विफलतेतून केलेली आत्महत्या हा गौरव नाही, अपरिहार्यता तर नाहीच नाही. विफल वाटणाऱ्या, असाहाय्य बनवणाऱ्या प्रसंगांना पुरून उरणारे, परिस्थितीला बदलण्याची 'दुर्दम्यता' बाळगणारे अनेक जण आपण इतिहासात आणि वर्तमानातही पाहतो. अशी माणसं बघताना आपली दु:खं म्हणजे आयुष्याबद्दलच्या छोटया छोटया तक्रारी असतात, हे लक्षात घेतलं, तर आपण वेळेवर सावरून मदत घेऊ किंवा सावरायला/मदतीला तत्पर राहू. मनाचं हे खोल खोल पाणी गूढ असलं, तरी त्यावरचे तरंग ओळखायला शिकू आणि मिळालेल्या आयुष्याचं सार्थक व्हावं म्हणून क्षण न् क्षण जागे राहू!
काळंशार पाणी, खोलीचा अंदाज येणार नाही असं. वाकून पाहताना पोटात गोळा यावा इतकं क्रूर. वरच्या संथ-शांत पृष्ठभागाच्या आत खोलवर काय चालू असेल हे पाहणाऱ्याला कळणारच नाही इतकं साळसूद. अचानक एखादा मोठा दगड गरगरत आत पडतो. पाणी खळबळतं, तुषार उडतात, पाणी थोडं जागं झाल्यासारखं वाटतं. कळल्यासारखं वाटतं, पण छे! क्षणार्धात पुन्हा जसं होतं तसंच. संथ, अपारदर्शक, गूढ आणि सारी खळबळ दडवून ठेवणारं!
असं हे पाणी म्हणजेच माणसाचं मन. त्यातील अव्यक्त - न समजणारा, पूर्णपणे अलिप्त असा भाग. कधीकधी भावनिक उद्रेकाच्या एखाद्या दगडामुळे खळबळणारं! काठावरची माती थोडी भिजते, इतकंच! मनाचा थांग लागणं कठीणच. त्यातून आपल्या अगदी रोजच्या बघण्यातील-माहितीतील-सहवासातील एखादी व्यक्ती जेव्हा अनपेक्षितपणे स्वत:ला संपवण्याचंच ठरवते, तेव्हा तर या काळया डोहापुढे आपण हतबलच होतो. 'असं का?' या प्रश्नांचं आवर्त कितीही कारणं शोधली, चिकित्सा, अंदाज केले तरी पूर्णपणे थांबत नाही. आपला अस्वस्थ शोध संपतच नाही.
आत्महत्या! स्वत:च्या हाताने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय आणि त्याची अंमलबजावणी. वेगवेगळया प्रकारांनी केलेली. वेगवेगळया हेतूंसाठी झालेली. एखादा ब्रेनवॉश्ड फिदाईन अंगभर स्फोटकं बांधून ती उडवून देतो, तीही आत्महत्याच आणि कालपर्यंत आपल्याशी हसतबोलत असलेलं कुणीतरी अचानक जगणं नाकारून जातं, हीसुध्दा आत्महत्याच. तृप्त मनाने, सार्थकतेची खूण बांधत आयुष्याला विराम देणं (समाधी/प्रायोपवेशन/संथारा) हीसुध्दा एक प्रकारे आत्महत्याच आणि मनातल्या जखमांवर औषध सापडतच नाहीये म्हणून हतबलतेने, वैफल्यातून स्वत:ला संपवणं हीसुध्दा आत्महत्याच. कोणती कृती तर्कनिष्ठ म्हणायची आणि कोणती तर्कदुष्ट ठरवायची, असा प्रश्नच उभा राहतो, नाही का?
पण जेव्हा अजून ज्यांनी जगण्याची फक्त पहाटच पाहिली आहे असे तरुण-तरुणी किंवा ज्यांच्या जगण्यात चार विसंवादी सूर असले तरीही काही हिरवी बेटंही आहेत अशी माणसं आत्महत्येचा मार्ग निवडतात, तेव्हा अस्वस्थतेमुळे त्याचा माग काढावासा वाटतो.
आत्महत्येचा विचार हा असा कडयाच्या टोकावरचा क्षण असतो, जिथून फार क्वचित लोक माघारी वळतात. जे वळतात तेही पुन्हा त्या वाटेवर जाणारच नाहीत असं नाही. मानसशास्त्रात आणि मनोविकारशास्त्रात यावर कैक दशकं संशोधन/अभ्यास चालू आहे.
मेंदू हा आपल्या सर्व कृतींचा नियंत्रक. मेंदूतील विविध रसायनांचा असमतोल हे अशा कुठल्याही अपसामान्य (abnormal) कृतीमागचं जैविक कारण असतं. मेंदूतील संदेशवहन करण्यासाठीचं माध्यम असणारी महत्त्वाची रसायनं म्हणजे डोपामाईन, सेरेटोनिन आणि कॉर्टिकोट्रॉपिन्स. या रसायनांच्या पातळया खाली-वर झाल्यामुळे भावनांमध्ये व विचार प्रक्रियांमध्ये परिवर्तन होत असतं. सेरोटोनिनची खालावलेली पातळी किंवा डोपामाईनची उंचावलेली पातळी वैफल्यग्रस्त व्यक्तींमध्ये किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये आढळून आलेली आहे. नेमक्या कोणत्या (बाह्य) गोष्टींमुळे या रसायनांच्या पातळयांमध्ये चढ-उतार होतात यावर अजूनही निर्णायक स्पष्ट कारणमीमांसा होऊ शकलेली नाही. संगणकात जसं मूळ प्रोग्रॅमिंग झालं की त्याप्रमाणे पुढच्या कृती संगणक करत राहतो, तसंच काहीसं या बाबतीत होतं, असं मेंदूरसायनतज्ज्ञांचं मानणं आहे. पण अर्थातच पूर्णत: जैविक/माणसाच्या विचारकक्षेच्या बाहेर काहीही थेट नियंत्रण नसणाऱ्या या गोष्टींवर मानसिक आरोग्य - किंबहुना आत्महत्येसारखी टोकाची कृती पूर्णत: अवलंबून असेल का? वातावरणात कुठल्या गोष्टी किंवा व्यक्तींचे कोणते विचार त्यांना वैफल्यग्रस्ततेकडे, असाहाय्य वाटण्याकडे ढकलत असतील? जगून समस्येवर उत्तर शोधण्याचं सोडून स्वत:चं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी प्रवृत्त करत असतील? विशेषत: ज्या वयात पुढची स्वप्नं बघायची, उद्दिष्टं ठरवायची, सोनेरी क्षणांचा आनंद घ्यायचा त्या वयात स्वत:ला संपवण्याची ऊर्मी का येत असेल? अभ्यासकांनी खूप वर्षं याचा विचार केलाय आणि विचारांना भरकटवण्यात काहीसा वाटा असणारे थोडे घटक नोंदवलेत -
* पालकांच्या संघर्षाला आपण जबाबदार असल्याची कल्पना
* अचानक कळलेली काही खाजगी/कौटुंबिक माहिती - उदा. दत्तक असणं
* लैंगिक शोषण किंवा प्रेमभंग
* भावनिकदृष्टया उपासमार/दुर्लक्षित वाटणं
* व्यसनीपणातून होणारा भ्रम
* शैक्षणिक अपयश
या सगळया कारणांचा वाटा या टोकाच्या निर्णयात नेमका किती असतो, हे सांगणंही अवघड आहे. बऱ्याचदा ज्याची कारणमीमांसा करणं गुंतागुंतीचं किंवा अनिश्चित असतं, तिथे एखाद्या ठोक गोष्टीवर खापर फोडणं सोपं असतं, सोयीचं आणि काहीतरी कळल्याचं फसवं समाधान देणारं असतं. 'पालक' हे असं Soft Target आहे असं मला नेहमी वाटतं. मुलांच्या बाबतीत ज्या ज्या वर्तन समस्या किंवा भावनिक समस्या दिसतात, त्यामागे पालकत्वातील काही त्रुटींची भूमिका असते हे खरं आहे; पण तेच एकमेव कारण नसतं, हेही आपण समजून घ्यायला हवं. विशेषत: 'आत्महत्ये'सारख्या गुंतागुंतीची कारणं असलेल्या घटनेची चर्चा करताना तर हा तोल खूपच सांभाळायला हवा. अन्यथा आधीच या अनपेक्षित भावनिक वादळाने कोलमडायला व्हावं, अशा परिस्थितीतील पालकांना आयुष्यभर 'अपराधीपणाची' बोच त्रास देऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवं.
'आत्महत्या' करण्याचा विचार येणं आणि कृती घडणं यातही खूप पल्ला असतो. अनेक व्यक्ती या इतरांवर दबाव टाकणं, लक्ष वेधून घेणं यासाठी 'आत्महत्या' करण्याचा प्रयत्न करतात. बहुतेकदा ती Calculated Risk असल्याने हे प्रयत्न पटकन इतरांना कळतील अशा प्रकारे केले जातात. त्यात Riskचा अंदाज चुकल्याने जीव जाण्याच्या घटनाही घडतात. पण त्यात त्यांची 'जीवनेच्छा' गेलेली नसते, हे काही मृत्युपूर्व जबाब/व्यक्त होणं यातून दिसून येतं. मात्र ज्या व्यक्ती विचारांच्या आणि भावनांच्या 'कडेलोट' जागेवर पोहोचलेल्या असतात, त्या अत्यंत विचारपूर्वक, योजनाबध्द पध्दतीने मृत्यूला कवटाळताना दिसतात. त्यांची Calculations ही Result oriented असतात. म्हणूनच ती प्रत्यक्ष घडतात, तेव्हा इतरांना धक्कादायक वाटली तरी त्यांनी ते खूप पूर्वीच Visualise केलेलं असतं.
'आत्महत्या' करण्याचा विचार अनेकांच्या मनात केव्हा ना केव्हा तरळून गेलेला असतो. पण तो प्रत्यक्षात येतो तो, जेव्हा परिस्थितीपुढे आपण पूर्णपणे हतबल झालो आहोत असं त्या व्यक्तीला वाटतं तेव्हा. जणू काही आपण गॅस चेंबरमध्ये गुदमरतो आहोत आणि सुटकेचा एकही मार्ग नाही. अशा परिस्थितीत जगणं हे मरण्यापेक्षाही अधिक वेदनादायक (भावनिकदृष्टया) आहे, अशी खात्री पटते, तेव्हा जणू काही अंगवळणी पडलेल्या असाहाय्यतेमुळे (Learned helplessnessमुळे) हा शेवटचा दरवाजा ठोठवावासा वाटतो. ही 'परिस्थिती' मात्र ज्याच्या त्याच्या डोक्यातून ठरवली जाते. लोक गरिबीमुळे आत्महत्या करतात का? अपयशामुळे? कर्जाच्या माऱ्याखाली दबल्यामुळे? एकटेपणामुळे? अन्यायामुळे? विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या प्रभावामुळे? अपराधीपणा बळावल्यामुळे? या सगळया प्रश्नांची उत्तरं 'हो' आणि 'नाही' अशी दोन्ही आहेत. त्यात श्रीमंत व्यक्तीही दिसतात. अत्यंत बुध्दिमान, प्रतिभावान व्यक्तीही दिसतात. अतिसंवेदनाशील दिसतात, तशाच अतिशय क्रूर/निर्दयी व्यक्तीही दिसतात. त्यामुळे सरसकट निष्कर्ष काढताच येत नाही!
भेडसावणाऱ्या दु:खातून किंवा वेदनेतून आत्महत्येमुळे सुटका होते हासुध्दा खरं तर फसवा समज आहे. 'आपण मेलो म्हणजे जग बुडालं' इतकं सरळ साधं समीकरण नाही. एखाद्याच्या या कृतीच्या वेदना मागे राहणाऱ्यांना अनेक प्रकारे आयुष्यभर सोसाव्या लागतात. 'आपण मात्र जिवंत आहोत' ही त्यातील सर्वात छळणारी भावना. आत्महत्येचा विचार मनात आला तर त्याच्या या परिणामांची कल्पना केली, तरी आपण चार पावले मागे येण्याचा निर्णय घेऊ, इतकं इतरांचं हे मूक सोसणं भयंकर असतं!
हे मात्र खरं की आत्महत्येच्या मार्गाकडे आपण हळूहळू पण निश्चितपणे वळत आहोत, हे यातल्या अनेक जणांनी आपल्या वागण्यातून, सूचक बोलणं आदी कृतींमधून व्यक्त केलेलं असतं. बऱ्याचदा प्रत्यक्ष कृती करण्यापूर्वी अशा व्यक्ती अगदी उलट भावनांचं प्रदर्शनही करतात. (उदा. सर्व कुटुंबाला भेटवस्तू आणणं - एकत्र जेवणं, जोक्स सांगणं इ.) त्यामुळेच उलट नंतरची त्यांची 'आत्मघाताची' कृती जवळच्या लोकांना प्रचंड धक्का देऊन जाते, एक प्रकारे अपराधीपणाच्या भावनेने वेढूनच टाकते म्हणा ना.
मग प्रश्न असा आहे, की हे स्वत:च्या किंवा इतरांच्या बाबतीत थोपवता येत नाही का? तर निश्चित येतं! जेव्हा भावनिक असंतुलनाची - विशेषत: अशा वैफल्याची लक्षणं जाणवू लागतात - स्वत:ची स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तीमध्ये - तेव्हा ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. ही मनोविकाराची सुरुवात असू शकते किंवा मेंदूतील रसायन संतुलनाचा ढळलेला तोल इशारे देत असतो. प्राथमिक औषधोपचारांनी व्यक्ती सुसंगत विचार करण्याच्या परिस्थितीमध्ये आल्याशिवाय निव्वळ मानसोपचारांचाही उपयोग होत नाही, हे सत्य लक्षात घ्यायला हवं. सर्व प्रशिक्षित मानसतज्ज्ञांनी तर नक्कीच ही खूणगाठ बांधली पाहिजे की, 'मी अत्यंत उत्तम मानसोपचारतज्ज्ञ असले/लो तरी संवादरूपी मानसोपचाराला मर्यादा आहेत. जैविक समतोल आधी प्रस्थापित होणं गरजेचं आहे.'
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवतीभोवतीच्या माणसात किंवा आपल्या स्वत:च्या मनातही अशा उलथापालथी होत असतील, तर त्या ध्यानी येण्यासाठी आपली 'भावनिक साक्षरता' वाढवणं खूप आवश्यक आहे. भावनिक आंदोलनं ही नुसती खळबळ न राहता उद्रेकाकडे किंवा अतिवैफल्याकडे जात आहेत का, हे वेळीच लक्षात घेणं यासाठी काही धोक्याच्या घंटा माहीत करून घेणं गरजेचं आहे.
* कुटुंब/मित्रपरिवारापासून स्वत:ला दूर ठेवावंसं वाटणं/ मिटून घ्यावंसं वाटणं.
* इतरांशी असलेल्या संवादामध्ये अचानक झालेली घसरण/खूप कमी झालेला संवाद.
* स्वत:च्या दिसण्याकडे, राहण्याकडे होणारं कमालीचं दुर्लक्ष
* सतत वेढून असणारी उदासी/उद्विग्नता
* घडलेल्या अपराधांची कबुली खिन्न मनाने देणं
* स्वत:च्या छोटया-मोठया वस्तू अचानक इतरांना देऊन टाकणं
* 'आत्महत्या' सूचित करणारे शब्द वापरणं, साहित्य गोळा करणं
* वरवर खूप उत्साही असल्याचं नाटक करणं, पण ते फार काळ न टिकवता येणं; तर कधी शेवटचं काही दिवस खूप Energetic असल्याचं मुद्दाम भासवणं.
* काही वेळा हिंसक कृती करणं/पळून जाणं.
यातील काही गोष्टी अन्य वेळाही दिसत असतीलच, पण अशा मन:स्थितीत व्यक्तीला जी खिन्नता किंवा उदासी वेढून असते, ती खरं तर मुख्य Marker असते. ती वेळेवर ओळखता आली, तर यातील काही टोकाच्या कृतींकडून माणूस नक्कीच मागे फिरू शकतो. याचा अर्थ फक्त औषधोपचारांनीच हे साध्य होतं असा नाही. ती सुरुवात असली, तरी त्यानंतर येतो तो स्वत:चा स्वत:शी होणारा अर्थपूर्ण विवेकी संवाद. तो चालू राहावा म्हणून मुद्दाम घेतलेले कष्ट आणि स्वत:ची चिकित्सा करण्याची सवय, आयुष्यातील व्यापक - स्वपलीकडच्या - उन्नत (sublime) उद्दिष्टांची सोबत आणि कार्यमग्नता!
आपण किंवा आपल्या जवळपासचं कुणी या वादळात सापडून अकाली विझून जाऊ नये, म्हणून आपण एवढं तरी नक्कीच म्हणू शकतो, 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.' कारण A cat has nine lives, man has only one! हे लक्षात ठेवून कविवर्य रवींद्रनाथ म्हणाले होते तसं, 'हे जग मी सुंदर करून जाईन' असं व्हायला हवं.
अशी विफलतेतून केलेली आत्महत्या हा गौरव नाही, अपरिहार्यता तर नाहीच नाही. विफल वाटणाऱ्या, असाहाय्य बनवणाऱ्या प्रसंगांना पुरून उरणारे, परिस्थितीला बदलण्याची 'दुर्दम्यता' बाळगणारे अनेक जण आपण इतिहासात आणि वर्तमानातही पाहतो. अशी माणसं बघताना आपली दु:खं म्हणजे आयुष्याबद्दलच्या छोटया छोटया तक्रारी असतात हे लक्षात घेतलं, तर आपण वेळेवर सावरून मदत घेऊ किंवा सावरायला/मदतीला तत्पर राहू. मनाचं हे खोल खोल पाणी गूढ असलं, तरी त्यावरचे तरंग ओळखायला शिकू आणि मिळालेल्या आयुष्याचं सार्थक व्हावं म्हणून क्षण न् क्षण जागे राहू!
9822502992
anagha.lavalekar@jnanaprabodhini.org
(लेखिका ज्ञान प्रबोधिनी - प्रज्ञा मानस संशोधिकेच्या
प्रमुख आहेत.)