पंढरीची आषाढीची वारी संपली की सगळे लोक/माध्यमे हा विषय आपल्या डोक्यातून काढून टाकतात. परत पुढच्या वर्षी मान्सून आणि मग गावोगावच्या दिंडयांची लगबग या बातम्या येईपर्यंत सारे काही या गप्पगार असते.
खरे तर आषाढी एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो. या एकादशीला 'देवशयनी एकादशी' म्हणतात. म्हणजेच देव आता विश्रांतीला जातात आणि बरोब्बर चार महिन्यांनी कार्तिक महिन्यात एकादशीला हा चतुर्मास संपतो. त्या एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' म्हणतात. या चार महिन्यांच्या काळात पंढरपूरला वारकरी संप्रदायातील साधुपुरुष, कीर्तनकार, अभ्यासक गोळा होतात. चार महिने पंढरपुरातच मुक्काम ठेवतात. आपसात विचारांचे आदानप्रदान करणे, चर्चा करणे, संप्रदायातील कूटप्रश्न-अडचणी सोडवणे या काळात घडते.
त्याचसोबत वारकरी संप्रदायातील ज्या तीन ग्रंथांना 'प्रस्थानत्रयी' म्हणून मान आहे, त्या 'ज्ञानेश्वरी', 'एकनाथी भागवत' आणि 'तुकाराम गाथा' यांच्यावर सखोल अभ्यास या काळात केला जातो. अन्यथा पंढरीची वारी म्हणजे गावोगावातून टाळ कुटत निघालेल्या रिकामटेकडया लोकांची दिंडी अशीच सगळयांची भावना होऊन बसली आहे.
गेल्या शंभर वर्षांत मौखिक परंपरेने आलेले ज्ञान नोंदवून ठेवण्याची चांगली प्रथा वारकरी संप्रदायात आता रुळली आहे. सोनोपंत दांडेकर, जोग महाराज, धुंडामहाराज देगलूरकर असे अधिकारी पुरुष या क्षेत्रात प्रसिध्द आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे ह.भ.प. वै. शंकरमहाराज खंदारकर. शंकरमहाराजांचे वैशिष्टय म्हणजे त्यांनी प्रस्थानत्रयीतील तिन्ही ग्रंथांवर सटीप भाष्य लिहिले. अन्यथा केवळ ज्ञानेश्वरी, केवळ तुकाराम गाथा यांच्यावरील बऱ्याच अधिकारी पुरुषांची भाष्ये आहेत.
मराठवाडयातील नांदेड जिल्ह्यात कंधार गावी साधुमहाराज (इ.स.1708 ते 1812) म्हणून संत अठराव्या शतकात होऊन गेले. त्यांच्या घराण्यातील सातवे वंशज म्हणजे शंकरमहाराज खंदारकर (1923-1985).
महाराजांनी तुकाराम गाथेवर केलेले भाष्य 1965मध्ये प्रसिध्द झाले. आजपर्यंत त्याच्या 9 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. जवळपास दहा वर्षांनी, 1974मध्ये ज्ञानेश्वरीवरील भाष्य 'ज्ञानेश्वरी भावदर्शन' प्रसिध्द झाले. त्याच्या आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराजांच्या निर्वाणानंतर 1991मध्ये प्रस्थानत्रयीतील शेवटचा ग्रंथ 'भावार्थ एकनाथी भागवत' प्रकाशित झाला. त्याच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. गंभीर ग्रंथांच्या आवृत्त्या म्हणजे वाचकांनी व अभ्यासकांनी ही एका प्रकारे दिलेली पावतीच आहे.
शंकरमहाराजांचे वैशिष्टय म्हणजे अतिशय सोप्या शब्दांत त्यांनी या तिन्ही ग्रंथांचे मर्म उलगडून दाखवले आहे. संसारात अडकलेली सामान्य माणसे वारकरी संप्रदायात मानसिक आधार शोधायला येतात. महाराष्ट्रात महानुभाव, लिंगायत, गाणपत्य, शाक्त, दत्त असे कितीतरी संप्रदाय आहेत. सर्वसामान्यांना सामावून घेईल असा एकमेव वारकरी संप्रदायच आहे, हे काळावर सिध्द झाले. शंकरमहाराजांनी हे ओळखून आपल्या भाष्याची मांडणी केली आहे. महाराज लिहितात, '...शास्त्राच्या दृष्टीने संन्याशाची मुले म्हणून भ्रष्ट ठरलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात आहे. कनक-कांतासंपन्न असलेल्या परिस्थितीतही परमार्थ करता येतो, हे श्री एकनाथ महाराजांच्या चरित्रात आहे. त्याचप्रमाणे विपन्नावस्थेतही परमार्थ कसा करता येतो, हे श्री तुकाराम महाराजांच्या चरित्रात दर्शविले आहे.'
'श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य' सगळयात पहिल्यांदा प्रकाशित झाले. पहिल्याच ग्रंथांत शंकरमहाराजांनी पाठभेद काळजीपूर्वक तपासून आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यावरून त्यांची दृष्टी एका टाळकुटया वारकरी सांप्रदायिकाची न राहता चिकित्सक आधुनिक अभ्यासकाची कशी आहे, हे लक्षात येते. बोलीभाषेतील विविध छटांचे शब्द बदलून तेथे मूळ प्रमाण असणारे संस्कृत शब्द त्यांनी भाष्य करताना योजले आहेत. उदा. आहिक्य - ऐहिक, अतित्यायी - आततायी, अभिळास -अभिलाष, दरुशण -दर्शन, कमळणी - कमलिनी.
शंकरमहाराज सांप्रदायिक आहेत. त्यांच्या लेखनात परंपरेचा एक जिव्हाळा आढळून येतो. ज्ञानेश्वर माउलीबद्दल लिहिताना स्वाभाविकच त्यांच्या लेखणीलाही पान्हा फुटतो - '...आपण समाधिस्थ झाल्यावर माउलीने बाळाला दररोज दूध पिण्याकरिता हरिपाठ लिहून ठेवला. बाळाने जन्मदरिद्री राहू नये व सर्वकाळ आनंदात राहावे, म्हणून अनुभवामृताचे धन साठवून ठेवले. बाळाचे पारमार्थिक आरोग्य कायम राहण्याकरिता पासष्टीच्या रूपाने पासष्ट सुवर्णमात्रा करून ठेवल्या. बाळाला वाईटाच्या संगतीने वाईट वळण लागू नये, म्हणून गाथेच्या द्वारा विठ्ठलभक्तीचे संस्कार त्याच्यावर केले.'
शंकरमहाराजांचा तिसरा महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे 'भावार्थ एकनाथी भागवत'. महाराजांच्या पूर्वी या भागवताची जी संपादने उपलब्ध आहेत, त्यांच्यात मूळ संस्कृत श्लोकांचा अर्थ नाही. शंकरमहाराजांनी मात्र मूळ संस्कृत श्लोक, त्याचा अर्थ, त्यावरच्या एकनाथ महाराजांच्या ओव्या आणि मग आपल्या टिप्पणीसह त्या ओव्यांचा अर्थ असे या ग्रंथाला स्वरूप दिले आहे. म्हणून त्याचे महत्त्व वाढले आहे. काही ठिकाणी तर प्राप्त परिस्थितीचा विचार करून नवीन अर्थाची मांडणीही करून दाखवली आहे. त्यातून महाराजांची उच्चकोटीची प्रज्ञा आणि प्रतिभा जाणवते.
एकनाथी भागवताच्या नवव्या अध्यायात 192 क्रमांकाची ओवी आहे -
विजातीयभेद ते ठायी। नसे सजातीय भेद कांही।
स्वगतभेदु तोही नाही। भेदशून्य पाहे ये रीती॥
आता यात नाथांच्या मूळ ओवीत कितीतरी रिकाम्या जागा आहेत. शंकरमहाराजांनी याचा अर्थ उलगडून दाखवताना, '...त्या नारायणाचे ठिकाणी वृक्ष पाषाणातल्याप्रमाणे विजातीय भेद नाही. वड-पिंपळातल्याप्रमाणे सजातीय भेद नाही आणि वृक्षांच्या शाखा, पल्लव, पाने, फुले, फळे यांच्यातल्याप्रमाणे स्वगतभेदही नाही. याप्रमाणे नारायणाचे स्वरूप भेदशून्य आहे.' अशा त्या रिकाम्या जागा भरून काढल्या आहेत.
गेली आठशे वर्षे अशिक्षित जनतेला वेदान्ताचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या सुबोध भाषेत संतांनी समजावून सांगितले. स्वत:वर अन्याय झाला, (ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, एकनाथांना भावार्थ रामायण अर्धवट ठेवून जलसमाधी घ्यावी लागली, तुकारामांचा शेवट तर गूढच आहे) तरी सामान्य लोकांना भवसागरातून तरून जाण्याचा मार्ग सुचवला. आधुनिक काळात शंकरमहाराजांसारख्या साधुपुरुषांनी चिकित्सक दृष्टीने, डोळसपणे हे सगळे विचारधन लिखित स्वरूपात भाष्यासह उपलब्ध करून दिले. आपण शिक्षणाची इतकी साधने निर्माण केली, गावोगाव शाळा उघडल्या, हजारोंनी शिक्षक नेमले तरी अपेक्षित ज्ञान पोहोचत नाही म्हणून आपण ओरड करतो. मग या साधुसंतांनी शेकडो वर्षे कुठलीही अनुकूलता नसताना ही ज्ञानाची परंपरा केवळ लोकांनी दिलेल्या भिक्षेवर आणि दानावर समृध्द करून दाखवली, हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
(शंकर महाराजांची सर्व ग्रंथसंपदा वै. शंकरमहाराज खंदारकर विश्वस्त संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आली असून ती वाचक, अभ्यासक, वारकरी भक्त यांच्यासाठी उपलब्ध आहे.)
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
9422878575