'शुध्दी आन्दोलन का संक्षिप्त इतिहास - सन 712 से 1947 तक' हे शुध्दीचा संक्षिप्त इतिहास सांगणारे हिंदी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. प्राचीन व्यवहार, इस्लामिक कालखंडातील शुध्दी, संतांचे धर्मरक्षण व शुध्दिकार्य, मराठयांनी केलेले शुध्दीकरण, शुध्दी करणाऱ्या संस्था व शुध्दीकरणाचे काही वैयक्तिक स्तरावरील प्रयत्न, असे अनेक विषय या पुस्तकात संदर्भमूल्यांसह वाचायला मिळतील.
पुस्तकाचे नाव : शुध्दी आन्दोलन का संक्षिप्त इतिहास
सन 712 से 1947 तक
लेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले
प्रकाशन : अखिल भारतीय संस्कृति समन्वय प्रकाशन, 2018
मूल्य : 40 रुपये l पृष्ठसंख्या : 79
भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, सावरकर, संघ, इस्लाम, ख्रिश्चॅनिटी, बौध्द, हिंदुत्वाचे अभ्यासक, मधुमेह व ग्रंथीविकार तज्ज्ञ डॉ. श्रीरंग गोडबोले ह्यांचे 'शुध्दी आन्दोलन का संक्षिप्त इतिहास - सन 712 से 1947 तक' हे शुध्दीचा संक्षिप्त इतिहास सांगणारे हिंदी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.
शुध्दीचा धर्मशास्त्रीय आधार तसेच प्राचीन व्यवहार, इस्लामिक कालखंडातील शुध्दी, संतांचे धर्मरक्षण व शुध्दिकार्य, मराठयांनी केलेले शुध्दीकरण, शुध्दी करणाऱ्या संस्था व शुध्दीकरणाचे काही वैयक्तिक स्तरावरील प्रयत्न ह्या प्रकरणातून त्यांनी पुराव्यासह शुध्दीच्या इतिहासावर प्रकाश टाकला आहे.
मतांतरित किंवा धर्मांतरित कोणाला म्हणावे ह्याची प्राचीन कालापासून सुरुवात करून मध्ययुगीन कालखंडातील धार्मिक परावर्तनापर्यंत आढावा घेण्यात आलेला आहे. अर्थातच नंतर ह्या मतांतरित-धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात घेण्यासाठी प्राचीन काळापासून ते 1947पर्यंत कसे प्रयत्न करण्यात आले, त्यासाठी कुठल्या संस्था, संघटना, राज्य, राजे, व्यक्तींनी कसे प्रयत्न केले व त्यासाठी कशाचा आधार घेतला (उदा. देवलस्मृती) ह्याचा अभ्यासपूर्ण थोडक्यात परिचय करून देण्यात आलेला आहे. विशेषत: इस्लामिक कालखंडातील शुध्दी ह्या प्रकरणात बापा रावल, सुखपाल (इसवी सन 1007), राव सूरजमल (इसवी सन 1516), दक्षिण भारतातील शुध्दी व इसवी सन 1021 मोहम्मद गझनीच्या सोमनाथ विध्वंसानंतर त्याच्या सेनेचा पाठलाग करून महाराजा मंडलिक व भीमदेवने केलेला पराभव व शुध्दी ह्याविषयीची अज्ञात माहिती वाचावयास मिळते. 'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी श्रध्दानंद, मुंजे, ना.भा. खरे, स्वातंत्र्यवीर सावरकर, शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी ह्यांच्या शुध्दिकार्याविषयी महत्त्वपूर्ण माहितीही वाचनीय आहे. मसुराश्रमच्या कार्यात विनायक महाराज मसुरकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सल्ल्यावरून सुरू केलेले शुध्दिकार्य, गोव्यातील गावडयांची शुध्दी, त्यासाठी मुंजे, न.चिं. केळकरांसह इतर व्यक्तींनी केलेले साहाय्य, त्यातील कायदेशीर बाबींची पूर्तता इत्यादी वाचून शुध्दिकार्याच्या विविध बाजूंची सखोल माहिती मिळते. याआधी कुठे वाचावयास न मिळणारी अशी विपुल माहिती ह्या छोटेखानी पुस्तकात वाचायला मिळते. मोजक्या शब्दात महत्त्वपूर्ण माहिती देणे ह्या लेखकाच्या लेखनशैलीचे विशेष कौतुक करावेसे वाटते.
पुस्तकासाठी निवडलेल्या विषयाचा कालखंड खूप मोठा आहे आणि तो 70-80 पृष्ठांत बसवणे म्हणजे खरे तर शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, पण लेखकाने ते यशस्वीरीत्या पेलून एका महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकला आहे. 80 पृष्ठांच्या ह्या छोटया पुस्तकासाठी 72 मराठी-हिंदी-इंग्लिश संदर्भग्रंथांची संदर्भसूची दिली आहे. ह्यावरून लेखकाच्या अभ्यासाची कल्पना येऊ शकते. प्रत्येक प्रकरणात संशोधन पध्दतीचा (Research Methodologyचा) उपयोग करून संदर्भ दिले आहेत, त्यामुळे पुस्तकाला संदर्भमूल्य आले आहे व ते संग्राह्य झाले आहे. सेमीहार्ड बाइंडिंग व उत्कृष्ट मुद्रण-छपाईमुळे पुस्तकाची रचनाही सुबक व आकर्षक झाली आहे.
अक्षय जोग