- पूनम पवार
पूर्वीपासून कुंकू, टिकली म्हटले की ते आवडीनुसार नाजूक किंवा ठसठशीत आकारात भांगात तसेच कपाळावर दिसायचे. पण या टिकल्या आता कपाळाबरोबरच शरीराच्या अनेक अवयवांवर दिमाखात विराजमान होताना दिसत आहेत. पार्टी, सणसमारंभ, लग्नसोहळा या सगळया आनंदाच्या प्रसंगी या टिकलीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
कुंकवाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वीच्या काळी भारतीय पुरुष आणि स्त्रिया दोघेही कुंकू लावत असत. पुरुषांच्या तिलकामध्ये उभा गंध लावणारे वैष्णव, तर आडवा गंध लावणारे शैव असा साधारण फरक होता. मात्र कालौघात ही प्रथा स्त्रियांपुरती मर्यादित राहिली आणि बदलत्या परिस्थितीप्रमाणे त्यात विविधताही आली.
भारतात सर्व हिंदू धर्मीयांमध्ये स्त्रियांनी कपाळावर कुंकू लावण्याची प्रथा आहे. अपवाद फक्त आसामचा. फक्त कुंकू लावण्याच्या पध्दती आणि आकार वेगवेगळे आहेत. कुंकू म्हणजे सौभाग्याचे लेणे असा समज दृढ असल्याने भारतीय स्त्रियांचे कुंकवाशी भावनिक नाते आहे. कुंकू लावणे हे सोळा शृंगारांपैकी एक मानले जाते.
पूर्वी कुंकू लावण्याचेही वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत - चंद्रकोर, चिरी, मळवट इत्यादी. तसेच कपाळावर कुंकू रेखायचे म्हणून पूर्वी गोंदण्याची प्रथाच होती. टॅटू हा गोंदण्याचाच आधुनिक अवतार. मला आठवते, माझी आजी कुंकू लावताना प्रथम कपाळावर मेण व्यवस्थित कोरून त्यावर कोरडया पिंजरीचा-कुंकवाचा ठसठशीत टिळा लावत असे. त्यानंतरची पिढी माझ्या आईची. आईच्या पिढीच्या बायका बाटलीत मिळणारे ओले गंध कपाळावर लावत आणि आम्हा लहान मुलींलाही विविध रंगांचे गंध लावत असत.
गरज ही शोधांची जननी असते असे म्हणतात. मग 'कुंकू' ते 'टिकली' हा प्रवासही त्याला अपवाद कसा असेल? जेव्हा हळूहळू बायकांनी घराबाहेर पडून काम करण्याचे प्रमाण वाढले, तेव्हाच हा बदल घडला. बाहेर काम करताना दिवसभराच्या रामरगाडयात आणि गर्दीत गंध ओघळून कपाळावर येई आणि चेहरा खराब होई. जवळ गंधाची बाटली बाळगणे हा उपाय होता, पण टिकली लावणे हा त्याहूनही अधिक सोयीचा उपाय होता. तशातच बाजारात मिळणाऱ्या कुंकवाचा दर्जाही खालावत गेला. त्वचेला घातक अशा रासायनिक द्रव्यांची भेसळ करून बनविलेले कुंकू वापरल्याने अनेकींच्या चेहऱ्यावर पुरळ येणे, त्वचा लाल होणे असे प्रकार घडू लागले. त्यातूनच टिकलीची जागा अधिक पक्की झाली. त्यात सतत येत असलेल्या नावीन्यामुळे टिकली दीर्घायुषी झाली.
जसजशी टिकली महिलांच्या पसंतीस उतरली, ती वापरण्यातला सुटसुटीतपणा त्यांना जाणवू लागला, तसतसे तिच्यात वैविध्य येत गेले. कालानुरूप विविध रंगांच्या, आकारांच्या, प्रकारच्या टिकल्या बाजारात येऊ लागल्या. टिकली कपाळाला चिकटावी यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदाचाही दर्जा सुधारला, जेणेकरून त्वचेस अपाय होऊ नये. आजकाल वेल्वेटशिवाय प्लॅस्टिकच्याही टिकल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नुसत्या विविध रंगांतल्या साध्या टिकल्यांबरोबरच फॅन्सी टिकल्यांमध्ये मणी, मोती, खडे, कुंदन, लटकन असे वेगवेगळे प्रकारही पाहायला मिळतात. नववधूसाठी अगदी 20 रुपयापासून ते 1500च्या वर किमतीची टिकली बाजारात आहे. काही प्रांतात नवरदेवाला मळवट भरण्याची प्रथा आहे, हे कृत्रिम मळवटदेखील टिकलीच्या स्वरूपात बाजारात विक्रीस असतात. तसेच भांगामधला सिंदूरदेखील टिकलीच्या स्वरूपात मिळतो. त्याची लांबी चार ते पाच इंच इतकी असते. टिकलीसाठी जो कागद वापरला जातो, तो पटकन फाटू नये यासाठी त्यात गवताच्या लगद्याचा वापर केला जातो. त्यात प्लास्टिसायझर घातले जाते. या टिकल्यांबरोबरच बाजारात न पसरणारे, न ओघळणारे 'स्मॉग फ्री गंध' मिळू लागले आहे.
ही एवढीशी टिकली असली, तरी तिने अगदी चित्रपट सृष्टीतही स्वतःचा ठसा उमटविला आहे. का कोण जाणे, या माध्यमामुळे तिची एक वेगळी ओळखही निर्माण झाली असे वाटते. सुधा चंद्रन या अभिनेत्रीची रमोला सिकंदची भूमिका लोकप्रिय होण्यात या कुंकवाचा फार मोठा वाटा आहे. शांती या मालिकेमधील मंदिरा बेदीची बाणाची टिकली, पुढचं पाऊल या मराठी मालिकेतील अक्कासाहेब यांची ठसठशीत कपाळावर रांगोळी घातल्यासारखी टिकली अशा एक ना अनेक मालिकांमध्ये वेगवेगळया लोकप्रिय टिकल्यांचे प्रकार आपल्याला दिसतात. या मालिकांचीच कमाल की काय, म्हणून ब्यूटी पार्लरमध्ये 'टिकली आर्ट' हा नवीन ट्रेंड आला आहे. त्याचा छोटासा कोर्ससुध्दा पार्लरमध्ये शिकविला जातो. मराठी चित्रपट सृष्टी, बॉलिवूड येथील नायिका ही टिकली कौतुकाने मिरवतातच, तसेच हॉलिवूडच्या पॉपस्टार सेलेना गोमेझ, ज्युलिया रॉबर्ट, मॅडोना यांनासुध्दा या टिकलीने भुरळ पाडली आहे.
या एवढयाशा दिसणाऱ्या टिकलीच्या व्यवसायात उलाढाल मात्र लाखो-कोटयवधी रुपयांची होते. अगदी छोटयातील छोटी कंपनी ते नामांकित 'ब्रँडेड' कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. या टिकली व्यवसायाची कथा अगदी गमतीशीर आहे. मुंबईत प्रिटिंग व्यवसायात काम करणारे विक्रमभाई आणि सुरेशभाई यांच्या डोक्यात ही टिकल्यांची कल्पना आली. त्यांच्या मित्राच्या पत्नीमुळे त्यांना ही कल्पना सुचली. तिला नटण्या-सजण्याची खूप हौस होती. सगळा मेकअप झाला की त्या कुंकू लावत. पण एकदा कुंकू पसरले की पुन्हा सगळा मेकअप करावा लागे. त्या वेळी विक्रमभाई आणि सुरेशभाई ग्रीटिंग बनविण्याचा व्यवसाय करत, त्यामुळे कटिंगबद्दलची माहिती त्यांना होतीच. त्याचा वापर करून, प्रयोग म्हणून त्यांनी मित्राच्या पत्नीला स्टिकर बिंदी करून दिली आणि ती कल्पना त्यांना फारच आवडली. नुसती आवडलीच नाही, तर त्यांनी या बिंदीकडे व्यवसाय म्हणून बघितले.
या एवढयाशा टिकलीमुळे आज अनेक जणांची चूल पेटते एवढे मात्र खरे. अनेक घरात हा टिकली व्यवसाय रोजंदारीवर केला जातो. एका शीटमागे काही रुपये असा त्यांचा व्यवहार असतो. अनेक महिला बचत गट, महिला स्वयंसेवी संस्था हा व्यवसाय मोठया प्रमाणात करतात. शिवाय मुंबई-पुण्यासारख्या अनेक शहरात हा व्यवसाय (घाऊक स्वरूपात) लाखोंची उलाढाल करताना दिसतो. हा व्यवसाय रोजंदारी, फेरीवाले, रेल्वेमध्ये विक्री करणारे, गृहउद्योग, लघुउद्योग ते नामांकित कंपन्या अशा सर्व स्तरांत अधिक नफ्यासहित केला जातो. भारतात तरी या उद्योगाला कधी मंदीचा काळ येईल असे वाटत नाही.
कारण टिकलीमध्ये नवनवीन ट्रेंड आले आहेत. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी या आधुनिक ट्रेंडची माहिती हवी, ती थोडक्यात -
* साध्या टिकल्या - या लाल, चॉकलेटी, काळया, रंगीत तसेच झिरो साइजमध्ये असतात. त्यातही 'रेशीमगाठी' या मालिकेमध्ये मेघना लावत असेलेली टिकली लोकप्रिय झालेली दिसते.
* फॅन्सी टिकली - यामध्ये कुंदन, हिरे, जर्दोसी वर्क, क्रिस्टल, मणी, मोती लावलेल्या टिकल्या बाजारात दिसतात.
* ब्रायडल टिकली - या टिकल्या नववधू आणि नवरदेवासाठी खास तयार केलेल्या असतात.
* टॅटू - फॅशन म्हणून टॅटू (गोंदणे) काढण्याची हौस जास्तच बळावली आहे. या टॅटूच्या राज्यातही टिकलीने शिरकाव केला आहे. हे कृत्रिम टॅटू (टिकली) वेगवेगळया डिझाइन्समध्ये आणि रंगांत बाजारात मिळतात.
* आय टिकली - ही टिकली कपाळावर नाही, तर डोळयाभोवती लावली जाते. त्या टिकलीवरचे नक्षीकाम बारकाईने केलेले असते.
* नोज टिकली - सणावाराला नथ घालणे ही आपली परंपरा. पण आजकाल मुलींचे नाक टोचलेले असतेच असे नाही. त्यासाठी 'नोज टिकली' हा चांगला पर्याय आहे. तिचे स्टिकिंगही चांगले असल्याने ऐनवेळी गळून पडण्याची भीती राहत नाही. एरवी नथ घातल्यावर नाकात जाणवणाऱ्या संवेदनाही होत नाहीत, शिवाय परंपरा जपल्याचा आनंदही काही औरच.
* बेली बटन बिंदी - हा टिकलीचा सर्वात नखरेदार प्रकार. आजकाल तरुणींमध्ये या प्रकाराची चलती आहे. क्रॉप टॉप किंवा लग्नसमारंभात शरारा घातल्यावर बेंबी टोचणे हा वेदनादायक सौंदर्याचा प्रकार नसेल, तरी काही हरकत नाही. त्यासाठीच तर हा बेली बटन बिंदी पर्याय उत्तम.
* नेल टिकली - नेल आर्ट अाता लोकप्रिय झालेला प्रकार आहे आणि तेव्हापासून नखांवर लावल्या जाणाऱ्या टिकल्यांनाही विशेष मागणी आली आहे. या टिकल्यांना कुंदन, हिरे, जर्दोसी, नाजूकसे घुंगरूसुध्दा लावले जातात. या टिकलीमुळे हाताच्या नजाकतीत भर पडते हे मात्र निश्चित.
* सोन्याची टिकली - टिकल्यांच्या फॅशनमधील शेवटचे टोक म्हणजे ही सोन्याची टिकली. ही टिकली चंद्रकोर आकारातच सोन्याच्या पेढयांमध्ये मिळते. चंद्रकोरीच्या खाली छोटा घुंगरू लावलेला असतो. या टिकलीमुळे स्त्रीचे सौंदर्य अगदी पेशवाई वाटते.
पूर्वीपासून कुंकू, टिकली म्हटले की ते आवडीनुसार नाजूक किंवा ठसठशीत आकारात भांगात तसेच कपाळावर दिसायचे. पण या टिकल्या आता कपाळाबरोबरच शरीराच्या अनेक अवयवांवर दिमाखात विराजमान होताना दिसत आहेत. पार्टी, सणसमारंभ, लग्नसोहळा या सगळया आनंदाच्या प्रसंगी या टिकलीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
टिकलीचा हा प्रवास असाच पुढे चालत राहो आणि आपली संस्कृती नव्या रूपात उजळत राहो.
9594961859