यावर खिळून राहिले. दुसऱ्याच क्षणी मन भानावर आलं. स्वत:लाच विचारतं झालं की, काय करावं..? या अकल्पितात पाय घालावा की, पाचाडात मुक्काम करावा..? सगळी समीकरणं डोळयांसमोर चमकून गेली. तोवर देशमुखांच्या खानावळीसमोर आलो होतो. दुर्दैवाने तिथेही शुकशुकाट होता. मंडळी बहुधा नात्याला उतरली होती. आता गडाच्या चढावर पाय ठेवण्यावाचून गत्यंतर नव्हतं. थकल्या शरीरातलं मन अग्निपरीक्षा द्यायला आता तयार होत होतं. कठीण वेळा सामोरी उभी ठाकली होती!

पाचाड मागे टाकून खिंडीच्या दिशेने पाऊल चढावर घातलं अन् काही क्षणांतच ढगांच्या त्या लोटाने भोवतालच्या रानासोबत मलाही पोटात घेतलं. घामाने अंगातला टी-शर्ट पार चिपचिपला होता. आता त्या थंडगार झोताने पाठीचा कणा शहारत ताठरला. पोटात गोळा उठला. अजून निम्मा गड चढायचा होता. पाठीवरल्या पिशवीत रेनकोट टोपी अगदी काहीच नव्हतं. हल्ली डोंगरभटक्यांसाठी नाना परींचं साहित्य मिळतं. सोयीसुविधांची रेलचेल असते. वेगळया शब्दांत सांगायचं झालं तर हल्ली भटकणं कमी अन् सुखासीनता जास्त, असं काहीसं व्यस्त प्रमाण झालेलं दिसतं. त्या दिवसात जे असेल त्यावर निभवायचं, जे समोर येईल येईल त्याला बेदरकारपणे सामोरं जायचं, या वृत्तीला प्राधान्य होतं. इतिहास सोबतीला घेऊन दुर्ग भटकावेत, शिवछत्रपतींच्या वास्तव्याने निर्माण झालेल्या अद्भुताचं अहेव लेणं मस्तकी धरलेल्या दुर्गांची पायधूळ भाळी घेऊन धन्य व्हावं. ती ताकद घेऊन नव्या दमाने जीवनाशी दोन हात करायला उभं ठाकावं, असे ते मंतरलेले दिवस होते. दुर्गांच्या वाटा अर्थगर्भ होत्या..!

ही अशी विचारांची आवर्त, वाटा चालताना नेहमीच मनांतळी गरगरत असतात. मात्र त्या अकाळदिवशी हे होणं नव्हतं. पाचाडचा चढ चढून चितदरवाजाच्या खिंडीत पाऊल घालतोय, तोच दंडाएवढया जाडीचा विजेचा लोळ, आकाश फाटेल असा कडकडाट करीत माथ्यावरून निजामपूर वारंगीच्या दरम्यान कुठेतरी कोसळला. आभाळातल्या ढगांचा तो धुमधुमाट काळजाच्या ठोक्यांबरोबरच बराच वेळ छातीत वाजत राहिला. विजेच्या कडाक्यानिशी सुरू झालेल्या पावसधारांनी आता आसमंत भरून गेलं होतं. पावसाचा एक थंडगार सणसणीत सपकारा श्वासासोबत छातीत शिरला अन् सारा धीर एकवटून निर्मनुष्य खिंडीतून मी पहिल्या पायरीवर पाऊल घातलं. छातीतोंडावर पाण्याचे सपकारे वाजत होते. त्या सणाणत्या धारांच्या जोडीला असलेल्या वाऱ्याचा झोत शरीरावर आदळताच पाठीचा काटा थंडीने ताठ होत होता.

पायरीवर पाहिलं पाऊल घातलं अन मनी अतिशय आवडता असा शिवछत्रपती राजा उभा राहिला..!

साल 1645. लेकराची उमर अवघी पंधरा वर्षांची. सोळावं उलटलं तोवर पदरी राजगड-तोरण्यासारख्या बलदंड दुर्गांची जोडी आली होती. 1646मध्ये पुरंदर हाती आला आणि मला वाटतं, फत्तेखानाशी झालेल्या झटापटीनंतर त्या एकाच लढाईत गनिमी युध्दाचे फायदे-तोटे त्या धाकल्याच्या ध्यानी आले. हातघाईच्या लढाईत दुर्गांचं महत्त्व काय असू शकतं याचा तो पहिला वस्तुपाठ होता. उमर कोवळी होती. मनी काही भलं उत्तुंग करावं असं उभं राहत होतं. बहुधा मनीच्या महत्त्वाकांक्षांना त्या एकाच अनुभवाने धुमारे फुटले असावेत. या घटनेनंतर कधीच मागे वळून पाहणं झालं नाही. दुर्गांशी जुळलं मैत्र मग कधी तुटलंच नाही. गाठीला एक एक दुर्ग जोडला जात राहिला. तेवढं तेवढं स्वराज्य वाढत राहिलं. आजवर इतिहासात असं कधी घडलं नव्हतं. सखा सह्याद्री त्याच्या जागी स्थिर होता. त्यावर दुर्ग होते. त्या दुर्गांमध्ये सैन्य होतं. त्या सैन्यांचे सेनानी होते. त्या सेनानींचे अधिपती मोठमोठाली साम्राज्यं चालवीत होते. मात्र त्या दुर्गांच्या सोंगटया करून बुध्दिबळाचा डाव मांडावा असं मात्र इतक्या शतकांच्या अवधीत कुणाच्याही मनी उमटलं नव्हतं...

चितदरवाजा ते वाळसुऱ्याची खिंड हा पहिलाच टप्पा पार दम काढणारा. मात्र तो कधी संपला ते कळलंच नाही. पायाखालचा रस्ता अकस्मात डावीकडे वळला, तेहा भान आलं की बहुधा वाळसुऱ्याची खिंड आली. वरून चळतधारा अक्षरश: कोसळत होत्या अन त्या पाण्याच्या पडद्याआडून हातभरावरचंही काही दिसत नव्हतं. धुकं अंगाशी झटत होतं. थंडीने शरीर दाठुरलं होतं. संवेदना बधिरतेच्या सीमारेषेवर उभ्या होत्या. हातापायांचे तळवे पांढरे पडू लागले होते. गात्रं थडथडत होती. मात्र मन? ते तर त्या राजाच्या आठवणीत रमून गेलं होतं...

या जगावेगळया राजाने आपलं अवघं आयुष्य दुर्गांच्या कुशीत काढलं. जन्मापासून मरणापर्यंतच्या वाटेवर त्याने केवळ दुर्गांचीच स्वप्नं पहिली. पुण्याच्या राखेतून उभा राहिलेला हा फिनिक्स पक्षी नव्हता. हा पक्षिराज गरुड होता. अवघ्या आभाळाला आपल्या मजबूत पंखांनी पालाण घालणारा, सारं अवकाश आपल्या दिठीच्या जरबेत ठेवणारा देववाहन गरुड. अवघ्या सह्यगिरीच्या अंगाखांद्यावर या गरुडाची घरटी होती. जिथे जिथे सह्यगिरीने आपली मस्तकं आभाळावेरी उंचावली होती, त्या त्या हरएक मस्तकावर या गरुडाचं घरटं होतं अन त्या घरटयाभोवतालच्या मुलखात स्वाभिमान जागा होता. दुर्गांच्या मदतीने, दुर्गांच्या आश्रय घेऊन स्वतंत्र राज्य उभं राहिलं होतं. हे असं आजवेरी कुणी ध्यानीमनीदेखील कल्पिलं नव्हतं. मात्र जे अतक्र्य वाटलं होतं, ते घडलं होतं..!

ढगांचं वाजप आता उणावलं होतं. थरकाप उडवणारा विजांचा लखलखाटही थांबला होता. मात्र आभाळातून पाण्याचा दोदाणा कोसळतच होता. त्याच्या जोडीला गच्च धुकट होतं. पाच-सहा हातांपलीकडलं काहीच दिसत नव्हतं. दाटलेल्या गर्द करडया धुक्यात झाडांच्या फांद्यांचे निष्पर्ण आकार नुसतेच जाणवत होते. त्या ओल्या सर्द धुक्यातून एखाद्या फांदीच्या टोकावर बसून आर्त शीळ घालणारा मलबार व्हिसलिंग थ्रश शेजारी कुठेतरी असल्यागत जाणवत होतं. डोंगर चढताना हे पाखरू दिसत नाही. मात्र सतत सोबत जाणवत राहतं. पानांमागे लपून साथसंगत देत राहातं. अनेक बोलांनी बोलणारं लखलखत्या निळयाशार रंगाचं हे पाखरू विलक्षण देखणं आहे, मात्र याचं दर्शनही दुर्मीळ म्हणावं असंच आहे. आपण डोंगर चढताना दम घेत कुठल्यातरी दगडावर विसावतो. एकटेच असलो तर आजूबाजूची शांतता फुललेल्या रंध्रातून शरीरात झिरपू लागते, अन् अचानक शेजारच्या झाडाच्या फांदीवरून याच्या शिळा उमटायला सुरुवात होते. न हलता हलकेच मान फिरवून पाहिलं की, हे पाखरू आपल्याच धुंदीत तानावर ताना टाकीत असलेलं दिसतं. या अशा दुर्मीळ योगावर डोंगरयात्रा सफल होते. एकटादुकटा रायगड चढताना हे पाखरू हत्तीतलाव येईपर्यंत सोबत करतं अन मग् शिळा घालीत गडात कुठेतरी मुरून जातं. इतक्या सुरेख रूपाच्या अन स्वराच्या पाखराला, मराठीसारख्या संपन्न भाषेत 'पर्वत कस्तुर' किंवा 'मलबार कस्तुर' असलं भिकार नाव कुणी ठेवलं देव जाणे. मात्र त्या दिवशी रायगडच्या निर्मनुष्य अन धुक्या-पावसामुळे गूढ वाटणाऱ्या चढावर पावसाच्या धारांसोबत याच्या सुरेल तानांनी माझी सतत साथसंगत केली. त्या असह्य कुंदाटलेल्या वातावरणात एकटेपण जाणवू दिलं नाही. 

पायरी पायरी मागे पडत होती. पावलापावलाने गड जवळ येत होता. भोवतीच्या शांततेने मनही एकंकारलं होतं. भावनांच्या उसळत्या हरेक कढाबरोबर शिवछत्रपती राजा आठवत होता. आमच्या राजाने त्याच्या त्या देदीप्यमान आयुष्यातली उणीपुरी पस्तीस वर्षं दुर्गांच्या कुशीत काढली. पंधराव्या वर्षी लेकरू राजगडी राहायला आलं अन् सह्याद्रीतल्या दुर्गाचं होऊन गेलं. सह्याद्रीतला वळीवही असा घनघोर बरसतो की, त्या पावसातही झाडांच्या खोडावर शेवाळ मूळ धरतं. मग आखाडाची काय बात करावी!

अकस्मात मनी उठलं की, हे असले धोधो कोसळणारे उणेपुरे पस्तीस पावसाळे त्या राजाने अंगावर झेललेत. कल्पनाही करता येत नाही, इतक्या कोवळया वयापासून मोहिमांचे बेत, शत्रूंच्या हालचाली, लढाया, त्यातून उभी राहिलेली राजकारणं, मनसुबे, हेरखातं - या साऱ्यांचे तणाव, सगळया सोबत्यांना सोबत घेऊन ध्येयाच्या दिशेनं चालणं, या वेगवेगळया संस्काराच्या व बुध्दीच्या, वेगवेगळया वयांच्या जमावाला सांभाळणं, त्यासाठी मान-अपमान पचवणं - ते तणाव सहन करत रहाणं; वाढणारं राज्य... मग जमिनींची मोजणी, त्याची प्रतवारी, त्यावरची सारा आकारणी, त्यातून मिळणारं उत्पन्न, त्या उत्पन्नाचा ताळमेळ बसवून राज्याचा गाडा चालता राहील याची काळजी घेणं, नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधत राहाणं, रयतेची काळजी घेणं - या अवघ्याचे ताणतणाव; घरची आघाडी - राज्याच्या कारभारावर परिणाम होऊ न देता - सांभाळणं; नवीन दुर्ग बांधणं, जुन्यांची हवी तशी दुरुस्ती करणं, ते जिंकणं वा हरणं, त्यासाठी लागणाऱ्या पैशांचं नियोजन करणं - तो ताण सतत उरावर वागवत राहणं; हेही कमी म्हणून की काय, घोडयावर मांड ठोकून किंवा अशा पाऊस-वाऱ्यात भिजत, कुडकुडत उभं आयुष्य गडावर काढणं. हे सारं किती कल्पनातीत कठीण आहे अन् तरीही घरच्या उबदार वातावरणात बसून गरम चहाचे घुटके घेत आपण म्हणत असतो - राजा अजून दहा-पंधरा वर्षं जगायला हवा होता..!

फांद्या धुक्यात खुपसून झाडं ते कोसळतं पाणी झेलीत निचळ उभी होती. झुडपं ओल्याकंच धुक्यात आकंठ बुडाली होती. पावलापावलाला चित्र बदलताना जाणवत होतं. झुडपांमधलं धुकं तसंच पायांशीच घोटाळत होतं. एक हलकासा उतार उतरलो आणि एका धबधब्याचा गंभीर कानाला जाणवू लागला अन् मन म्हणालं की, कडयाखालची आडयाची वाट आता संपली. हत्तीतलाव आणि गंगासागराच्या ओव्हरफ्लोचा हा धबधबा अक्षरश: वाटेवर उतरला होता. हे याचं आजवर कधीही न पाहिलेलं रूप होतं. एव्हाना थंडीमुळे शरीराचं जवळजवळ लाकूड झालं होतं. त्यामुळे बर्फासारख्या पाण्याची ती भिंत पार करताना बधिरावस्थेत काही फारसा फरक पडला नाही. मात्र दणाणत कोसळणाऱ्या पाण्याच्या त्या माराने शरीर फाटून निघेल की काय, हे भय मनाला थरकापवून गेलं.

कोंझरपासून चढून गात्रं पार थकली होती. त्यात हा पाऊस जणू हाडांना जाऊन भिडला होता. महाडहून निघाल्यापासून पोटात अन्नाचा कणही नव्हता. दुपारची अन्नवेळा टळून गेली होती. शंभर टक्के खात्री होती की, पाठीवरल्या पिशवीत जे काही खाणं होतं त्याचा पार चिखल झालेला असणार. पोट अगदी काकुळतीला आलं होतं. मात्र आता गडावरल्या देशमुखांच्या हॉटेलात पोहोचेपर्यंत अन्नब्रह्माची आशा नव्हती. पाऊस नुसता ठोक बरसात होता. महादरवाजाचे बुरूज धुक्याच्या पडद्याआडून हलके हलकेसे जाणवले. दरवाज्याच्या पांदीत शिरलो तर पायाच्या नडगीला घासून पाणी सुसाटत होतं. अर्थ स्पष्ट होता. गंगासागर ओसंडून वाहत होता. दरवाजाच्या देवडीत पाठीवरलं ओझं उतरवलं अन् त्याच क्षणी जीवघेण्या थंडीने शरीराचा ताबा घेतला. थंडीने लटलटणारं शरीर काही केल्या भानावर येईचना. अंगावर रेनकोट टोपी काहीच नव्हतं. पातळसे कपडे होते. ते जणू शरीराशी एकरूप झाले होते. देवडीत पाऊस लागत नव्हता. मात्र इतका वेळ चालून काहीसं तापलेलं शरीर काही क्षणात गार पडलं होतं. कुडकुडणं असह्य झालं, तसं ओझं पुन्हा पाठीवर लादलं. इलाज नव्हता. पावलं पाण्यातून ओढत महादरवाजामागच्या चिंचोळया वाटेने निघत शेवटच्या चढावर पाऊल घातलं. तटावर मांडलेल्या, कधीकाळी आग ओकलेल्या तोफा या क्षणी गच्च धुक्याची चादर पांघरून त्या निसर्गचित्राचा भाग बनून मुकाट होत्या.

मनाच्या तारेवर पुन्हा हळुवारपणे बोटं फिरली. गडावरला पाऊस झेपेनासा झाल्यावर आऊसाहेब पाचाडला राहायच्या. त्या माउलीला भेटायची अनावर इच्छा झाल्यावर, या अशा धूमधूम पावसातून, साधेसे घरगुती कपडे घातलेला शिवछत्रपतीराजा अंगावर घोंगडी पांघरून कधी गड चढला-उतरला असेल काय? या अडीचशे-तीनशे इंच पावसातलं जीवन शिवकाळात कसं होतं असेल? पस्तीस वर्षं घोडयावर मांड ठोकून सख्या सह्याद्रीची दरीखोरी पालथा घालणारा, उघडया तंबूखाली राहणारा हा हाडामासाचा राजा अन् त्याच्या एका शब्दावर जीव उधळून टाकणारे त्याचे मैतर यांनी हा गडांवरला हाडं थिजवणारा पाऊसवारा कोणत्या हिमतीने सोसला असेल? दोनेक तास पावसाचा बेदम मार खाऊन पार थिजलेल्या शरीरातलं मन मात्र निमूटपणे डोळे मिटून भूतकाळात शिरलं होतं. गडावर याचि देही पावता झाल्याची ती पावती होती..!

संततधार किंचितशी उणावू लागली होती. धुकटाचं गचपण मात्र हलायला तयार नव्हतं. बोचरा वारा शरीरावर चहू बाजूंनी एल्गार करीत होता. पाठीवरल्या ओझ्यासह मदारीच्या कबरीजवळच्या तटाला टेकून उभा राहिलो. कोंझरहून दुपारी बाराच्या सुमाराला निघालो होतो. आता सांजावू आलं होतं. प्रकाश गाळल्यागत धुकटांतून आजूबाजूला पसरत होता. हुंकार भरीत वारा मध्येच तो पडदा जिवंत करीत होता. कोसळत्या प्रपातांचा घोष त्या कुंदावलेल्या वातावरणात भरून राहिला होता. मदारमोर्चापासून वरपर्यंत सादावत सोबत केलेलं ते नीलरंगी पाखरूही त्या दाटत्या धुकटात कधीच विरघळून गेलं होतं. इतिहासात डुबी दिलेलं मन वातावरणाशी एकंकार झालं होतं. पायपीट, थकवा, पाऊस, वारा, थंडी, शरीर हे सारंच त्या क्षणी जाणिवांच्या पल्याड गेलं होतं. माझ्या विरून गेलेल्या अस्तित्वासकट काळ जणू जागीच थांबला होता.

देह चैतन्याची खोळ,

पांघरताची उजाळ,

आभासाचा निष्फळ,

उजेड...

 

याचे काही न ऐकावे,

हरिरूपा शरण जावे,

त्या दिव्यत्वाचे व्हावे,

'दा म्हणे..!

एका क्षणी भोवती पसरलेल्या त्या करडया धुक्याचा पडदा वाऱ्याने क्षणभर हलवला. गंगासागराची बाजू किंचितशी मोकळी झाली अन् बालेकिल्ल्याचा काळाभोर सुस्नात तट नजरेसमोर मोकळा झाला. वास्तवाचं भान आलं. आठवलं की, या बालेकिल्ल्यात असलेल्या एका चौथऱ्यावर शिवछत्रपतींची पावलं उमटली आहेत. तो महानुभाव त्या वास्तूत वावरला आहे. त्या दीप्तिमंताचा शेवटचा श्वासही त्याच चौथऱ्याने झेलला आहे. जीवन जगण्याची अफाट ताकद देणारा अक्षय्य ऊर्जेचा स्रोत तेथे आहे. त्यासाठीच लोभावून इथवर आलोय.

दुर्गावर पावता झालो होतो. जणू उंबरा ओलांडून घरात शिरलो होतो. मन तरतरीत प्रसन्न झालं होतं. झाल्या दमछाकीचं कुठेही नावनिशाण जाणवत नव्हतं. आपसूक पावलं मुक्कामाच्या दिशेला, धर्मशाळेकडे वळली. तटावर टेकलो होतो, तो वाटेवर आलो.

वातावरण जणू भारून गेलं होतं. सर्दावलेलं धुकं नाकातोंडातून छातीत उतरत होतं, तर ढगांनी शरीराला कवेत घेतलं होतं. त्या भारित वातावरणात मन शिवछत्रपतींचे पायठसे निरखू पाहत होतं. आभाळातलं जळदाटलं धुकं पायांतळीच्या वाहत्या पाण्यात मिसळून शेवटच्या प्रवासाला निघून जात होतं. असह्य गारवा शरीराला मिठीत घेऊन थोपटीत होता.

मात्र मन...?  ते त्या भारित वातावरणात, बरसणाऱ्या पावसात शिवछत्रपतींचे पायठसे निरखू पाहत होतं... काय वाटलं कुणास ठाऊक, मात्र मुक्कामाच्या दिशेला निघालेली पावलं अनाहूतपणे गच्च धुक्यातून होळीच्या माळाकडे वळली. धुक्यात चाचपडत पायऱ्यांचा अंदाज घेत वर निघालो. धुक्याने कवेत घेतलेलं शिरकाईचं शिखर सूक्ष्मसं जाणवलं अन् डावीकडे वळत ठेचकाळत मी होळीच्या माळावर पावता झालो. इतकं नीरव पांढरंशुभ्र वातावरण पहिल्यांदाच अनुभवीत होतो. मिनिटभर इथेतिथे पाहिलं अन क्षणभरात दिशाभुली झाली. कुठून आलो, कुठे आहे काहीच कळेना झालं. पार हादरलो. गडावर तसा नवखा होतो. मदतीला कुणाला हाक मारावी तर त्या धुक्याच्या गचपणातून ती कुणी ऐकेल याची खात्री होत नव्हती. गडापलीकडे कुठेतरी सूर्य अस्तावू निघाला होता. धुकं काळवंडायला सुरुवात झाली होती. भरकटेन या भीतीने जागचा हललो नाही. धुकं हलायची वाट पाहत तसाच जागी खिळून उभा राहिलो. मिनिटभराचा तो काळ संपेनासा वाटत राहिला. हवेच्या एक झोताने दाटल्या धुक्याचा तो पडदा काहीसा हलवला अन् समोरच बाजारपेठ दिसली. दोन्ही हात पसरले तर मिठीत येईल अशी. बाजारपेठेचं ते रूप केवळ अद्भुत होतं. आता आश्वस्त झालो. दिशा मनात पक्क्या झाल्या अन् मी पुन्हा शिवछत्रपतींची स्मरणं जागवत त्या धुक्यात बुडून गेलो.

घाटमाथ्यावर स्वराज्याचं बस्तान नीट बसलं होतं. राजगड तोरण्याची जोडी पदरात येऊन दहा-बारा वर्षं उलटून गेली होती. सताठदहा दुर्गांनी राखलेलं स्वराज्य बरं गोमटं भासत होतं. मात्र राजाचं मन अस्वस्थ होतं. राजगडावरून दिसणारा सूर्यास्त त्यांना कोकणाची आठवण करून देत होता. असंख्य बंदरांत वरवलेल्या व्यापारी गलबतांनी दाटलेलं. सौदागरांच्या मालवाहू तांडयांनी गजबजलेलं, धनसंपन्न कोकण. ते ताब्यात येत नव्हतं. पाचर बसावी तसे जावळीचे मोरे स्वराज्यातून कोकणात उतरणाऱ्या साऱ्या घाटवाटा अडवून बसले होते. स्वराज्य नुकतंच मूळ धरू पाहत होतं. मात्र ते जोमाने वाढावं इतकं खतपाणी त्याला मिळत नव्हतं. राज्य वाढवायचं तर सैन्य हवं. ते पोसायचं तर पैका हवा असं त्रांगडं होऊन बसलं होतं. काही विचारांती प्रयत्न म्हणून राजांनी मोऱ्यांना साद देऊन पाहायचं ठरवलं. प्रतिसाद मिळाला तर उत्तम, नपेक्षा दंडभेदावाचून पर्याय नव्हता. शेवटी जे नकोसं वाटत होतं तेच झालं. मग्रूर प्रतिसादाची फळं मोऱ्यांना पावती झाली. घाटवाटा मोकळया झाल्या. कोकणची संपन्नता राजमार्गाने स्वराज्याच्या खजिन्यात पावती होऊ लागली. मोरे पळून जाऊन रायगडावर लपला. त्याच्या पाठलागावर आलेल्या थोरल्या राजांनी बहुधा या वेळी रायगड पहिल्यांदा पहिला. मोऱ्यांच्या जहागिरीचा रायगड स्वराज्याच्या सेवेत रुजू झाला.

बहुधा याच वेळी या दुर्गाचं दुर्गमत्व राजांनी ओळखलं. चहूबाजूंनी उत्तुंग डोंगरांच्या घेरात लपलेला हा नंदादीपाचा डोंगर राजकीयदृष्टया किती महत्त्वाचा, ते त्या असाधारण प्रज्ञेच्या राजाने नेमकं ओळखलं. तख्ताचा गड हाच, हे बहुधा याच क्षणी त्या दुर्गपतीला जाणवलं असावं. जे कोकण दीड कोटी होनांचं जकातीचं उत्पन्न स्वराज्याच्या खजिन्यात ओतत होतं, तो प्रदेश जिवापाड सांभाळायला स्वराज्याची राजधानी त्या दुर्गम प्रदेशातच हवी, हा विचार पक्का झाला अन् राजधानी राजगडावरून रायगडावर हलली. कळकळत्या कडयांच्या काठाने फिरत्या गस्तीची जागल रातभर सुरू झाली. साडेतीनशे घरांचे उंबरे गडावर सजले. बाजारपेठ गजबजली. देखणा राजवाडा बालेकिल्ल्याच्या तटाआडून डोकावू लागला. देवाधिदेव महादेव जगदीश्वराच्या रूपाने रायगडावर स्थानापन्न झाला अन् ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात, अठरापगड जातींच्या साक्षीने, महाराष्ट्रदेशीच्या देवतांच्या आशीर्वादाने राजा रायगडी तख्ती बैसला.

खणखणीत स्वरात कविराज म्हणाला :

'देवल गिरावते फिरावते निसान अली, ऐसे डूबे रावराने सभी गये लबकी

गौरा गनपती आप औरनको देत ताप, अपनीही बारी सब मारी गये डबकी

पीरा पयगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिध्दकी सिधायी गयी राही बात रबकी

कासिहुकी कला जाती मथुरा मसीद होती, सिवाजी न होते तो सुनती होत सबकी..'

कुण्या घळीच्या आश्रयाला बसून बाहेरचं निळंभोर मोकळं आभाळ न्याहाळीत तो समर्थ योगी गरजला होता :

उदंड जाहले पाणी, स्नानसंध्या करावया

जपतप अनुष्ठाने, आनंदवन भुवनी...

बुडाला औरंग्या पापी, म्लेच्छसंहार जाहला

अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी...

ही सारी ज्या क्षणाची परिणती होती, तो क्षण त्या दाटत्या धुक्याच्या पल्याड असलेल्या राजसदरेतील सिंहासनाच्या चौथऱ्याने साडेतीनशे वर्षांपूर्वी अनुभवला होता. तो क्षण अनुभवीत त्या ठिकाणी मी आता एकटा उभा होतो. नुसत्या विचारासरशी उभ्या अंगी काट फुलला. मन दाटून आलं. डोळयांतून घळाघळा आसवं वाहू लागली. धुक्यापावसात विरघळून जाऊ  लागली. पाठीवरलं ओझं, दिवसभराचा थकवा, ती चाल, तो पाऊस या साऱ्यांचं भान पार हरपून गेलं.

शरीराबाहेर उभ्या असलेल्या मनाला सडकत्या पावसधारांनी पुन्हा भानावर आणलं अन् त्याच क्षणी गडाने मला कडकडून घट्ट मिठीत घेतलं.

या पावसाला आता अडतीस वर्षं होऊन गेलीत...

मात्र आजही हा दुर्गोबा मी दिसताक्षणी मला मिठीत घेतो अन् परतताना सोबतीला सुखाची पुरचुंडी हाती देऊन पाठीवर हात फिरवीत धाल्या मनानं निरोप देतो..!

इति!

9619006347