सहकाराच्या माध्यमातूनशेतकऱ्याला समृध्द करणे हेच ध्येय - मंदाताई खडसे

विवेक मराठी    28-Apr-2017
Total Views |


(अध्यक्ष, महानंद सहकारी दूध उत्पादक संघ)

साप्ताहिक विवेकचा या वर्षीचा महाराष्ट्र दिन विशेषांक हा अन्नप्रक्रिया, दुग्ध व दुग्धप्रक्रिया उद्योग या विषयावर आधारित आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्ष मंदाताई खडसे यांच्याशी संवाद साधला. ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचं उद्दिष्ट डोळयामोर ठेवून मंदाताईंनी आपल्या गावात सहकारी तत्त्वावर दूध सोसायटीची स्थापना केली. नफ्यात चाललेल्या या सोसायटीने ग्रामीण महिलांना अर्थार्जनाचं साधन मिळवून दिलं. या यशस्वी प्रयोगााने त्यांच्यातलं आत्मभान जागं झालं आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या मंदाताईंचा आत्मविश्वास वाढला. या क्षेत्रातच काम करायचं, असा निर्धार अधिक पक्का झाला. या सर्व प्रवासाबाबत मंदाताईंशी केलेली बातचीत...

या क्षेत्रात तुमचा प्रवेश कसा झाला? आणि हा प्रवास कसा होता?

शेतीची, दूधदुभत्याची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात माझा जन्म झाला. घरातच गाई-म्हशी असल्याने मला या कामाविषयी पहिल्यापासून आत्मीयता होती, आवड होती आणि त्याची माहितीही होती. या आवडीमुळेच आणि शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी काही काम करण्याच्या प्रेरणेतून, ज्या गावात लहानाची मोठी झाले त्या कोथळीमध्ये मी फक्त महिलांची दूध डेअरी काढली. या माध्यमातून महिलांचं संघटन करता आलं, याचं मला अतिशय समाधान आहे. आज शहरातल्या  महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आहे. कारण काम करण्याच्या, पैसे मिळवण्याच्या संधी त्यांना उपलब्ध आहेत. एखाद्या स्त्रीला संधी मिळाली की ती अतिशय निष्ठेने काम पूर्णत्वाला नेते. गावातल्या महिलांची कष्ट करण्याची तयारी असूनही केवळ संधीच्या अभावामुळे त्या आर्थिकदृष्टया स्वतंत्र नाहीत. महिलांसाठीच्या दूध डेअरीने हीच उणीव दूर केली. त्यानंतर या महिला सदस्यांची दूध सोसायटी स्थापन केली. तिची मी अध्यक्ष आहे. अतिशय यशस्वीपणे तिचं काम आजही चालतं. माझा या क्षेत्रातला अनुभव, असलेली माहिती आणि मिळालेलं यश यामुळे दोन वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली. उत्तर महाराष्ट्रातील महिलेला अध्यक्षपदी निवडून येण्याचा मान पहिल्यांदाच मिळाला, तोही एकमताने. आमचा जळगाव जिल्हा दूध संघ नफ्यात चालू आहे ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झाली.

सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्ष म्हणून काय विशेष जबाबदारी असते?

हे अतिशय जबाबदारीचं पद आहे. या महासंघाचे 85 जिल्हा दूध संघ सदस्य आहेत. या सदस्य संघांकडून रोज दुधाची होणारी आवक किती, त्यातून विक्री किती होते, नफा/तोटा किती होतो, पाश्चराइज्ड दुधाव्यतिरिक्त महासंघाची एकूण उत्पादनं किती आणि कोणकोणत्या प्रकारची आहेत अशी सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती अध्यक्षाला ठेवावी लागते.

दूध हा नाशिवंत पदार्थ आहे. आज महाराष्ट्रातील 85 जिल्हा दूध संघ महासंघाशी जोडलेले आहेत. त्यांच्यापैकी 65 दूध संघांकडून महासंघाकडे आवक होते. अशा दूध संघांचे संचालक नेमण्याचं कामही महासंघामार्फत चालतं.

सहकारी उद्योग म्हणजे तोटयात चालणारा उद्योग असं म्हणतात. याबाबत तुमचा अनुभव कसा आहे?

 जिल्हा पातळीवरचे दूध संघ नफ्यात चालतात, मात्र या संघांचा महासंघ मात्र सर्व उत्पादनं दर्जेदार असूनही तोटयात आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. ती नाकारता येत नाही.  जिल्हा पातळीवर दूध संकलन शेतकऱ्यांकडून केलं जातं आणि महासंघाला मात्र अन्य संघांवर अवलंबून राहावं लागतं. तसंच महासंघात अतिरिक्त कर्मचारिवर्गही आहे. या दोन प्रमुख कारणांमुळे महासंघ तोटयात चालतो असं मला वाटतं. त्याचबरोबर मुंबईच्या मार्केटमध्ये महानंदबरोबरच अन्य खाजगी ब्रँडही असतात. त्यांच्याशी स्पर्धा असते. त्याचाही प्रतिकूल परिणाम महानंदच्या व्यवसायावर होतो.


महासंघाद्वारे महानंद दुधाबरोबरच अन्य कोणती सहउत्पादनं घेतली जातात?

महानंद म्हटलं की बहुतेकांच्या डोळयासमोर गायीचं दूध, लस्सी आणि ताक ही उत्पादनंच येतात. त्यापलीकडे लोकांना विशेष माहिती नसते. मात्र आज महानंदच्या उत्पादनांची साखळी बरीच मोठी आहे. वरील तीन उत्पादनांबरोबरच सुगंधी दूध, साजूक तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, लष्करासाठी जाणारं टोण्ड मिल्क अशी दर्जेदार उत्पादनं आज बाजारात आहेत. या सर्व उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे आमच्याकडे येणारं दूध. रोज इथे साडेतीन लाख लीटर दुधाची आवक होते. पुण्यात दौंडजवळ वरवंडचा दूध पावडरीच्या प्लँटसाठी येणारं दूध लक्षात घेता दररोज एकूण साडेपाच लाख लीटर दुधाची आवक होते. या दुधाचा दर्जा चांगला हवा, याकडे आमचा कटाक्ष असतो. कोणतीही दर्जात्मक तडजोड करायची नाही हे तत्त्व आम्ही कसोशीने पाळत आलो आहोत. म्हणूनच आलेल्या दुधात काही दोष आढळला तर कोणतीही तडजोड न करता, दुधाचे टँकरच्या टँकर परत पाठवले जातात.

दुधाच्या टेट्रा पॅकिंगचा अद्ययावत प्लँट जसा उभारण्यात आला आहे, तसाच लस्सी, ताक, दही, पनीर या उत्पादनांसाठीही अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज अशा नवीन प्लँटचं लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

दूध संघांच्या कामाचा वाढता व्याप आणि घरची आघाडी याची सांगड कशी घालता?

माझी सून रक्षा खडसे खासदार आहे. नातवंडं लहान आहेत. त्यांचं संगोपनही महत्त्वाचं आहे. त्यामुळे घरातलीही जबाबदारी आहेच. ती सांभाळून आठवडयातले 5 दिवस मुंबईत काम, तर दोन दिवस जळगावमध्ये राहून काम करायचं आणि रविवारी पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू करायचा, अशी सध्या तारेवरची कसरत सुरू आहे.

सहकार क्षेत्र पुढे नेलं पाहिजे, शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे, त्यांना त्यांच्या श्रमाचं मोल मिळालं पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी ही कसरत जमवावी लागते. मग जमेल तिथे प्रत्यक्ष हजर राहून, जमेल तिथे फोनवर संपर्क करून या सगळया आघाडया सांभाळायचा प्रयत्न करते.

शब्दांकन : अश्विनी मयेकर