सिंधू - सरस्वती संस्कृतीची देणगी - डॉ. वसंत शिंदे

विवेक मराठी    14-Apr-2017
Total Views |

 

 

चिकन तंदुरी - बुध्दिबळ - ठिकऱ्या

नुकतीच पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात असलेल्या मोहेंजोदारो येथे सिंधू-सरस्वती संस्कृतीवर एक तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद झाली. सिंध प्रांताच्या संस्कृती, कला आणि पुरातत्त्व विभागाने आयोजित केलेल्या ह्या परिषदेत पेपर वाचण्यासाठी म्हणून पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्रमुख डॉ. वसंत शिंदे यांना निमंत्रित केलं होतं. ह्या परिषदेत भाग घेणारे ते एकमेव भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतात सध्या राखीगढी ह्या सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या एका मोठया साइटवर उत्खनन चालू आहे. त्या उत्खननाच्या अनुषंगाने सापडलेले नवे पुरावे आणि मोहेंजोदारो व हरप्पा येथे भविष्यात नवीन उत्खनन केल्यास त्या पुराव्यांचा काय उपयोग होऊ  शकतो, हा डॉ. शिंदे ह्यांच्या पेपरचा विषय होता. मुळात पाकिस्तानात सध्या परिस्थिती इतकी अस्थिर आहे की तिथे ह्या वातावरणात अशी मोठी आंतरराष्ट्रीय परिषद घेणे हेच कौतुकास्पद होते. ह्या परिषदेच्या निमित्ताने 'साप्ताहिक विवेक'तर्फे शेफाली वैद्य ह्यांनी डॉ. वसंत शिंदेंची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीतला हा प्रमुख अंश.

 

आता ज्या सिंधू-सरस्वती संस्कृतीवरच्या परिषदेसाठी तुम्ही पाकिस्तानला जाऊन आलात, त्या परिषदेचा उद्देश काय होता?

सिंध सरकारच्या पुरातत्त्व आणि संस्कृती विभागाने ही परिषद आयोजित केली होती. ह्या परिषदेचे मुख्य दोन उद्देश होते. एक म्हणजे मोहेंजोदारोच्या शास्त्रशुध्द उत्खननाला सुरुवात होऊन आता जवळजवळ 90 वर्षं झालीत. त्यानिमित्ताने जगभरात मोहेंजोदारो आणि हरप्पावर जे संशोधन चालू आहे, त्याचा प्रत्यक्ष साइटवर आढावा घेणं आणि त्यातून काही नव्या दिशा दिसतात का ते पाहणं. दुसरा महत्त्वाचा उद्देश होता, तो म्हणजे युनेस्कोला पटवून देणं की ह्या साइटला जो जागतिक सांस्कृतिक वारशाचा दर्जा मिळालेला आहे, तो तसाच कायम ठेवणं. पाकिस्तानमधल्या मोजक्याच जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये मोहेंजोदारो आणि हरप्पा यांचा समावेश होतो आणि मिळालेला दर्जा तसाच टिकवून ठेवण्यासाठी सिंध सरकारला ह्या संदर्भात जगात काय संशोधन चालू आहे हे जाणून घेणं भाग होतं. ही परिषद प्रत्यक्ष साइटवरच आयोजित करण्यात असली असल्यामुळे आम्ही चोवीस तास तिथेच राहत होतो. ह्याआधीची मोहेंजोदारो आणि हरप्पावरची परिषद भुत्तोंच्या काळात भरवली गेली होती, म्हणजे तुम्ही कल्पना करा की मध्ये किती वर्षं गेली. ह्या वर्षांत पाकिस्तानमध्ये मोहेंजोदारो आणि हरप्पावर नवीन संशोधन जवळजवळ झालंच नाही म्हटलं तरी चालेल.

सध्या तिथे नवीन काही उत्खनन चालू आहे का?

नाही. नवीन उत्खनन जवळजवळ नाहीच म्हटलं तरी चालेल, आणि त्यांनी ते करूही नये हे माझं मत आहे. मुळात मोहेंजोदारो आणि हरप्पा ह्या साइट्स प्रचंड मोठया आहेत आणि तिथे बऱ्याच मोठया भागात त्यांनी उत्खनन करून ठेवलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की नवीन भागात उत्खनन सुरू करण्यापेक्षा त्यांनी छोटा परीघ घेऊन खोलवर जावं. सध्या मोहेंजोदारो आणि हरप्पा या साइट्सचं संवर्धन आणि संरक्षण कसं करावं हा या साइट्सचा प्रॉब्लेम आहे. जगभरातून आम्ही पंचवीस संशोधक होतो. त्यातला भारतातून मी एकटाच होतो. बाकीचे चोवीस लोक युरोप आणि अमेरिकेतून आलेले होते. पाकिस्तानच्या फक्त एकाच संशोधकाला त्यांनी पेपर वाचायला बोलावलं होतं. त्यावरून ह्या विषयावर अधिकारवाणीने बोलणारे लोक पाकिस्तानमध्ये किती कमी आहेत ते आम्हाला कळलं. त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, जे युरोपियन किंवा अमेरिकन संशोधक पाकिस्तानमध्ये काम करून गेले, त्यांनी पाकिस्तानी संशोधकांना फक्त मदतनीस म्हणून वापरलं, त्यांना ग्रो होण्याची संधी दिली नाही, जे भारतात सुदैवाने घडलं नाही. भारतातही बाहेरचे संशोधक आले, पण त्यांनी आमच्या बरोबरीने काम केलं. ते संशोधक आणि आम्ही मदतनीस हे समीकरण भारतात कधीच चाललं नाही. पाकिस्तानमध्ये मात्र तसं घडलं नाही. तिथे संशोधन बाहेरच्या शास्त्रज्ञांनी येऊन केलं आणि पाकिस्तानी संशोधकांना कायम दुय्यम दर्जा दिला गेला. त्यातही पाकिस्तानचा सिंधू संस्कृतीवरचा सगळयात मोठा संशोधक रफिक मुगल याला परिषदेच्या आयोजकांनी निमंत्रणच दिलं नव्हतं. कदाचित त्यांचं अंतर्गत काही राजकारण असावं.

गेली अनेक दशकं पाकिस्तानमध्ये सिंधू संस्कृतीवर काही भरीव काम झालेलं नाहीये. ह्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? त्यांच्याकडे फंड्सची कमतरता आहे का?

नाही. तसं नाही मला वाटत. पैसे त्यांच्याकडे भरपूर आहेत. युनेस्कोकडून त्यांना फंड मिळतात, पण मुळात त्यांचा संवर्धनाबद्दलचा दृष्टीकोनच चुकीचा आहे. पाकिस्तानमध्ये काम करणारे जवळजवळ सगळेच लोक युरोपियन किंवा अमेरिकन असल्यामुळे त्यांनी सगळी स्वत:कडची साधनं वापरली आहेत, जी आपल्या हवामानाला उपयुक्त नाहीयेत. तुम्हाला माहीत आहे की सिंधू संस्कृतीतल्या शहरांची खासियत म्हणजे पक्क्या विटांचं बांधकाम. त्या विटांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्यावर केमिकलचा लेप देऊन विटा कव्हर करून टाकल्या. पण त्यामुळे आर्द्रता आतल्याआत ट्रॅप होऊन विटा कुजायला लागल्या, ढासळायला लागल्या. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी वरून दिलेला लेप खरवडून काढायला सुरुवात केली, त्यामुळे अधिकच नुकसान झालं. मी त्यांना सुचवलं की त्या भागात अजूनही लोक तशीच घरं बांधतात, तशाच भाजलेल्या विटांचा उपयोग करून. त्या लोकांना त्या विटांचं संरक्षण कसं करावं ते माहीत असतं. त्यांच्याकडून ते टेक्निक शिकून घ्यावं. ते कमी खर्चाचंही असेल आणि मुख्य म्हणजे तिथल्या हवामानाला पूरकही होईल. ह्यापुढे तिथले लोक स्थानिक तंत्रज्ञान वापरतील अशी आशा आहे.

तुमच्या पेपरचा विषय काय होता?

मी आणि माझी टीम सध्या हरियाणामध्ये घघ्घर-हाक्रा खोऱ्यामध्ये राखीगढी नावाच्या गावात उत्खनन करतोय. ही घघ्घर-हाक्रा नदी म्हणजेच पूर्वीची सरस्वती आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. ह्या उत्खननातून उपलब्ध झालेली नवी माहिती मोहेंजोदारो आणि हरप्पाच्या संदर्भात पडताळून पाहणं हा माझ्या पेपरचा विषय होता. मुख्य म्हणजे आम्ही हे उत्खनन करताना मोहेंजोदारो आणि हरप्पामध्ये केलेल्या चुका जाणीवपूर्वक टाळल्या. पहिली दोन वर्षं आम्ही फक्त पूर्ण साइटचं सर्वेक्षण केलं. प्रत्यक्ष उत्खननाला हातही लावला नाही. ह्या साइटचं सर्वेक्षण करताना आमच्या लक्षात आलं की या साइटचं क्षेत्रफळ जवळजवळ 550 हेक्टर आहे, म्हणजे मोहेंजोदारोच्या जवळजवळ दुपट्ट मोठी अशी ही राखीगढीची साइट आहे. अर्थात ह्यामुळे मोहेंजोदारोचं महत्त्व कमी होत नाही. पण राखीगढीमध्ये आम्हाला जवळजवळ 20-22 मीटर खालपर्यंत डिपॉझिट मिळाले. त्यामुळे राखीगढीमधल्या मानव वसाहतीची सुरुवात जवळजवळ इसवीसनपूर्व पाच हजार वर्षांपर्यंत मागे जाते. मोहेंजोदारोमध्ये हाच काळ इसवीसनपूर्व साडेतीन हजार वर्षांपर्यंतचा मानला जातो. म्हणजे राखीगढीमधला पुरावा सिंधू-सरस्वती संस्कृतीला जवळजवळ दीड हजार वर्षं मागे नेतो. अर्थात मोहेंजोदारोमध्येही नवीन उत्खनन झालं, जास्त खोलवर जाता आलं तर तिथेही अर्ली हरप्पन पिरियडचा पुरावा मिळण्याची शक्यता आहे. मी त्या परिषदेत तिथल्या लोकांना तेच सुचवलं. राखीगढीमध्ये तिथल्या लोकांच्या राहणीत कसकसे बदल झाले हे आमच्या उत्खननात स्पष्ट दिसतंय. म्हणजे पूर्वी इथली माणसं गोल झोपडया बांधून राहायची, जमिनीखाली खड्डा खणून. पुढे त्यांच्या घरांचे आकार चौकोनी झाले. घरं जमिनीच्या पातळीवर आली. हळूहळू घरांचे आकार मोठे होत गेले, एकाहून जास्त खोल्या आल्या आणि शेवटी ह्या संस्कृतीचं पूर्ण विकसित रूप जे नागरीकरणाचं आहे ते दिसायला लागलं. अर्थात हे सगळे बदल हळूहळू तिथल्या माणसांच्या वाढत्या गरजांबरहुकूम झाले. राखीगढीमध्ये सिंधू संस्कृतीचा पुढचा टप्पा - म्हणजे ज्याला आम्ही लेट हरप्पन म्हणतो, तो मात्र दिसत नाही. कदाचित त्याचं कारण सरस्वती नदीचं लुप्त होणं असावं. ही घघ्घर-हाक्रा नदी म्हणजेच पूर्वीची सरस्वती आहे असं बऱ्याच पुरातत्त्वशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ही नदी लुप्त झाली ह्याबद्दल सगळयांचं एकमत आहे, पण ती कधी लुप्त झाली त्याबद्दल मात्र ठोस असा पुरावा नव्हता. पण राखीगढीमध्ये झालेल्या उत्खननानंतर आम्ही अनुमान लावू शकतो की साधारण इसवीसनपूर्व दोन हजारच्या दरम्यान कधीतरी ही नदी लुप्त व्हायला सुरुवात झालेली असावी. कारण राखीगढीमध्ये आपल्याला फक्त इसवीसनपूर्व पाच हजार ते दोन हजारपर्यंतचेच पुरावे सापडतात. त्यानंतर वस्ती नदीपासून लांब लांब चाललेली दिसते. ह्याचाच अर्थ ह्याच कालखंडाच्या दरम्यान सरस्वती आटत चालली असावी.

राखीगढीमधल्या तुमच्या उत्खननाबद्दल थोडी विस्तृत माहिती द्याल का?

एक खूप महत्त्वाचा प्रयोग आम्ही राखीगढीमध्ये करतोय. हरप्पन लोक कोण होते, ते कसे दिसत होते ते अजूनसुध्दा आम्हाला माहीत नाही. सिंधू-सरस्वती संस्कृती जेव्हा विकसित होत होती, तेव्हा आजूबाजूच्या देशांत इतरही संस्कृती होत्या आणि त्या लोकांशी ह्या लोकांचे व्यापाराचे संबंध होते. पण जनुकीय दृष्टीने त्यांच्यामध्ये काही संबंध आले होते का, हे आपल्याला अजून माहीत नाही. ते शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे DNA ऍनालिसिस. आम्ही ह्याआधी फर्माना नावाच्या गावात जेव्हा उत्खनन केलं होतं, तेव्हा हा DNA ऍनालिसिसचा प्रयोग आम्ही केला होता. पण तेव्हा तो फार यशस्वी झाला नाही, कारण तिथे स्थानिक लोकांची वर्दळ खूप होती आणि आम्हाला जी दफनं मिळाली होती, ती आम्ही लोकांना दाखवण्यासाठी बराच वेळ उघडयावर ठेवली होती, त्यामुळे तिथला DNA फार लवकर कंटॅमिनेट झाला आणि तो प्रयोग फसला. ह्या वेळेला मात्र आम्ही खूप काळजी घेतली. तिथली दफनभूमी उकरताना कुणाला सांगितलं नाही. एकेक उत्खननात एकेकच ब्रश आणि चाकू वापरला आणि मुख्य म्हणजे जे सापडलं त्याचं लगेच डॉक्युमेंटेशन करून तो पुरावा योग्य रितीने सीलबंद करून DNA ऍनालिसिससाठी प्रयोगशाळेत पाठवूनही दिला. राखीगढीहून आम्हाला सहा चांगले DNA सॅम्पल्स मिळालेले आहेत. ह्या DNA ऍनालिसिसचा रिपोर्ट लवकरच बाहेर येईल आणि त्यातून आर्यन आक्रमणाची जी थियरी आहे - जी आज नाकारण्यात आलेली आहे, तिच्यावर कदाचित कायमचाच पडदा पडू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुराव्यावर हरप्पन लोक कसे दिसत होते हे त्रिमिती रिकन्स्ट्रक्शन करून बघण्याचं तंत्रज्ञान आज आपल्याकडे आहे. कोरियन लोकांबरोबर आम्ही ह्या विषयावर काम करतोय. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. ह्या ऑॅगस्टमध्ये कदाचित आमचा अंतिम अहवाल प्रसिध्द होईल आणि मगच आम्ही आमचे निष्कर्ष लोकांपर्यंत पोहोचवू. एकदा 'नेचर'सारख्या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिध्द झाला की बऱ्याच अज्ञात गोष्टींवर प्रकाश पडू शकेल, बरीच कोळिष्टकं धुऊन जातील.

मी असं वाचलंय की सिंधू-सरस्वती संस्कृतीतल्या लोकांची नगरे अत्यंत विकसित आणि प्रमाणबध्द होती. त्यांची पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्था वगैरे अत्यंत चोख होती. त्याबद्दल काही सांगू शकाल का?

बरोबर आहे तुमचं. सिंधू-सरस्वती संस्कृतीतल्या लोकांची शहरं अत्यंत स्वच्छ होती. सांडपाण्याचा निचरा करण्याची त्यांची व्यवस्था अत्यंत प्रगत होती. घराघरातलं सांडपाणी छोटया छोटया बंद नाल्यांमधून वाहत येऊन मुख्य नाल्याला मिळायचं आणि नंतर ते सगळं दूषित पाणी थेट शहराच्या बाहेर नेऊन त्याचा निचरा करायची व्यवस्था होती. खुद्द शहरात उघडी गटारं, सांडपाण्याचे ओहोळ वगैरे गलिच्छ गोष्टी कधीच दिसायच्या नाहीत. त्यामुळे ते लोक अत्यंत निरोगी होते. आज आपण 'स्वच्छ भारत'च्या गोष्टी करतो, पण नागरी स्वच्छता ही संकल्पना आपल्याकडे पार सिंधू-सरस्वती संस्कृतीपासून आलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का, की सिंधू-सरस्वती संस्कृतीत घराघरात बंद टॉयलेट्स होते? आपण आज असं मानतो की कमोडची कल्पना पाश्चिमात्य संस्कृतीमधून आपल्याकडे आलेली आहे. पण कमोडचा सर्वात प्राचीन पुरावा हरप्पन संस्कृतीमध्ये मिळतो. तसेच स्वीमिंग पूल, म्हणजे सार्वजनिक तरणतलाव ही कल्पनाही सिंधू-सरस्वती संस्कृतीत अस्तित्वात होती. आज ज्या जागेला आपण 'ग्रेट बाथ' म्हणून ओळखतो, तो त्या संस्कृतीतला सार्वजनिक तरणतलाव होता. सिंधू-सरस्वती संस्कृतीने जगाला दिलेली सगळयात मोठी देणगी म्हणजे शास्त्रशुध्द रितीने सिव्हिल बांधकाम कसं करायचं. पक्क्या भाजलेल्या विटा रचताना एक ओळ आडवी एक ओळ उभी रचण्याची पध्दत आहे, जी आजदेखील आपण वापरतो. आज त्या पध्दतीला आपण 'इंग्लिश बाँड' म्हणून ओळखतो, पण त्याचा सर्वात प्राचीन उपयोग सिंधू-सरस्वती संस्कृतीमधल्या लोकांनी केलेला आहे. खरं तर आपण त्याला 'हरप्पा बाँड' असं म्हणायला पाहिजे. 

आपण आज 'युनिटी इन डायव्हर्सिटी' म्हणजे विविधतेमध्ये एकता ह्या विषयावर खूप बोलतो, पण ही संकल्पनाही आपल्याकडे सिंधू-सरस्वती संस्कृतीतल्या लोकांकडूनच आलेली आहे. सिंधू-सरस्वती संस्कृतीचा भौगोलिक विस्तार खूप प्रचंड आहे. जवळजवळ वीस लाख चौरस कि.मी. पश्चिमेला अगदी अफगाणिस्तान, इराणपासून ते पूर्वेकडे उत्तर प्रदेशापर्यंत ह्या संस्कृतीच्या पाऊलखुणा सापडलेल्या आहेत. मोहेंजोदारो, हरप्पा, चौदारो या सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पश्चिमेकडच्या शहरांपासून पूर्वेकडे कालीबंगन, हरियाणात राखीगढी, कच्छमध्ये धोलावीरा आणि लोथल इथपर्यंत विविध ठिकाणी उत्खनन झालेलं आहे. आज भारतात असलेल्या बऱ्याच साइट्स ह्या लुप्त सरस्वती मानल्या गेलेल्या घग्गर-हाक्रा खोऱ्यामध्ये आहेत. हा भाग सध्या समशुष्क (semi-arid) मानला जातो. पण एकेकाळी इथे सरस्वती नदी दुथडी भरून बारमाही वाहत असावी, असं मानायला पुष्कळ पुरावे आहेत. ह्या संस्कृतीतल्या सगळया शहरांमध्ये सापडलेल्या पुराव्यांमध्ये समान धागे खूप आहेत. पक्क्या भाजलेल्या विटांचं बांधकाम. विटांचा आकारही 1:2:4 ह्या प्रमाणात स्टँडर्डाइझ केलेला. लाल-काळी मातीची भांडी, पशुपती आणि एकशिंगी युनिकॉर्नचे भरपूर सील्स, सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी केलेली व्यवस्था, मण्यांचे, सोन्या-चांदीचे दागिने आणि दफनं ह्यामध्ये खूप साम्य आहे, त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणचे काही खास असे स्वत:चे असे वेगळे फीचर्सदेखील आहेत. ही विविधतेमधील एकता आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आहे. 

पण ही एकता किंवा स्टँडर्डायझेशन कसं झालं असावं? तेसुध्दा त्या काळात जेव्हा आजच्यासारखी दळणवळणाची साधनं नव्हती... उदाहरणार्थ, विटा पाडताना त्यांचं प्रमाण 1:2:3 किंवा 1:2:4 असंच असलं पाहिजे ही माहिती इतक्या मोठया भौगोलिक परिसरात पोहोचली कशी?

फार चांगला प्रश्न विचारलात. ह्याबद्दल ठोस, नि:संदिग्ध पुरावा नाही, पण उपलब्ध पुराव्याच्या आधारावर आम्ही संशोधक अनुमान काढू शकतो. पाकिस्तानचे रफिक मोगल हे सिंधू-सरस्वती संस्कृतीवर काम करणारे एक खूप मोठे संशोधक आहेत, त्यांच्या मते हरप्पा आणि मोहेंजोदारो ही दोन शहरं म्हणजे त्या काळातल्या टि्वन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह राजधान्या होत्या आणि तिथून बऱ्याचशा पॉलिसी बनवल्या जायच्या आणि तिथून मग ती माहिती दुसरीकडे जायची. हरप्पा आणि मोहेंजोदारो इथे खूप लिखाण असलेले सील्स मिळालेत, इथली मातीची भांडी खूप रेखीव आहेत, रस्ते आणि घरं खूप विस्तृत आणि व्यवस्थित आखलेले आहेत. त्यामुळे हे अनुमान सत्य आहे असं मानायला पुरावा आहे. पण जोपर्यंत सिंधू-सरस्वती संस्कृतीची लिपी आपल्याला वाचता येत नाही, तोपर्यंत ठोस, नि:संदिग्ध पुरावा मिळण्याची शक्यता जरा कमी आहे.    

'आर्यन इन्व्हेजन थियरी'वर काही प्रकाश टाकू शकाल का आपण?

ही थियरी आता जवळजवळ मृत झाल्यातच जमा आहे. गेली दहा हजार वर्षं मोठया प्रमाणावर आपल्याकडे बाहेरून स्थलांतर झाल्याचा कसलाच मटिरियल पुरावा आपल्याकडे नाही आणि आपले लोक त्या प्रमाणात बाहेर गेल्याचेही. एखादी परकी संस्कृती आपल्याकडे इतक्या मोठया प्रमाणावर आयात झाली असती, तर इथल्या लोकांच्या संस्कृतीवर त्याचा परिणाम झाल्याचे काही तरी मटिरियल पुरावे मिळायला पाहिजे होते. पण तसं काहीच आजवरच्या उत्खननातून निघालेलं नाहीये. काही युरोपियन संशोधकांनी जनुकीय अभ्यास केलाय, म्हणजे DNA ऍनालिसिस नाही, पण जनुकीय अभ्यास करून असं सिध्द केलंय की भारतीय उपखंडामध्ये माणसाच्या शरीरात गेली दहा हजार वर्षं काही लक्षणीय बदल झालेला नाही. आमच्या DNA ऍनालिसिसमध्ये जर हे नि:संशय सिध्द झालं, तर ह्या वादावर कायमचा पडदा पडेल. आम्ही जी त्रिमिती रिकन्स्ट्रक्शन करतोय सध्या, त्यावरून सिंधू-सरस्वती संस्कृतीतली माणसं दिसायला कशी होती, त्यांचा रंग कसा होता, केस कसे होते, डोळे कुठल्या रंगाचे होते ह्या सगळयावर प्रकाश पडू शकेल. हा सगळा डेटा मी मोहेंजोदारोमधल्या माझ्या पेपरमध्ये सादर केला. खूपच कुतूहल वाटलं त्यांना की भारतात ह्या प्रकारचं उत्खनन आणि संशोधन चालू आहे. तिथल्या संस्कृती विभागातल्या काही लोकांनी म्हटलंसुध्दा की सिंधू-सरस्वती संस्कृती हा भारत-पाकिस्तान मधला दुवा आहे. त्यावर दोन्ही देशांनी मिळून काम केलं पाहिजे.

कारण मुळात संस्कृती एकच आहे आणि त्या संस्कृतीच्या खुणा ह्या प्रदेशात अजूनही जिवंत आहेत. अजूनही ह्या भागातल्या गावांमधली घरं सिंधू-सरस्वती संस्कृतीतल्या घरांसारखीच बांधली जातात. एक मोठं अंगण असतं आणि सभोवताली खोल्या. अजूनही ह्या भागातली घरं मुख्य रस्त्यावर उघडत नाहीत, तर त्यांचा दरवाजा बाजूच्या छोटया गल्ल्यांमध्ये उघडतो, जेणेकरून त्यांचे शेजाऱ्यांशी संवाद होतात, मुख्य रस्त्यावरची धूळ व घाण घरात येत नाही. घरं अजूनही भाजलेल्या विटांची असतात आणि विटांचं प्रमाणही तेच जुनं असतं. बंद विटांच्या तंदूरमध्ये तेव्हाही कोंबडी भाजली जायची, आजही भाजली जाते. सिंधू-सरस्वती संस्कृतीत जे खेळ खेळले जायचे - म्हणजे लगोऱ्या, ठिकऱ्या आणि बुध्दिबळ - ते आजही भारतीय उपखंडातले लोक खेळतात. सिंधू-सरस्वती संस्कृतीतले लोक जसे मण्यांचे दागिने वापरायचे, तसेच दागिने आजही तिथले लोक वापरतात. ही संस्कृती आजही आपल्याकडे जिवंत आहे, भारतातही आणि पाकिस्तानातही.

तुमचं हे मत आजपर्यंत प्राचीन भारताच्या इतिहासाबद्दल रूढ असलेल्या 'आर्यन इन्व्हेजन'सारख्या सिध्दान्ताला पूर्णपणे नाकारणारं आहे. त्यावर काय सांगाल?

सिंधू-सरस्वती संस्कृतीवरील संशोधन काळाची गरज आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे या संस्कृतीच्या प्राथमिक टप्प्यात लोक गोल झोपडयांमध्ये राहत होते. मग जमिनीवर व्यवस्थित चौकोनी घरं बांधली जाऊ  लागली आणि मग याचं सुनियोजित आखीव-रेखीव नगरात रूपांतर झालं. स्थापत्याचा हळूहळू विकास होत गेला. पुढे ह्या नगरांचा ऱ्हास झाला तोही काही एकदम नाही, तर हळूहळू. पण नगरे सोडून लोक दुसरीकडे राहायला गेले म्हणजे संस्कृतीचा ऱ्हास झाला असं नक्कीच नाही. मी वर म्हटल्याप्रमाणे कितीतरी गोष्टी आज आपल्याकडे दिसतात, ज्या थेट सिंधू-सरस्वती संस्कृतीपासून आपल्याकडे सतत चालत आलेल्या आहेत. नव्या आधुनिक व विश्वसनीय कालमापन पध्दतींचा वापर करून काढलेल्या अंदाजांवरून सिंधू-सरस्वती संस्कृतीची सुरुवात इ.स.पू. साडेसात-आठ हजारपासून झाली असल्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षं वेगवेगळया पध्दतींनी, उपकरणांनी केलेल्या सखोल संशोधनातून हे अनुमान स्पष्ट झालेलं आहे. या भागात बाहेरून कोणी आक़्रमक आल्याचा किंवा येथून कोणी बाहेर गेल्याचा सबळ पुरावा कुठेही आढळत नाही. आम्ही संशोधक आहोत, त्यामुळे पुराव्यानिशी जे काही आमच्या हाती येतं, ते जसंच्या तसं लोकांपुढे मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. संशोधनाने जर आधीचे निष्कर्ष चुकीचे ठरवले, तर ते मान्य करावंच लागेल ना?

धन्यवाद सर. तुमचा राखीगढीवरचा अंतिम अहवाल प्रसिध्द होण्याची वाट बघतेय, त्यामुळे बऱ्याच गोष्टी पूर्णपणे स्पष्ट होतील.

हो. खरंय. सगळेच ह्या अहवालाची वाट बघत आहेत. भारताचा इतिहास कदाचित ह्या अहवालामुळे बदलून जाण्याची शक्यता आहे.  

shefv@hotmail.com